श्याम लोंढे – ध्यास एकलव्याचा (Shyam Londhe)

0
76

श्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या दोन शाळांच्या बांधकामात आहे. श्याम लोंढे यांनी घरे, बंगले, हॉटेले आदी बांधकामांमध्ये विशेष नाव कमावले आहे.श्याम यांनी तशा कल्पकतापूर्ण, कलात्मक गोष्टी अनेक साधल्या आहेत; तेही औपचारिक शिक्षण फारसे न घेता. ते दहावी उत्तीर्ण जेमतेम झाले आहेत. कारण एवढेच, की ‘कामांपुढे तसा त्यांना पुढे वेळच मिळाला नाही!’ श्याम यांचे आयुष्य म्हणजे अनुभव, मेहनत आणि प्रतिभा यांचे सान्निध्य. त्यांच्या आयुष्याचा मंत्र सकारात्मकता हा आहे.

त्यांचे वडील ‘मेरी’मध्ये गवंडीकाम करत. ते व्ही.टी.सी.मध्ये क्राफ्ट शिकवत. ते कलाकारही होते. श्याम यांच्याकडे कलाकुसर, स्टेज यांचे आकर्षण वडिलांकडून आले. त्यांच्या आईचे निधन झाले. वडीलही अलिकडेच वारले. श्याम यांना एकूण तीन भावंडे. एक भाऊ आणि दोन बहिणी. परिस्थिती बेताची. ती मंडळी वाल्मिकनगरमध्ये राहत. श्याम यांचे शिक्षण चौथीपर्यंत नगरपालिकेच्या शाळेत आणि पाचवी ते दहावी स्वामी विवेकानंद विद्यालयात झाले. श्याम सांगतात, “आईला आम्ही विनोदाने ‘श्यामची आई’ म्हणत असू. ती मला अभ्यासाला बसवी. मी जमेल तसे इंग्रजी वाचत असे आणि तिला आनंद होई. आई दुसरी-तिसरी शिकली होती, पण मुलाने शिकावे ही मोठी इच्छा बाळगून होती.” श्याम यांचे वडील राममंदिरात कथा-कीर्तन करत.

घरात धार्मिक वातावरण होते. कलेचा शिडकावा तर सतत होत असे. शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा होत, त्यात श्याम यांना बक्षिसे मिळत गेली. त्यांना शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यास मात्र वेळ होऊ लागला तेव्हा घरातून ‘तुमचे तुम्ही बघा’ असा आदेश आला. गवंडीकाम घरी होतेच. श्याम यांनी काम पाठीवर पखाल अडकावून उंच इमारतींच्या भिंतींवर, छोट्याशा फळ्यांचा आधार घेत सुरू केले. त्या आठवणी त्यांच्या अंगावर काटा आणतात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बंगल्याच्या भिंतीवर बाहेरून तसे काम करणाऱ्या मनुष्याचे शिल्प रेखले आहे.

त्यांनी आर्टिस्ट म्हणून आरंभी ‘गावकरी’मध्ये नोकरी केली. तेथे नोकरीचे खरे स्वरूप होते ‘पडेल ते काम.’ मात्र ‘गावकरी’च्या वातावरणाचा उपयोग त्यांची वैचारिक जडणघडण होण्यास झाला. मोठे लेखक, विचारवंत, कलाकार तेथे भेटू लागले. अत्रे, औरंगाबादकर, जानोरकर यांचे संस्कार लाभले. भाषा सुधारू लागली. शालेय शिक्षणाच्या पलीकडील संस्कार मिळू लागले. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. ते ‘आस्वाद पुरवणी’, ‘अमृत’, ‘रसरंग’ या अंकांची हेडिंग्ज तयार करणे, चित्रे काढणे यांत पटाईत झाले. मुख्य म्हणजे त्यांना काम वेळेत पूर्ण करण्याची शिस्त तेथे लागली. ते डिझायनिंग, स्क्रीनप्रिटिंग शिकले. त्यांचा दिनक्रम सकाळी ‘गावकरी’ आणि संध्याकाळी नेताजी भोईर यांच्या विजय नाट्यमंडळात नाटकाची तालीम असा असे. नाटक हे त्यांचे आणखी एक वेड. तेथेही त्यांनी प्रॉम्टिंगपासून मॉबसीनमध्ये काम करण्यापर्यंत विविध कामे केली. हळुहळू अभिनयक्षेत्रातही त्यांचा मुक्त संचार सुरू झाला, नाटकात मुख्य भूमिका मिळू लागल्या. श्याम यांनी त्यांची मोठी बहीण, मेहुणे व काही मित्र मिळून ‘कलाकौस्तुभ’ नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी ‘आधे-अधुरे’ नावाचे मूळ हिंदी नाटक सादर केले. त्यांच्या मराठी नाटकाला राज्य नाट्यस्पर्धेत सात-आठ बक्षिसे मिळाली.

