शिक्षण हक्क पुरस्कर्ती – वृंदन बावनकर

1
34
_ShikshanHakkaPuraskarti_VrundanBavankar_1.jpg

वृंदन बावनकर नागपूरमध्ये राहते. तिने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ‘पवन पब्लिक स्कूल’ या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे विविध प्रयोग चालवले आहेत. वृंदनने संस्था चालवण्याचे आईवडिलांनी दिलेले आव्हान शिक्षणक्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना वयाच्या विशीत स्वीकारले आहे. तिची शिक्षणक्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. वृंदनने तिची संस्था व्यक्तिकेंद्री होऊ नये, तिच्यानंतरही कोणी संस्था चालवणारी व्यक्ती असावी या दृष्टिकोनातून शाळेचा विस्तार केला आहे. खरे तर, वृंदनला संरक्षण सेवेमध्ये जायचे होते, वैमानिक व्हायचे होते. पण तिच्या शाळेत एनसीसीचे मार्गदर्शन करत असताना, शिक्षणातील काही त्रुटी लक्षात आल्या. वृंदनला देश घडवणाऱ्या भावी पिढीला योग्य दिशा देण्याची गरज, शिक्षणक्षेत्रातील त्रुटी तिच्या सुधारण्याची तळमळ स्वस्थ बसू देईना. तेव्हा तिने त्याच शिक्षणपद्धतीत राहून काही बदल करत दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यावर काम करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जावे, त्यांना सजग व समर्थ नागरिक बनवावे यासाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून ‘पवन शाळे’त शिक्षण दिले जाते. नर्सरीच्या मुलांचे स्नायू बळकट नसतात. मुलांना त्या वयात हातात पेन पकडावयास लावणे योग्य नसते. त्यासाठी मुलांना मनोरंजनातून शिकवणे सोईस्कर असते, पण समाज कला, कार्यानुभव, नाच-गाणी या माध्यमांना दुय्यम लेखतो. ‘पवन शाळे’त मात्र त्या माध्यमातून शिकवले जाते. पवनी हे वृंदनच्या वडिलांचे गाव. वृंदनचे वडील व ग्रामस्थ यांनी मिळून 1 जुलै 1999 रोजी ‘पवन पब्लिक स्कूल’ नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केली. शाळा दहा मुलांपासून सुरू झाली. ती पाचशेबत्तीस विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोचली आहे. ‘पवन शाळे’त नर्सरी ते बारावीपर्यंत वर्ग घेतले जातात. फी देऊ शकतात अशा पालकांकडून दोनशे ते तीनशे रुपये फी घेतली जाते. तीस टक्के मुलांना मोफत शिकवले जाते.

_ShikshanHakkaPuraskarti_VrundanBavankar_3.jpgवृंदन बावनकरचा जन्म 16 डिसेंबर 1987 रोजी नागपूरमध्ये झाला. वृंदन बावनकरचे स्वत:चे शिक्षण नागपूरच्या परांजपे शाळेत झाले. वृंदनने संरक्षण सेवेमध्ये जायचे, वैमानिक व्हायचे असे ठरवले होते. तिने बी.एस्सी. पदवीचे शिक्षण सुरू असताना एनसीसी एअर विंग व नेव्हल विंगला प्रवेश घेतला. त्या दरम्यान, ती प्रजासत्ताक दिनाची परेड, स्कूबा डायव्हिंग, मायक्रो लाइट फ्लाइंग असे विविध साहसी उपक्रम करत होती. त्यासाठी तिला ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’ हे सुवर्णपदकही मिळाले आहे. वृंदनने तिच्या त्याच अनुभवाधारे आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना मार्गदर्शन करावे यासाठी ‘परांजपे शाळे’च्या संचालक कमल परांजपे यांनी तिला बोलावले. इतर एक-दोन शाळांनीही बोलावले. त्या वेळी वडिलांनी वृंदनला “तू जेथे एनसीसीचे शिक्षण पोचलेले नाही अशा खेड्यात जायला हवेस” असे सुचवले. वृंदन पवनी या वडिलांच्या गावी ‘पवन शाळे’च्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने फेब्रुवारी 2009 मध्ये गेली. तेव्हा शाळेतील काही गोष्टी तिला खटकल्या. त्यावर वडील म्हणाले, “हे तुझे भारतीय नौदल नाही. हे भारतीय खेडे आहे. येथे काम असेच चालते. उंटावरून शेळ्या हाकणे सोपे, प्रत्यक्ष काम करणे कठीण असते”. वृंदनच्या आईने मात्र, ‘तू तुला ज्या चांगल्या गोष्टी येतात, त्या शाळेत जाऊन शिकव. तुला सिस्टिम बदलण्याची संधी उपलब्ध आहे’ असे उघड आव्हान दिले. वृंदनने ते आव्हान स्वीकारले आहे.

