शाहूंचा राज्याभिषेक – काव्यमय वृत्तांत

0
154

कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या राज्यारोहण समारंभाचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले काव्यमय वर्णन… त्याची संशोधित आणि संपादित स्वरूपातील देखणी आवृत्ती  प्रकाशित झाली आहे. तो समारंभ 2 एप्रिल 1894 रोजी झाला. ती ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. तो प्रसंग कोल्हापूरसाठी सुवर्णयुग घेऊन आला. त्या क्षणापासून कोल्हापूर संस्थानात  सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले ! त्यातून देशभरातील सामाजिक सुधारणांना वेगळी दिशा मिळाली. तो ठेवा पुन्हा प्रकाशात आणण्याची महत्त्वाची कामगिरी यशोधन जोशी यांनी केली आहे.

ती घटना ‘मुक्त्यारी समारंभ’ अथवा ‘श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती यांचा राज्याधिकार स्वीकारोत्सव’ या नावाने ओळखली जाते. ती मूळ संहिता आहे बाळाजी महादेव करवडे यांची. ते गृहस्थ त्या काळातील हेडमास्तर. त्यांचे गाव म्हणजे पट्टणकोडोली (पेटा आळते, इलाखा कोल्हापूर). ते शाहू महाराजांच्या राज्यारोहण सोहळ्याला उपस्थित होते. तो सोहळा 1894 मध्ये साजरा झाला. त्यांनी त्या सोहळ्याचे केलेले वर्णन 1896 मध्ये प्रकाशित झाले. तो ऐवज यशोधन सुरेश जोशी यांच्या हाती लागला. त्यांनी त्या ऐवजात अधिकची भर घातली. त्यासाठी ब्रिटिश लायब्ररीतील दस्तऐवज मिळवले आणि त्या साऱ्यासह बाळाजी महादेव करवडे यांचे ते काव्य वाचकांच्या हाती दिले आहे. करवडे यांच्या मूळ काव्याला इतर अस्सल आणि दुर्मीळ कागदपत्रांची जोड मिळाल्याने त्या ग्रंथाचे संदर्भ मूल्य वाढले आहे.

महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या विभूतींत शाहू छत्रपती यांचे स्थान महत्त्वाचे- विशेषत: सामाजिक सुधारणांच्या बाबतीत. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर शाहू छत्रपतींचा झालेला उदय ही ऐतिहासिक घटना होय. असे शाहू छत्रपती तख्तारूढ होताना, प्रत्यक्ष पाहणाऱ्या बाळाजी महादेव करवडे यांचा काव्यग्रंथ यशोधन जोशी यांनी अभ्यासू वाचकांच्या हाती दिला आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक, शाहू चरित्रकार रमेश जाधव यांनी त्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे. ‘… हा काव्यसंग्रह हे अस्सल असे प्राथमिक साधन आहे.’ हा त्यांचा अभिप्राय. काव्यकर्ते बाळाजी महादेव करवडे हे तिसऱ्या शिवाजीराजांच्या म्हणजे बाबासाहेब महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर होते आणि राजर्षी शाहूंच्याही. शिवाय, त्यांनी ते काव्य त्या समारंभाला हजर असणाऱ्या लोकांशी संवाद साधून लिहिले असल्याने त्याला महत्त्व खूप. जाधव यांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहे. जाधव तो काव्यसंग्रह आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टिकोनातून संपन्न असल्याचे सांगतात. प्रस्तावनेत काव्यविषयाबाबतची आस्था, साधी-अर्थगर्भ शब्दकळा, तथ्य सत्याची कष्टपूर्वक प्राप्ती, आत्यंतिक काव्यनिष्ठा, रचना सापेक्षता आणि कृतज्ञतेची भावना अशी रचनेची सारी वैशिष्ट्ये उलगडून दाखवली आहेत.

काव्यसंग्रहाचे एकूण पाच भाग आहेत –  पहिला भाग : मुक्त्यारीसमारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपति, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव, दुसरा भाग : मुहूर्ताचा निश्चय, तिसरा भाग : मुक्त्यारीसमारंभ व त्यासंबंधी दरबार, चौथा भाग : समारंभाचे वर्णन आणि पाचवा भाग : महाराजांना मानपत्र अर्पण करण्याचा सोहळा.

प्रस्तावना मूळ काव्यकर्ते यांनी लिहिली आहे. शाहू छत्रपतींच्या गुणांचे वर्णन करणारे काव्य परिशिष्ट आहे. त्या पाच भागांसोबत त्या प्रसंगी हजर असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणे सविस्तर दिली आहेत. संपूर्ण काव्य हे वृत्त-छंदात बंदिस्त असून गेय स्वरूपात आहे. कीर्ती शिलेदार यांनी त्या काव्याला स्वरबद्ध करण्याची मनीषा व्यक्त केली होती. पण त्यांचे निधन मनीषा प्रत्यक्षात येण्यापूर्वी झाले. कीर्ती शिलेदार यांची इच्छा फलद्रूप झाली असती तर राजर्षींच्या राज्याभिषेक सोहळ्याचा तो वृत्तांत घराघरात पोचला असता.

