शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये

1
38

शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये

 विश्वास काकडे

एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा समजावून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने आयुष्यात वेळोवेळी घेतलेले निर्णय तपासून पाहा, असे अस्तित्ववाद सांगतो. मनुष्य यशस्वी होणार की अयशस्वी होणार, सुखी होणार की दु:खी राहणार अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या त्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असतात. प्रगत समाजामध्ये निर्णय घेण्याची पाळी पदोपदी येत असते. जोडीदाराची निवड, व्यवसायाची निवड यांपासून ते अनेक लहान लहान गोष्टी, व्यक्तीच्या निर्णयांवर अवलंबून असतात. पूर्वीच्या काळी परिस्थिती एवढी बिकट नव्हती, स्पर्धा जीवघेणी नव्हती, पर्याय विपुल प्रमाणावर उपलब्ध नव्हते; इतकेच नव्हे, तर कित्येक व्यक्तींना स्वत:बद्दलचे निर्णय स्वत: घेण्याचे प्रसंग येत नसत. व्यक्ती निर्णय कसा घेणार हे त्या व्यक्तीच्या मूल्यांवर अवलंबून असते. या मूल्यांवरून जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वत:चे भान या व अशा अनेक गोष्टी ठरत असतात.

माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना एकदा पत्रकाराने विचारले होते, की ‘ तुम्ही निर्णय घेण्याचे ब-याचदा टाळता. असे का?’ त्यावर त्यांनी उत्तर दिले, की ‘निर्णय न घेणे हासुध्दा एक निर्णयच आहे!’. यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा अंतर्भूत आहे. प्राप्त परिस्थितीत निर्णय न घेणे म्हणजे ती परिस्थिती आणि त्यातून घडणारी घटना स्वीकारणे. म्हणजे प्रवाहात वाहत जाण्याचा धोका पत्करणे! स्वत:च्या आयुष्यावरचे नियंत्रण स्वत:हून सोडून देणे. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता सर्व यशस्वी व्यक्तींनी – पुराणातील व्यक्तिरेखा असोत, संत ज्ञानेश्वर असोत, शिवाजी महाराज असोत अथवा म. गांधी, या सर्वांनी प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी सक्रिय विचार करून निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय त्यांच्या त्यांच्या मूल्यव्यवस्थेमधून उद्भवले आहेत.

लहान मूल मोठे होत असताना ब-याच गोष्टी शिकते. ते सर्व गोष्टी टप्प्या टप्प्याने बोलणे, चालणे, चिडणे, हसणे अशा अनेक गोष्टी जैविक प्रेरणा व अनुकरण यांतून शिकते. यामध्ये काही नैसर्गिक क्षमता कमी असल्यास अथवा त्यांचा अभाव असल्यास, त्याचा विकासावर परिणाम होतो. प्रामुख्याने नैसर्गिक क्षमतांचा विकास हाच धागा सुरूवातीला असतो. नंतरच्या काळातले शिकणे हे अनुकरण अथवा इतरांच्या वागण्याला प्रतिक्रिया अशा स्वरूपात असते. जोडीला इतर मोठ्या व्यक्तींचे आदेश असतातच!

मुले स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इतर व्यक्तींबद्दलची मते या सर्व अनुभवांतून ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. कित्येकदा, त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीवरून हे स्पष्ट होते. आपण त्यांच्या प्रश्नांना ज्येष्ठ मंडळी जी उत्तरे देतात अथवा मुले ज्यांचे अनुकरण करत असतात त्यातून त्यांच्या समजुती व मूल्ये आकार घेत असतात. काही वेळा, त्यांच्या नैसर्गिक प्रतिक्रिया – राग, भीती, चिंता, बंडखोरपणा, उदासीनता  त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणा-या ठरतात. हे सर्व मुलांच्या कळत-नकळत घडत असते. मुले स्वत:च्या पध्दतीने त्यांना येणा-या अनुभवाचा अर्थ लावत असतात. यामध्ये विचार करण्याचे स्वातंत्र्य, उपलब्ध पर्याय, निर्णयकौशल्य अशा अनेक गोष्टी त्या मानाने अप्रगत असतात.

साधारणपणे मुले स्वत:चा विचार योग्य पध्दतीने करायला पौगंडावस्थेत शिकतात. याचा अर्थ असा, की शिकवलेल्या अथवा अनुकरणातून शिकलेल्या गोष्टी विचारांचे स्वातंत्र्य – पर्यायांचा वापर करून – वागणे ही,  मुलांमध्ये घडणारी नवीन प्रक्रिया असते.

