शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था

carasole

शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना अडीअडचणीत मदत करणे हा आई-वडिलांचा स्वभाव होता. त्यामुळे शुभदा प्रेमात पण कडक शिस्तीत वाढल्या.

त्यांनी शिक्षण चालू असताना थोडे अर्थार्जन केले. त्या साड्यांवर टिकल्या भरणे, साडीच्या पदराला जाळी गोंडे करणे अशी कामे करत. त्यांना त्या कामांत आई मदत करत असे. तयार माल दुकानात पोचवण्याचे काम करावे लागे. ते काम वाढले तेव्हा त्यांनी आजुबाजूच्या गरीब गरजू महिलांना काम दिले. वीसपर्यंत महिला ते काम करत एवढा व्याप वाढला. त्यामुळेच त्यांना सामाजिक जाणीव आली आणि उपक्रम फलदायी पद्धतीने चालवण्याचे शिक्षण मिळाले.

सेवादलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमलताई गरुड यांचे त्यांच्या घरी येणे असे. त्यांनी शुभदा यांना घराबाहेर पडून काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचा विवाह १९६३ साली सेवादलातील कार्यकर्त्याशी झाला. ते कुटुंब एकत्र होते. घरात खूप माणसे, त्यामुळे पूर्ण वेळ घरकामात जाई. सासुबाई फार प्रेमळ होत्या; जोडीदारही समजूतदार होता. तसेच ते स्त्रीचा आदर करत.

शुभदा यांनी अनेक मोठ्या लोकांची भाषणे ऐकली. त्यातून त्यांना बौद्धिकतेचा लाभ झाला असे त्या म्हणतात, ”अनुताई लिमये, कमलताई पाध्ये, आवाबेन, भाई वैद्य, प्रमिला दंडवते, नाथ पै, मृणाल गोरे, सुधाताई व सदानंद वर्दे, नानासाहेब गोरे, बापू काळदाते, एस.एम.जोशी या सर्वाना मी जवळून पाहू शकले. त्या मान्यवरांच्या विचारांनी मी संस्कारित झाले. त्यामुळे माझ्या जीवनात, विचारांत आमूलाग्र बदल झाला; जीवन जगण्याची नवीन दिशा मिळाली.” असे शुभदा कृतज्ञभावाने सांगतात. त्यांना आवाबेन, अनुताई, कमलताई ह्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना नव्या प्रेरणा मिळाल्या, त्यांचे जीवन बदलून गेले.

पुण्यात पोलिओची साथ १९६७ साली जोरात सुरू झाली. आवाबेन देशपांडे यांनी शुभदा यांना पोलिओकरता आरोग्य केंद्राची सचिव करून टाकले. तेव्हापासून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. शुभदा यांचा पोलिओ सेंटरमुळे प्रत्येक कुटुंबाशी तीन-चार महिने संपर्क असायचा. त्या संपर्कातून त्यांच्याशी जवळिक निर्माण झाली. त्यातून त्यांना महिलांचे प्रश्न समजत गेले. त्यांनी महिला व मुले यांच्या प्रबोधनासाठी काम सुरू केले. पंचवीस मुलांची पहिली बालवाडी मंगळवार पेठेत सुरू झाली. त्यानंतर तशा तीन बालवाड्या भरू लागल्या. त्याचबरोबर महिला व मुले यांच्यासाठी वाचनालय सुरू केले. शिवणवर्ग, कथामाला, गृहिणी शिक्षणवर्ग, निरनिराळ्या विषयांवरील व्याख्याने असे अनेक उपक्रम… उद्देश हाच, की त्यांच्या ज्ञानात भर पडावी व विचारांत योग्य तो बदल व्हावा. मंगळवार पेठेतील मूळ जागा अपुरी पडू लागली तेव्हा ‘२०० मंगळवार पेठ गाडीतळ’ येथील जागा लाँग लीजवर घेतली. त्या जागेची पायाभारणी केली आणि त्याच दरम्यान, त्यांचा आधार असलेल्या आवाबेन कॅन्सरने वारल्या. पण लोकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. त्यामुळे हॉल बांधला गेला. त्याच वास्तूचे ‘आवाबेन नवरचना संस्था’ असे नामकरण झाले. ती संस्थेची औपचारिक सुरुवात!

