ज्येष्ठ मराठी कवी आणि गझलकार सदानंद डबीर यांनी ‘गारूड गझलचे’ या पुस्तकात मराठी गझल व समकालीन उर्दू गझल ह्यांचा तुलनात्मक सौंदर्यवेध घेताना, ‘शहरयार’ ह्या प्रतिभावंत उर्दू कवीचे काही शेर नमूद केले आहेत. शहरयार यांना नोव्हेंबर 2010 मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाला. समारंभात शहरयार यांनी आपले भाषण संपवताना तोच शेर म्हटला, जो डबीर यांनी आपल्या पुस्तकासाठी निवडला आणि त्याचे विश्लेषण केले. शहरयारसारख्या मोठ्या कवीच्या मनाशी आपण तद्रूप झाल्याची भावना त्या क्षणी डबीर यांच्या मनात जागली. या उर्दू शेराचा अर्थ स्पष्ट करत डबीर यांनी केलेली ही मल्लिनाथी…
‘शहरयार’ ह्या प्रतिभावंत उर्दू कवीला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार नोव्हेंबर 2010 मध्ये जाहीर झाला. माझे ‘गारूड गझलचे’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’मार्फत डिसेंबर 2010 मध्ये प्रकाशित झाले. त्यात मी मराठी गझल व समकालीन उर्दू गझल ह्यांचा तुलनात्मक सौंदर्यवेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुहम्मद अली, निदा फाजली, मख्मूर सईदी, कुमार पाशी व शहरयार हे भारतीय कवी आणि कतील शिफाई व नासिर काजमी हे पाकिस्तानी शायर ह्यांच्या गझलांची वैशिष्ट्ये सांगणारे लेख त्यात आहेत. मराठी गझल एकसूरी होत आहे का? व तसे असल्यास त्याची कारणे काय? गझल हा काव्यप्रकार कसा ‘बहुरूपिणी’ आहे! हे आधुनिक उर्दू गझलांच्या संदर्भात स्पष्ट करणे असे त्या पुस्तकाचे आशयसूत्र आहे.
त्यात ‘शहरयार- उर्दू गझलची दोन भिन्न रूपे’ ह्या शीर्षकाचा लेख आहे. ‘भूमिका’, ‘उमराव जान’ अशा मोजक्या तीन-चार चित्रपटांसाठी लोकप्रिय गझला लिहिणारे शहरयार रसिकांना ज्ञात आहेत. परंतु त्यांच्या अन्य सहा-सात संग्रहांत ज्या गझला वाचायला मिळतात त्या सोप्या किंवा चटपटीत वा दादलेवा नाहीत; तर चिंतनशील, सखोल, थोड्या ‘अॅकेडेमिक’ स्वरूपाच्या आहेत. त्यांच्या ह्या पैलूवर लिहिण्यासाठी मी त्यांचे चार-पाच उपलब्ध संग्रह वाचून, शेकडो शेरांतून पंधरा-वीस शेर रसग्रहणासाठी निवडले व मल्लिनाथीसह वाचकांसमोर ठेवले.
‘सुखद’ योगायोगाकडे वळतो. शहरयार यांना ज्ञानपीठ प्रदान करण्याचा समारंभ सप्टेंबर 2011च्या मध्यास झाला. ‘दिल्ली दूरदर्शन’ने शहरयार ह्यांना ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत 19 सप्टेंबर 2011 रोजी दाखवला. गुलजार, अमिताभ बच्चन ह्यांची भाषणे झाली. ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त ‘शहरयार’ ह्यांनी सत्काराला मोजक्या शब्दांत उत्तर दिले आणि गझल वाचली. भाषण संपताना ते म्हणाले – ‘अब मैं सिर्फ एक शेर सुनाना चाहता हूँ’, कार्यक्रम बघणारा मी सावध झालो. त्यांनी शेर ऐकवला, तो असा-
‘शिकवा कोई दरिया की रवानी से नही है
रिश्ता ही मेरी प्यास का पानी से नही है’
माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! कारण मी त्यांचे जे शेर निवडले होते, त्यात हा शेर घेतला आहे. मी त्यावर माझ्या पुस्तकात मल्लिनाथी केली आहे. आपल्या आयुष्यातल्या सर्वौच्च आनंदाच्या क्षणी (ज्ञानपीठ) एका प्रतिभावंत कवीला, आपला जो शेर नमूद करावासा वाटला- नेमका तो शेर मी त्यांचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी निवडला होता! हा माझ्यासाठी खरोखरच सुखद असा योगायोग म्हणावा लागेल, तो लेख लिहिताना, काही क्षण का होईना – ‘शहरयार’ नावाच्या प्रतिभावंत कवीच्या मनाशी मी तद्रूप झालो अशी माझी भावना झाली.
उदधृत शेरावर, माझ्या लेखात मी केलेली मल्लिनाथी अशी ‘अर्थात, – नदीच्या प्रवाहाबद्दल माझी काही तक्रार नाही. (कारण) माझ्या तृष्णेचे नातेच – संबंध- (ह्या) पाण्याशी नाही!’ हा शब्दार्थ झाला. ही जी प्यास आहे, तृष्णा आहे ती ‘अलौकिक’ आहे. पाण्याने शमणारी नाही. अशी तृष्णा म्हणजे चिरंतनाचा वेध, अंतिम सत्याचा शोध असे म्हणता येईल. मग नदीचा सतत बदलणारा प्रवाह म्हणजे ही जगन्माया होईल. पण कवी म्हणतो की ह्या मायेच्या प्रवाहाबाबत माझी काही तक्रार नाही. (वाहू दे त्या नदीला, जसे हवे तसे!) इथे कवी मायेला मृगजळ म्हणून खोटे किंवा भ्रामक किंवा अस्तित्वात नसलेली वस्तू मानत नाही, तर त्या नदीचे अस्तित्व तिच्या जागी – माझी तहान मात्र वेगळी आहे – ह्या नदीशी संबंधित नाही असे म्हणतो. हे वेगळे चिंतन आहे.’
गहन तत्त्वज्ञान मोजक्या शब्दांत, शेराच्या दोन ओळीत – तेही ‘लिरिकली मांडणं, हे गझल या ‘बहुरुपिणी’चे एक रूप आहे, ते असे !!
सदानंद डबीर- 9819178420
संबंधित लेख –
कवितेचं नामशेष होत जाणं…
‘गत पंचवीस वर्षातील मराठी कवितेचा प्रवास’ हा सदानंद डबीर यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सदानंद डबीर यांचा गझलसंग्रह ‘खयाल’ : डॉ.राम पंडित