वृंदनची आई हिरा बालमंदिर संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या विकासासाठी काम करते, तर तिचे वडील मृणाल गोरे, भाई वैद्य यांच्यासारख्या मंडळींबरोबर चळवळीत काम करणारे. त्यामुळे तिला समाजसेवेचे बाळकडू मिळाले. वृंदनची आई व परांजपे शाळेच्या संचालक कमल परांजपे यांच्यात लहान मुलांच्या मानसिकतेवरून नेहमी चर्चा होई. मूल कसे शिकते, त्याची मानसिक वाढ कशी होते, लहान मुलांना मारू का नये, त्यांच्यावर मारण्याचे काय परिणाम होतात, खेळांतून-गोष्टींतून मुलांना कसे शिक्षण द्यावे, त्यांना कशी मोकळीक द्यावी याबद्दल सतत काही ना काही वृंदनच्या कानावर पडत असे. त्या वेळी वय लहान असल्यामुळे काही कळत नसे, पण वृंदन त्या ऐकलेल्या गोष्टींचा फायदा मुलांमध्ये जाऊन काम करताना झाल्याचे सांगते.

वृंदन म्हणते, “मी शिकत असताना शाळेसाठी करता येईल तेवढे काम करत होतेच. मला पदवीच्या दुसर्या, वर्षाला असताना, प्रॅक्टिकल सोमवारी नसायचे. त्यामुळे मी सोमवारी शाळेत जात असे. त्या वेळी मुलांशी गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर खेळणे यांतून त्यांना काही शिकवता आले तर शिकवायचे. त्यामुळे मुलांशी बोलण्याची, त्यांच्यात वावरण्याची आवड निर्माण झाली. मग कॉलेज बुडवून ‘तीन दिवस कॉलेज, तीन दिवस शाळा’ असा दिनक्रम ठरला. मी मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या वर्गांत जाऊन विषय शिकवायचे. मी मुलांशी गप्पा मारत असताना माझ्या ध्यानात मुलांना संधी मिळत नाही, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत नाही ही गोष्ट आली. शिवाय, शाळेच्या समस्यांचे स्वरूपही लक्षात आले. मुलांच्या व शाळेच्या विकासासाठी संपूर्ण वेळ देऊन काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे हेही कळले. मी त्या वर्षभरातील कामामुळे गावात राहून काम करावे हा निश्चय केला. मी संरक्षण सेवेत जाण्याच्या, वैमानिक होण्याच्या स्वप्नावर पांघरूण घातले.”

_ShikshanHakkaPuraskarti_VrundanBavankar_2.jpgवृंदन शिक्षकांशी चर्चा रोज संध्याकाळी अर्धा तास गावात काय हवे, मुलांना शिकवताना काय अनुभव येतो यावर करायची. मुलांना शिक्षण हे ओझे वाटू नये, त्यांनी शिक्षणाचा आनंद घेत मुक्त वातावरणात शिकावे. विद्यार्थी व निसर्ग यांच्यात सुसंवाद साधला जावा यासाठी त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकवले जाऊ लागले. उदाहरणार्थ, मुलांना भूगोलातील नदीबद्दल माहिती द्यायची झाली तर त्यांना पवनीजवळच्या वैनगंगा नदीच्या काठावर नेऊन शिकवले जाई. त्यामुळे मुलांना तो विषय समजणे अधिक सोपे होई. वृंदनची धडपड शिक्षण म्हणजे केवळ इयत्ता पास होणे नव्हे, तर शिक्षण हे जीवनाचा पाया मजबूत बनवणारे असावे यासाठी आहे. त्यासाठी प्रायोगिक शिक्षणावर भर देण्यात येतो. वृंदनचे प्रयत्न मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांनी वास्तविक ज्ञान प्रयोगातून मिळवावे यासाठी आहेत. ‘कल्चरल एक्स्चेंज प्रोग्राम’ अंतर्गत नर्सरीच्या मुलांपासून ते बारावीच्या मोठ्या मुलांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना बँकेत, फॅक्टरीत, कारखान्यांमध्ये घेऊन जाणे, पोलिस-स्टेशन, हॉस्पिटल यांना भेटी देणे यांसारखे उपक्रम राबवले जातात. मुलांच्या मूलभूत संकल्पना चोख व्हाव्यात, त्यांना प्रत्येक संकल्पनेचा जीवनातील संदर्भ कळावा यासाठी त्यांना त्या सैद्धांतिक शिक्षणाआधी प्रयोगाद्वारे शिकवल्या जातात. मुलांना शेताच्या बांधावर नेऊन त्यांना शेती समजावली जाते.

