अनुया कुलकर्णी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील शेर्पे गावच्या रहिवासी. त्या ‘विकास प्रबोधिनी’ संस्थेच्या माध्यमातून वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यांत समाजातील विविध प्रश्नांवर काम करतात. अनुया कुलकर्णी यांना वक्तृत्वकला व संघटनकौशल्य हे गुण उपजत लाभले आहेत. त्यांनी स्त्रीसबलीकरण, दारूबंदी, जातीयता, रेशन हे प्रश्न असोत, की महिलांवरील अत्याचार… त्या विरुद्ध महिलांना संघटित करून आवाज उठवला. त्या फक्त दहावीपर्यंत शिकल्या असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या कामातून आणि त्यातून घडलेल्या विचारातून प्रगल्भता लाभली आहे.
अनुया कुलकर्णी यांचा जन्म १ सप्टेंबर १९६४ रोजी राजापूर तालुक्यातील केळवली गावी झाला. त्यांचे वडील पंढरीनाथ वाघाव हे ग्रामसेवक होते. त्यांनी ती नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजसेवेसाठी दिला. त्यामुळे अनुया यांनाही समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्यांनी ‘अॅक्टिव्ह फ्रेंड सर्कल’ व ‘विकास प्रबोधिनी’ या संस्थांतून काही काळ कामे केली. त्यांना ‘अॅक्टिव्ह फ्रेंड’ सर्कलचे कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांची मदत लाभली. किंबहुना, कांबळे यांच्यामुळे ‘त्या घडल्या’ असे अनुया सांगतात.
अनुया सांगतात, “परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांना स्वत्वाची जाणीव होत नाही. मीही त्यातून गेले आहे. माझे पती अशोक कुलकर्णी हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. ते आठ महिने बोटीवर असायचे. मी त्या आठ महिन्यांच्या काळात घरच्यांचा विरोध पत्करून सामाजिक काम करायचे. उच्चवर्णीय महिलांना मोकळेपणाने बोलता येत नाही. त्यांची कोंडी होते हा माझा अनुभव. त्यामुळे मला स्वत:वरून इतर महिलांचे प्रश्न दिसू लागले. सर्व ठिकाणी स्त्रीला समान अधिकार मिळावा, यासाठी चौदा सहका-यांच्या मदतीने काम सुरू केले. उच्चवर्णीय समाज तथाकथित खालच्या वर्गातील लोकांचा विटाळ पाळायचा. ‘त्या’ लोकांचे चहा पिण्याचे कपदेखील वेगळे ठेवले जायचे. अशा काळात आम्ही सर्व जातींच्या महिला एकत्र येऊन एकमेकांचे चहाचे कप अदलाबदली करायचो. जेणेकरून समाजानेही तो बदल स्वीकारावा. तसेच शेर्पे गावातील सर्व जातींच्या महिलांना एकत्र करून महिला मंडळ काढले. त्या मंडळाद्वारे समाजातील विविध प्रश्नांवर संघटितपणे लढा दिला जातो.”
अनुया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शेर्पे गावातील महिला मंडळाने पहिला लढा उभारला तो दारूबंदीचा. दारूचे नऊ गुत्ते गावात त्या वेळी होते. त्या गुत्तेवाल्यांनी मोर्चेकरी महिलांना धमकी दिली, शिवीगाळ केली, पोलिसांकरवी त्रासही दिला. तरीही, महिला दारूबंदीवर न डगमगता अडून राहिल्या, त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शेर्पे गावातील दारूचे नऊ गुत्ते बंद करण्यात आले. दारूबंदीचे ते लोण आजूबाजूच्या कुरंगवणे, बेर्ले, मणचे, साळिस्ते या गावांतही पसरले. प्रत्येक गावात महिला मंडळ निर्माण झाले. त्या मंडळांनी मिळून दारूचे पस्तीस-चाळीस गुत्ते बंद केले आहेत. मात्र अनुया कुलकर्णी ‘दारूबंदी झाली, पण आम्ही दारू पिणे बंद करू शकलो नाही’ अशी खंत बोलून दाखवतात. त्यांचा भर पुरुष सहका-यांना साथीला घेऊन व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनात्मक प्रयत्न करण्यावर आहे.
