विनोदिनी पिटके-काळगी – आनंददायी शिक्षणाच्या वारकरी

_Vinodini_Pitake_Kalagi_5.jpg

मुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात! शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाविना परतावे लागते. शाळा वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेले आहे. इतर शाळांमधील शिक्षकही साहित्याधारे प्रशिक्षण घेत आहेत. त्या मराठी शाळेचे नाव आहे ‘आनंदनिकेतन’.

शाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक आहेत विनोदिनी पिटके-काळगी. त्या मूळच्या साताऱ्याच्या. त्यांनी 1985 साली गणित विषयात एम एस्सी पूर्ण केले. त्यांनी शिक्षिकेची नोकरी ‘सातारा सैनिकी स्कूल’मध्ये केली. त्या अविनाश बी.जे. यांच्या नेतृत्वाखाली ‘सत्यशोध’ या सामाजिक संघटनेबरोबर साताऱ्यात काम करत असत. त्यांनी त्याच संघटनेत कार्यरत असलेल्या राज काळगी यांच्याशी 1988 साली लग्न केले. राज काळगी हे एसटीत कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची बदली झाली म्हणून दोघे 1991 साली नाशिकला आले. विनोदिनी तेथे आर वाय के कॉलेजला नोकरी करू लागल्या. त्यांनी शिक्षक होण्याचे आधीपासून ठरवलेले होते. त्यांचा पिंड चळवळ्या असल्याने त्या समता आंदोलन, स्त्रीवादी चळवळ यांच्याशी तेथेही जोडल्या गेल्या.

‘समता आंदोलन’ त्यावेळी झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवत असे; पण त्या कामाला आकार तसा निश्चित नव्हता. विनोदिनी यांना शिस्तबद्ध कामाची सवय होती. कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांच्या कार्याचा व विचारांचा विनोदिनी यांच्यावर प्रभाव आहे. लीला पाटील यांच्या ‘सृजनआनंद शाळे’ने त्यांच्या मनात घर केले होते. तरी त्या टप्प्यावर नवीन शाळा काढण्याचा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. पण त्यांची मुलगी मिताली शाळेत जाण्याच्या वयाची झाली आणि त्यांना शिक्षणातील खेळखंडोबा अनुभवास आला. शिक्षणक्षेत्रावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे; त्यामुळे शिक्षण हाच एक प्रश्न बनला आहे.

विनोदिनी यांनी त्यांच्या मुलीसाठी मराठी माध्यमाची त्यातल्या त्यात वेगळ्या वाटेने जाणारी थोडी लांबची शाळा निवडली होती; पण त्या शाळेतही अभ्यास, शिस्त या नावाने रूढ वाट चोखाळली जात होती. त्यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या वाढदिवशी शाळेतील मुलांना वेठीस धरलेले पाहिले आणि ठिणगी पडली. अशा वेळी, परिस्थिती बदलण्यासाठी सरकारपुढे मागण्या करणे हा एक मार्ग असतो किंवा स्वतः काही नवीन निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारावे लागते. विनोदिनी यांनी दुसरा पर्याय निवडला आणि ‘आपणच शाळा काढू या’ असा प्रस्ताव त्यांच्या मित्रमंडळींपुढे मांडला.

_Vinodini_Pitake_Kalagi_8.jpgशाळा कशी असावी यासंबंधी, विनोदिनी यांच्या कल्पना स्पष्ट आहेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्यावर सुरुवातीला काही अटी घालून घेतल्या :

• सरकारी बंधने नकोत म्हणून शाळा सरकारी अनुदान घेणार नाही.
• मुलांचे व शिक्षकांचे स्वातंत्र्य हा शाळेचा पाया असेल.
• शाळा मराठी माध्यमाची असेल.
• समाजातील सर्व जाती, धर्म, वर्ग, आर्थिक गटांतील मुले शाळेत असतील.
• फी माफक असेल व प्रवेशासाठी देणगी घेण्यात येणार नाही.
• शारीरिक शिक्षा केली जाणार नाही.
• शिक्षण आनंददायी व सहभागशील असेल.
• प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त चाळीस विद्यार्थी असतील.
• शिक्षण जीवनाशी जोडलेले असेल.
• स्पर्धेपेक्षा सहकारावर भर असेल.

मूल ज्ञान मिळवते म्हणजे ते स्वतःला परिसराशी जोडत जाते. तेव्हा त्यांचा विश्वास परिसर भाषा हे त्याच्या ज्ञानप्राप्तीचे नैसर्गिक साधन असावयास हवे या गोष्टीवर आहे. त्यांची काही समविचारी मित्रमंडळी त्यांच्या साथीला आली. अशा तऱ्हेने ‘आविष्कार शिक्षण संस्थे’ची नोंदणी झाली. विनोदिनी यांनी शाळेचे नाव सुचवले – ‘आनंदनिकेतन’. त्यांनी नाशिकच्या माणिकनगरमधील छोटा हॉल भाड्याने घेतला. सोळा पालकांनी त्यांची मुले त्यांच्या हवाली केली. दैनंदिन कामाला, विनोदिनी मैदानात एकट्याच उरल्या. त्या स्वतः, वर्षा हवालदार व स्वाती पाटील या बालवाडी शिक्षिका म्हणून उभ्या राहिल्या आणि ‘आनंदनिकेतन’ शाळा 10 जून 1998 रोजी सुरू झाली.

