प्रिय अतुल देऊळगावकर,
तुझे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक वाचल्यानंतर तुला लिहावे असे उत्कटतेने वाटले. तू गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील तुझ्या वेगवेगळ्या पुस्तकांतून ‘प्रगती व पर्यावरण’ या विषयाचा केवढा आवाका मांडला आहेस! थक्क व्हायला होते. तुझा लेखनप्रवास ‘डळमळले भूमंडळ’ पासून सुरू झाला. तू ते पुस्तक लातूर जवळच्या किल्लारी भूकंपानंतरच्या अनुभवातून लिहिलेस. तुझ्या अभ्यासाला तेथून बहुधा दिशा व गती लाभली. तुझे लॉरी बेकर, स्वामिनाथन अशा तज्ज्ञ मंडळींबद्दलचे जागरूक प्रेम तुझ्याबद्दलच्या अपेक्षा वाढवत गेले. तू त्यांच्याबद्दल पुस्तके लिहीलीस आणि त्यानंतर तुझी तज्ज्ञता वाढत गेली. तू त्या शोधात भारतभर व जगामध्ये भ्रमंती करत राहिलास, वेगवेगळी कमिशने-कमिट्या यांचा भाग बनत गेलास; परिषदांना उपस्थित राहिलास, तरीदेखील तुझ्यातील तळमळीचा कार्यकर्ता डोकावायचा. तुझे टेलिव्हिजनवरचे दर्शन व अभ्यासमांडणी चिकित्सक, विश्लेषणपूर्ण, तरी आर्जवी वाटायची. तुझा ‘हे जग बदलले पाहिजे – सुधारले पाहिजे’ हा ध्यास त्यामधून व्यक्त होत असे. त्याची परिणती तुझ्या ‘बखर’मध्ये झाली. ते पुस्तक ‘मौजे’ने प्रकाशित केले व तू तुझा समावेश प्रतिष्ठित लेखकांच्या वर्तुळात होण्यास त्यामुळेही अधिक पात्र ठरलास. तुझ्या नावाभोवती त्या वेळपर्यंत विद्वत्तेचे झकास वलय आले. तुझी गणना महाराष्ट्रातील मोजक्या पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी बुद्धिवंतांत होऊ लागली. त्या विषयावर प्रेम करणारे अनेक आहेत, पण त्या विषयाचा ध्यास, व्यासंग… समाज कार्यकर्ता ते पढतपंडित ही तुझी वाटचाल विलोभनीय वाटली, मनी कौतुक दाटून आले.
निसर्ग, पर्यावरण हे विषयच असे आहेत, की ते सतत नवनवीन वाटतात. जसे ‘डिस्कव्हरी’, ‘नॅशनल जिऑग्रफी’ या वाहिनी दररोज चोवीस तास नवलाईच्याच जाणवतात. जीवनाचे कोडे उलगडायचे तर निसर्गचक्राचा वेध घेणे क्रमप्राप्त असते. विज्ञान म्हणतात ते तेच. सद्यकाळात वैज्ञानिक त्याबाबत फार सतर्क आहेत. त्यामुळे त्या विषयात नवीन माहिती सतत उपलब्ध होत असते. ती चक्रावून टाकणारी असते आणि त्या विषयातील अभ्यासक हे विद्वान, विचार-चिंतन करणारे, जीवनाच्या गाभ्याला वैचारिक पातळीवर हात घालू शकणारे वाटतात. ते वृत्तीने एकाच वेळी गंभीर आणि बर्याच वेळा हळवेदेखील असतात. तू ‘बखरी’मध्ये पर्यावरणाचा वेध घेतलास व त्याबरोबर पर्यावरणवादी म्हणून तुझ्या अभ्यासाचादेखील आलेख मांडलास.