बालवाड्या, शिक्षणवर्ग, कथामाला, ग्रंथालय, आरोग्य केंद्र, बालमार्गदर्शन, बाल चिकित्सालय, बालसंगोपन, कौन्सेलिंग सेंटर, बहुउद्देशीय महिला केंद्र, संस्कार वर्ग अशी कल्याणकारी कामे संस्थेत चालतात. समाजवादी महिला सभेचे उद्योग केंद्रही सुरू होते. वनाझ व फिलिप्स तर्फे कामे मिळाली. दोन सत्रांत साठ महिला पार्टटाईम काम करत. त्यामुळे महिलांना घर सांभाळून अर्थार्जन करता येई व कुटुंबाला आधार होई.

‘सामाजिक संस्थांनी पैसे मिळवून देण्याचे मशीन बनू नये तर रचनात्मक कार्यावर भर द्यावा’ असा विचार अनुताई व्यक्त करत. त्यानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे. लोक कौटुंबिक सल्ला केंद्रात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येत असतात. काही समस्या भयानक असतात. कोणाचाही संसार न मोडता तो उभा कसा राहील याचाच प्रयत्न संस्थेत होत असतो. समुपदेशानाचे प्रयत्न होतात. शुभदा यांनी मोडलेले अनेक संसार पुन्हा उभे करून दिले आहेत. त्यासाठी सतत संबंधित कुटुंबाच्या संपर्कात राहवे लागते. शुभदा म्हणतात, कुटुंबे सुखात नांदताना बघून फार आनंद होतो. काही वेळेस लोकांचे प्रश्न ऐकून मन सुन्न होते व मनात विचार घोळू लागतो, की माणूस खरेच कोठे चाललाय? माणसाची ढासळत चाललेली नीतिमत्ता समोर येते. साध्या साध्या गोष्टींचे भांडवल करून मोडणारे संसार पाहण्यास मिळतात. ह्या कार्यांतून आम्हाला विविध अनुभव तर मिळतातच, त्याचबरोबर असे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत.

संस्था पुणे जिल्ह्यात खेडोपाडी जाऊन शिबिरे घेत असते. वक्ते त्यांचे विचार नाना विषयांवर मांडतात. विषयांचे गांभीर्य ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले जाते. लोकांच्या विचारांना चालना मिळाली, की आपोआप सुधारणा घडू लागते.

आलेल्या केसेस:

केस १. खोडदची एक माहेरवाशीण, पैशासाठी सासूने, नवऱ्याने मुंबईतून मारेकरी आणून तिचा खून केला. तिच्या प्रेताला माहेरच्या अंगणात आणून टाकले. तिला तीन लहान मुले- छोटे बाळ आठ महिन्यांचे. त्याला प्रेतासोबत ठेवले. ह्या कृत्याबद्दल आवाज उठवला. गावात सभा घेतल्या. तिच्या नातलगांच्या मनाची तयारी केली. दोन ट्रक भरून माणसे घेऊन तिच्या सासरी मूक मोर्चा काढला. ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर मोठी सभा घेतली. घडला प्रकार गावकऱ्यांसमोर आणला. त्या घरात मुलगी द्यायची नाही व त्यांच्या घरातील मुलगी कोणी करायची नाही असा त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. त्यांना वर्षभर जामीनदेखील मिळू दिला नाही.

केस २. पुण्यातीलच केस आहे. खूप थाटामाटाने वडिलांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावून दिले. सासरकडच्यांनी लग्नानंतर तिला माहेरी व कोठेही पाठवले नाही. तिच्या नवऱ्याचे व जावेचे अनैतिक संबंध होते. तिला दिवस गेले होते. तिने आईला फोन केला. मी तुला गोड बातमी द्यायला लवकरच येत आहे. पण नवऱ्याने व जावेने तिला इतके मारले, की तिची हाडे मोडली. माहेरी जाऊन तिने काही सांगू नये याकरता तिची जीभ कापून टाकली! ती कोमात गेली तेव्हा तिला ‘जहांगीर हॉस्पिटल’मध्ये नेले. मग तिच्या माहेरी कळवले. आई लेकीची वाट पाहत होती, पण ती आईशी बोलूच शकली नाही. सारे काही संपले. खूप हुंडा देऊनही मुली सुखी होत नाहीत. त्यांनी खंबीर व शिक्षित बनवण्याची गरज आहे. असे व यासारखे अनेक प्रश्न समाजापुढे आणून, समाजात काय काय घडते, किती अन्याय केले जातात, त्यासाठी आपल्या वागण्यात काय बदल व्हायला पाहिजे हा विचार समाजापर्यंत पोचवणे व स्त्रीला खंबीर बनवणे यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो.