बालवाडीत लिहिण्यास शिकवले जाणार नाही, फक्त लेखनाची पूर्वतयारी होईल, मुलांना गृहपाठ असणार नाही, पालकांनी मुलांवर कसलाही दबाव टाकू नये अशा स्पष्ट सूचना विनोदिनी यांच्या होत्या. बालवाडीच्या प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना त्या सूचना सुरुवातीलाच दिल्या जातात. विनोदिनी यांच्या डोक्यामध्ये संस्था उभारणी, मुले मिळवणे, अभ्यास करणे, शिक्षिका मिळवणे यांसारखी असंख्य कामे घोंघावत होती. विनोदिनी कॉलेजमध्ये नोकरी करत होत्या. त्यांनी नोकरी सोडली. शाळेची सुरुवात तर झाली; पण हाताशी पैसा, साधनसंपत्ती, सरकारी मदत वा संस्थेचा नावलौकिक यांपैकी काहीही नव्हते. होते ते फक्त आत्मबल! मंत्रालयात कोणाशीही ओळख नव्हती; पण पत्रकार सुरेश भटेवरा यांनी मदत केल्याने ते काम झाले. खरी कसोटी शाळेसाठी योग्य शिक्षक मिळवताना होती. कारण त्यावर शाळेचे स्थैर्य अवलंबून होते आणि स्थैर्यावर अवलंबून होता पालकांचा विश्वास! विनोदिनी स्त्री चळवळीशी संबंधित अनेक वर्षें आहेत. स्त्रियांमध्ये उच्च दर्ज्याची गुणवत्ता व सर्जनशीलता असते. त्यांना ती प्रकट करण्याची योग्य संधी मिळाली तर त्या अशा कामात पैशांची अपेक्षा न करता सामील होतील असा विश्वास वाटत होता. तसेच झाले. मुले मोठी झाल्याने संसाराची जबाबदारी कमी झालेल्या चारजणी उत्स्फूर्तपणे त्या कामात सहभागी झाल्या. पुढे शिक्षक जमवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. विनोदिनी गमतीने म्हणतात, “नंतरच्या काळात त्या जटिल प्रश्नाचे उत्तर स्वतःच आमच्याकडे चालत आले.” आनंदनिकेतनमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आया चांगल्या शिकलेल्या होत्या. त्यांना त्याही शाळेत शिकवू शकतील असे वाटले. शाळेच्या कसोट्या तीनच होत्या- शाळेच्या उद्दिष्टांशी सहमती, मुलांविषयी प्रेम व तिसरे म्हणजे नवीन काही शिकण्याची व करून पाहण्याची तयारी. पाहता पाहता, शाळेची गरज भागेल इतक्या शिक्षिका शाळेच्या टीममध्ये सामील झाल्या. शाळेत शिक्षिकांना मुले ‘ताई’ म्हणतात – शिक्षिकांचे नाते मुलांसोबत तसे बनते.

विनोदिनी संस्थेच्या सेक्रेटरी आहेत. सुरुवातीला त्या शाळेच्या मुख्याध्यापकही होत्या; तरी त्या वेगळ्या खोलीत बसल्या नाहीत. त्यांनी पहिली दहा वर्षें झाल्यानंतर मुख्याध्यापकपद सोडले. ती जागा शोभना भिडे यांनी घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी मुख्याध्यापकपद नवीन ताईंकडे दिले जाते. सर्व शिक्षिका शाळेत आल्या आणि आनंददायी शिक्षण चळवळीच्या कार्यकर्त्या बनल्या! शिक्षिका त्यांचे वर्ग झाडण्यापासून शिकवण्यापर्यंतची सर्व कामे उत्साहाने पगार न घेता केवळ पेट्रोल अलाउन्सवर करतात. माणसाची आंतरिक गरज जीवनाचा सर्जनशील उपयोग व्हावा हीदेखील असते. ती गरज शाळेने भागवली आहे. शाळेने त्या शिक्षिकांना इतर प्रयोगशील शाळा पाहण्यास पाठवले. वाचन, चर्चा यांतून त्यांचे मानस घडवले. त्यातून टीम इतकी एकजीव झाली, की क्वचितच कोणी शाळा सोडून गेले. सर्व शिक्षिका एकत्र बसून शाळेच्या कामासंबंधीचे सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने घेतात.