अनुया कुलकर्णी यांनी महिलांमध्ये आर्थिक सक्षमता यावी, यासाठी ‘विकास प्रबोधिनी’च्या माध्यमातून महिलांचे एकशेवीस बचत गट स्थापन केले. त्या बचत गटांच्या माध्यमातून घरगुती वापराच्या विविध वस्तू (जसे – काथ्या, पायपुसणी, वॉशिंग पावडर, सुकी मच्छी) बनवल्या जातात. त्या वस्तूंच्या विक्रीतून एका बचत गटाची वार्षिक उलाढाल सहा ते सात लाखांवर गेली आहे. बचत गटांचे स्टॉल गावागावांत व जत्रांच्या ठिकाणी लावले जातात. बचत गटांतील काही महिला स्वत: वस्तू बनवून स्वतंत्र व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांना बचत गटांकडून कर्जे देण्यात येतात. त्याव्यतिरिक्त महिलांसाठी ‘सहयोग महिला दुग्ध व्यावसायिक संस्था’ २००१ ला स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या गावांतून दूध घेऊन ते सरकारी डेअरीला घातले जाते. शिवाय, महिलांच्या सहयोग डेअरीद्वारे दुग्धजन्य अन्य वस्तूंची विक्रीही केली जाते. मुस्लिम महिला सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करत. त्यांना बाजारपेठेत बसण्यास मज्जाव केला जाई. ‘विकास प्रबोधिनी’ने मुस्लिम महिलांना बाजारपेठेत मच्छीविक्रीसाठी बसण्यास मिळावे म्हणून शासन दरबारी प्रयत्न केले. प्रसंगी मोर्चे काढले. तेव्हा त्यांना खारेपाटण, वैभववाडी, देवगड येथील मोठ्या बाजारपेठांत मच्छी खरेदी-विक्रीसाठी परवानगी मिळाली. संस्थेद्वारे महिला अत्याचाराची बासष्ट प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर बावीस परित्यक्त्या स्त्रियांचे पुनर्विवाहही करून देण्यात आले आहेत.
अनुया सांगतात, “‘विकास प्रबोधिनी’द्वारे कोणताही प्रश्न हाती घेताना तो आणखी दहा गावांचा आहे का, हे पाहून त्यावर काम केले जाते. वाढीव वीज बिलांचा प्रश्न त्यातीलच एक. संस्थेने अव्वाच्या सव्वा येणा-या वीज बिलांवर अडीच हजार महिलांचा मोर्चा २००३ ला काढला. त्यावर विचार होऊन नंतरच्या काळात मीटर रिडिंगमध्ये सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे ‘विकास प्रबोधिनी’ने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, त्यांनाही ‘सात-बारा’मध्ये स्थान मिळावे म्हणून संयुक्त घरमालकीचा उपक्रम राबवला. पती-पत्नी दोघांच्याही नावे घरे करण्याच्या त्या उपक्रमास वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यांतील बेचाळीस गावांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांपैकी चार गावांमध्ये त्या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व ठेवून कुळ कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यानुसार ‘विकास प्रबोधिनी’ने लोकांचा कुळ प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न केले, पण त्याला फारसे यश आले नाही.”
कणकवली तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये नळपाणी योजना नव्हती. त्या योजनेचे काम २००९ मध्ये सुरू झाले. ‘विकास प्रबोधिनी’च्या माध्यमातून गावागावांतील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेतली गेली. त्याचा अभ्यास करून मग पाण्याचे वाटप कसे करायचे ते ठरवले गेले. ती योजना अठरा गावांमध्ये राबवली गेली. मात्र, दोन-तीन अपवादात्मक गावे वगळली तर अन्यत्र त्या योजनेला फारसे यश आलेले नाही. तालुक्यातील तीन धनगर वस्त्यांमधील नळपाणी योजना मात्र यशस्वी झाली आहे.
कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावात धरण प्रकल्प प्रस्तावित होता. त्याचा ठराव वीस वर्षांपूर्वी झाला होता, पण त्याचे पाणी शेर्पे व बेर्ले या गावांना मिळणार होते. त्यामुळे कुरंगवणे ग्रामस्थांना ते धरण गावात नको होते. शिवाय, नाधवडे येथे उगम पावलेली सुख नदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. शेर्पे गावात धबधबाही आहे. दोन्ही बारमाही वाहतात. ते वाहून वाया जाणारे पाणी गावात नळपाणी योजनेद्वारे पुरवता येऊ शकते. वेगळ्या धरणाची तेथे आवश्यकताच नव्हती. त्यामुळे कुरंगवणे व शेर्पे गावांतील लोकांनी एकत्र येऊन त्या धरणास विरोध केला. त्यासाठी ‘विकास प्रबोधिनी’ संस्थेचे सहकार्य मिळाले. महिलांनी धरण विरोधात २०१० मध्ये मोर्चा काढला. महिलांनी धरणाच्या कामाच्या गाड्या अडवल्या. सरकारने धरणग्रस्त समितीला घेऊन पाहणी केली. शेवटी, नियोजित धरण रद्द करण्यात आले. ‘विकास प्रबोधिनी’चे व गावक-यांच्या एकजुटीचे ते यश होय. कुरंगवणेवासीयांनी नळपाणी योजनेसाठी लढा उभारला. तेव्हा दोन योजना गावाला मिळाल्या, पण त्यातही पस्तीस लाखांचा घोटाळा झाला. त्यानंतर नितेश राणे यांच्या खासदार फंडातून बाव्वन लाखांची नळपाणी योजना त्या गावाला २०१३-१४ मध्ये दिली गेली. सुख नदीला लागून असलेल्या विहिरींना मोटर पंप बसवून गावाला पाणीपुरवठा केला गेला.
