शैला यादव – परिवर्तनाची पायवाट

_ShailaYadav_ParivartanachiPayvat_1.jpg

जन्मत:च पायाशी घट्ट बांधून आलेला भटका उपेक्षितपणा दूर सारुन डोंबारी कोल्हाटी समाजातील शैला यादव हिने शिक्षणाची वाट धरली. रस्तो न रस्ते भटकतच राहयचे असेल तर विद्येच्या वाटेवर का भटकू नये? असा जहरी सवाल तिने तिच्या समाजापुढे ठेवला. आणि उत्तर मिळाले नाही तसं शिक्षणाचा हात घट्ट धरून ठेवला. एकामागून एक वर्ग पार करत शिक्षण मिळू लागले. समज वाढत गेली आणि तिच्या लक्षात आले, ‘आपला समाज तर कोसो दूर आहे अजून. कोठे आहे तरी कोठे तो. ना कोठल्या शाळेच्या पटात, ना कुठल्या राजकीय अजेंड्यात. हातात मोबाईल आणि घरात टीव्ही आला असेल. लोकांनी गावोगाव फिरायचं सोडून एकाच ठिकाणी मुक्काम टाकला असेल, पण आहे काय त्याच्याकडे? ’हे वाटणं तिला अस्वस्थ करून गेले आणि शिकत असतानाच शैलाने ठरवले. आपल्या समाजातील येणा-या पिढ्यांच्या शिक्षणासाठी काम उभे करणे. प्रबोधनाची परंपरा असणा-या महाराष्ट्रात जातीच्या उतरंडीत दूरवर फेकल्या गेलेल्या आपल्या डोंबारी कोल्हाटी समाजात पहिले काम प्रबोधनाचे करायचे. वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी शैलाने ‘समावेशक सामाजिक संस्था’ सुरू केली आहे. तिच्या संस्थेचे नावही किती बोलके आहे. समावेशक. तिचे हे नाव द्विअर्थी आहे. ज्या समाजाच्या परिघाबाहेर आम्ही दूर फेकलो गेलोय तिथे सामावून जाण्याची अभिलाषा आणि भटक्या विमुक्तांच्या सर्व जातींनी भेदाभेद न करता एकत्रितपणे समतामुल्य समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे.

शैला संस्थेच्या माध्यमातून बचत गटांची निर्मिती, रोजगार मार्गदर्शन, हुंड्याचा नायनाट करण्यासाठी कार्यक्रम असे विविध उपक्रम करत आहे. मुलांमध्ये शिक्षणाची आवड, शिक्षणाविषयीची मानसिकता तयार करण्यासाठी तिने खटाव तालुक्यातील औंध, इंदिरानगर, सुफेसावळी, वडूज येथे महात्मा फुले अभ्यासवर्ग सुरू केला आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षण घेताना भटक्या विमुक्त मुलांना फार अडचणी येतात. एकतर भाषा वेगळी असते आणि दुसरे गावकुसाबाहेर राहणारी मुलं म्हणून हेटाळणी यामुळेही मुले मागे पडतात. स्वअनुभवातून आलेल्या या शहाणपणामुळे शैलाने हे अभ्यासवर्ग सुरू केले आहेत. आपल्या कामाची दिशा पक्की व्हावी म्हणून शैलाने एक महत्त्वाचं पाऊल उचलले. सध्या ती ‘दुष्काळी भागातील भटक्या विमुक्त महिलांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक व आरोग्याचा स्तर’ या विषयावर फिल्डसंशोधन करत आहे.

