‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची ‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ मोहीम सुरू होती. ‘थिंक’चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत होते. ती भटकंती विंचूर गावापर्यंत पोचली आणि तेथे गवसले ‘विन्सुरा’ वाइनमुळे प्रसिद्ध झालेले प्रल्हाद खडांगळे!
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालक्यातील विंचूर गावचे प्रल्हाद खडांगळे हे नाव जगभरात प्रसिद्ध झाले ते त्यांच्या ‘विन्सुरा’ वाइनमुळे. विंचूरची सुरा ती विन्सुरा! त्यांचे जीवन त्यांनी शेतकऱ्यांसाठी दाखवलेल्या प्रयोगशीलतेमुळे एरवीही आदर्श आहे! त्यांनी बनवलेली ‘विन्सुरा’ वाइन जगात पोचली असून त्यामुळे मद्याच्या सुरा या भारतीय नावालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. खडांगळे यांचे जीवन विविध उपक्रमांनी भरले आहे. त्यांचे आई-वडील रूई गावचे. प्रल्हाद यांचा जन्म तेथेच झाला. त्यांचे आईवडील शेतीत काम करायचे. गरीब सर्वसामान्य कुटुंब, मात्र प्रल्हाद यांची हकिगत जे मनी आले ते करून पाहिले अशी आहे. त्यांनी रूई गाव व नंतर विंचूर गाव येथील शिक्षण संपवल्यानंतर ते पिंपळगावला कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले. तेथे ते एक खोली घेऊन राहत. त्यांना जेवणाचा डबा रोज गावावरून एसटीने येई. तो 1980 ते 1982 चा काळ होता. खोलीपासून कॉलेजला जाण्याच्या रस्त्यावर पटांगण होते. शेतकरी संघटनेच्या शरद जोशी व माधवराव मोरे यांची भाषणे त्यांना पटांगणावर नेहमी ऐकण्यास मिळत. प्रल्हाद यांना शरद जोशी यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ खरी वाटू लागली. त्यांनी त्यांचे बी एस्सी (केमिस्ट्री)चे शिक्षण सुरू असताना, पुढील आयुष्य शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी झटण्याचा निर्धार केला. शेतकरी संघटनेने शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी सभासंमेलने आयोजित केली; बार्डोली ते टेहरी अशी यात्रा काढली. मालेगावजवळील टेहरी येथे यात्रेची सांगता 30 ऑक्टोबर 1984 ला होणार होती; त्याच दिवशी शासनाविरोधी आंदोलन पुकारले जाणार होते. महाराष्ट्रभरातून शेतकरी तेथे आले होते. त्यात खडांगळे यांचा पूर्ण सहभाग होता. पण त्याच दिवशी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या दिल्लीत झाली. त्यामुळे आंदोलन रद्द करावे लागले. खडांगळे रात्री त्यावेळचे अध्यक्ष भास्करराव बोरावके यांच्या घरी शरद जोशी व इतर सहकाऱ्यांसह मुक्कामाला राहिले. तेथे त्यांची शंकर वाघ यांच्याशी भेट झाली. ते संघटनेचे ज्येष्ठ संस्थापक कार्यकर्ते, पण नंतर त्यांचे मत बदलले होते. ते जोशी यांचे विरोधक बनले होते. त्यांनी खडांगळे यांच्यासह चार-पाच युवकांना बाजूला घेतले व समजावून सांगितले, की ‘तुम्ही तुमच्या शेतीधंद्याकडे लक्ष द्या.’ ‘शरद जोश्याच्या नादी लागू नका’ असेही बजावले.
हा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध झाला आहे.
