वृंदावन बाग – काऊ क्लब आणि बरेच काही!

2
60

चंद्रकांत भरेकर, राहणार भूकुम, तालुका मुळशी. त्यांचे ‘वृंदावन फार्म’ पुणे शहरापासून जेमतेम दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. ‘वृंदावन फार्म’ म्हणजे एका छत्राखाली किती वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतात त्याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे! त्यांनी वीस वर्षांपूर्वी सत्तावीस एकर शेती घेतली होती. त्या सत्तावीस एकरांतील प्रत्येक इंच जमीन ‘वृंदावन फार्म’ या नावाने कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरली जात आहे. तेथील प्रयोगाची सुरुवात देशी गायींची पैदास यापासून सुरू झाली. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून ‘वृंदावन काऊ-क्लब’ सुरू केला आहे. देशी गायींची पैदास, संगोपन आणि प्रचार हा त्याचा उद्देश. त्यांनी थारपारकर देशी गायी नावाचे ब्रीड राजस्थानमधून पुण्याला आणले, जातिवंत बुल्स आणून त्यांच्या सहाय्याने गुणन प्रक्रिया सुरू केली. त्या बैलांचे वीर्यदेखील उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना बैलही हवे तर दिले जातात. त्यांच्याकडे उच्च प्रतीचे तीन वळू आहेत. त्यांनी दोनशे बुल्स, दोनशे गायी व शंभर कालवडी वाटल्या आहेत.

भरेकर यांच्या वृंदावन फार्ममध्ये जनावरांत ‘सरोगसी’चा प्रयोग केला गेला आहे. तो प्रकार टेस्ट ट्यूब बेबीचा. गर्भधारणेसाठी देशी बुलचे वीर्य वापरून त्याचे फलन देशी गायीच्या गर्भाशयात केले गेले आणि मग तो गर्भ विदेशी गायीच्या गर्भाशयात वाढवला गेला. तयार झालेले बछडे आई व बाप, दोघेही देशी असल्यामुळे संपूर्ण स्वदेशी बनले.

भरेकर यांच्याकडे दीडशे गायी आहेत. दररोज जवळपास अडीचशे लिटर दूध त्यांच्याकडे तयार होते. ते ए 2 प्रकारचे दूध असल्यामुळे त्याला मागणी चांगली आहे. ते दूधाचे संकलनही सुरू करणार आहेत. त्यांचा मानस ‘काऊ-क्लब’च्या शाखांचा विस्तार करण्याचा आहे. खरे तर, त्या गोशाळाच!

देशी गायींच्या संवर्धनामुळे एक लाभ होत आहे, तो म्हणजे जी थारपारकर नावाची जात नष्ट होण्याच्या मार्गावर होती तिचे पुनरुज्जीवन होत आहे. या गायी प्रत्येकी चौदा लीटरपर्यंत म्हणजेच जर्सी गायीइतके दूध देत आहेत. भरेकर यांनी आणखी एक प्रयोग केला. मृत गायीच्या शिंगात माती भरून ते शिंग जमिनीत गाडले व त्याचे टोक सूर्यप्रकाशात सहा महिने ठेवले तर ती माती उत्कृष्ट खत बनते व ते खत शंभर एकर जमिनीला सुपीक करते. तो प्रयोग त्यांनी त्यांच्याकडे यशस्वीपणे राबवला. गायींचा जिवंत असताना जेवढा उपयोग आहे तेवढाच त्यांच्या मरणानंतरही आहे. त्या कारणामुळेही तिला कामधेनू हे नाव यथार्थ शोभते.           

पंचगव्यापासून (गायीचे शेण, मूत्र आणि दूध हे तीन मूळ पदार्थ आणि दूधापासून बनलेले दही व तूप हे दोन पदार्थ मिळून पंचगव्य तयार होते). भरेकर त्रेचाळीस उत्पादने तयार करतात. त्यातील प्रमुख हँडवॉश, फ्लोअर क्लीनर, डिश वॉशर, मऊ कपडे धुण्याचे साबण, पंचगव्य अगरबत्ती, उटणी, बॉडी लोशन, गोमय तेल, सॉफ्ट लोशन, फेस मास्क, क्रीम्स, गोमूत्र अर्क, शांपू, टोनर जेल, अंगाला लावण्याचा साबण, धूप, फूड प्रॉडक्ट्स, मच्छर कॉइल्स, च्यवनप्राश ही प्रमुख उत्पादने आहेत. ती तयार केलेली उत्पादने ‘आयएसओ’ प्रमाणित आहेत. ती डॉक्टर्स, कॉस्मेटॉलॉजिस्ट्स, फार्मासिस्ट्स आणि केमिस्ट यांच्याकडून संशोधन करून तयार करण्यात आली आहेत. ती देशात आणि परदेशात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी एक विक्रीसाखळी उभारलेली आहे. त्यांची शाखा राजस्थानमध्ये असून तेथे दूध संकलनाचे काम सुरू झाले आहे. सामान्य दूधापेक्षा त्यांनी तेथील शेतकऱ्यांना पाच रुपये जास्त भाव दिला आहे. त्या सेंटरमध्ये ते ऑर्गॅनिक तूप तयार करतात. त्या तुपात औषधी गुण असल्यामुळे तूपाला भावही आकर्षक मिळतो.