प्रयोगशील शिक्षणाचा सकारात्मक परिणाम झाला. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू लागला. विद्यार्थी शिकताना वेगवेगळ्या वस्तू बनवू लागले. मुलांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन वर्षातून एकदा आयोजित केले जाते. त्यात कागदी पेन, सुतळी बॉल, पेन स्टँड, मोबाइल स्टँड, पायपुसणी, डिझायनर आरसे यांसारख्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. विक्रीतून येणारे पैसे त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक खर्चासाठी दिले जातात. सरकारतर्फे शैक्षणिक पातळीवरील अशा नव्या प्रयोगांना ‘इन्स्पायर’ या पुरस्काराने सन्मानित केले जाते. वृंदनच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यासाठी तिसरे पारितोषिक मिळाले आहे.

वृंदन ‘पवन’च्या वाटचालीतील कसोटीचे दोन क्षण सांगते, “ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर वर्षातून दोनदा-तीनदा शाळेत तपासणी करण्याला येतात. त्यांना पैशांचा लिफाफा द्यायचा असतो. त्याची किंमत आधीच सांगितली जाते. लिफाफ्याच्या वजनावर शाळेची श्रेणी ठरवली जाते. पण मी एनसीसीमध्ये घडले. त्यामुळे आत्मविश्वास होता. मी लिफाफा देण्यास नकार दिला. स्वत: मला, मी गरीब मुलांसाठी शाळा चालवते. विनावेतन काम करते. शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य व्हावे यासाठी धडपडते. यात चुकीचे तर काही करत नाही. इतर शिक्षकसुद्धा अत्यल्प वेतनावर काम करतात. कोणी नोकरी म्हणून काम करत नाही. असे असताना लिफाफा का द्यायचा? असा प्रश्न पडला. मी लिफाफा दिला नाही म्हणून शाळेचा तपासणी अहवालच गेला नाही. अधिकाऱ्यांकडून खूप त्रास झाला. सतत समस्या येत राहिल्या. मुलांना आम्ही प्रामाणिकपणाचे धडे शिकवतो. तो गुण प्रथम स्वत:त असला पाहिजे. आम्ही आम्हाला आरटीई (Right to Education) अंतर्गत सरकारकडून आलेले जास्तीचे पैसे 2015 मध्ये घेतले नाहीत. आम्ही पैसे खात नाही, कोणाला खायला देत नाही.

“दुसरा अनुभव असा, पवन शाळेची इमारत नगर परिषदेकडून भाड्याने घेतली. त्याच इमारतीत प्रफुल पटेल यांच्या जी. एम. पटेल संस्थेला उच्च महाविद्यालयासाठी परवानगी मिळाली. ती इमारत पूर्ण मिळावी म्हणून पटेल यांच्या संस्थेने नगर परिषदेत अर्ज केला. इमारत जास्त भाडे देणा-या मिळेल असे नगर परिषदेकडून लेखी कळवण्यात आले. आमच्या शाळेजवळ मुळातच पैसा कमी होता. त्यामुळे शाळेच्या इमारतीसाठी वडिलांनी नऊ दिवस आमरण उपोषण केले. त्याच दरम्यान, कलेक्टर पाहणीसाठी येणार होत्या. ‘पवन’च्या सर्व शिक्षकांनी त्यांना विनंती करण्याचे ठरवले. पण कलेक्टर आल्या तेव्हा शिक्षकांना आत न घेता शाळेचे गेट लावले गेले. तेव्हा शिक्षकांनी जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्यावरून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या वेळी सोळा शिक्षिका व तीन शिपाई असा स्टाफ होता. मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होते. मी माझी परीक्षा सुरू असल्यामुळे त्या दिवशी उपस्थित राहू शकले नव्हते. शिक्षिका त्या प्रकारामुळे घाबरल्या. काही शिक्षिकांच्या घरातील लोक नगर परिषदेत कामाला होते. त्यांना धमकावले गेले. त्यामुळे शिक्षिकांनी ‘आम्ही कोणी शाळेत येणार नाही’ असे सांगून टाकले. मी हताश, निराश झाले. पण त्यातूनही मार्ग निघाला. सुदैवाने, तेव्हा उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत सर्व स्थिरस्थावर झाले.”