केस ३. दोन किडन्या फेल झालेल्या, जीवनाशी झगडणारी, तिच्या तीन मुलांसाठी धडपडणारी आई, आठवड्यातून तीन वेळा डायलिसीस करावी लागणारी एक गृहिणी- पूजा राहातूळ. तिच्या जिद्दीला सलाम. तिच्यासाठी जमेल तसे सर्वतोपरी सहकार्य करत आहे. तिला पैसे मिळवून दिले. माझ्या मिस्टरांचे वर्षश्राद्ध न करता त्या खर्चाची रक्कम पाच हजार एकशेएक्कावन्न रुपये पूजाला घरी बोलावून दिले. तिच्या तिन्ही मुलांना व तिला जेवूखाऊ घातले.

धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी संस्थेत आले होते. त्यांच्याशी ह्याविषयी बोलले. ते म्हणाले, “आमच्याकडे पैसे पडून आहेत. ती मदत योग्य माणसांपर्यंत कशी पोचवायची हा प्रश्न पडतो.” त्यांनी पूजाचा डायलिसीसचा खर्च मान्य करून, ते डायलिसीस ‘जहांगीर’मध्ये करण्याची सोय केली. आठवड्यातून तीन वेळा येणारा डायलिसीसचा खर्च कसा करावा ह्या विवंचनेतून त्या गरीब महिलेची सुटका झाली. त्यामुळे तिला मानसिक स्वास्थ्य मिळाले.

पूजा आणि तिच्यासारख्या अनेक असाध्य रोग्यांसाठी मदत व मदतीचे हात मिळवून देण्याचे काम केले जाते. ते अनेकांच्या सहकार्यातून घडते.

शुभदा म्हणतात, सामाजिक कामे ही सदासर्वदा करावी लागतात. सतत ध्यास घेऊन चांगले विचार लोकांपर्यंत जाणीवपूर्वक पोचवावे लागतात. त्यातूनच कोठेतरी परिवर्तन घडते व दिसू लागते. चांगल्या विचारांच्या बियांची पेरणी करून सामाजिक कामाची नांगरणी करावी लागते. जसे बीला रुजण्यासाठी मातीत गाडून घ्यावे लागते, तसेच सगळा भार पेलण्यासाठी पायाचा दगड कोणाला तरी व्हावे लागते. सामाजिक परिवर्तनाचे काम अगदी तसे आहे. चित्र स्पष्ट दिसत नसेल तरी निराश न होता, न थांबता सामाजिक प्रबोधन करत राहायला पाहिजे. या जाणीवेतून शुभदा कामे करत आहेत.

शुभदा सांगतात, माझ्या जोडीदारानेही मला तितकीच साथ दिली. आता ते नाहीत याची जाणीव काम करताना पावलोपावली जाणवते. ते उत्तम कविता करत. सामाजिक प्रश्नांवर त्यांचे विचारवर्तक लेख दिवाळी अंकांमध्ये छापून आले आहेत.

शुभदा यांना तीन मुले आहेत. ती त्यांच्या पायावर उभी आहेत. एक मुलगी, दोन मुले, दोन सुना, जावई, तीन नातवंडे असा परिवार आहे. मुलगी कधीतरी बोलून दाखवते, “आमची आई आमच्या वाट्याला फार कमी आली… कारण ती साऱ्यांची आई आहे !” शुभदा म्हणतात, “कामाच्या व्यापात मी त्या साऱ्यांच्या बाबतीत सर्व कर्तव्ये जरूर पार पाडली, परंतु धावता धावता, त्या सर्वांबरोबर निवांत क्षण फार नाही घालवू शकले, त्यांना द्यायला पाहिजे तेवढा वेळ नाही देऊ शकले. त्याची कोठेतरी खंत आहे. परंतु त्या सर्वांनी माझ्या वाटचालीत समजून घेऊन मला नेहमीच पाठबळ दिले आहे.”

