विरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली!
‘नवयुग ‘ हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं, तशी त्यावेळच्या अन्य नियतकालीकांबरोबर, नवयुगलाही दोन हात करावे लागले. या सगळया खेळात सर्वात जास्त रंगत आणली ती ‘नवयुग’ विरुध्द ‘विविधवृत्त’ या दोघांमध्ये नवयुग मधून काँग्रेसच्या धोरणांचा आणि राजकारणाचा पुरस्कार केलेला असायचा तर ‘विविधवृत्ता’त काँग्रेसवर टिका असायची. कित्येकदा ही टिका वैयक्तिक पातळीवर सुध्दा होत असे.
पुण्यातल्या एका व्याख्यानात आर्चाय अत्रे म्हणाले, ”काही लोक मला विचारतात की, ‘काय हो अत्रे, तुम्ही का तुंरुगात गेला नाहीत? (प्रचंड हशा). त्यांना माझं उत्तर असं आहे, कीं, मी आहे कॉग्रेसचा पठाण किंवा भय्या म्हणा हवे तर. घरमालक गावाला गेले म्हणजे रखवालदाराला त्या घराचा जसा सांभाळ करावा लागतो तसे काकासाहेब गाडगीळ किंवा केशवराव जेधे हे आमचे काँग्रेस पुढारी तुरुंगात गेले की,’साप्ताहिक नवयुग’चा सोरा हातात घेऊन मला या काँग्रेस हाऊसचे रक्षण करीत बसावे लागते. जो कोणी या घरावर दगड फेकील त्याच्या ‘लगाव पाठीत सोटा’ हे माझे कार्य आहे. तेव्हा मला तुरुंगात जाण्यास वेळ कोठून मिळणार?” (प्रचंड हशा)
याच व्याख्यानात अत्र्यांनी हिंदूमहासभेच्या नेत्यांची भरपूर खिल्ली
उडवली होती. झालं. तटणिसांनी व्याख्यानाच्या वरच्या विषयाला अनुसरुन एक व्यगंचित्र प्रसिध्द केलं. त्यात पठाणाच्या वेषभूषेत अत्रे ‘हिंदूमहासभा’ नामक तरुणीचे प्रियाराधन करीत बाजेवर बसले आहेत. आणि उजव्या
बाजूला ‘नवयुग’च्या सोटयावर एक कुत्रं तंगडी वर करुन लघवी करत आहे.
व्यंगचित्र प्रसिध्द झाल्यावर अत्रे विरोधकांनी प्रंचड जल्लोष केला. त्यांना वाटलं तटणिसांनी अत्र्यांवर भलतीच मात केली. या असल्या गोष्टींनी अत्रे कसले नामोहरम होतायत.
नवयुगच्या पुढच्याच अकांत अत्र्यांनी तेच व्यंगचित्र जसच्या तसं छापलं. फक्त एकच फरक केला तो म्हणजे, कुत्र्याच्या अगंवर ‘तटणीस’ अशी ठळठळीत अक्षरं लिहली.
एका व्यंगचित्रामध्ये थोडा बदल करुन ते पुन्हा त्या चित्रकाराच्या किंवा प्रकाशकाच्या अंगावर शिताफीने उलटवून त्याची फटफजिती करण्याच्यां या तंत्राचा महाराष्ट्रतल्या वृत्तपत्रसृष्टीतला तो पहिला नमुना होता.
प्रचारात विरोधी पक्षाची खिल्ली उडवताना. ‘ढमढेरे’ आडनावाच्या उमेदवारवर कोटी करताना अत्र्यांनी ‘ढमढरे म्हणजे ज्यांच्या आडनावात दोन ‘ढ’ आणि एक ‘मढे’ आहे’ असं सागितलं. यावर तटणिसांना अत्र्यांच्या अडनावात ‘ढ’ घालण्याची सुरसुरी आली. पण ह्यात आडनावात ते करणं शक्य नव्हतं म्हणून ‘विविध वृत्तात’ त्यांनी, ‘अत्रे यांच मुळ आडनाव गाढवे आहे’ असं छापलं त्यावरही अत्रे विरोधक पोट धरधरुन हसले.
तटणिसांच्या या खोडसाळपणाला नवयुग मधून ‘गाढव आणि तटणीस’ या मथळयाखाली सणसणीत उत्तर दिलं, ते असं :
” ‘विविधवृत्त’ चे संपादक श्री.रामभाऊ तटणीस ह्यांनी असा एक नवीन शोध लावला आहे की आचार्य अत्रे त्यांचे मुळ आडनांव ‘गाढवे’ असे होते. ह्या संशोधनाच्या अनुषंगाने आम्हाला आणखी एक शोध लागला तो असा कीं, कालांतराने गाढवे वंशातल्या एका गाढवाचा एका तट्टाणीशी प्रेमसंबंध जडला आणि त्यापासून त्यांना जी खेचर संतती निर्माण झाली ती पुढे ‘तट्टाणीस – तट्टणीस – तटणीस’ ह्या नावांनी ओळखली जाऊ लागली. त्या गाढवेवंशी व तटणीसांच्या एकापेक्षाही एक खेचरलीला पाहून गाढवे वंशातल्या लोकांना इतका पच्छात्ताप झाला की, त्यांनी आपलं आडनांव बदलून टाकलं.”
हा खुलासा नवयुगमधे छापून आल्यावर, अत्र्यांना ‘गाढवे’ ठरवणाऱ्या तटणीसांचं महाराष्ट्रभर हसू आलं. हे झालं वृत्तपत्रीय लढाईतलं ! पण हजरबाबीपणाचा एक किस्सा अफलातून आहे.
अत्र्यांच्या ऑफिसजवळ एक गाढव मरुन पडलं. दोन दिवस त्यांच्याकडे कोणीच लक्षं दिलं नाही. शेवटी त्या गाढवाची दुर्गंधी सुटली. म्हणून अत्र्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्यखात्याशी संर्पक साधला. आरोग्य अधिका-याला ते म्हणाले ”अहो ! गेले दोन दिवस इथं एक गाढव मरुन पडलंय, कोणीच उचलून नेत नाही. आता दुर्गंधी सुटायला लागली आहे. काहीतरी करा आणि ती घाण उचलून टाका”
यावर अधिकाऱ्याला विनोद करायची इच्छा झाली. तो हसून म्हणाला ”काय हे अत्रेसाहेब? रोज तुमच्या पेपरातून एवढी घाण बाहेर काढता. एक गाढव उचललंत तर काय बिघडेल? अधिकाऱ्याला वाटलं आपण आपल्या विनोदाने अत्र्यांना गप्प केलं. तो आपल्या विनोदबुध्दीवर खुष झाला.
”अहो! ती घाण निवारणं मला अवघड नाही. पण आपल्या हिंदू धर्मात अशी प्रथा आहे की माणूस मेल्यावर क्रियाकर्म करायला त्याच्या जवळच्या
नातेवाईकाला बोलावलं जातं, म्हणून आधी तुम्हाला कळवलं. तुम्ही आला नाहीत तर भडाग्नी द्यायला मी आहेच.”