समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास – अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय? सरकार त्या वयानंतरच्या दिव्यांगांना सांभाळण्यास अनुदान देत नाही. समाधान सावंत यांनी वेगळी दुनिया ‘सहवास’ या नावाने तशाच अठरा वर्षांवरील विशेष मुलांसाठी उभी केली आहे. त्या सगळ्यांनी तेथे यावे. त्यांनी छानपैकी जेवण करावे, खेळावे, टीव्ही पहावा- त्यासोबत काही गमतीजमती कराव्या असे सारे डोक्यात ठेवून संस्था उभारली आहे. मी संस्थेत पाय ठेवल्या ठेवल्या तेथील विशेष मुलगा मला विचारू लागला, की “तू कोण?” मी त्याला म्हणालो, “पाहुणा आलोय तुमच्याकडे”. त्याने लगेच स्वागत केले. बाकीजण कॅरम खेळण्यात दंग होते. त्यांना समजले, की कोणीतरी नवीन व्यक्ती आली आहे. म्हणून सगळ्यांनी एकसाथ स्वागत केले. त्यांच्यातील एकजण उठला आणि त्याने गुलाबपुष्प दिले. त्याचे स्वागताचे काम झाले आणि तो मस्तपैकी गादीवर जाऊन बसला. बाकीचे पुन्हा कॅरम खेळण्यात दंग झाले.
समाधान यांनी संपूर्ण संस्था दाखवली. मुलांनी काढलेली काही चित्रे दाखवली. काही मुलांची चित्रे विशेष वाटली. देवाने त्या मुलांना व्यंग्य बनवले असले, तरी त्यांना बुद्धिकौशल्य दिले आहे. तशी जाणीव वेळोवेळी होत होती. ते स्वतःच्या हातांनी कापडी-कागदी पिशव्या, मेणबत्ती, अगरबत्ती हे सारे बनवतात. सोनू पाटील नावाचे गृहस्थ त्यांना त्या कौशल्यांचे प्रशिक्षण देतात. दिव्यांग मूल एका ठिकाणी बसून जड होऊ नये म्हणून त्याला वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी घेणे गरजेचे असते. समाधान प्रत्येक मुलांविषयी तो कोण, कोठून आणि कसा आला हे सांगत होते. एकदा का पालकांनी विशेष मुलांना तिकडे प्रवेश घेऊन दिला, की त्यांनतर ते त्यांच्याकडे पाहण्यासही येत नाहीत! मला ते समजले तेव्हा फार खंत वाटली.
समाधान सावंत यांनी तरुण वयात असा आश्रम सुरू करण्याचे धाडस केले, म्हणून लोक त्यास वेड्यात काढतात, परंतु समाधान यांच्या स्वभावातच ‘वेड’ आहे. म्हणून तर त्यांनी बी. एड.चे शिक्षण घेतले ते ‘स्पेशल एज्युकेशन’ या विषयात. त्यांनी ‘एज्युकेटर’ म्हणून दोन वर्षें नोकरीदेखील केली, परंतु ग्रामीण भागात मतिमंद मुलांची फार हेळसांड होते हे त्यांनी लहानपणापासून पाहिले होते, म्हणून संधी मिळताच, 2015 साली हा आश्रम सुरू केला. ते म्हणाले, की मी शाळेत जात असताना एक मतिमंद मुलगा बसस्टॉपवर भीक मागताना दिसायचा. म्हणजे तोती मागतही नसे, परंतु लोक त्याचा तसा प्रतिपाळ करत. ती तीन भावंडे होती. तिन्ही मतिमंद. पैकी दोघांचा ते लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मग या मुलाची आबाळ फार जाणवू लागली. माझ्या मनात तो ‘मुलगा’ बसला होता. आश्रम सुरू करण्याचे ठरवल्यावर प्रथम त्याला घेऊन आलो. तो या आगळ्यावेगळ्या दुनियेचा प्रथम नागरिक आहे. तसे मानाचे स्थान त्यास आहे.
समाधान म्हणाले, की त्यांनी आश्रम सुरू करण्यापूर्वी जळगाव जिल्ह्याची गरज किती मुलांची आहे यासाठी पाहणी केली, तर तो आकडा दोनशेछपन्न इतका आला. आम्ही नवे ‘शेल्टर’ बांधून झाले, की पन्नास मुलांची सोय करू शकू. सध्याच्या बावीस मुलांत वय वर्षें अठरा ते एकाहत्तर या वयोगटातील ‘मुलांचा’ समावेश आहे.
समाधान सावंत यांचे कुटुंब आई-वडील-काका असे मोठे आहे. त्यांचे लग्न 2019 च्या मध्यास झाले. ते म्हणाले, की मला बायको – नंदुरबारची मिळाली. तिलाही सुदैवाने समाजकार्याची आवड आहे. त्यामुळे तिने माझे ‘वेड’ समजून घेतले आहे. त्यांनी लग्न रजिस्टर पद्धतीने केले व समारंभाचा संभाव्य खर्च ‘सहवास’च्या कामी लावला.