संस्था करत असलेली कामे पुढीलप्रमाणे –

१. पोलिओ केंद्र १९६७ ते १९७७ चालवले. पंचवीस हजार मुलांना पोलिओचे डोस व ट्रिपलची इंजेक्शने.
२. संस्थेच्या सहाय्याने दहा हजारांपेक्षा जास्त कुटुंबांचा सर्वे.
३. मंगळवार पेठ परिसरात आदर्श अशी तीन सकस आहार केंद्रे. सहाशे मुलांना सकस आहार दिला जाई.
४. १९६९ ते १९८२ पर्यंत बालवाडी शिक्षिका. मुलांच्या पाच पिढ्या झाल्या.
५. गृहिणीशिक्षण वर्गांचे नियोजन.
६. कुटुंब नियोजन व लोकजागृती कार्यरत
७. १९७२ ते २००० पर्यंत कुष्ठरोग निवारण केंद्राचा सर्वे करून साडेतीनशे पेशंट शोधले. त्यात शाळेत जाणारी छोटी साठ मुले होती.
८. आवाबेन संस्था ग्रंथालय कार्य.
९. शिवणवर्ग – संस्थेचा शिवणवर्ग होता. नंतर नेहरू रोजगार योजनेचे शिवणवर्ग चालवले. सध्या जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.
१०. बहुउद्देशीय महिला केंद्र. ही योजना १९९५ पासून संस्थेत सुरू झाली. ह्या योजनेअंतर्गत पुणे जिल्हाभर महिलांचे आरोग्य, आहार, शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन ह्या विषयांवर भर दिला जातो. महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मेळावे, घेतले जातात. महत्त्वाच्या विषयांवर ज्ञान देणे, स्त्रीला तिच्या पायावर उभे करणे ह्या प्रकारचे मार्गदर्शन.

मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे –

१. कै. भाऊसाहेब रानडे स्मृती पुरस्कार  १९९२
२. पुणे महानगरपालिका गौरव पुरस्कार  १९९२
३.  त्वाष्टाकासार समाज भूषण पुरस्कार  १९९२
४. भगिनी निवेदिता पुरस्कार  १९९३
५.  मंगळ भूषण पुरस्कार १९९५
६. आदर्श कार्यकर्ता सेवाभावी पुरस्कार  १९९७
७. गांधी विचारमंच – नीलकमल पुरस्कार  १९९७
८.  राजीव गांधी पुरस्कार, पुणे १९९७
९. समाजवादी महिला सभा, महाराष्ट्र पुरस्कार  १९९९
१०. संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार २००४
११. सोशल सायन्स सेंटर – ८ मार्च भारती विद्यापीठ पुरस्कार  २००५
१२. जि.प.बाल आरोग्य खाते – ८ मार्च गौरव पुरस्कार  २००९
१३. जागतिक महिला दिन शिवसेना समर्थ सन्मान पुरस्कार  २०११
१४. गुरुकुल प्रतिष्ठान पुणे स्नेहोपायन पुरस्कार  २०१२
१५.  स्नेही महिला मंडळ कर्तुत्ववान महिला सत्कार  २०१०
१६. अनाम प्रेम खोपोली- महिला सत्कार  २०१३
१७. पुणे महानगरपालिका पुरस्कार  २०१३
१८. सानेगुरुजी कथामाला पुणे जीवनगौरव पुरस्कार  २०१४
१९. सानेगुरुजी आरोग्य मंदिर सांताक्रूझ – “सानेगुरुजी स्मृती पुरस्कार “ २०१४

संपर्क – मेघना लांजेकर ९४२२००२६०९

– दिपाली सुधिंद्र

Last Updated On – 23rd Jan 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. मला खुप अभिमान आहे माझ्या आई
    मला खुप अभिमान आहे माझ्या आई चा….. खुप नशीबवान आहे मी….तिच्या च्या पाेटी जन्म… हे मला मिळालेले सर्वात माेठे वरदान आहे…. तीच्या सारखी फक्त तीच….

  2. मृण्मयी जगदीप कामत ( क्रांती रविंद्र लांजेकर)

    मला खुप अभिमान आहे माझ्या
    मला खुप अभिमान आहे माझ्या आईचा. खुप नशिबवान आहे मी……. तीच्या पाेटी जन्म़़ हे मला मिळालेले सर्वात माेठे वरदान आहे़ तीच्या सारखी फक्त तीच…. तीच्या ह्या नि:स्वार्थ सेवेला आमचा सलाम़़ !

Comments are closed.