शैला डोंबारी कोल्हाटी समाजातली. डोंबारी कोल्हाटी म्हणजे कसरतीचे खेळ खेळणारे आणि तमाशा फडात कला सादर करणारे. या समाजातील महिलांनी तमाशाच्या फडात नाच-गाणे सादर करणे हे यांच्या जगण्याचे मुख्य स्त्रोत. याशिवाय केव्हातरी तुम्ही ‘घे सुया, घे फणी, घे बिबा’, ‘वरवटा पाटा घे माय, पोलपट लाटणं घे’ अशा हाका ऐकल्या असतील. शहरात फार नाही पण गावाकडे आजही अशा हाका देत या डोंबारी कोल्हाटी बायका दिसतात. तारेवरून तोल सांभाळत चालणारी, बारक्याशा रिंगणातून शरिराचे मुटकुळं करून बाहेर येणारी कच्चीबच्ची आणि त्यांच्याभोवती ढोल वाजवत फिरणारे त्यांचे मायबाप हे चित्र हमखास कुठल्याही शहराच्या नाक्यावर, गावकुसावर पाहिले असेलच. शैलाचा जन्म या समाजातला. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात खटाव गावात डोंबारी माळ म्हणून वस्तीत शैलाचे कुंटुब वास्तव्याला आहे. या वस्तीत डोंबारी, कोल्हाटी, पारधी, कैकाडी अशा वेगवेगळ्या भटक्या विमुक्त माणसांची वस्ती आहे.

शैलाच्या कुटुंबात आई वडिल. दोन भाऊ आणि दोन बहिणी. आई धुणेभांड्यांचे काम करी. वडिल बैलांच्या शिंगांना धार लावून देणे, रवी, लाटणे, ढोलकी बनव अशी कामे करत. घरात अठराविश्वे दारिद्रय. अशा भवतालात शैलाचे शिक्षण सुरू झाले आणि सुरू झालेले हे शिक्षण टिकविण्यासाठी अगदी पाचवीपासून तिला एका पार्टीसोबत गाणे म्हणण्यासाठी जावे लागायचे.

_ShailaYadav_ParivartanachiPayvat_2.jpgशैला आपल्या शिक्षणाविषयी सांगते, आमच्या समाजाता तमाशात नाचणे गाणे हे तसे कॉमन. पण आमच्या घरात ही परंपरा नव्हती. आई धुणं भांड्याचे काम करायची. चांगल्या घरात कामे करत असल्याने तिलाही वाटायचं की आपल्या मुलांनी शिकावे. माझ्या मोठ्या भावडांना मात्र आवड नाही वाटली. मला मात्र शाळेत जायला आवडायचे. फक्त अभ्यास आवडत होता अशातला भाग नाही. पण शाळा बरी वाटायची. आमच्या वस्तीतल्या पोरी आम्ही परिसरातल्या कन्या शाळेत जायचो. तिथे सधन घरातल्या मुलीही यायच्या. त्यांचे वागणे, बोलणे आवडायचे. म्हणूनही शाळेत जात होते. पण शिक्षणाच्याबाबतीत सगळीच बोंबाबोंब. आमच्याकडे शिक्षक लक्ष द्यायचे नाहीत. वस्तीतली भाषा आणि शिकण्याची भाषा वेगळी होती. शिक्षकसुद्धा आमचं हात धरून आम्हाला काही समजावत असे झाले नाही. पण ती भेदाभेद कळावी इतकी समज नव्हती. शाळा बरी वाटायची. सुदैवाने आमच्या परिसरात संभाजीराजे देशमुख आश्रमशाळा सुरू झाली. भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी ही शाळा होती. आईने मला या शाळेत घातले. इथे सगळीच आमची भाषा बोलणारी होती. मुलंही कमी असल्याने शिक्षकांचे आमच्याकडे लक्ष वाढले आणि मुळात आवडणारी शाळा अधिक आवडू लागली. आईने तर मग मला आश्रमशाळेच्या हॉस्टेलवरच ठेवले.’

