कोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या फार्महाउसवर अकरा एकरांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे! रांगोळीचे ठिकाण कोपरगाव व शिर्डी यांच्या मधोमध आहे. रांगोळीचा ध्यास सौंदर्याने प्रजासत्ताक दिनी घेतला. तिने त्या दिवशी विश्वविक्रमी रांगोळीची सुरुवात केली. ती शिवजयंतीला पूर्ण झाली. त्या रांगोळीसाठी तिला सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा खर्च झाला. वडील संदीप बनसोड यांनी दागिने, सोने-नाणे गहाण ठेवून ती रक्कम उभी केली. काही दानशूर मंडळींनीही त्यात भर घातली.
सौंदर्या बनसोड ही इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते. तिने 2019 सालच्या शिवजयंतीचा मुहूर्त पकडला. कोपरगाव हे शहर साईबाबांच्या शिर्डीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. साईदर्शनासाठी देश-विदेशांतील भक्त मोठ्या प्रमाणात तेथे येतात. त्यांना ती कला पाहण्याची संधी मिळणार आहे. विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचा ध्यास तिने एकटीने घेतला. तिचे मन मध्येच एकदा 12 फेब्रुवारी 2019 रोजी खट्टू झाले. कारण कोपरगावच्या परिसरात अवकाळी पाऊस आला. पण योगायोगाने, पाऊस तिचे रांगोळीचे काम ज्या ठिकाणी चालू होते त्या ठिकाणी बरसलाच नाही!
सौंदर्या ही वयाच्या पाचव्या वर्षापासून रांगोळी काढण्याचा छंद जोपासत आहे. तिने शेकडो रांगोळ्या काढल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या रांगोळीचे चित्र अकरा एकरांवर आहे. त्या चित्रात सहा रंग आहेत. रांगोळी पूर्ण करण्यासाठी तिला दोनशेपन्नास टन रांगोळी लागली. रांगोळी काढली जात असतानाच तिच्याबद्दल आकर्षण एवढे निर्माण झाले, की ती कलाकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी; तसेच, कलाकारांनी भेटी देण्यास सुरुवात केली. सौंदर्याच्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
संदीप बनसोड म्हणाले, की “सौंदर्यास परमेश्वरी देणगीच लाभली असावी. ती पाचव्या वर्षापासून चित्रे काढते. ती अप्रतिम, हुबेहूब असतात. तिने दोन वर्षांपूर्वी, प्रथम विश्वविक्रमी रांगोळी काढण्याचा उल्लेख आमच्याजवळ केला. तेव्हा मी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिला म्हटले, की तू प्रथम तीन एकरांत शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याची आउटलाइन काढून दाखव. मग तुझ्या संकल्पास आम्ही मान्यता व पुष्टीही देऊ. चमत्कार म्हणजे तिने दोन दिवसांत ते रेखाटन करून दाखवले! तेव्हा आम्ही तिचे ते वेड पुरवण्याचे ठरवले.”
सौंदर्याने वयाच्या सातव्या वर्षांपासून तिच्या आईच्या नर्सरीच्या भिंतींवर तैलरंगाने चित्रे काढण्यास सुरुवात केली. नर्सरीत आलेले लोक ती चित्रे पाहत बसत. त्यात कार्टूनपासून चित्रकलेचे सर्व प्रकार होते. ती नवरात्रोत्सवात दरवर्षी रांगोळ्या काढते. तिची शाळेत शैक्षणिक प्रगतीदेखील ठीक आहे असे संदीप म्हणाले.
सौंदर्याची रांगोळी आकारात आल्यापासून तिची कीर्ती त्या टापूत सर्वत्र पसरली आहे आणि शिवसैनिकांच्या वेगवेगळ्या शाखांमार्फत तिचे सत्कारदेखील होऊ लागले आहेत. लोक अर्धवट चाललेली रांगोळी पाहण्यास येतच, पण ती गर्दीच तिला रांगोळी काढत असताना त्रासदायक ठरली. लोकांचे पाय बिनदिक्कत रांगोळीवर पडत आणि तो आकार व रंग तिला पुन्हा साधावा लागे!
अकरा एकरांवरील रांगोळी पाहणाऱ्याच्या नजरेच्या टप्प्यात तर येणार नाहीच; संदीप यांनी ड्रोण कॅमेरे बसवून, रांगोळी एलसीडी पडद्यावर दाखवण्याची व्यवस्था केली आहे.
जगात व्यक्तिगत सर्वात मोठी रांगोळी एक लाख चौरस फुटांत आहे. ग्रूप रांगोळी सर्वांत मोठी दहा एकरांत आहे.
संदीप यांचा ‘काँप्युटर – सेल्स आणि सर्व्हिस’चा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी मीना यांची नर्सरी आहे. त्यांना सौंदर्या ही मोठी व लावण्या ही छोटी अशा दोन कन्या आहेत.
– संदीप बनसोड 9822199957
– महेश जोशी 9423167177,mjmaheshjoshi67@gmail.com