तू व्यवसायाने इंजिनीयर. तुझी रसिकता साहित्य –संगीत –चित्रकला अशा व्यापक विश्वात आस्वाद घेऊ शकते; पण तुझा रोख गेल्या आठ-दहा वर्षांत पर्यावरण एके पर्यावरण असा व्यक्त होताना दिसतो. त्यामुळे तुझे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक (प्रकाशन- ऑक्टोबर२०१२) काय नवा दृष्टिकोन घेऊन येते याबद्दल कुतूहल होते.
पुस्तक मांडणीत एकदम आकर्षक झाले आहे. सतीश भावसार हा तुझा चित्रकार मित्र सध्या विविध प्रकाशनांमधून इतक्या वेगवेगळ्या रीतीने व्यक्त होत आहे! चित्रांकन व मांडणी या दोन्हीची जाण असलेले चित्रकार कमी असतात. सतीश त्या कमींमध्ये मोठा कलावंत आहे. त्याहून सतीशचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्वत:ला वाचनाची आवड आहे व वेगवेगळ्या विषयांमध्ये जिज्ञासा आहे. तो तर अपवादात्मक गुण होय! सतीशने तुझ्या विषयाला समर्पक अशा चित्रकृतींनी मुखपृष्ठापासून पुस्तक सजवले आहे (अर्थपूर्ण केले आहे.)
तू विषयदेखील सम्यकपणे मांडला आहेस. पुस्तकाचा आरंभच ‘पृथ्वीचे मारेकरी’ नावाच्या प्रकरणाने होतो. त्यातील पृथ्वीवर केवढी उलथापालथ हवामान बदलामुळे होत आहे याची वर्णने अंगावर शहारे आणतात. प्रकरणातील प्रत्येक वाक्य ह्रदय चिरत जाते. त्याची सुरुवात होते, “२०११ हे साल गेल्या एकशे बत्तीस वर्षांच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष होते. त्याच वर्षी पाकिस्तानमध्ये उन्हाचा पारा ५३.७ अंशावर गेला होता आणि पृथ्वीचा उष्मा गेल्या शतकापेक्षा ०.८ अंश सेल्सियसने वाढला.” विवेकापासून फारकत घेऊन साधलेला विकास हे मानवी दु:खाचे कारण आहे अशी तुझी मांडणी सह्रदय माणसाला भिडणारीच वाटेल.
तुझी मांडणी पुढील प्रकरणांतून वेगवेगळ्या पद्धतीने सघन व सकस होत जाते. ‘पर्यावरणीय दहशतवाद’ हे प्रकरण जागतिक पर्यावरण परिषदांचा आढावा घेता घेता निसर्गहानीची भेदक सत्ये मांडते. जोहान्सबर्ग, कोपनहेगन, कानकून, डर्बन… परिषदांमागून परिषदा होत गेल्या, शहरांची ती नावे त्यामुळे जगभर प्रसिद्धी पावली, परंतु जागतिक वातावरण मात्र खालावत गेले. जीवविविधता ही पृथ्वीची खासीयत आहे, तिची हानी कशी होत आहे हे दाखवून, त्या संबंधातील आपले, महाराष्ट्राचे – जनता व शासन – औदासिन्य व्यक्त करताना, तू म्हटले आहेस, “ पश्चिम घाटाला जागतिक वारसा ठरवून जगाने आपल्यासमोर आरसा धरला आहे. आपले अर्थराजकारण सुसंस्कृत करण्यासाठी ते आवाहन व आव्हान आहे!”
