शाहीर राम जोशी

3
115

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव तासे असे होते. त्यांच्या घराण्याची वृती जोसपणाची (जोशी) असल्यामुळे कालातरांने तासे हे लुप्त होऊन जोशी हे आडनाव कायम झाले.

त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र जगन्नाथ जोशी. राम यांचे वडील जगन्नाथ व त्यांचे बंधू अनंत हे दोघेही वेदशास्त्रसंप्पन होते. त्यांना समाजात मानमान्यता होती, राम यांचा थोरला भाऊ मुदगल भट हा कथा-कीर्तने करी, पुराणेही सांगे. तो त्याची परंपराप्राप्त भिक्षुकीही चालवी. वडील वारल्यावर धाकट्या भावाचा सांभाळ करणे त्यांच्याकडे आले. राम जोशी व्युत्पन्न कवी होते. त्यांच्या मराठी स्फुट सुभाषितांचा संग्रह व रघुवंशाच्या धर्तीवर रचलेले यदुवंश नामक एकोणीस सर्गांचे महाकाव्य उपलब्ध आहे.

राम जोशी यांनीही आपल्याप्रमाणे कीर्तन करावे, भिक्षुकी चालवावी, कुळाची कीर्ती वाढवावी अशी भावाची इच्छा होती. पण राम जोशी लहानपणापासून हूड व उनाड असल्यामुळे त्यांनी भावाच्या इच्छेची कदर केली नाही. ते जात्या बुद्धिमान व प्रतिभावान होते खरे. परंतु तमासगिरांच्या संगतीने त्याला वाईट वळण लागले. लवकरच, त्याने शाळाही सोडली. ते त्यांच्या घरासमोरील धोंडिबा नामक शाहिराकडे अष्टौप्रहर बैठक करू लागले. कधी कधी, ते त्या त्या मंडळींतच जेवणखाणेही करत.

मुदगलभट यांनी त्यांना (भावाला) शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा राम यांनी त्यांच्याशी संबध तोडून टाकले व ते राजरोस तमाशाच्या फडात सामील झाले.

आरंभी, ते धोंडिबा शाहिराला लावण्या रचून देण्याचे काम करत; पुढे, ते स्वत:च तमाशा करू लागले. लवकरच, त्यांचा एक नामवंत तमासगीर म्हणून सर्वत्र लौकिक झाला. त्यांना कीर्ती व संपत्ती मिळाली; तथापि त्यांच्या चैनी व व्यसनी वृतीमुळे ती त्यांना टिकवता आली नाही. शेवटी, ते अगदी कफल्लक बनले व मग पश्चाताप पावून पंढरपूर मुक्कामी वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांच्याकडे विद्याध्ययनासाठी राहिले. त्यांनी तेथे काही वर्षें मन लावून अभ्यास केला आणि उत्तम कीर्तनकार व पुराणिक म्हणून ते पुनश्च सोलापूरला परतले.

राम जोशी सोलापूरला पुराणिक म्हणून किती प्रसिद्ध होते या विषयी एक आख्यायिका सांगतात,  ती अशी –

सोलापूरच्या एका प्रसिद्ध मंदिरात राम जोशी यांचे बंधू मुदगलभट महाभारतावर प्रवचन करत असताना एकदा त्यांना ताप येऊ लागला. साहजिकच, पुराणात खंड पडला म्हणून मुदगलभट दु:खी झाले. त्या वेळी राम जोशी सोलापुरास परतले होते. ते मुदगलभट यांच्या घरी आले. त्यांना पाहताच मुदगलभटांस संताप आला व ते राम जोशी यांना ‘कुलांगार’, ‘घरबुडव्या’ अशा शब्दांनी दूषणे देऊ लागले. तथापी राम जोशी रागावले नाहीत. भावाच्या शिव्याशापांवर किंचितही प्रतिवाद न करता ते म्हणाले, “पोथी कोठे आहे? मी आज तुमच्या ऐवजी पुराण सांगतो.” मुदगलभटांना राम जोशी यांच्या परिवर्तनाची काही कल्पना नसल्यामुळे ते ओरडून राम जोशी यांना म्हणाले, “डफ वाजवण्यात आणि पुराण सांगण्यात महदंतर आहे.” तरीही राम जोशी यांनी अधिकोत्तर केले नाही. ते शांतपणे देवळात गेले व तेथे त्यांनी रसाळपणे पुराण सांगितले. त्यांच्या पुराणकथनावर श्रोते एवढे खुश झाले, की अनेकांनी त्याची स्तुती मुदगलभट यांच्यापुढेही केली.

पुढे राम जोशी यांनी कीर्तने करण्यास सुरुवात केली. बारामतीच्या मुक्कामात बाबुजी नायकांच्या घरी झालेल्या कीर्तनप्रसंगी त्यांची कविवर्य मोरोपंत यांच्याशी भेट झाली. प्रथम भेटीतच मोरोपंतांची त्यांच्यावर मर्जी बसली. राम जोशी यांच्या कवनांवर मोरोपंत एवढे खूष असत, की त्यांना ते पत्रांतून ‘कविप्रवर’ म्हणून संबोधत.

