Home वैभव शांबरिक खरोलिका – पडद्यावरील हलती चित्रे (Shambarik Kharolika – Show That Preceded...

शांबरिक खरोलिका – पडद्यावरील हलती चित्रे (Shambarik Kharolika – Show That Preceded Film Medium)

 

कल्याणचे(ठाणे जिल्हा)) पटवर्धन बंधू यांच्या शांबरिक खरोलिका नावाच्या खेळाने पडद्यावरील हलत्या चित्रांच्या माध्यमातून कथाकथनास सुरुवात झाली. ती चित्रपट माध्यमाची आरंभीची झलक असे म्हणता येईल. त्यानंतर दादासाहेब तोरणे व नंतर दादासाहेब फाळके … पडद्यावरील हलती चित्रे ते चित्रपट हा विकासक्रम असा आहे. राजा हरिश्चंद्रनावाचा मूकपट 3 मे 1913 या दिवशी प्रथम प्रदर्शित झाला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची ती कृती. त्यावेळी सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली!
हलती चित्रे पडद्यावर दाखवण्याचा भारतातील पहिला प्रयोग त्याआधी तेवीस वर्षें, 30 सप्टेंबर 1892 रोजी झाला होता. न्यायमूर्ती काशिनाथ तेलंग यांच्या सत्कार समारंभात ते घडलेचित्रे पडद्यावर पहिल्यांदा हलली! त्यांना वाद्य, संगीत, संवाद व निवेदन यांची जोड होती. तो पराक्रम होता कल्याणच्या पटवर्धन बंधूंचा. त्यांनी शांबरिक खरोलिका या नावाने पडद्यावरील हलत्या चित्रांच्या माध्यमातून गोष्ट सांगण्यास सुरुवात केली होती. पटवर्धन बंधूंच्या शांबरिक खरोलिकाच्या पहिल्या प्रयोगानंतर त्यांना विविध ठिकाणांवरून आमंत्रणे येऊ लागली. त्या शोचा खास खेळ 27 डिसेंबर 1895 रोजी पुण्यात काँग्रेसच्या अधिवेशनातही सादर करण्यात आला होता. त्याची प्रशंसा लोकमान्य टिळक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, नामदार गोखले यांनी केली होती.
शांबरिक खरोलिका ही महादेवराव पटवर्धन (1830 1902) यांची कल्पना. ते कल्याणला पारनाक्याजवळ राहत. ते चौघे भाऊ. त्यांपैकी दोघांची नावे देवराव व गंगाधरपंत. महादेवराव चित्रकार होते. मॅजिक लँटर्नचा खेळ त्यांच्या पाहण्यात आला. पटवर्धन धडपड्या स्वभावाचे होते. त्यांनी मॅजिक लँटर्नची कला शिकण्याचे ठरवले. मॅजिक लँटर्नमध्ये चित्रे स्थिर राहत. महादेवरावांनी त्या स्थिर चित्रांना हलवण्यासाठी सुधारणा केली. तो 1892 च्या दशकातील काळ. पटवर्धन यांनी चित्रे भिन्न आकाराच्या काचेच्या प्लेटवर काढली. त्यांनी ती चित्रे एका काचेवर कुत्रा उभा आहे, तर दुसऱ्या काचेवर कुत्रा दोन पायांवर उभा आहे अशी रंगवली. कुत्र्याचा चेहरा अर्थातच दोन्ही चित्रांत सारखा काढला. त्यांनी त्या काचा वर-खाली हलवल्या; त्यातून कुत्रा उड्या मारत असल्याचा भास उत्पन्न झाला. महादेवराव रेल्वेत नोकरीला होते.  त्यांनी ती चित्रे कंदिलाच्या (रेल्वेत वापरले जाणारे प्रखर कंदील) प्रकाशात पडद्यावर पाहिली. चित्रे हलत असल्याचा, कुत्रा उडी मारत असल्याचा भास अधिक स्पष्ट झाला. अशा रीतीने, त्यांना हलत्या चित्रांचा शोध लागला! त्यानंतर त्यांनी रामायण, महाभारत, पंचतंत्र अशा कथांवर आधारित चित्रे तयार करणे आरंभले. काळ जुना होता. चित्रे 4”x 4च्या काचांवर काढण्यास हवी होती. त्यांनी विनायक व सदाशीव या त्यांच्या मुलांना सोबतीला घेतले. त्यांनी विनायकला (1889 -1990) मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकण्यासाठी पाठवले होतेच.

महादेवराव यांच्या मुलांनी एकाऐवजी दोन-तीन कंदील वापरणे सुरू केले. त्यामुळे पडद्यावर अंधार न होता सलगपणे गोष्ट सादर होऊ लागली. पटवर्धन बंधूंच्या शांबरिक खरोलिकाया शोने प्रेक्षकांना दोन-अडीच तास अंधारात बसण्याची सवय लागली. तसेच, पडद्याकडे एकटक पाहण्याचीही सवय लागली. त्या आधी नाटक, तमाशा हे खेळ उजेडात सादर होत.

महादेवरावांचे 1902 साली निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी संपूर्ण लक्ष त्या व्यवसायाकडे लावले. त्यासाठी त्यांचे दौरे सुरू झाले. प्रशंसा, सत्कार त्यांच्या वाट्याला येत गेले. जळगावकरांनी त्यांना तीन तोळ्यांचे सुवर्णपदक देऊन त्यांचा 1910 मध्ये सत्कार केला. कलेक्टर जॅक्सन नाशकात खरोलिकाचा प्रयोग बघण्यास 20 मे 1909 रोजी आले होते. त्यांनी त्यांना प्रशस्तिपत्र दिले. ब्रिटिश सरकारने पटवर्धन यांची कलेक्टर जॅक्सन यांच्या खुनाशी संबंध असावा म्हणून चौकशीही केली होती. पटवर्धन यांच्या शोमधील साहित्याचे वाटप भाऊबंदकीत झाले तरी, पटवर्धन यांच्या वारसांकडे पाचशे ते सहाशे पारदर्शिका शिल्लक आहेत. महादेव विनायक सदाशीव – सुनील असे वारस आहेत. महादेवरावांचे पणतू सुनील प्रसंगपरत्वे खेळ सादर करतात. सुनील बँकेत नोकरी करतात. त्यांनी त्या पारदर्शिका केंद्र शासनाच्या नॅशनल फिल्म अर्काईव्हज ऑफ इंडियाच्या ताब्यात सुरक्षित ठेवल्या आहेत. सुनील यांना अक्षय व अथर्व अशी दोन मुले आहेत. ती सर्व मंडळी एकत्र राहतात.

शांबरिक खरोलिका या नावाची गंमत सुनील यांनी सांगितली. शंबासूर नावाच्या राक्षसाचा उल्लेख पुराणात आहे. तो जादू करून काहीही साध्य करत असे. त्यावरून शांबरिक घेतले. खरोलिका हा शब्द संस्कृतमध्ये दिव्यासाठी आहे. त्यावरून शांबरिक खरोलिकाअसे नामकरण झाले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथाया आत्मकथनात तो किस्सा लिहिलेला आहे.
सुनील पटवर्धन9819945085

 

श्रीकांत पेटकर 9769213913shrikantpetkar@yahoo.com
श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (
MSEB) कंपनीत पडघे, तालुका भिवंडी येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची आणि मी बौद्ध झालोया अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत. पेटकर यांच्‍या प्रयतनांमुळे त्‍यांच्‍या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्‍कृष्‍ठ वीज केंद्राचा पुरस्‍कार मिळाला. त्‍यांना कल्याण रत्नया पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.
———————————————————————————————————————————

————————————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version