माधव गाडगीळ समितीच्या अहवालासंबंधी अतुल देऊळगावकर –
तू अन्न-पाणी- शेती यांचा घेतलेला विस्तृत आढावा डोळे उघडणारा आहे. तत्संबंधीच्या रोजच्या वर्तमानपत्रांमधील बातम्या आधीच आम्हा शहरवासीयांना खजील करत असतात. पाण्याचा प्रत्येक थेंब वापरताना, अन्नाचा प्रत्येक कण खाताना गावाकडे त्या गोष्टींचे असलेले- सांगितले जाणारे दुर्भीक्ष्य त्रस्त करत असते. तरी बिचारे अन्नपाणी आम्हाला पचते याचेही अजब वाटते. तू व्यक्तिगत पातळीवर जाणवणा-या त्या प्रश्नांची जागतिकता, व्यापकता आणि त्यामधील गुंतागुंत उलगडून मांडली आहेस. ती उद्धृते , ती आकडेवारी परिच्छेदागणिक वाचकाच्या मनबुद्धीत तुडुंब भरते आणि त्या भरपेट अवस्थेतील त्याची स्वत:ची निष्क्रियता त्याला अधिकच छळू लागते. निदान, मला तरी तो त्रास झाला.
त्याच अवस्थेत पुस्तकातील ‘शतकाचा कौल’ हे अखेरचे प्रकरण पुढे येते. ते आइनस्टाइनच्या विधानाने सुरू होते. तू त्याला एकूणच तात्त्विक डूब दिली आहेस व सर्व प्रश्न जीवनशैलीशी नेऊन भिडवला आहेस. किती खरे आहे ते! त्यामधूनच तू विद्यमान आत्मकेंद्रिततेला भिडतोस, बाजारपेठेच्या राजकारणाला दूषणे देतोस, लोकशक्तीची महती वर्णतोस आणि म्हणतोस, नेटवर्किंग असायला हवे, पण ते अस्सल, सामाजिक संबंधांचे, प्रत्यक्षातले.
मी त्या क्षणी मात्र गोंधळलो. शेवटचे प्रकरण जेमतेम पाच-सहा पानांचे आहे. त्या आधीच्या एकशेसत्तर पानांतील विश्वरूपदर्शनाचा मथितार्थ एवढाच? पर्यावरणवादी व विकासवादी असे सरळ सरळ दोन तट सध्या मिडियामधून व अशा तर्हेच्या पुस्तकांतून दिसून येतात. दोघांनाही चर्चेच्या पातळीवर विवेक हवा असतो, अभिप्रेतही असतो, पण तो ‘त्यांच्या त्यांच्या बाजूचा’ विवेक! त्यामुळे गोंधळायला होते. जग चाललेय कोठे? लोकांच्या गरजा काय आहेत? त्यांची पसंती आणि विचारवंतांची – कार्यकर्त्यांची शिफारस यामध्ये ताळमेळ बसत नाही. मग ही विद्वत् चर्चा पढतपांडित्याची वाटू लागते. संस्कृती हा शब्द मराठीमध्ये जसा अनेक तर्हांनी वापरला जातो, तसाच ‘जीवनशैली’ हादेखील. त्यामळे जीवनशैलीतील अपेक्षित बदल हा नीटपणे व वर्तमानकाळातील परिस्थितीशी सुसंगत असा मांडला जायला पाहिजे. महागड्या ब्रँडेड कपड्यांचे दुकान स्वत:ला ‘लाइफ स्टाइल’ म्हणवते व दिलीप कुळकर्णी दापोलीजवळच्या निसर्गात मोबाईल विना राहतात ते वेगळी जीवनशैली म्हणून. देईळगावकर, तुम्हाला कोणती जीवनशैली अभिप्रेत आहे? समाजाची जीवनशैली विकसित होते. समाजच ती घडवतो, पण त्यासाठी वेळोवेळी हस्तक्षेप हवा. तो ही मंडळी करत असतात. तुमचा ‘हस्तक्षेप’ कळला तर तुमच्या तत्त्वचिंतनाला टोक येईल. त्या बाबतच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
विश्वाचे आर्त
लेखक – अतुल देऊळगावकर (९४२२०७१९०५)
प्रकाशन – लोकवाङ्मय गृह
पृष्ठे- १८८ / मूल्य- २५० रुपये
दिनकर गांगल