राम जोशी यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केली. त्यांनी पंढरपूरचे वर्णन, तुळजापूरचे वर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचे वर्णन इत्यादी लावण्या त्या त्या प्रवासात रचल्या. राम जोशी यांना शेवटी काशी यात्रा करण्याची इच्छा झाली; परंतु त्यांच्या उधळ्या वृतीमुळे यात्रेसाठी लागणारे धन त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे धन देण्याबद्दल अर्ज केला. परंतु बाजीरावाने त्या अर्जाला प्रतिसाद दिला नाही. अन्य काही सोय न झाल्यामुळे त्यांची काशी यात्रेची इच्छा अपुरी राहिली.

राम जोशी हे मुख्यत्वे शृंगार कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आध्यात्मिक काव्यरचना ही त्यांचा तमाशाचा नाद सुटल्यानंतरची आहे. उपमा, उत्प्रेक्षा, तरल कल्पना आणि अनुप्रास या वाङ्मयीन गुणांनी त्यांचे लावणीवाङ्मय कोणाचेही मन मोहून टाकते. एक नमुना –

सुंदरा मनामध्ये भरली l जरा नाही ठरली l
हवेलित शिरलि l मोत्याचा भांग l रे गड्या हौस नाहि पुरलिl म्हणोनी विरलि l
पुन्हा नाहिं फिरलि l कुणाची सांग ll ध्रु ll
जशी कळी सोनचाफ्याची l न पडु पाप्याची l
दृष्टि, सोप्याचीl नसल ती नार l

अति नाजुक तनु देखणी l गुणाची खणी l
उभी नवखणीं l चढुन सुकुमार ll
जशि मन्मथरति धाकटी l सिंहसम कटी l उभी एकटी l गळयामध्ये हार l
आंगि तारुण्याचा भर ज्वानिचा कहर l
मारिते लहर मदनतल्वार ll
पायिं पैंजण झुबकेदार l कुणाची नार कोण सरदार l हिचा भरतार l
कुलविद्याजडावटिकलि l मनामधिं टिकलि l
नाहिं हटकली l तेज अनिवार l
नाकामध्ये बुलाख सुरति l चांदणी वरति l
चमकति परति l हिच्यापुढे फार l चालते गजाची चाल l लड सुटली कुरळे बाल l
किनखाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल l
शोभवी दिठोणा गाल l हिला जरि गाल l
हिला भोगाल l फिटल तरि पांग l
ही शुद्ध इंदुची कळा l मतिस नाकळा l
इतर वाकळा l न हिजहुनि चांग ll

अध्यात्मपर लावणीमध्ये ते भक्ती व ज्ञान यांचा पुरस्कार करतात. त्या प्रकारचा नमुना –

भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयी बुधा l धरिशि तरि हरिचा सेवक सुधा llधृ ll
चराचरि गुरु तरावयाला नरा शिरावर हरी l जरा तरि समज धरी अंतरी ll
हटातटानें पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरं l मठाची उठाठेव कां तरी ll
काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे l
ही काय भावाला दुर करतिल माकडे l
बाहेर मिरविशी आंत हरिसि वांकडे l
आशा भक्तिच्या रसरहित तूं कसा म्हणविशी बुधा l
हरिरस सांडुनि घेशी दुधा ll

राम जोशी यांच्या ठायी पांडित्य व पाचकळपणा, प्रौढता व ग्राम्यता, वैराग्य व विलासीपणा अशा परस्परविरोधी गुणांचा मजेदार संगम झाला होता. त्यांची रचना संस्कृतप्रचुर, भाषा रसाळ आणि वर्णने खुमासदार आहेत.

राम जोशी यांच्‍या जीवनावर आधारीत व्‍ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्‍दर्शीत केलेला ‘लोक शाहीर राम जोशी’ हा चित्रपट 1947 साली प्रदर्शित झाला. त्‍या चित्रपटामध्‍ये जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती. विशेष म्‍हणजे त्याच वर्षी राम जोशी यांच्‍या आयुष्‍यावर आधारीत ‘मतवाला शाहीर राम जोशी’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्‍याचे लेखन ग. दि. माडगुळकर यांचे होते.

(मूळ लेख भारतीय संस्कृतिकोश खंड – 8)

About Post Author

3 COMMENTS

  1. थिंक महाराष्ट्र…
    थिंक महाराष्ट्र…
    धन्यवाद…

    खूप सुंदर माहिती. आतापर्यंत अशा तपशीलासह या संदर्भातील माहिती प्रथमच वाचनात आली.
    “थिंक महाराष्ट्र’ कडील संकलन खूप चांगले आहे.

    धन्यवाद…शुभेच्छा
    धोंडिराम पाटील, सांगली

  2. माहिती फारच छान वाचनाचा व्या…
    माहिती फारच छान वाचनाचा व्या संग दांडगा आहे असंच लिहित रहा writing
    makes a man perfect

    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  3. खूपच सुंदर व दुर्मिळ माहिती…
    खूपच सुंदर व दुर्मिळ माहिती आहे. सोलापूरच्या पुरातन व विद्यमान कलाकारांची माहितीचा संग्रह खूप प्रेरणादायी आहे. असाच निरंतर प्रयत्न आपल्याकडून होत राहो,हीच सदिच्छा!

Comments are closed.