शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय

0
443

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी ग्रंथसंपदा आहे…

समृद्ध ग्रंथालये ही निकोप समाजमनासाठी आवश्यक असे जीवनसत्व होय. त्यातून मिळणाऱ्या पोषणमूल्यामुळे समाजमन हे सुदृढ होत असते. त्यामुळे ग्राम वाचनालयांचा प्रभाव हा त्या त्या गावाच्या सामाजिक जडणघडणीवर झालेला जाणवतो.

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. तसेच, ते तेथील सामाजिक-सांस्कृतिक वैभव व संचित ठरले आहे. ते वाचनालय 1947 पर्यंत – स्वातंत्र्यपूर्व काळात व्हिक्टोरिया जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावाने ओळखले जात असे. भारत स्वतंत्र झाल्यावर स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांनी त्या वाचनालयाचे नामकरण ‘महात्मा सार्वजनिक वाचनालय’ असे केले. त्यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. शेवगावच्या जुन्या बाजारतळाजवळ स्वत:च्या प्रशस्त इमारतीमध्ये असलेल्या या वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे. वाचनालयाने सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची श्रीमद्भभगवतगीता, दासबोध, ज्ञानेश्वरी या धर्मग्रंथांच्या दुर्मीळ हस्तलिखित प्रती, इंग्रजी-मराठी शब्दकोश (1885) असा ऐतिहासिक ठेवा जपला आहे.

वाचनालयाचे सहाशे वाचक सभासद असून तेथे नियमित येणारे वाचक शंभरपेक्षा जास्त आहेत. ही बाब शेवगावमध्ये रुजलेली वाचन संस्कृती अधोरेखित करते. वाचनालयात स्वतंत्र बाल व महिला विभाग उपलब्ध असून तो उत्तमोत्तम आणि दर्जेदार ग्रंथांनी सुसज्ज आहे.

वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाची उपक्रमशीलता कौतुकास्पद अशी आहे. त्यात टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा, ग्रामीण भागातील गुणी आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी डॉ. पुरुषोत्तम भापकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, लेखक तुमच्या भेटीला, सांस्कृतिक आणि साहित्यविषयक कार्यक्रम, चर्चासत्रे, ग्रंथप्रदर्शने, ग्रामीण भागात असलेल्या विजेच्या भारनियमनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभ्यासिका असे उपक्रम सुरू आहेत. वाचनालयाने महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनेक नाटके सादर केली आहेत. त्या स्पर्धेत वाचनालयाचे अध्यक्ष आणि शेवगावचे सिनेस्टार गोकुळप्रसाद दुबे यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले होते. विद्यमान अध्यक्ष रमेश भारदे यांना अभिनयाचे रौप्य पदक तसेच नाट्य लेखनासाठी राज्य पुरस्कार मिळाले आहेत. भारदे यांनी महाकवी कालिदासाचे ‘मेघदूत’, भगवद्गीता आणि दत्तलहरी या संस्कृत ग्रंथांचा मराठी अनुवाद करून साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

वाचनालयाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठीतील उत्तमोत्तम लेखकसमाजसुधारक यांची छायाचित्रे दर्शनी भागात आहेत. तेथे साने गुरुजी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, राजमाता विजयाराजे शिंदे, चिं.वि.जोशी, द.मा.मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शिवाजीराव भोसले, प्रभाकर पणशीकर, विजया वाड, कवी नागराज मंजुळे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन दिलेले अभिप्राय ही संस्थेची मर्मबंधातील ठेव आहे.

वाचनालयाला राजाराम मोहनराय फेलोशिप (1987-88), महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार (1997), बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार (2007)  मिळाले आहेत. माजी ग्रंथपाल अनंत कुलकर्णी यांना एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार 2010 साली प्राप्त झाला आहे. वाचनालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने पाच लाख रुपयांचे अनुदान वाचनालयास दिले होते. त्या रकमेतून वाचनालयाने अद्ययावत असे रानडे सभागृह बांधले. त्यात बहुसंख्य साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. वाचनालय संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथील दुर्मीळ ग्रंथ आणि अभिप्राय डिजिटल स्वरुपात जतन केले जात आहेत.

अध्यक्ष रमेश भारदे, ग्रंथपाल साजिद शेख हे विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने वाचनालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहेत.

– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com

————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here