ते मूर्तिकलेतही रमले तेव्हा ‘गावकरी’ सोडले. लोक त्यांना ‘मूर्तिकार श्याम लोंढे’ म्हणून ओळखू लागले. त्यांनी नाशकातील पहिला अश्वारूढ पुतळा बनवला. त्यांनी वाल्मिकनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीची मोठी मूर्ती तयार केली. त्यावेळी तीनशे रुपये मानधन मिळाले. मूर्तिकार म्हणून काम करताना त्यांचे मन भरत होते, पण पोट भरणे शक्य नव्हते. बहीण माघारी आली होती. ती ‘महिला हक्क समिती’मध्ये कुसुम पटवर्धन यांना मदत करत असे. श्याम यांनी रविवार कारंज्यावरील सार्वजनिक गणपतीत केलेला देखावा खूप गाजला. तो त्यांनी हुंडाबळीचा संदर्भ घेत तीन मुलींच्या आत्महत्येची वास्तवातील घटना असा चितारला होता. त्या देखाव्याला पाच बक्षिसे मिळाली. तरीही तो व्यवसाय पैसे मिळवून देईना. मूर्तिकामाची त्यांना ओढ होतीच. ते गणपतीच्या मोठ्या मूर्ती करू लागले.

त्यांच्या दहावीच्या वाऱ्या चालूच होत्या. ते गणितात कधीतरी एकदा पास झाल्यावर दहावीचा शिक्का त्यांच्या कपाळावर बसला! दरम्यान, त्यांना नवेच क्षेत्र गवसले. ‘नीलांबरी’ हा घोलपदादांचा चित्रपट आला. श्याम यांनी त्याचे कलादिग्दर्शन केले. तो त्यांना नाटक आणि सिनेमा यांतील फरक कळून देणारा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा अनुभव होता – सोमेश्वर धबधब्यावर झोपडी करायची होती. पन्नास डिझाइन्स केली. किरवंत ब्राह्मणाचे घर करायचे होते. त्र्यंबकला शूटिंग होते. आयुष्य वेगवेगळ्या वळणांवरून जात होते. तेव्हाच त्यांनी जयश्री पवार या लहानपणापासूनच्या मैत्रिणीशी लग्न केले. लग्नास घरच्यांचा विरोध, त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले. आयुष्य अधिक खडतर झाले.