भरेकर यांनी परिसरात विविध प्रकारची वृक्ष लागवड केली आहे. त्यांच्याकडे आंब्याची पंधराशे झाडे आहेत. ती सेंद्रीय पद्धतीने वाढवली गेली आहेत. त्याशिवाय नारळ, चिकू, आयुर्वेदिक वनस्पती, वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब, चिंच, फणस, जांभूळ, शेवगा, हातगा अशा प्रकारची अगणित झाडे लावण्यात आली आहेत. परिसरात नक्षत्रबनाची कल्पनाही राबवली गेली आहे. ती झाडे भारतात आणि आग्नेय आशियात आढळतात.

वृंदावन परिसरात एक भव्य तळे आहे. त्या तळ्याला पाणी बाराही महिने भरपूर असते. ते तळे सरकारने 1972 च्या दुष्काळाच्या दिवसांत खणले आहे. तळ्याकडे उतार सर्व बाजूंनी असल्यामुळे पावसाचे पाणी तलावात जमते. भरेकर यांनी त्या उतारावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खणले असून त्यात पावसाचे पाणी जिरवले जाते. ते सर्व पाणी अखेर त्या सरोवरात उतरते. त्यांनी मोठी विहीर तलावाच्या काठावर खणली असून त्या विहिरीचे पाणी सर्व सत्तावीस एकरांत फिरवले जाते. अशा प्रकारे जलपुनर्भरणाची प्रक्रिया तेथे सतत होत असते. त्यांना पाणी प्रश्न त्या ठिकाणी गेल्या सत्तावीस वर्षांत कधी जाणवला नाही.

भरेकर यांनी इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद’ या संस्थेच्या सहकार्याने त्या परिसरात ‘तनमन आयुर्वेदिक रिसर्च सेंटर’ चालवले आहे. संस्थेचा पंचेचाळीस देशांशी टाय अप आहे. डॉ. सुभाष रानडे आणि त्यांची टीम तो पसारा सांभाळतात. उपचार त्या ठिकाणी मन आणि शरीर या दोहोंवर केला जातो. पंचकर्म त्या ठिकाणी केले जाते. विकारपीडित लोकांसाठी निवासाची अद्यावत सोय आहे. तेथे योगाचेही प्रशिक्षण उपलब्ध आहे. मनशांती, ब्रुहन, अग्नी, सुप्रजनन, सुनिद्रा, परिनमन, निवृत्ती, संतुलन, स्थैर्य, चिरतारुण्य, लावण्य, शरीरशुद्धी यांसारख्या क्रिया तेथे केल्या जातात. तेथे तुलसी ऑक्सिजन पार्क आहे. तुलसीबनात प्राणवायूचे प्रमाण जास्त असते. त्याचा लाभ घेण्यासाठी ती सोय आहे. उपचारासाठी देशी व विदेशी लोक तेथे येत असतात.

भरेकर देशी गायीचे शेण, अंड्यांची टरफले आणि ओक या झाडांपासून मिऴणारे काही लिक्विड्स यांचा वापर करून एक कल्चर तयार करण्याचा कारखाना टाकत आहेत. ज्या गावात देशी गायी आहेत अशा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला तर तसा कारखाना तेथेही सुरू केला जाऊ शकतो. एका एकरात चार किलो कल्चर टाकले तर ते पुरेसे ठरते. तो प्रकल्प राबवणारी कंपनी हरियाणामधील आहे. ती भारत सरकार पुरस्कृत योजना आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण कंपनी देते. तयार झालेले खत कंपनीच विकत घेऊन जाते आणि खरेदी किंमत म्हणून किलोमागे वीस रुपये मिळतात. शेतातील कचऱ्यावर कल्चर शिंपडले तर त्या कचऱ्यापासून कंपोस्टखत तयार होते. त्यामुळे देशी गायीपालन आणि सेंद्रिय शेती या दोन्ही गोष्टींना चालना मिळते.

सेंद्रीय शेतीवर भर सत्तावीस एकरांत दिला गेला आहे. लवंग, विलायची, धने, जिरे, दालचिनी, हळद यांसारखे मसाल्याचे पदार्थ त्यांच्या गार्डनमध्ये तयार होतात व त्याचाच वापर त्यांच्या ‘पथ्यम हॉटेल’मध्ये केला जातो. त्यांना लागणारा भाजीपाला त्यांच्याच किचन गार्डनमध्ये तयार होतो. दुर्मीळ वनस्पतींची जोपासनाही तेथे केली जाते.

भरेकर यांनी सामूहिक विवाह योजनेत भरीव कामगिरी केली आहे. ते दर वर्षी किमान पन्नास लग्ने लावतात. आतापर्यंत तशी सातशे लग्ने वृंदावनच्या कँपसमध्ये लागली आहेत. गोसंवर्धनासाठी विद्यापीठ सुरू करणे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

एवढा मोठा प्रकल्प ते कसे सांभाळतात असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, “मी दिवसभर येथेच असतो. माझा परदेशात शिकून आलेला मुलगाही शनिवारी-रविवारी त्याचे काम सांभाळून मला मदत करत असतो. माझी सूनही या कामात मला मदत करते. शिवाय गायी, उपहारगृह व आयुर्वेद सेंटर या तिन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी तीसाच्यावर कर्मचारी येथे काम करतात.”

डॉ.दत्ता देशकर 9325203109, jalasamvad@gmail.com

(जलसंवाद, जानेवारी 2019 वरून उद्धृत, संपादित)

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.