वेटलिफ्टिंग @ कुरुंदवाड

carasole

दिल्लीतील एकोणिसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडू चंद्रकांत ऊर्फ महेश माळीचे चौऱ्याऐंशी किलो गटातील पदक थोडक्यात हुकले. चंद्रकांतला जरी पदक मिळवण्यात अपयश आले, तरी कुरुंदवाडसारख्या ग्रामीण भागात वेटलिफ्टिंगचा खेळ रुजत आणि वाढत असल्याची प्रचीती तेव्हा मिळाली होती. त्यानंतर झालेल्या विविध स्पर्धांत तेथील खेळाडूंनी पदकांना गवसणी घातली असली, तरी त्याची दखल मात्र घेण्यात आली नव्हती. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुरुंदवाडच्या (जि. कोल्हापूर) ‘हर्क्युलस जीम’च्या गणेश माळी, चंद्रकांत ऊर्फ महेश माळी आणि ओंकार ओतारी यांनी ब्राँझपदक मिळवल्यामुळे ‘हर्क्युलस जीम’चे नाव सर्वदूर पोचले. तेथील प्रशिक्षक प्रदीप पाटील आणि त्यांचे साथीदार यांची तपश्चर्या फळाला आली. त्या सर्वांच्या श्रमातूनच कुरुंदवाड जागतिक नकाशावर पोचले.

कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावर कृष्णा पंचगंगा संगमावर कुरुंदवाड हे ऐतिहासिक गाव आहे. पटवर्धन सरकारांमुळे त्या गावाला प्रतिष्ठा मिळाली. क्रीडा क्षेत्राची सुरुवात कुरुंदवाडमध्ये खो-खो खेळापासून झाली. खो-खो पाठोपाठ व्हॉलिबॉलमध्ये कुरुंदवाडने राष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला. ती प्रगती सुरू असतानाच १९७८ मध्ये ‘हर्क्युलस जीम’ची स्थापना झाली. प्रदीप पाटील, विश्वनाथ माळी, अरुण आलासे, मोनाप्पा चौगुले यांचा जिामची स्थापना करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.

कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल या खेळांमध्ये दबदबा असलेल्या कुरुंदवाड गावामध्ये वेटलिफ्टिंगसारख्या कमी प्रसिध्दी व मोजका प्रेक्षकवर्ग असलेल्या खेळाची आराधना सुरू झाली. व्यायामशाळा भाड्याच्या खोलीत सुरू झाली. श्रीपाल आलासे यांनी ‘आलासे अर्बन बँके’ची १९८२ मध्ये जागा दिली. वेटलिफ्टिंगची क्रेझ हळुहळू वाढत गेली. युवकांना व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यात प्रदीप पाटील आघाडीवर राहिले. खेळाडूंनीही जिल्हा, राज्य व आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गुरूंच्या कष्टांचे सार्थक केले.

महावीर निवाजे हा जिमचा पहिला खेळाडू १९८६ मध्ये आंतर विद्यापीठ स्पर्धेत चमकला. प्रदीपचे वडील बापुसाहेब पाटील यांनी स्वमालकीची जागा जिमसाठी १९८८ मध्ये दिली. रवींद्र माळी, रवींद्र चव्हाण, विजय माळी, विश्वनाथ माळी व कैलास पुजारी या खेळाडूंनी आंतरविद्यापीठ स्तरावर दैदिप्यमान कामगिरी केली. त्यातील कैलास पुजारीने तर दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावताना वेटलिफ्टिंगच्या जोरावर सेनादलामध्ये नोकरी मिळवली. ‘आशिया सिनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धे’त सहभागी होणारा जि्मचा तो पहिला खेळाडू. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात कुरुंदवाडच्या तीन खेळाडूंनी स्थान मिळवले व ब्राँझपदकही पटकावले!

कुरुंदवाडच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवल्यामुळे तेथे प्रशिक्षणासाठी येण्याकरता राज्यभरातील वेटलिफ्टिंग खेळाडू संपर्क साधू लागले आहेत. त्यामध्ये वीस-बावीस वर्षांच्या युवकांचा जास्त समावेश आहे. जिममध्ये दहा ते बारा वर्षांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. त्यांना लहान वयापासून मोठ्या स्पर्धेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मार्गदर्शन करण्यास सुलभ जाते. कुरुंदवाडच्या आजुबाजूच्या वीस-पंचवीस गावांतील खेळाडूंना जिम जवळ असावी यासाठी शेडशाळ, कवठेगुलंद व नृसिंहवाडी येथे वेटलिफ्टिंग प्रशिक्षणाची सोय करून दिली गेली आहे. त्या प्रशिक्षण केंद्रांतून वर्षभर विविध गटांतील स्पर्धांचे आयोजन करून उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. अशा शोधातूनच रणजीत चिंचवाडे, रणजीत चव्हाण, रणजीत देसाई, विशाल सावगावे व स्वस्तिक पाटील हे जिोमचे खेळाडू उदयास आले आहेत. ते प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेत आहेत.

जिममध्ये पस्तीस-चाळीस खेळाडू सराव करत असतात. या खेळाडूंना घडवण्यावर प्रशिक्षक भर देत आहेत. जिममधील खेळाडूंच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात येते. सरकारने पदक मिळवलेल्या खेळाडूंचा बक्षिस देऊन गौरव केला आहे. पण उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे म्हणून जे खेळाडू पदक मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत, त्यांना सरकारने आहार व औषधांसाठी मदत करावी अशी अपेक्षा प्रदीप पाटील व्यक्त करतात.

– मारुती पाटील
maruti.patil@timesgroup.com

(महाराष्ट्र टाइम्स, रविवार, 10 ऑगस्ट 2014 वरून)

About Post Author