शिक्षक होण्यातील समृद्धी

1
31
_ShikshakHonyatil_Samrudhi_1.png

मी ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर येथील माध्यमिक शाळेत शिक्षिक पदावर 1981 साली रुजू झाले. माझे वय लहान होते, मात्र मनामध्ये अनेक स्वप्ने होती. माझे लहानपणापासून शिक्षिक होण्याचे ध्येय निश्चित होते. माझ्या डोळ्यांसमोर तेव्हा अनेक शिक्षकांचे आदर्श होते. माझ्यासाठी शिक्षक होणे हा व्यवसाय नव्हे तर ध्येय होते.

मी बीएडची पदवी मिळवल्यानंतर मला अनेक खासगी शाळांकडून शिक्षक पदाच्या आॅफर्स आल्या. मात्र मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकवावे असा निर्णय मी आणि माझे पती, आम्ही दोघांनी मिळून घेतला. मी महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकमध्ये शिकवू लागले. तेथे पोलिस लाईन आणि आंबेडकर रोड या परिसरांतील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. मला सुरूवातीला तेथील विद्यार्थी, त्यांची राहणी, भाषा या सगळ्याचा त्रास जाणवे. मला त्या मुलांना आवरणे, त्यांना शिस्त लावणे कठीण जाई. त्या शाळेतील बहुसंख्य मुले झोपडपट्टीत राहणारी होती. त्यातील काही अनेक वेळा नापास झाल्यामुळे वयाने मोठीदेखील होती. त्यांच्या घरचे वातावरणात शिक्षणाबद्दल आस्था नव्हती. त्यामुळे त्या विद्यार्थांना अभ्यासाचे महत्त्व कळत नसे. त्यांचे अभ्यासात अजिबात लक्ष नसे. मला काय करावे ते कळत नव्हते. माझे थोडे दिवस तसे निराशेत गेले. माझा सुरवातीचा उत्साह मावळला. पण मनात विचार आला, ‘अरे! ही तर सुवर्णसंधी आहे. साध्या-सरळ मुलांना सगळेच शिक्षक शिकवतात. पण ही वेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेली मुले आहेत. त्यांना योग्य वळण लावणे, त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणे हे कठीण काम माझ्यासमोर आले आहे आणि ते मला पूर्ण करायचं आहे.’ मी त्या मुलांना शिकवण्याचा निश्चय केला आणि मग मात्र मी मागे वळून पाहिले नाही.

माझे सुरुवातीचे दिवस कधी स्वतःला तर कधी मुलांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात गेले. ती मुले वरकरणी उद्धट, वाया गेलेली वाटत होते, मात्र त्यांना मनातून प्रेमाची, आपुलकीची अोढ होती. त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. मला त्यांची ती गरज समजली आणि मग शिक्षिका, मोठी बहीण ते आई असा माझा प्रवास नकळत घडत गेला.

मी छत्तीस वर्षे शिक्षक पदावर कार्यरत होते. त्या काळात मी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, वांद्रे, ठाणे अशा विविध परिसरांमध्ये वास्तव्याच्या निमित्ताने फिरले. विद्यार्थ्यांना शिकवत असताना मीदेखील एकिकडे शिकत राहिले. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले, त्यांमुळे माझे आयुष्य परिपक्व होत गेले. मी बऱ्याच गोष्टी शिकले. काही चूकादेखील केल्या. मला मी विद्यार्थ्यांची कॉपी पकडली म्हणून मारण्याची धमकी देण्यात आली, कधी रस्त्यात अडवले गेले. पण वाईट अनुभवांच्या पाठोपाठ चांगल्या घटनादेखील घडत होत्या. कधी पूर्वीचा गुंड प्रवृत्तीचा विद्यार्थी त्याच्या बायकोला माझ्याकडे नमस्काराला घेऊन आला, तर अनेकदा लग्न झालेले विद्यार्थी पहिले मुल झाल्यावर त्याला आशिर्वादासाठी माझ्याकडे घेऊन येत.

मी ठाण्यातील श्रीनगर येथे 1989साली राहायला आले. मी तेथील किसननगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये बदली घेतली. त्या शाळेतील अनेक मुलांना त्यांच्या घरी अभ्यास करणे शक्य होत नसे. ते विद्यार्थी माझ्याजवळ त्यांच्या राहत्या परिसराच्या सभोवतालची अपुरी जागा, आजूबाजूचा गोंगाट यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, अशी कारणे सांगत. मला वाटे, की मुले अभ्यास न करण्यासाठी खोटी कारणे देत आहेत. पण मी त्यांच्या परिसराला भेट दिली, तेव्हा तेथील वास्तव परिस्थिती माझ्या लक्षात आली. ते विद्यार्थी भटवाडी, वारलीपाडा, घाटीपाडा, अंबिकानगर, रामनगर या ठिकाणी राहायचे. गजबजलेला परिसर, तेथील छोटी-छोटी घरे, घरातील माणसांची गर्दी असे ते वातावरण मुलांच्या अभ्यासाला पूरक नव्हते. मी ते पाहिल्यानंतर एक निर्णय घेतला. माझे घर दुपारी बंद असे. माझी मुलगीदेखील दुपारी शाळेत असायची. मी माझे घर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरता वापरावे असे ठरवले. मी तसे विद्यार्थ्यांना सांगितले. प्रथम चार-पाच विदयार्थी तयार झाले. पुढे मुलांची संख्या वाढली. मुली सुद्धा विचारायला आल्या. त्यांच्यासाठी वेगळी वेळ ठेवली. आज ती सगळी मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, मोटर मेकॅनिक अशा वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. ती मुले जेव्हा प्रेमाने भेटायला येतात, तेव्हा अभिमानाने माझा उर भरून येतो.