‘सहवास’मध्ये आठ मुलांना एक शिक्षक असे प्रमाण आहे. असे गट पाडल्याने वेगवेगळ्या बुद्ध्यांकांची मुले त्यांच्या क्षमतेला योग्य अशी कौशल्ये हस्तगत करून, त्यानुरूप कामे करू शकत. मी मुलांशी सहज गप्पा मारता मारता म्हणालो, “मी आज तुमच्याकडेच राहणार आहे. माझी आज काय सोय कराल?” त्यांच्यातील दिनकर नावाचा मुलगा उत्स्फूर्तपणे हातवारे करत म्हणाला, “थांबा, चिकन कापू.” मला हसू आवरेना. दुसऱ्याला विचारले, तर त्याने मात्र शाकाहारीचा रस्ता दाखवला. बाकीचे मजा घेत होते. मला त्या सर्व मुलांमध्ये दिनकर जे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त कुतूहल वाटले. दिनकर विशेष मुलगा असूनही बँकेत कामाला जायचा. तिकडे तो छोटमोठे काम करायचा म्हणून त्या मोबदल्यात त्याला चहा किंवा कॉफी मिळायची. त्यातच तो खूश व्हायचा. त्याने काम करताना कधी काही चूक केली नाही. शे-दोनशे नोटांचे बंडल अमुक व्यक्तीला देऊन ये असे जर सांगितले, तर तो ते त्याच व्यक्तीला नेऊन द्यायचा. पण कालांतराने नवीन माणसे आली आणि दिनकर तेथून बाहेर पडला! त्यानंतर तो या संस्थेत जोडला गेला. मी संस्थेतील प्रत्येक विशेष मुलाकडे पाहत होतो आणि त्याच्याशी बोलत होतो, पण मला प्रोत्साहित करणारा दिनकर हाच होता. कारण त्याच्याकडे पाहिले, की तो आनंदानेच पाहणार. मी त्या सगळ्यांना म्हणालो, की कोणीतरी गाणे म्हणून दाखवा. ते माझ्यावरच उलटले, सगळे म्हणू लागले ‘गाणे लावा; आम्हाला नाचायचे आहे.’ तिकडे एक मस्तपैकी साउंड सिस्टम आहे. ‘बाला गाणे’ लावले आणि त्या सगळ्यांनी मला त्यांच्यासोबत ठेका घेण्यास सांगितले. मी “चला, नाचुयात मनसोक्त” असे म्हटले. ती माणसे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात. दिनकर अॅक्टिव्ह दिसत असल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी एक छेड काढली. दिनकरला अमिताभची अॅक्टिंग येते. मग काय ते सुरू झाले! त्यांच्याबरोबर फुल धम्माल केली. बरीच मजा आली! त्यांच्यासोबत फोटो काढताना प्रत्येकजण येऊन फूल देत होता आणि फोटो काढून घेत होता. संस्थेला भेट देणाऱ्या व्यक्तीचा आदरयुक्त मान करण्याचे संस्कार ‘सहवास’मध्ये दिसून आले.
इनमिन तीन लोक आणि बावीस जणांचा सांभाळ! म्हणजे जरा कठीणच. संस्था गाव-खेड्यात असल्यामुळे तिला मिळणाऱ्या मदतीचा ओघ कमी. बदलापूरच्या आधार संस्थेचे सहकार्य त्यांना बरेच लाभते. वनकोठे या गावातील भास्कर पिंताबर पाटील यांनी संस्थेसाठी जागा दिली. त्यांच्या मृत्यूनंतर रावसाहेब पाटील या त्यांच्या मुलाला संस्थेने अध्यक्ष बनवले आहे. त्यांनी दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू आहे. तेथे पन्नास व्यक्तींचे ‘शेल्टर’ लवकरच सुरू होणार आहे. संस्थेचे कार्य ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत सुरेश सूर्यवंशी यांच्या जागेत नाममात्र भाड्यावर सुरू आहे. सर्वसामान्य माणसे आयुष्यात रोज धावपळ करतात. पोटासाठी कमावतात. त्यांना काम वेळेवर झाले नाही तर प्रचंड मनस्ताप होतो, असे सगळे काही घडत असते. पण तिकडे मतिमंद निवासी शाळेत त्यांच्यात मिसळल्यावर सर्वसामान्य कारणे, दुःखे सगळी फिके वाटू लागतात. जळगावला गेलात कधी तर नक्की भेट देऊन या!
‘सहवास’ अ केअर मतिमंद निवासी कार्यशाळा
sahawascare@gmail.com,7744091291
सोनबर्डी, कासोदा-एरंडोल रोड, जिल्हा – जळगाव
– शैलेश दिनकर पाटील 9673573148 patilshailesh1992@gmail.com
———————————————————————————-
अभिनंदन शैलेश. छान लिहिलं…
अभिनंदन छान लिहिलं आहेस. मी जळगावची आहे पण ह्या संस्थेबद्दल माहीत नव्हतं आज तुझ्या मुळे कळले. धन्यवाद. असंच चांगलं लिहीत राहा. शुभेच्छा