अनुया कुलकर्णी २००५ मध्ये महिला राजसत्ता आंदोलनाच्या कामात सक्रिय झाल्या. अनुया कुलकर्णी ‘सिंधुदुर्ग जिल्हा महिला विकास संघटने’च्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी ‘पंचायत समिती’ची निवडणूक लढवली. त्यात अनुया यांना अपयश आले. तेव्हा संघटनेने निवडणूक लढवण्यापेक्षा गावपातळीवर महिलांची राजकीय सक्षमता, सहभाग वाढवण्याकडे लक्ष देण्याचे ठरवले. गावातील स्त्रियांनीच राखीव जागांवर स्त्रियांची निवड करण्याचा प्रयोग काही गावांत केला. त्या वेळी शेर्पे गावी आठ महिला बचत गटांचा त्यांना पुढाकार लाभला. सरपंच व महिला प्रतिनिधी यांची निवड एकमताने व बिनविरोध केली गेली. ती निवड गावाला स्वीकारावी लागली. त्याच प्रकारे कुरंगवणे गावीही सरपंचाची निवड करण्यात आली. संघटना विरोध होण्याचे प्रसंग, वादविवाद व कौटुंबिक अडचणी यांमुळे राजकीय पदावरून दूर होण्याचा विचार करणा-या स्त्रियांना मदत करते.
रेशन कार्डधारकांचे प्रश्न बरेच होते. अनुया कुलकर्णी यांनी त्या प्रश्नांवर २००६ मध्ये काम सुरू केले. रेशन दुकानावर धान्याचा अपहार होत होता. रेशन दुकानावर बोर्ड लावले जात नव्हते. पावती मिळत नव्हती. केशरी कार्डधारकांना रेशन मिळतच नव्हते. ग्रामसभेत गावातील लोक रेशन प्रश्न उपस्थित करत. तेच “ग्राम दक्षता समिती’त वर्षानुवर्षे सदस्य होते. तीच स्थिती तालुका-जिल्हा पातळीवरही होती. त्यामुळे अनुया यांना त्यावर नेमके काय करावे ते कळत नव्हते. अनुया यांनी रेशनचा प्रश्न ‘महिला राजसत्ता आंदोलन’च्या मीटिंगमध्ये मांडला. त्याच दरम्यान ‘कोरो’ संघटनेद्वारे त्यांची फेलो म्हणून निवड झाली. अनुया यांना ‘कोरो’कडून काम कसे करावे व कामाची पद्धत याविषयी माहिती मिळाली. त्याद्वारे त्यांनी महिलांमध्ये जागृती केली. त्या जागृतीचा दबदबा एवढा निर्माण झाला, की गावातील रेशन व्यवस्था सुरळीत झाली. कधी चुकून रेशन मिळाले नाही तर लोक तक्रार वहीत तक्रार करू लागले. ‘रेशन दक्षता समिती’च्या मीटिंगा घेऊ लागले. केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळू लागले. नंतरच्या काळात ब-याच लोकांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभही मिळाला.
‘विकास प्रबोधिनी’ला कोणाकडूनही फंड मिळत नाही. संस्थेचा खर्च फेलोशिप व लोकसहभाग यांतून भागवला जातो. चौदा कार्यकर्त्या मिळून संस्थेची धुरा सांभाळतात. फेलोशिप घेतलेल्या नऊ जणी आहेत. अनुया कुलकर्णी यांना सामाजिक कार्याबद्दल ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
– अनुया कुलकर्णी ९४२१७९४८५६
– वृंदा राकेश परब
Khup chan kam aahe vahini…
Khup chan kam aahe vahini.congee chu lagoon
अनुयाताई धडाडीच्या लिडर…
अनुयाताई धडाडीच्या लिडर अाहेत , त्यांच्या कार्यास सलाम… शुभेच्छा!!
Comments are closed.