याच सुमारास आणखी एक गोष्ट घडली. शैलाच्या पाचवीच्या सुट्टया सुरू असताना, त्यांच्या वस्तीवर एक जोडपं त्यांच्या पार्टीत गाणे म्हणण्यासाठी एक मुलगी आहे का हे पाहण्यासाठी आले होते. शैला चुणचुणीत. तिचा आवाजही चांगला. त्यांनी तिला सोबत घेतले. सुरवातीला आई वडिलांना ते नको वाटत होते पण पैसे मिळू लागले. हातभार होऊ लागल्यावर वडिलांनी फक्त पार्टी चांगली आहे का याची खात्री करून घेतली. पार्टी चांगली सुशिक्षित होती. त्या कुटुंबातील मुलं मुलीही शिकत होती. त्यामुळे शैलाच्या शिक्षणात त्यांनी आडकाठी आणली नाही आणि तिचं शिक्षण सुरू राहिले. ‘मला काही कळत नव्हते. रसही नव्हता. पण हळुहळू त्यांच्या घरातल्या वातावरणात मिसळून गेले. शाळेच्या सुट्टयांत तर त्यांच्याकडे राहायलाच असायचे. इतरवेळी अपडाऊन करायचे.  शाळेनंतर कॉलेजही सोडू दिले नाही, त्या भल्या माणसांनी. मग तर रोजचे अपडाऊन सुरू झाले. वस्तीतील लोक मात्र नाके मुरडायची. नावे ठेवायची. कशाला पाठवता. लोक गैरफायदा घेतील. तिकडे काय करते ती असे खूप बोलायचे. मला वाईट वाटायचे. मग एक दिवशी त्या कुटुंबातल्या ताई म्हणाल्या, ‘फडावर, तमाशातल्या बायकांचे हाल बघतेस ना. कुणी कमरेत चिमटे काढते. कुणी हात धरते. कुणी अंगाला हात लावते. त्यापेक्षा या शिव्या कितीतरी सुसह्य आहेत.’ ही गोष्ट माझ्या डोक्यात फिट बसली. मला त्या पेचात अडकायचे नव्हते मग शिकण्याचे अगदी मनावर घेतले. त्यातच ग्रॅज्युएट झाले. बासष्ट टक्के मिळाले होते. बी. एड. करायचे होते म्हणून तसा फॉर्मही भरला. पण आमच्याकडे कुठे आली कागदपत्रे. मला शाळेत घालण्यासाठीच आईच्या घरमालकीणीने कसाबसा दाखला बनवून दिला होता. तेवढाच एक कागद. जातीचा दाखलाही नव्हता. गाडी तिथेच अडली. मित्रांमध्ये चर्चा करताना कुणीतरी सांगितले. एमएसडब्ल्यू केल्यावर लगेच नोकरी लागते. मला नोकरीची गरज होती. म्हटले चला ही काय भानगड आहे ती शिकूया आणि नोकरीला लागूया. अशा सरळ विचारानं साता-याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ’

‘मास्टर इन सोशल वर्क’ शिकेपर्यंत शैलाला समाजातले प्रश्‍न, जातीभेद, समतावाद, वैचारिक भूमिका, चळवळी हे काहीच माहित नव्हते. सुरवातीला इंग्रजीतून सुरू झालेले शिक्षण तर तिला डोक्यावरून जात होते. शिवाय ती डोंबारी कोल्हाटी आहे. पार्टीत गाणे म्हणायची ही गोष्टही कॉलेजमध्ये पसरली. त्यावरून कुजके बोलणे सुरू झाले. शिक्षण सोडून द्यावे असेही तिला वाटत होते. पण हळुहळू विषय कळू लागले. तेथील शिक्षकांनी तिचे शिकणे किती महत्त्वाचे आहे हे तिला समजावून सांगितले. आणि भाषेची अडसर संपली. विषय समजू लागले, तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवले की आपला समाज तर किती कोसो दूर आहे. तो वास्तवाला गावकुसाच्या-शहरांच्या परिघावर आहे. खरे पण आचारविचारानेही तो परिघावरच आहे. न्याय-अन्याय, आपले भले बुरे इतकं समजण्याचीही समज त्यांच्यात विकसित झालेली नाही. मजूरी नाही तर कला सादर करण्यापलिकडे यांना विश्‍वच नाही. ती अस्वस्थ झाली आणि त्यातूनच तिने एम. ए. च्या दुस-या वर्गात असताना समविचारी मित्र-मैत्रिणींसोबत तिने ‘समावेशक’ ही संस्था सुरू केली. महिलांचे मेळावे घेणे, बचत गट निर्माण करणे, शिक्षणाविषयी प्रबोधन, व्यावसायिक प्रशिक्षण असे एकमागून एक उपक्रम ती घेऊ लागली.

