शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. त्या संदर्भात फिजिक्स विषयाचे नोबेल पुरस्कार विजेते कार्ल वीमन यांचे विचार मोलाचे आहेत. वीमन हे अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठात फिजिक्स विभागात काम करतात. त्यांनी विज्ञानक्षेत्रात तज्ज्ञ तयार कसे होतात, मुळात तज्ज्ञ कोणाला म्हणावे, उत्तम शास्त्रज्ञ कोण, नोबेल विजेते कसे घडतात अशा विषयांचा अभ्यास केला. त्यांचे निष्कर्ष महत्त्वाचे अन् मजेशीरही आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ! ते परीक्षेसाठी, गुणांसाठी, पदवीसाठी ठीक आहे. पण जोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग काय, ते व्यवहारात वापरावे कसे, नवी समस्या सोडवण्यासाठी उपयोगात आणावे कसे हे कळत नाही, तोपर्यंत त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. विद्यार्थी त्याने शिकलेल्या गोष्टींचा उपयोग नवी समस्या सोडवण्यासाठी, समाजाला हितकारक निर्णय घेण्यासाठी करण्यास शिकत नाही तोपर्यंत तो स्वतःला जाणकार म्हणू शकत नाही. शिक्षणाचे खरे मूल्य, त्या शिक्षणाचा उपयोग आयुष्यात चांगले, समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कसा होतो यावरून ठरते ! शिकलेले ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे समाजाचे भविष्य अधिक चांगले, उत्तम करण्यासाठी कसे उपयोगात आणले जाते यावरून व्यक्तीची क्षमता, योग्यता, प्रावीण्य ठरत असते. बाकी परीक्षेतील गुण, पदव्यांची नामावली, मिळालेल्या श्रेणी हे सारे दुय्यम ठरते !
विज्ञान म्हणजे समाजात आहे त्यात सुधारणा, जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी डॉक्टरचे ज्ञान, डायग्नोसिसिसची- तपासणीची साधने, यंत्रणा याला मर्यादा होत्या. मेडिकलच्या सर्व क्षेत्रांत झालेली प्रगती ही विज्ञान तंत्रज्ञानाची देणगी आहे. तपासणी यंत्रणा बदलली आहे. शस्त्रक्रियांसाठी आधुनिक यंत्रणा आली आहे. त्यामुळे निदान आणि उपचार करण्यात गती आली आहे. उपचार वेदनादायी राहिलेले नाहीत, ते सुसह्य होत आहेत. विज्ञानाने मोबाईल, इंटरनेट, कम्युनिकेशन अशा सर्व क्षेत्रांत लक्षणीय भरारी घेतली आहे.
पण याच टप्प्यावर शास्त्रज्ञांचे विवेकी निर्णय महत्त्वाचे ठरतात. मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीचा शोध दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शत्रूच्या विमानाचा विध्वंस करणाऱ्या रडार यंत्रणेसाठी झाला. मायक्रोवेव्ह तंत्र आता स्वयंपाकघरात आहे – कुकिंगसाठी, बेडरूममध्ये आहे – मनोरंजनासाठी. त्याच मायक्रोवेव्हचा उपयोग पोटातील ट्यूमर शोधण्यासाठी किंवा त्यातील दुखापतीला रेडिएशन हिटिंगने बरे करण्यासाठीदेखील होतो. व्यक्ती जे शिकते त्या ज्ञानविज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी, चांगल्यासाठी कसा करावा यासाठी ही उदाहरणे बोलकी आहेत. शास्त्रज्ञाने स्वतःला प्रश्न विचारण्यास हवा: या प्रयोगाने, संशोधनाने समाजाचे कोणते प्रश्न कसे सुटतील? हा ‘प्रॉब्लेम’ सोडवण्याने ज्ञानविज्ञानात कोणती भर पडेल? ही कामगिरी समाजाच्या कोणत्या क्षेत्रात कोणाच्या कामी येईल? या विचारसरणीचे संवर्धन म्हणजे खरे शिक्षण.
शिक्षकापुढे आव्हान हे असण्यास हवे, की विद्यार्थ्यांच्या गळी हे उतरवावे कसे? शिकण्यास आलेला विद्यार्थी इतक्या दूरचा, आदर्श विचार करत नाही. त्याला वाटते, की पुस्तकातील माहिती समजली की पुरे ! तीदेखील परीक्षेत उत्तरे लिहिण्यापुरती. गुण, पदवी मिळवण्यापुरती. अन् त्या भरवशावर चांगली म्हणजे उत्तम कमाईची नोकरी मिळवण्यापुरती ! मुलांना या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर काढणे, त्यांना शिक्षणाचे खरे उद्दिष्ट समजावत वेगळ्या उंचीवर नेणे हे शिक्षकांपुढे खरे, मोठे आव्हान असणार आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान हे क्षेत्र म्हणजे बुद्धिवंतांची मक्तेदारी असा गैरसमज आहे. हे पूर्ण चुकीचे आहे. अनेक यशस्वी शास्त्रज्ञ, नोबेल विजेते सर्वसामान्य परिस्थितीतून वर आले आहेत. त्यांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीदेखील सर्वसाधारण स्तराची आहे. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना हा ‘मेसेज’ देतो, की गरिबी, सामाजिक परिस्थिती या गोष्टी विद्वत्तेच्या आड येत नाहीत. त्यावरून व्यक्तीची गुणवत्ता ठरत नाही. व्यक्तीच्या अंगी योग्य ‘स्किल’, मनोवृत्ती, जबर आकांक्षा, जिद्द असेल, धाडस असेल तर कोणत्याही विषयाचे शिखर गाठण्यापासून तिला कोणीच रोखू शकत नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाने नवी दारे उघडली आहेत. त्यासाठी नव्या सुविधादेखील निर्माण झाल्या आहेत. क्लिष्ट विषय समजणे सोपे झाले आहे. तशी साधने घरबसल्या उपलब्ध आहेत. शिक्षकाने शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वप्रयत्नांनी, स्वाध्यायाने बरेच काही शिकणे सोपे झाले आहे. पण त्यासाठी वीमन म्हणतात त्या प्रमाणे शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेणे विद्यार्थी अन् प्राध्यापक, दोघांनाही गरजेचे आहे.
– विजय पांढरीपांडे 7659084555 vijaympande@yahoo.com
उत्तम लेख आहे. शिक्षण कशासाठी? हे अद्यापही ठरत नाही. ज्ञान, माहिती, विश्लेषण आणि उपयोजन प्रामुख्याने शिक्षणातून अपेक्षित आहेत. गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून शिक्षणावर अनेक आयोग आले, तरी व्यवस्था ज्ञान-माहिती यापुढे फारशी गेली नाही, हे वास्तव आहे. काळानुरूप गरजाभिमुख शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यासाठी शिक्षक-विद्यार्थी यांना आमुलाग्र बदलावे लागेल.