ते चित्रकला महाविद्यालयात जात असत. तेथे रविकिरण मोरेसरांचे मार्गदर्शन लाभले. श्याम विद्यार्थ्यांचे काम बघत असत, त्यातून शिकत. रंगांची-रेषांची ओळख अधिक होऊ लागली. दहावी झाल्यावर रीतसर प्रवेश घेण्यास गेले तर मोरेसर म्हणाले, “तुझे तर नाव झाले आहे आता, तू का वेळ फुकट घालवतोस प्रवेश घेऊन?” अनेक आर्किटेक्ट मित्र होते… मूर्तिकाम करताना फायबरचे महत्त्व लक्षात आले होते. फायबर ग्लास मेटलमध्ये काम करायला हवे हे कळले. मग त्यांचे स्वतःचे संशोधन सुरू झाले. संजय खत्री यांची कंपनी अंबडला होती. श्याम त्यांना भेटण्यास तेथपर्यंत चालत गेले! कारण बससाठी पैसे नव्हते. संजय खत्री यांनी सगळे ऐकून घेतले. त्यांना श्याम यांना फायबर वापरून मूर्तिकाम, फर्निचर करायचे आहे हे ऐकून कुतूहल वाटले आणि त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. श्याम ते काम काही दिवस पायी जा-ये करून शिकले. ते म्हणतात, “मी शिकाऊ मंडळींना अभिमानाने सांगतो, मी अंबड रिटर्न्ड आहे!” त्यांनी शहा नावाच्या माणसाच्या मदतीने फायबरची फॅक्टरी सुरूही केली. पण ती सुरू होता होताच बंद झाली. आणि नंतर योग जुळून आला, तो मात्र त्यांचे आयुष्य बदलणारा ठरला. वामनराव लोखंडे या बिल्डरांना त्यांच्या सिल्व्हर टॉवरमध्ये डोम टाकायचा होता. श्याम यांनी त्यांना ‘काच काय अॅक्रिलिकही वापरू नका’ असे म्हणत त्यातील धोके समजावून दिले. लोखंडे यांना ते पटले आणि श्याम यांना फायबरमध्ये डोम निर्माण करण्याचे पहिले काम मिळाले. ते जमले, यशस्वी झाले आणि श्याम ‘फायबर डोमवाला’ म्हणून प्रसिद्धी पावले. ते पत्रे, शेड, म्युरल्स तयार करणे अशी कामे करत. त्यांना त्यांचा लहान भाऊ दीपक मदत करी. त्यांनी स्वतःची ‘क्रिएशन असोसिएट्स’ ही कंपनी २००० मध्ये सुरू केली आणि मग मागे वळून पाहिले नाही. त्यांनी जत्रा, वैभव, पूजा, रुद्र आदी हॉटेल्सचे काम केले आहे. बंगले, दुकाने, फ्लॅट्स यांच्या आरेखनाची मोठी कामे तर त्यांच्या नावावर अगणित आहेत.

त्यांच्याकडे एकदम, एक मोठी संधी चालून आली. त्यांना मोटार सुशोभीकरणाचे काम हाताळणाऱ्या ‘हिरा-मोती’चे काम मिळाले. दोन कोटी रुपये खर्च करायचे होते. श्याम सांगतात, “एक कोटी म्हणजे शंभर लाख ना? असे मी त्यांना प्रांजळपणे विचारले होते. मी त्यांना ‘हो’ म्हणण्यापूर्वी सात दिवसांची मुदत मागून घेतली. मला माझी कुवत अजमावायची होती. त्या काळात खूप स्केचेस काढली. नवीन काय करता येईल याचा विचार केला. ते काम मिळाले.”

शांताराम नागरे हा हुशार आणि गुणी विद्यार्थी त्या टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आला. तो निफाड तालुक्यातील सारोळेथडी या छोट्याशा खेड्यातून खडतर परिस्थितीत नाशिकच्या कला महाविद्यालयात शिकण्यासाठी आला होता. त्याची खासीयत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे ही आहे. तो श्याम यांचा जणू उजवा हात बनून गेला. त्याच्याकडे डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईनिंग, बी.ई. इन सिव्हिल इंजिनीयरिंग, एम.टेक. इन ‘टाऊन अॅण्ड कंट्री प्लॅनिंग’ अशी प्रमाणपत्रे आहेत. श्याम यांना तो प्रत्येक कामात मोलाची मदत करत आहे.