वृंदन काम ‘प्रथम’ एज्युकेशन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत जानेवारी 2013 पासून करत आहे. ‘प्रथम’ संस्थेतर्फे पवनी तालुक्यात विज्ञान केंद्र 2014 मध्ये बांधण्यात आले. तेथे सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलची मोफत सोय आहे. वृंदनवर ‘प्रथम ओपन स्कूल’ अंतर्गत पवनी तालुक्यातील शंभर गावांसाठी दहावी परीक्षेला न बसलेल्या मुलींना सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसवावे, तीन महिन्यांत बेसिक कोर्सची व आठ महिन्यांत संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. हेमेंद्र फाउंडेशन व ‘प्रथम’ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याघ्र अभयरण्याच्या संरक्षित पट्ट्यातील मुलांच्या शिक्षणासाठी व स्वयंरोजगारासाठी उपक्रम सुरू आहे. वृंदनवर महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा येथील उपक्रमाची जबाबदारी आहे. सरकारने गोसीखुर्द धरण प्रकल्पातील पन्नास हजार बाधित लोकांना पैसे दिले. त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले नाही. वृंदनचा त्या बाधित कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तेथील महिलांचे गट स्थापन करण्यात आले आहेत.

‘पवन’ची साडेपाच एकर जमीन पवनीमध्ये आहे. त्या जागेवर शाळा बांधायची आहे. त्या इमारतीचे बांधकाम BALA च्या (building as learning aid) धर्तीवर करायचे आहे. त्या प्रकारची इमारतच विविध चित्रांच्या माध्यमातून मुलांना शिकवते. तसेच, प्रत्येक वर्गाच्या पाठीमागे त्या वर्गाएवढी जागा सोडण्यात येते; जेणेकरून त्या जागेत मुले शेती शिकतील, प्रत्येक मुलाला स्वत:तील कौशल्य विकसित करता येईल. अशी योजना नवीन इमारतीत ठरवण्यात आली आहे. गरीब मुलांसाठी होस्टेलची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्या सगळ्यासाठी दोन कोटींचा खर्च आहे. एक संस्था एक कोटीची मदत करणार आहे – वृंदन उर्वरित एक कोटी रुपये जमवण्याच्या कामात व्यस्त आहे.

वृंदनला आजी-आजोबा नाहीत. तिला त्यांची कमतरता जाणवते. ती कमी भरून काढण्यासाठी ती वृद्धांशी दोस्ती करते. त्यांना सिनेमाला घेऊन जाते. त्यांच्याशी गप्पा मारते. वृंदन सगळ्या वयोगटातील लोकांमध्ये समरसून जाते हे तिचे वेगळेपण आहे. वृंदनचा शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून चांगली शिक्षणपद्धत निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न आहे.

वृंदन बावनकर 9766370959

– वृंदा राकेश परब

About Post Author

1 COMMENT

  1. “ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर व…
    “ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर व पैशांचा लिफाफा, नगर परिषदेकडून शाळेसाठी भाड्याने जागा मिळवताना झालेला त्रास अशा अडचणींची नोंद ह्या लेखात स्पष्टपणे केली आहे हे लक्षणीय आहे.

    ‘प्रथम ओपन स्कूल’ तर्फे दहावीच्या परिक्षेबाबत होणारे काम तसेच शिक्षणाचे संसाधन म्हणून इमारतीचा वापर करणारा उपक्रम अशा कामांचा आढावा घेणारे वेगळे सविस्तर लेख लिहायला हवेत.

Comments are closed.