गणेश नलावडे व अजित गावकर हे दोघे 1992-93 च्या बॅचचे सातवीचे विद्यार्थी. हुशार! दोघांचे अक्षर सुंदर. गणेश वर्गात शेवटच्या बाकावर बसायचा. मी वर्गात त्या गेले की त्याला पुढे बसायला सांगायचे. तेव्हा तो वैतागायचा, पण पुढे बसायचा. गणेश अबोल होता. इतर विद्यार्थी त्याला ‘मुका’ म्हणून चिडवायचे. पण त्याची माझ्याशी नाळ जुळली. तो हळुहळू बोलायला लागला. मी एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला ज्ञानेश्वरांची भूमिका दिली. तेव्हापासून आमची गट्टीच जमली. गणेश व अजित यांना अभ्यासात रस होता. म्हणून मी आठवीच्या वर्गात त्या दोघांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष पुरवले. ते मला त्यांच्या घरच्या अडचणी सांगू लागले. त्यानंतर माझ्याकडे गणेशमार्फत इतर मुलांच्या अडचणी येऊ लागल्या. अजित व गणेश यांनी काही दिवसात माझा इतका विश्वास संपादन केली, की ते मी घरी नसतानादेखील इतर मित्रांना घेऊन माझे घर उघडून अभ्यास करत बसू लागले. गणेश माझ्या घरच्या सदस्याप्रमाणे होऊन गेला. त्याने माझ्या मुलीला भावाचे प्रेम दिले. त्याने माझ्या मुलीच्या लग्नात, पुढेदेखील प्रत्येक ठिकाणी साथ केली. तो माझ्या घरातील प्रत्येक प्रसंगात सहभागी असे. गणेश माझ्याकडे गणपती-गौरीच्या दिवसांत मूर्ती बुक करण्यापासून तिची प्रतिष्ठापना करणे, विसर्जन करणे अशा प्रत्येक कार्यात घरातल्या कर्त्या मुलासारखी जबाबदारी घ्यायचा. तो नेहमी एकच वाक्य उच्चारे, ‘माझे जीवन सार्थकी लागले. आज आम्ही जे काही आहोत. ते तुमच्यामुळे!’

मी अजित गावकर याचा मेडिकलचा फॉर्म भरण्यासाठी, त्याला अलिबागमध्ये स्थिर होण्यासाठी मदत केली. अजित त्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आज चिपळूणजवळ मोठे हॉस्पिटल चालवणाऱ्या अजितकडे पाहिले की कृतकृत्य वाटते.

‘‘लोहकरे मॅडम आम्हाला मराठी विषय शिकवायच्या.

त्यांनी आम्हाला केवळ विद्यार्थी नव्हे तर स्वत:च्या

मुलासारखे मानून संस्कार केले. त्यांनी हुशार विद्यार्थी

आणि अभ्यासात लक्ष न देणारे विद्यार्थी असा भेदभाव

केला नाही. लोहकरे यांनी ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात

रुची नव्हती त्यांच्यावर अधिक मेहनत घेतली.

मी आयुष्यात जे काही बनू शकलो

त्यात लोहकरे मॅडमचा मोलाचा वाटा आहे.”      

– डॉ. अजित गावकर

मी माझ्या आयुष्यपटाकडे पाहते तेव्हा मनात विचार येतो, की मी त्या साऱ्या अडचणींसमोर ठामपणे उभी राहिले. त्यांवर मातदेखील केली. ती सारी इच्छाशक्ती माझ्यात कोठून आली असावी? कदाचित माझ्या वडिलांकडून. माझे वडिल दत्तात्रय कमळे हे जळगावच्या विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री होते. त्यांनी तेथील आदिवासी परिसरांत मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य उभारले. जळगावच्या पाचोरा परिसरात आजही माझ्या वडिलांचे नाव आदराने घेतले जाते. माझ्या मनावर त्यांच्या कामाचा अप्रत्यक्ष संस्कार झाला असावा. माझी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना मदत करण्याची प्रेरणा माझे वडिल असावेत.

आज गणेश नलावडे यशस्वी वकील आहे. अजित गावकर मोठा डॉक्टर झाला आहे. उमेश क्षीरसागर हा मोटर मॅकेनिक आहे, बबन कदम सैन्यात भरती झाला आहे, गौरी सोनार परदेशात इंजिनिअर म्हणून काम करते, तर शर्मिला पिंपळोलकर ही नगरसेविका पदावर कार्यरत आहे. ते सारे म्हणजे केवळ उदाहरणे! तसे माझे अनेक विद्यार्थी आहेत. ते सारे कोठेही भेटले तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून स्नेह, कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त होतो. मी शिक्षकी पेशातून निवृत्ती 2017 साली घेतली. तेव्हा अनेक विद्यार्थी दूरवरून त्या समारंभाला आले होते. ती मुले मला म्हणतात, ‘‘तुम्ही होतात म्हणून आम्ही आज या उंचीवर पोचलो.’’ मला त्यांचे ते वाक्य कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटते. मला त्या विद्यार्थांचे भरभरून मिळणारे प्रेम ही माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी समृद्धी आहे.

– मनीषा लोहकरे

About Post Author

1 COMMENT

  1. Feeling proud Manisha tai…
    Feeling proud Manisha tai…khup Chan lekh lihilay tumchyasarkhe…kharatar tyanche karya hyahun khup mothhe aahe. Tumchya mdhe aslele ganache aani nrutyache gun hi aamhala thawuk Aahet.Khup khup Abhinandan.

Comments are closed.