“‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पात जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाइट बनत आहेत. त्यातील तीन आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी व्ही. शांताराम यांच्यासंबंधीची वेबसाइट खुली होत आहे. मला फाउंडेशनचे हे कार्य खूप मोठे वाटते. त्यामधून गेल्या शतकातील मराठीजनांचे भाव आणि विचारविश्व प्रकट होणार आहे. फाउंडेशनच्या या कामात मी सहभागी होईनच; परंतु प्रत्येक सुबुद्ध मराठी माणसाने या कामी हातभार लावला पाहिजे.” असे उद्गार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पातील चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या वेबसाइटचे उद्घाटन ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून साधण्यात आले.
ही वेबसाइट गिरीश घाटे यांनी बनवली आहे; मजकूरही त्यांनीच संकलित केला. त्या कामात किरण शांताराम, चित्रपट अभ्यासक संजीत नार्वेकर आणि कलावंत-निर्माता विनय नेवाळकर यांचे सहकार्य लाभले. घाटे यांनी प्रास्ताविक भाषण करताना वेबसाइटची माहिती देऊन शांताराम यांच्या चित्रपट कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे विषद केले. वेबसाइटची खासीयत अशी, की तिला जोडून व्ही. शांताराम यांच्या पन्नास चित्रपटांचा खजिनाही प्रेक्षकांना खुला झाला आहे.

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेश’नने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलवर 2024 साली प्रसिद्ध झालेल्या लेखांतील निवडक लेखन ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित– खंड चौथा’ याद्वारे मुद्रित स्वरूपात वाचकांसमोर सादर केले. त्याचे संकलन नितेश शिंदे यांनी केले आहे. त्याचसोबत स्वामी रामानंद तीर्थ, एस एम जोशी, व्ही शांताराम अशी तीन चरित्रात्मक पुस्तके गिरीश घाटे यांनी लिहिली आहेत. ती चारही पुस्तके सुहास जोशी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यांतील सर्व साहित्य वेबपोर्टलवर उपलब्ध आहेच. ही पुस्तके ‘प्रिंट टू ऑर्डर’ तंत्राने प्रसिद्ध होत आहेत. सध्याचा जमाना ऑनलाइन वाचनाचा आहे हे खरेच, परंतु अजूनही बराच मोठा वाचक पुस्तक स्वरूपात वाचणे पसंत करतो, त्यांच्यासाठी ही सुविधा आहे (पुस्तकांची ऑर्डर देण्यासाठी फोन करावा (गिरीश घाटे 9820146432). कार्यक्रमाची स्मरणिकादेखील यावेळी प्रसिद्ध करण्यात आली. तिचे वाटप उपस्थित सर्वांना विनामूल्य करण्यात आले. संजय आचार्य यांनी त्याकरता आर्थिक व व्यवस्थापकीय सहाय्य करणाऱ्यांचे आभार मानले.

दुसरा संस्थात्मक कार्यक्रम प्रशस्तीपत्रे प्रदान करण्याचा होता. ‘थिंक महाराष्ट्र’वर गेल्या वर्षभरात जे लेखन प्रसिद्ध झाले त्यांपैकी तीन लक्षवेधक माहितीपूर्ण लेख निवडण्यात आले. त्या लेखांच्या लेखकांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे प्रशस्तीपत्रे देण्यात आली. ते विजेते होते रंजन जोशी, शमशुद्दीन तांबोळी आणि मानसी चिटणीस. या लेखांची निवड ‘थिंक महाराष्ट्र’च्या संपादन समितीने केली होती.
– टीम थिंक महाराष्ट्र 9892611767 info@thinkmaharashtra.com