खडांगळे त्यांच्या गावी परत आले व खरोखरीच, शेतीकामाकडे वळले. मात्र ते शिक्षणामुळे पारंपरिक शेती न करता काहीतरी नवीन करण्याच्या ध्येयाने पछाडले गेले होते. त्यांनी नर्सरी सुरू केली. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतीमालासाठी औषधविक्रीचे दुकान काढले. खडांगळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत. त्यामुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या दुकानात गर्दी होऊ लागली. त्यांचे स्वत:चे शेतीतील प्रयोग चालूच होते. ओघात, त्यांना पाचगणीतील स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग कळला. खडांगळे पाचगणीला गेले. त्यांनी तेथे स्ट्रॉबेरीची शेती पाहिली. त्या बाबी आश्चर्याचा धक्का देणाऱ्या होत्या. त्यांना शेतमालाचा भाव वीस-तीस रुपये असा ऐकण्याची सवय; पण एखाद्या शेतमालाला दोनशे-तीनशे रुपये किलोमागे मिळतात हे त्यांना नवल वाटावे असेच होते!
त्यांनी शेतमालकाची, अमरिश करवत यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. तेथे पाहतात तर आणखी मोठे आश्चर्य वाढून ठेवले होते. करवत यांच्या ऑफिसपुढे स्ट्रॉबेरी असलेल्या मालवाहू गाडीतून ते आंबटगोड छोटेसे फळ उतरवले जात होते. स्ट्रॉबेरीचा भाव होता अडीचशे रुपये अर्ध्या किलोला! प्रल्हाद यांनी तीनशे रोपे विकत घेतली. एका रोपाचे पंचवीस रूपये! प्रल्हाद व एकूणच शेतकरी यांना तोपर्यंत भाव एकदोन रुपये रोप असा ऐकण्याची सवय होती. प्रल्हाद यांच्या ध्यानी आले, की जमाना बदलत आहे, ग्राहकही बदलत आहे. उत्पादक शेतकऱ्याने बदलण्यास हवे. त्यांना व्यावसायिकतेचे जणू धडेच मिळत होते!
खडांगळे दोन दिवसांनी पाचगणीला जाऊन रोपे घेऊन आले. त्यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीचा प्रयोग अर्धा एकर जागेत सुरू केला. स्ट्रॉबेरीला निफाडची माती, थंड वातावरण मानवले. रोपे चांगली टवटवीत झाली. शिवाय, मस्तपैकी फळेही आली. त्यांनी स्ट्रॉबेरी अर्ध्या एकरावरून वाढवत दोन एकर जागेत नेली. मुंबईतील श्रीमंत ग्राहक मिळू लागले; त्यांना मार्केटिंगचा प्रभाव कळला. त्यांचे फोटो यशस्वी शेतकरी म्हणून पेपरात येऊ लागले. बातम्या येऊ लागल्या. प्रल्हाद यांचा स्वभाव नवीन काहीतरी करत राहण्याचा. ते ड्रिप इरिगेशनचा अभ्यास करावा म्हणून इस्रायलला कृषी प्रदर्शनास 1995 मध्ये गेले. त्यांनी तेथे आधुनिक शेती बघितली व तिचा अवलंब स्वतःच्या शेतात केला. ते पुन्हा फ्रान्सला ‘कल्चरल एक्सचेंज’ नावाखाली 1997 मध्ये एक महिना गेले. त्यांना तेथे द्राक्ष शेती, दूधापासून चीज बनवणे, फुलांपासून परफ्यूम बनवणे इत्यादी खूप गोष्टी पाहण्यास मिळाल्या. त्यांनी स्वतः मेंढीचे दूध तेथे काढले. तो महिना ऑक्टोबरचा होता. त्याच महिन्यात फ्रान्समध्ये द्राक्षांच्या ‘हार्वेस्टिंग’चा काळ असतो. खडांगळे यांनी द्राक्षांपासून वाइन बनवण्याची प्रक्रिया पाहिली.