काव्याचा पहिला भाग राजर्षींची कुल परंपरा आणि त्यांची जडणघडण सांगणारा आहे. दुसऱ्या भागात राज्याभिषेकाची तयारी आणि नियोजन यांचे वर्णन आहे, तिसऱ्या भागात प्रत्यक्ष राज्याभिषेक समारंभाचा वृत्तांत वर्णन आणि त्या प्रसंगी भरवण्यात आलेला दरबार, चौथ्या भागात समारंभानंतरचा दीपोत्सव आणि भोजनाच्या पंगती; तर पाचव्या भागात राजर्षींना देण्यात आलेल्या मानपत्रांची वर्णने आली आहेत. बाळाजी महादेव करवडे यांनी लिहिले आहे, “ज्याचे छायेखाली आपण आहों, ज्याची चाकरी करितों, ज्याचें अन्न खातो, अशा त्या श्री. शाहूछत्रपति महाराजांचे मुक्त्यारीचे वर्णनाचें काव्यरूपानें केलेलें पुस्तक…. साक्या, दिंड्या, संगीत चालीचीं अनेक तऱ्हेचीं पदे, कटाव, काही वृत्तांचे श्लोक, अंजनीगीतें, आर्या, अभंग वगैरे अशा प्रकारांनी रचिलें आहे.”

यशोधन जोशी यांनी अधिकची भर घालण्यासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. त्यांनी मूळ ग्रंथात पॉलिटिकल एजंट कर्नल वुडहाऊस, बॉम्बे गव्हर्नरचे सेक्रेटरी व्हीटवर्थ या दोघांची त्या समारंभाबाबतची पत्रे समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर, राज्यकारभार स्वीकारण्यापूर्वी शाहू महाराजांना गव्हर्नर हॅरीस यांनी लिहिलेले पत्रही त्यात वाचण्यास मिळते आणि इंग्रजांनी राजशिष्टाचार व मानपान यांबाबतीत संस्थानिकांना, जहागिरदारांना कसे जखडून टाकले होते त्याचीही कल्पना येते.

पुस्तकात 2 ते 5 एप्रिल या चार दिवसांत झालेल्या दैनंदिन कार्यक्रमांची सविस्तर माहिती मिळते. जोशी यांनी त्या प्रसंगी करवीर दरबारतर्फे प्रकाशित करण्यात आलेला कार्यक्रमाचा आराखडा, करवीर सरकारचे ग्याझिट, कोल्हापूर रेसिडेन्सीमधील आणि नव्या राजवाड्यातील बैठक व्यवस्था, राजवाड्यात प्रवेश करताना महाराज आणि गव्हर्नर यांचा लवाजमा यांचा आराखडाही दिला आहे. त्यावरून तत्कालीन रीतीरिवाजांची कल्पना येते. त्या समारंभाच्या निमित्ताने ‘दैनिक केसरी’मध्ये वृत्तांत आले होते. जोशी यांनी ते दिले आहेतच, शिवाय, त्या समारंभाची बातमी 20 सप्टेंबर 1894 रोजीच्या अमेरिकन वृत्तपत्रांत आली होती, त्याचे कात्रणही जोशी यांनी मिळवले आहे. The Arizona Republic मध्ये महाराजांच्या छायाचित्रासह आलेली ती बातमी प्रथमच मराठीजनांना वाचण्यास मिळत आहे !

तो सगळा ऐवज दुर्मीळ छायाचित्रांनी सजलेला असल्याने ते काव्य वाचत असताना, जणू काही वाचक त्या समारंभास उपस्थित असल्याची अनुभूती येते. त्यापूर्वी सदाशिव महादजी देशपांडे यांनी लिहिलेली आणि विलास पोवार यांनी संपादित केलेली ‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार, करवीर यांच्या दत्तक विधानाची हकिकत, 1885’ वाचताना तशीच अनुभूती आली होती. ते पुस्तकही पुनर्मुद्रित झाले आहे.

इतिहासाच्या दृष्टीने त्या ग्रंथाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन कृष्णा पब्लिकेशन्स यांनी तो ग्रंथ देखण्या स्वरूपात सादर केला आहे. ग्रंथाची मांडणी आणि सजावट दर्शन पासलकर यांची आहे. राजर्षींच्या राज्यारोहणाच्या छायाचित्राच्या मुखपृष्ठाची मांडणी चारुदत्त पांडे यांची आहे.

–  सदानंद कदम 9420791680 kadamsadanand@gmail.com

मुक्त्यारीसमारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहूछत्रपति सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव
मूळ संहिता : बाळाजी महादेव करवडे.
संशोधन-संपादन : यशोधन जोशी.
कृष्णा पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १६८ किंमत : ३०० रुपये

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here