वीणा व दिलीप या दोघांनाही असे वाटले, की चांगले सामाजिक कार्य करणार्या संस्थांची माहिती लोकांना द्यायला हवी. त्यांचे चांगले काम लोकांपर्यंत पोचवायला हवे. या दांपत्याच्या मनात, काय केले की आपला हा हेतू साध्य होईल याविषयी विचार चालू असे. अशातच, ते दोघे एक प्रदर्शन पाहायला गेले. प्रदर्शनात अनेक स्टॉल्स असतात. तिथे विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. खरेदी केल्या जातात. आणि अचानक दिलीपना असे वाटले, की प्रदर्शन हे माध्यम चांगले आहे. मग तो विचार पक्का झाला. ही घटना आहे २००५ सालची. सर्व सामाजिक संस्थांचे चांगले काम एका प्रदर्शनातून लोकांच्या समोर मांडावे. अशा प्रदर्शनाचे नाव ‘देणे समाजाचे’ असे असावे.
हे प्रदर्शन पितृपंधरवड्यात भरवायचे असे ठरले. वीणा म्हणाली, की एकतर पितृपंधरवड्यात दान करण्याची संकल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पितृपंधरवड्यात हॉल मिळणे सोपे जाते. त्याचे भाडेही, लग्नमुंजीच्या सिझनच्या मानाने, थोडे कमी असते. वीणाने मनोहर मंगल कार्यालयाच्या मालकांविषयी आदराने सांगितले, ते, आम्हाला हॉल देत व अमूक इतके पैसे दे असे चुकूनही सांगत नसत. ही सामाजिक बांधिलकीचीच जाणीव. परंतु मीही योग्य तेवढेच पैसे त्यांना देते.
पितृपंधरवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन असते. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत असते. वीस संस्थांना प्रत्येक वर्षी बोलावले जाते. तिथे प्रोजेक्टरच्या सहाय्याने वा ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने, संस्था कशा प्रकारचे काम करते ही माहिती त्या त्या संस्थेद्वारा दिली जाते. संस्थांना असे आवर्जून सांगितले जाते, की तुम्हाला लोकांकडून कशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे ते तुम्ही हायलाईट करा. कारण प्रत्येक वेळी पैशाचीच मदत हवी असते असे नाही. तर कधी कपडे हवे असतात – कधी भांडी हवी असतात – कधी कार्यकर्ते हवे असतात वगैरे, वगैरे.
एका संस्थेला आपले काम फक्त दोन वर्षेच प्रदर्शनाद्वारे लोकांसमोर मांडता येते. त्यामुळे – मागीलवर्षी येऊन गेलेल्या संस्था एका बाजूला व नव्या संस्था एका बाजूला अशी प्रदर्शनाची मांडणी असते. यंदा २०१२ साली वीस ऐवजी पंचावन्न संस्थांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. यापैकी सात संस्था नवीन होत्या.
दुस-या वर्षीपासून – २००६ – प्रायोजक मिळाल्यामुळे, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा असतो. वीणाने २००७ सालचा एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, की उद्घाटन सोहळा संपण्याच्या तीन-चार मिनिटे आधी, एका गृहस्थांनी मला चिठ्ठी पाठवली व मला बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ द्यावा अशी त्यात विनंती केली. वीणा म्हणाली, की त्या गृहस्थांनी सांगितले की मी येथून जात होतो. काय कार्यक्रम आहे म्हणून थांबलो. येथील संस्थाच्या कामाविषयी ऐकून भारावून गेलो. मी एक लाख वीस हजार रुपयांचा हा चेक देत आहे. ती रक्कम सर्व संस्थांनां सारख्या प्रमाणात वाटण्यात यावी अशी माझी इच्छा आहे.
वीणा म्हणाली, मी पाहातच राहिले त्यांच्याकडे! नुकतेच बॅंकेतून रिटायर झालेले ते गृहस्थ, त्यांनी दिलेली अशी उत्स्फूर्त दाद!
वीणा ही एम.एस.सी. (न्यूट्रिशन) आहे. ती पुण्याच्या चैतन्य हेल्थ क्लबमध्ये डाएट कन्सल्टंट म्हणून काम करते. त्याचप्रमाणे, तिच्या मुलीच्या आजारपणामुळे –स्पेशल चाईल्ड असल्यामुळे, तिला पू्र्वी घरातून बाहेर पडणे अशक्य असायचे. फार कठीण, मानसिक ताणाखाली राहावे लागत असे. पण तिला बोलण्याची, लोकांशी संपर्क ठेवण्याची खूप आवड. त्यांचे डॉक्टर व पती, दिलीप यांच्या प्रोत्साहनामुळे तिने ‘गिरीसागर टूर्स’ची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वी केली. व ती कोकणात सहली नेऊ लागली. दिलीप हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे व तिला स्वत:लाही संगीत आवडत असल्यामुळे ‘गिरीसागर टूर्स – स्वरांबरोबर विहार’ ही संकल्पना राबवली. सहलीत उत्तमोत्तम कलाकारांचे सांगीतिक कार्यक्रमही सुरु केले.
समाजऋण फेडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे.
यंदाचा कार्यक्रम – 23, 24 आणि 25 सप्टेंबर 2016
स्थळ – हर्षल हॉल, बापट पेट्रोल पंपाजवळ, कर्वेरोड, पुणे
वेळ – सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत
वीणा गोखले,
९८२२०६४१२९
gokhaleveena@yahoo.co.in
– पद्मा क-हाडे
आमच्या विश्व हिंदू परिषद सेवा
आमच्या विश्व हिंदू परिषद सेवा कार्य प्रकल्प सहभागी करावा
Eka Changalya Karyacha
Eka Changalya Karyacha Parichay Zala….
Comments are closed.