आणि खडांगळे यांना मार्ग सापडला! त्यांनी ध्यानी घेतले, भारतात,
दूध आहे भरपूर…….पण उत्तम चीज नाही
फुले आहेत ………. पण उत्तम परफ्यूम्स नाहीत
द्राक्षे आहेत छान….. पण उत्तम वाइन नाही
ते वाइन बनवण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक सामानाची लिस्ट फ्रान्समधून घेऊन आले. सोबत वाइनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या, द्राक्षाच्या जाती – शॅडोणे, सौवैनोब्लाक, पिनोनेरा अशा – आणल्या. त्यांनी प्रथम प्रयोग म्हणून वाइन द्राक्षापासून घरीच बनवून पाहिली. पेय तयार होण्याला महिना लागला असेल. एक वाइनतज्ज्ञ त्याच काळात नाशिकला कॅलिफोर्नियातून येणार होते. खडांगळे त्यांनी बनवलेली वाइन घेऊन त्या तज्ज्ञाकडे गेले. त्या तज्ज्ञांनी वाइन शिशी नाकाजवळ नेताच ‘व्वा, व्वा! एक्सलंट’ असे उद्गार काढले. खडांगळे त्यांची वाइन घेऊन तिची चव, स्वाद व दर्जा तपासून पाहण्यासाठी फ्रान्सला आणखी एका एक्झिबिशनमध्ये गेले. त्यांना तेथे ‘व्वा, व्वा! छान फ्लेवर’ असे ऐकून नाशिकच्या द्राक्षांचीच मान उंचावल्यासारखे वाटले! त्या फ्लेवरसाठी नाशिकची माती व त्यापेक्षा तेथील रात्रीची थंडी हे खरे आवश्यक घटक आहेत. द्राक्षांचे हार्वेस्टिंग झाल्यावर पाऊस जर आला नाही तर त्या वर्षाला ‘विंटेज इयर’ म्हणतात व त्या ‘वाइन’ला ‘विंटेज वाइन’. ती ‘वाइन’ इतर वर्षांच्या ‘वाइन’पेक्षा दहापट जास्त भावाने विकली जाते. नाशिकमध्ये तर एखादे वर्ष अपवाद म्हणून सोडले तर दरवर्षीच ‘विंटेज वर्ष’ असते – योगायोग असा, की सुदैवाने, कृषिक्षेत्रातून सचिवपदावर गेलेल्या प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त असे धोरणही त्या काळात राबवले. त्यांनी विंचूर भागात वाइन पार्क उभारले, प्लॉट वाटप झाले अन ‘विन्सुरा’ अस्तित्वात आली.
Why VINSURA – खडांगळे यांनी शेतकरी संघटना जरी सोडली होती तरी शेतकऱ्यांचे हित बघणे सोडले नव्हते. औषधांचे दुकान चालवणाऱ्याला जसा फार्मसीतील डिप्लोमा हवाच; तसा शेतीऔषधे, खते विक्रेत्याला कृषीचा डिप्लोमा हवा असा सरकारी नियम आहे. तसाच, वाईनरीसाठी वाइन मेकिंगचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट हवे असा सरकारी फतवा निघाला. खडांगळे यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून कृषी डिप्लोमा चांगल्या गुणांनी पूर्ण केला. खडांगळे यांनी त्यांच्या उद्योगाला ‘संकल्प’ असे योग्य नाव दिले आहे, कारण त्यांचा संकल्प शेतकऱ्यांसाठी आहे. फ्रान्समध्ये वाइनची नावे प्रदेशावरून ठेवतात – जसे बोजुलो, बरगंडी, बोर्डो, त्याप्रमाणे विंचूरची दारू (सुरा) या अर्थाने ‘विन्सुरा’ असे नाव त्यांच्या वाइनला देऊन त्यांनी ते खरे भूमिपुत्र असल्याचा पुरावाच दिला आहे.
त्यांच्या वाईनची युरोप, अमेरिका, चीन, जपान व भारतातील राज्यांमध्ये चांगल्या गुणवत्तेने विक्री होते. त्यांच्या उद्योगाचा वार्षिक टर्नओव्हर सहा कोटी रुपये आहे. ते स्वतःच्या शेतीतील द्राक्षे वाइनसाठी अधिकाधिक वापरतात. त्यांची पन्नास एकर शेती आहे. खडांगळे यांच्या प्रयोगशील स्वभावाची परिणती म्हणजे विन्सुरा!
– प्रल्हाद खडांगळे 9822504085
khadangalep@yahoo.com
विंसुरा वायनरी प्रायव्हेट लिमिटेड
सीयू-03, वाईन पार्क एमआयडीसी, विंचूर,
तालुका निफाड, जिल्हा नाशिक 422305
– श्रीकांत पेटकर 9769213913
petkarshrikant3@gmail.com