दोन वर्षासाठी तिने पुण्यात ‘निर्माण’ या संस्थेसोबत कामही केले. भटक्या विमुक्तांच्या अनेक प्रश्‍नांवर ही संस्था काम करते. इथे तिच्या जाणिवा अधिक रूंदावल्या. दुसरीकडे तिच्या राहत्या वस्तीत कामही सुरूच होते. सुरूवातीला बायका स्वत:ची बचत करण्यासाठीही येत नव्हत्या. पण सातत्याने प्रयत्न करून तिने बचत गट तयार केले. हुंड्यासारख्या प्रथेचा नायनाट करण्यासाठी खंबीरपणे उभी राहिली. ‘शैला लग्न मोडते’ असं म्हणून लोके तिला नावे ठेवायची पण ती मागे हटली नाही. आज तिच्या परिसरात हुंडा घ्यायला कुणीही धजावत नाही. इस्लामपुरमधील जातपंचायत बरखास्त करणा-या कार्यकर्त्यांत शैलादेखील सक्रिय होती.

आज शैलाच्या कामाचा मुख्य भाग शिक्षण असा आहे. ती म्हणते, ‘आज शासनदरबारी चांगल्या योजना असल्या तरी त्यासाठी किमान शिक्षणाची अट असते. मग आमची मुले शिकलेलीच नसतील तर उपयोग काय? शाळाबाह्य मुले नाहीत हे कागदोपत्री ठीक. पण प्रत्यक्ष आयुष्याचे मातेरे होणा-यांविषयी सहानुभूती कधी दाखवणार. मुले शाळेत जात नाहीत कारण तिथली भाषा, तिथले वातावरण त्यांना त्यांच्यासारखे वाटत नाही. म्हणूनच महात्मा फुले अभ्यासवर्ग सुरू केला. इथे फक्त भटके विमुक्तांनी यावे असे अजिबात नाही. ज्यांना अभ्यासाची आवड आहे अशा सगळ्यांना मुक्त प्रवेश आहे. ऍक्टीव्हिटी करण्यासाठी शिक्षण घेतो. समज वाढवण्यासाठी इथे प्रयत्न करतो. दुसरे आमच्या समाजात हाताला काम नाही. शेती नाही. ती कसताही येत नाही. म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणवर्गही घेते. मी लोकांच्या हातांना काम देऊ शकत नाही पण दिशा देऊ शकते. प्रबोधन करू शकतो. प्रशिक्षण देऊ शकतो. ते काम करत आहे. आता एक फिल्ड संशोधन हाती घेतले आहे. ‘इको नेट’ या संस्थेने फेलोशिप दिली आहे. दुष्काळी भागातील भटक्या विमुक्त महिलांचा अभ्यास आहे. माझ्या स्थानिक माण तालुक्याच्या भागाचा अभ्यास करत असल्याने मला त्याचा उपयोग प्रत्यक्ष कामासाठी होणार आहे. नेमके प्रश्‍न, नेमका स्तर, गुंतागुंत समजेल. त्यातून मग इथल्या मुलांसाठीचा शिक्षणासाठीचा एक पायलट प्रोजेक्ट मला हाती घेता येईल.’

एम. ए. करेपर्यंत पुस्तकेही न वाचलेल्या शैलाकडे आज दोन हजार पुस्तके आहेत. लोकांच्या भेटीतून तिने ही पुस्तके मिळवली आहेत. वाचन फार महत्त्वाचे आहे हे तिला कळायला वेळ लागला याची आज तिला चुटपूट आहे. ती चुटपूट दूर करता यावी आणि हा आनंदून टाकणारा अनुभव आपल्या समाजातल्या मुलांना बालवयातच मिळावा यासाठी शैलाचे काम सुरू आहे.

शैला यादव – 9552626501

– हिनाकौसर खान

About Post Author

Previous articleज्ञानप्राप्तीची शोधयात्रा
Next articleहस्ता गाव (Hasta)
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200