वैशाली म्हणाल्या, “मी घटप्रभेला शिकत असताना अशा जखमांचे ड्रेसिंग कसे करायचे त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण आम्हाला दिले गेले होते. रुग्णाला अशा जखमा होणे म्हणजे आम्हीच सेवेमध्ये कुठेतरी कमी पडलो की काय असे वाटते. रुग्ण एका स्थितीत हालचाल न करता पडून राहिल्याने त्याला अशा जखमा होतात. बेडसोर्सचे रुग्ण बहुतेक वेळेला वृद्ध असतात त्यांची त्वचा ही वयोमानाने पातळ, संवेदनशील झालेली असते. हालचाल न करता पडून राहिल्याने ती बेडला घासते, चट्टे पडतात, वेळीच त्यावर उपाय झाले नाहीत तर त्या जखमा चिघळतात. काही ‘केसेस’मध्ये त्यात अळ्यासुद्धा होतात. जखमेला घाण वास येतो. म्हणून ते ड्रेसिंग अवघड असते.’’
वैशाली त्यांच्या कामाविषयी सांगत होत्या, ‘‘मी ड्रेसिंगच्या आधी डॉक्टरांकडून रुग्णांची सर्व माहिती घेते. त्याला देण्यात येणारी औषधे पाहते. त्यांनी जखमांसाठी सुचवलेली सर्व औषधे, मलमे यांचा वापर करते. पण त्याचबरोबर मी माझ्या वडिलांनी सांगितलेले खास मलम तयार करून रूग्णांंच्या जखमांवर लावते. दोन-तीन दिवसांत रूग्णाला आराम वाटू लागतो. हा अनुभव आहे, पण तसे वाटले नाही तर पुन्हा डॉक्टरांशी चर्चा करून, औषधात बदल करून ड्रेसिंग सुरू ठेवते. ड्रेसिंग केल्यावर रुग्णाला बरे वाटते आणि ते स्वस्थतेचे भाव त्याच्या चेह-यावर उमटतात. मी पंचवीस वर्षांहून अधिक काळ हे काम करत असल्याने माझी स्वत:ची ड्रेसिंग पद्धत तयार झाली आहे.’’
वैशाली रूईकर यांचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. त्यांची मुले लहान असताना त्या घरातील कामे आवरून सकाळी सहा वाजता कामासाठी बाहेर पडत असत. आता मुले–सुना घरची जबाबदारी सांभाळतात. त्यांना मुलांनी व पती विलास यांनी त्याम कामात मोठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय ते काम अशक्य होते, हे त्या आवर्जून सांगतात. विलास यांचे मध्यंतरी निधन झाले पण वैशाली रुईकरांना त्यांच्या कामामुळे ते दु:ख सहन करणे शक्य झाले असे वाटते.
वैशाली रुईकर त्यांचे वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रातील अनुभव सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, ‘‘नर्स या पेशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि विचार जुनाट आहेत. वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांइतके नर्सचेही योगदान आहे, पण डॉक्टरांना प्रतिष्ठा आहे. नर्सेसना नाही.
‘कामये दु:ख तत्पानाम् व्याधीनाम् अर्ती नाशनम्’.
महाभारतातील या वचनाप्रमाणे मी माझे लोकांच्या व्याधी, दु:ख दूर करण्याचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे. मी माझ्याबरोबर पाण्याची बाटली, चहाचा थर्मास घेऊन जाते. ठरलेल्या मोबदल्यापेक्षा इतर काहीही घेत नाही, बेडसोर्स होऊ नयेत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जागृती करते. मी या सेवेमुळे असंख्य घरे जोडली आहेत. प्रथम रुग्ण म्हणून ओळख झालेल्या व्यक्ती नंतर घरातील सदस्यांप्रमाणे जवळ येतात. नर्सिंग पेशात समाजसेवा अंतर्भूत आहे. त्यामुळे मानापमान, बरे-वाईट असा विचार करून चालत नाही.’’
वैशाली म्हणतात ,‘‘या स्वतंत्र नर्सिंग प्रोफेशनने मला स्वत:ची ओळख, आर्थिक स्थैर्य, कामाचे समाधान दिले. वडिलांनी माझ्या हातांना ‘यशस्वी भव’ असा जो आशीर्वाद दिला, त्याने यश मिळत गेले. मला पाहिल्यावर ‘आपण बरे होणार’ असे रुग्णांना वाटते. तेच मला सेवेचे बळ देते. नर्सिंग ही मानवी जीवन निरामय बनवण्यासाठी निर्माण झालेली कलाच म्हटली पाहिजे. त्यातील ‘मी’ हे निमित्तमात्र आहे.’’
वैशाली यांच्या अफाट सेवाव्रताची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. केंद्र सरकारकडून त्यांना ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेल उत्कृष्ट परिचारिका’ हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते 2014 साली प्रदान करण्यात आला.
अनुपमा मुजुमदार
१८७, कसबा, पुणे ४११०११
०२०-२४५७९३६४
ggmujum@gmail.com
मंदा परदेशांत स्थायिक झालेल्या लोकांच्या पालकांची (वृद्ध वा आजारी) सर्वतोपरी सेवा करणे, संगोपन करणे, त्यांना घरगुती वातावरणात राहिल्याचे समाधान देणे असे बिकट काम करते वा करवून घेते. परदेशातील लोकांकडून तिच्या कार्याची वाहवा होते. त्या लोकांना त्यांचे पालक आनंदात व सुरक्षित आहेत हे ऐकून आनंद होतो. अशा प्रकारचे ते व्रत कठीण आहे.