श्याम यांनी आणखी एक मोठे आव्हान स्वीकारले. त्यांनी नाशिकजवळ पाडली येथे हिराई नावाचा एक प्रकल्प हाती घेतला. त्यांना मोठा डोंगर खुणावत होता. त्यांचे डोंगर डिझाईन करण्याचे ते पहिले काम. तेथे मोठे फार्म हाउस करायचे, झाडे लावायची… अशी योजना होती. डोंगरात माती कमी, सगळा खडखडाट, पाणी नाही, श्याम यांनी चरे खणले, पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा आजुबाजूच्या जमिनींना झाला. मग तलाव, विहिरी खोदणे यांचा आधार घ्यावा लागला. त्यांनी सात विहिरी खणल्या. पाण्याचा प्रश्न सुटला. डोंगरातील मातीतूनच कंपाउंड केले. आंबा, काजू, जांभूळ, फणस, पेरू अशी साठ-सत्तर हजार फळझाडे लावली. संपूर्ण भोवतालात उन्हाळ्यात हिरवागार दिसणारा तो एकच डोंगर!

श्याम यांचे ऑफिस सुशोभित आहे. त्यांनी स्वतः त्याचे इंटीरिअर केले आहे.  चंद्रकांत निकम तथा सी.पी. शेट यांच्या सहकार्यामुळे ऑफिसचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांचा बालनाट्याचा विद्यार्थी सचिन जोशी भेटला आणि श्याम, सचिन जोशी आणि शांताराम या त्रिकुटाच्या कल्पनाशक्तीला जणू बहर आला. तिघांनी ‘चाके शिक्षणाची’ ही सचिनची कल्पना साकार करणारी बस निर्माण केली. ती अनोखी बस वस्तीवस्तीतील मुलांपर्यंत शाळा घेऊन जाते. तिची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. भारतातील ती तशी पहिली बस! ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या सचिन जोशी यांच्या दोन अनोख्या शाळा निर्माण करताना तर श्याम यांच्या निर्मितिक्षमतेचा कस लागला आहे. मोकळ्या आणि नैसर्गिक जीवनशिक्षणाशी जुळणारे वातावरण राखत सर्व आरेखन करणे हे मोठे आव्हान होते. त्या दोन्ही शाळा दिमाखात उभ्या आहेत! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या ‘कंप्युटर ऑन व्हील’ या प्रकल्पासाठी श्याम यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

श्याम त्यांची पत्नी जयश्री, कन्या लावण्या, मुलगा शुभम यांच्यासह नव्या बंगल्याच्या वाटेने मार्गक्रमण करत आहेत. तो बंगला म्हणजे एक अस्सल कलाकृती नसली तरच नवल! तो पूर्णपणे ‘इको फ्रेंडली’ असणार आहे. भारतातील तो पहिला-दुसरा प्रयोग आहे. श्याम यांनी त्यात भाजलेल्या विटांचा वापर केलेला नाही, पोकळ विटा तयार करून त्या वापरल्या आहेत आणि त्यात भरला आहे नामशेष न होणारा खूप सारा थर्माकोल आणि तसेच, हट्टी प्लास्टिक. श्याम सांगतात, “आमच्या कुटुंबाने आजवर जेवढा कचरा निर्माण केला असेल त्याहून जास्त कचरा गोळा करून मी पर्यावरणनाशाची भरपाई केली आहे. त्यामुळे घराचे तापमान योग्य राखण्यालाही मदत होणार आहे.”

श्याम यांच्या कामांची ही सर्व वाटचाल. त्यात मुख्य वळण येते ते त्यांच्या एका मोठ्या स्वप्नाचे. ते स्वप्न प्रथम पाहिले दादासाहेब फाळके यांनी – नाशिकमध्ये फिल्म सिटीची निर्मिती! त्या कामाला सरकारी सहकार्याने पुढील वर्षभरात सुरुवात होईल. जीवनशिक्षण म्हणजे नक्की काय हे श्याम लोंढे यांच्या कृतिपूर्ण आयुष्यातून दिसून येते. माणसाच्या अंगी गुण असतील आणि त्याने मेहनत घेतली तर तो सफल आयुष्य जगतो. शिक्षण हे त्याकरताच तर असते ना?

श्याम लोंढे 9923745237,shamcreation@gmail.com

अलका आगरकर 7776 948 231,alka.ranade@gmail.com

About Post Author