या काळातले वातावरणही महत्त्वाचे असते. जवळपासच्या वयाची अनेक मुले-मुली एकत्र वाढत असतील तर बहुधा सांघिक प्रवृत्ती, मैत्री, सामाजिक संबंधांचे कौशल्य ही वाढीला लागतात. काही वेळेस, मुलांना गटाने राहण्याची सवय इतकी होते, की त्यांचे प्रत्येकाचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व तयार होत नाही. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये, आजुबाजूच्या परिसरात घटना कमी घडत असल्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनातील सदोषता, व्यक्तींमधील संपर्क कौशल्याचा अभाव, अमूर्त विचार करण्याचा अभाव अशा प्रवृत्ती आढळतात. ही मुले व्यक्ती व स्वत:ला येणारा अनुभव यांच्यापलीकडे विचार सहसा करत नाहीत. त्यांच्यामध्ये सामाजिक बुध्दिमत्ता कमी प्रमाणात आढळते (त्या अवस्थेत). त्यांच्या तुलनेत मोठ्या शहरांतील मुले व्यवहारात व वागण्यात, शिक्षणात जास्त चलाख असतात. नंतरच्या आयुष्यात मुलांकडून अशी अपेक्षा ठरवणे रास्त असते, की त्यांच्या पैकी प्रत्येकाने स्वत:चा विचार करून वागावे. प्रत्येक व्यक्तीला अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्या पर्यायांचा विचारपूर्वक अवलंब करणे हे त्या व्यक्तीकडून अपेक्षित असते. निर्णयप्रक्रियेमध्ये उपलब्ध पर्याय, माहिती, परिणामांची जाणीव, निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व इतर अनेक घटक असतात. ही क्षमता जोपासणे म्हणजे संस्कार. ते शिक्षणातून मिळायला हवेत. शिक्षणाचा खरा हेतू काय? तर अनुभवाचा अर्थ लावण्याचे कौशल्य जोपासणे व त्याच्या परिणामांची जबाबदारी स्विकारण्याची तयारी त्यातूनच त्यासाठी लागणारी जीवनमूल्ये आत्मसात होत असतात. लिहिणे, वाचणे, बेरीज-वजाबाकी इत्यादी ही कौशल्ये झाली. ही कौशल्ये पूर्वी पुरेशी होती, परंतु आता नाहीत.

अनुभवाचा अर्थ लावणे – सर्वंकषपणे ! ही फार महत्त्वाची क्षमता आहे. एका अर्थाने, शिक्षण हादेखील अनुभवच आहे. ज्या तरुणांना हा अनुभव सुखद किंवा आव्हानात्मक वाटतो ते तरुण त्यात रस घेतात. त्यांच्यामध्ये व्यावसायिक व वैचारिक कौशल्य वाढीस लागते. ही क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हिस्सा बनते. शिक्षणातून या क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. ज्या तरुणांना परिस्थितीमुळे किंवा शिक्षणव्यवस्थेतील विपरीत अनुभवांमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यांची परिस्थिती वेगळी असते. त्यांतील काही तरुण स्वत:च्या हिंमतीवर आयुष्याला तोंड देतात; काही पालकांवर अवलंबून राहतात, काही वाहवत जातात; काही बंडखोर बनतात, काही सुदैवी तरुणांना चांगले मार्गदर्शकही भेटतात.

शिक्षणाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिक प्रेरणांना शोधून त्यांना मूर्त स्वरूप देणे, व्यक्तिमत्त्वाला आकार देणे, त्यांच्या क्षमता विकसित करणे; पण या प्रक्रियेत जे सहभागी होणारे महत्त्वाचे घटक – पालक व शिक्षक- तेच या बाबतीत उदासीन आहेत. याला अनेक कारणे आहेत. अज्ञान हे प्रमुख कारण ! पालक स्वत:ची मते व उद्दिष्टे पाल्यांवर लादतात. शिक्षक सक्षम नसतात. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे फक्त लठ्ठ पगाराची नोकरी, ऐहिक सुखे हीच गाजरे मुलांना दाखवली जातात. त्यांच्यापुढे आयुष्य जगण्याच्या प्रक्रियेपेक्षा चंगळवादी उद्दिष्टे ठेवली जातात. परिणामी, जे तरुण यात यशस्वी होतात अथवा जे अयशस्वी होतात, ते दोघेही सुखी होऊ शकत नाहीत.

सध्याच्या शिक्षणपध्दतीमध्ये औपचारिकतेकडे लक्ष दिले जाते. मुलाला प्रत्यक्ष विषय किती समजला अथवा उमगला यापेक्षा त्याला त्याची पोपटपंची जमते का हेच पाहिले जाते. एखादा शिक्षक त्याच्या मर्यादित क्षमतेने गणित शिकवतो तेव्हा कित्येक विद्यार्थ्यांना गणित का शिकायचे हेच माहीत नसते. त्यामुळे विद्यार्थी उदासीन राहतात किंवा अनुत्तीर्ण होतात. एखादा चांगला शिक्षक गणित शिकवतो तेव्हा काही विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि जाण विकसित होते व त्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग होतो.

शिक्षण हे प्रभावी व्हायचे असल्यास शिक्षणव्यवस्था, शिक्षकांची क्षमता, परीक्षेची पध्दत, विद्यार्थ्यांकडून ठेवल्या जाणा-या अपेक्षा, व्यावहारिक जगातील संधी हे सर्व चांगले व एकमेकांशी सुसंगत हवे. या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वाशी संबंध, संदर्भ असणे आवश्यक आहे.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावे लागणारे निर्णय व त्यासाठी अंगी असणारी क्षमता हे शिक्षणातून विकसित होत असते.

विश्वास काकडे

vishwas1000@gmail.com

भ्रमणध्वनी : 9822509682 /  सोलापूर : 2627324, 2729144

 

 

About Post Author

Previous articleकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
Next articleसंपादकीय
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

Comments are closed.