मंदाने आसपासच्या महिलांना त्यांच्यात स्वत्वाची, स्वावलंबनाची महती पटवून देत, अर्थार्जन व संचय करण्याची आवश्यकता पटवून दिली. दररोज सकाळी आठ वाजण्यापूर्वी तिला त्या दिवशी कोणत्या महिलेस सेवेकरता कुठे पाठवायचे आहे या संबंधीचे फोन येत असतात. रात्रपाळी करून येणारी सेविका तिची कमाई मॅडमच्या हवाली करते. मंदानं त्यातून काही टक्के रक्कम शिल्लक टाकण्याची सवय महिलांना लावली आहे. तिला कामावर जाणा-या प्रत्येक महिलेच्या पैशांचा हिशोब ठेवावा लागतो.
मंदाचे बालपण कागलमध्ये गेले. पन्नास वर्षांपूर्वीचे कागल. संध्याकाळी सात वाजताच अंधारमय व्हायचे. लाईट नव्हती. त्यामुळे सातनंतर घराबाहेर पडणं कठीण. तीन कुटुंबे एकत्र असलेला आमचा तोरगलकर वाडा. दोन काका, दोन काकी व बारा-तेरा चुलत भावंडे. मंदा एवढ्या मोठ्या गराड्यात वाढली. ती तीन वर्षांची असतानाच तिची आई वारली. मात्र तिच्या वडिलांनी, विठुकाकांनी तिला आईचे प्रेम भरभरून दिले. तिला मोठा भाऊही होता. बाळू. आमची आई व काकू दिवसभर घरकाम करून ‘रांधा-वाढा उष्टी काढा’ या रामरगाड्यांत मंदाला काय वळण लावणार? कोणते संस्कार करणार? तेव्हा ना संस्कार केंद्र होते ना गोष्टी सांगणारी आजी! तशा वातावरणात वाढलेली मंदा एवढी मोठी, एवढी चांगली, एवढी सहनशील कशी बनली? कोणी बनवले तिला?
तिच्या ठायी लहानपणापासून काही सद्गुणांची जोपासना झाली होती. धीटपणा, चतुराई, सडेतोड उत्तर देणे, जननिंदेची बेपर्वा, निर्भिडता, कोणतेही काम करण्याची तयारी. त्या काळची कागलची बाजारपेठ दत्तमंदिरच्यााही पुढे होती. एखादेवेळी एक आण्याची बडिशेप किंवा बारा आण्यांचा चहाचा पुडा आणायचा झाला तर बागणीकर किंवा रेळेकर यांच्या दुकानापर्यंत जावे लागे. रात्रीच्या वेळी मिणमिणत्या उजेडात प्रवेशद्वारापासून वाड्याच्या दरवाज्यापर्यंत जायचे म्हणजे दिव्यच होते. आम्ही राममंदिराचे पडके छत, बोळाच्या दोन्ही बाजूस पडकी घरे एवढं अंतर पार करून वाड्याच्या दरवाज्यापर्यंत येताना घामाघुम व्हायचो. आम्ही चौघी बहिणी फक्त वयाने मोठया. मंदा मात्र ते अंतर धावत येऊन पार करायची.
आमचा बाळू (भाऊ) २ जून १९५७ रोजी अचानक वारला आणि मग मंदा एकदम बदलली. हणमंतराव रुईकर सांगलीचे. त्यांच्या मुलाशी, विलासरावांशी तिचा विवाह झाला. काही वर्षे सांगलीत राहिल्यानंतर तिचा पुण्याला हडपसर येथे संसार सुरू झाला. कुंदन, मुन्ना या मुलांनी तिचा संसार फुलला. तिने मुले लहान असतानाच नोकरी केली. मंदाची दोन्ही मुले स्वतंत्रपणे त्यांच्या पायावर उभी आहेत. पस्तीस वर्षे पायपीट करून दमलेली मंदा आज चार चाकी गाडीतून फिरते.
मंदाने त्या घरात कष्टाची परिसीमा केली. त्याचा परिणाम म्हणून तिच्या घरात भाग्य व धनलक्ष्मी एकत्र नांदत आहेत. तिच्या घरातील प्रत्येक वस्तूला स्वतंत्रतेचा सुगंध आहे. तिला विलासरावांप्रमाणे मुलांनीही जनसेवेचे व्रत चालु ठेवण्यास पुरेपूर साहाय्य केले. मुले त्यांचे व्यवसाय सांभाळून स्वतंत्रपणे संसार करत आहेत. कुंदन गेली अठरा-वीस वर्षे कमर्शियल आर्टिस्टचा व्यवसाय करतो. मुन्ना ‘याना’ कंपनीमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहतो. मी व अक्का कुंदनच्या ऑफिसच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त एका गाण्याच्या कार्यक्रमास गेलो होतो. कुंदन येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यास त्याच्या आईची ओळख करून देत होता. दोन्ही मुले, सुना, नातींसमवेत आरामात बसलेली मंदा पाहिली आणि धन्य धन्य वाटले.
वसुंधरा पागे
बुनियाद सेक्टईर १५
ए.पि.जे. स्कूलजवळ,
नेरूळ, नवी मुंबई
मुंबई ४००७०६
९५७९०९०५४४
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती
भावनास्पर्ष लेख..
भावनास्पर्षी लेख.
संपर्क ..नं पाठवा.जुनी जखम…
संपर्क ..नं पाठवा.जुनी जखम असलेले पेशंट आहे.pz
Comments are closed.