_Vinodini_Pitake_Kalagi_6.jpgशाळेत जबाबदाऱ्यांचे वाटप असले तरी अधिकाराची उतरंड नाही. शिक्षिका स्वतःही साचेबद्धता येऊ नये यासाठी नवनवीन शिकत राहतात. शिक्षिका ‘आनंदनिकेतन’मध्ये ‘नोकरी’ करत नाहीत, तर त्या ‘आनंदनिकेतन’ चालवतात, घडवतात. शाळेला स्वतःची इमारत नसल्याने वीस वर्षांत आठ जागा बदलाव्या लागल्या. परंतु आता मात्र शाळेची स्वतःची दुमजली इमारत उभी राहिली आहे, ती लोकसहभागातून. संस्थेकडे इमारत उभारणीसाठी पैसे नव्हते; पण अनेक दाते दहा वर्षांच्या कामानंतर शाळेचा लौकिक चांगला असल्याने उभे राहिले व त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून इमारतीचे बांधकाम केले गेले.

विनोदिनी यांना ‘शाळेचे वेगळेपण नेमके कशात आहे’ असे विचारले असता त्या म्हणाल्या, “वेगळेपणाचा अट्टहास न करणे हेच खरे वेगळेपण आहे. ‘आम्ही काहीही वेगळे करत नाही, मुले स्वतः शिकतात’ असे शाळेचे घोषवाक्य आहे. कारण शिकणे ही उत्स्फूर्त, नैसर्गिक गोष्ट आहे. शाळेने फक्त अनुकूल पर्यावरण पुरवायचे आहे. शिक्षक व मुले यांच्यामध्ये कमीत कमी अंतर असायला हवे. मुलांना बोलते करणे हे शिक्षकांचे काम आहे, गप्प करणे हे नव्हे. संगणकाचा उपयोग योग्य विषयासाठी योग्य वेळी करावा. तयार प्रश्नावली व व्यवसायमाला शिक्षकांची, मुलांची कल्पनाशक्ती मारतात आणि पालकांच्या पाकिटावरील बोजा वाढवतात, तेव्हा त्या टाळाव्यात.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय शिकवायचा आहे, पाठ्यपुस्तक नाही, ही खूणगाठ एकदा बांधल्यावर ‘आनंदनिकेतन’चे शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणची पुस्तके, साधने वापरू लागले. शाळेचा प्रयत्न शिक्षण प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा असल्याने हाताने काम करण्यावर भर दिला गेला. त्यासाठी क्षेत्रभेटी, मुलाखती, कार्यानुभव, सहली, फिल्म्स असे उपक्रम वर्षभर सातत्याने घेतले जातात. धड्याखालील प्रश्नोत्तरे हे शिकवण्याचे साध्य नसून विषयांबद्दलचे औत्सुक्य जागवणे हे साध्य आहे, असे शाळेने मानले असल्याने शिकणे रंगतदार होत जाते. सर्व क्षेत्रांत खरा प्रश्न ‘पॅरडाइम शिफ्ट’चा असतो, असे विनोदिनी यांचे मत आहे, त्याचा प्रत्यय शाळेत येतो. शिकवण्याच्या काही पद्धती त्यांनी इतरांकडून आत्मसात केल्या, तर किती तरी पद्धती त्यांनी स्वतः अभ्यास आणि अनुभव यांतून विकसित केल्या. त्यांनी त्यामुळेच शिक्षकांचे स्वातंत्र्य आणि क्रियाशीलता महत्त्वाची मानली. त्यातून त्यांच्या कल्पनांना बहर आला आणि शिक्षण समृद्ध बनले. उदाहरणार्थ, ‘फंक्शनल इंग्लिश’बाबतचा मीनल परांजपे यांचा वर्तमानपत्रातील लेख वाचण्यात आला. शाळेत इंग्रजी पहिलीपासून त्याच तऱ्हेने शिकवले जाते. त्याचे अनुकरण इतर मराठी शाळांनी नंतर केले आहे. विज्ञानासाठी ‘होमी भाभा विज्ञान केंद्रा’ची पुस्तके जास्त उपयुक्त आहेत असे लक्षात आल्यावर शाळेतील दीपा पळशीकर या ताईंनी त्यांचा अनुवाद करून ती वापरण्यास सुरुवात केली आहे. आता, तो अनुवाद ‘भाभा केंद्र’ पुस्तकरूपाने छापत असते. शिवाय, अनेक शाळांनी ती पुस्तके वापरण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या शिक्षिका त्याचे प्रशिक्षण देतात. लैंगिक शिक्षणसंदर्भातील डॉ. मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान शिबिरा’बाबत ऐकल्यावर त्यांना शाळेने आमंत्रित केले. शाळेत त्यांची चार शिबिरे तर झालीच, शिवाय शाळेतील शोभना व प्रशांत यांची टीम त्या कामासाठी तयार झाली आहे. त्यांना इतर शाळांमधून त्यासाठी बोलावले जाते. शाळा त्यांना ‘आत्मभान’ शिबिरे म्हणते. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी शाळेचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. पालक व मुले यांच्यामधील तणाव कमी व्हावा यासाठी त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आनंद नाडकर्णी यांच्या संस्थेत ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’, ‘शिक्षक प्रबोधन’, ‘भावनांचे रंग’ यांसारख्या प्रशिक्षण वर्गांसही शिक्षिकांना आवर्जून पाठवले जाते.

_Vinodini_Pitake_Kalagi_2.jpgएखादा कलाकार दर महिन्याला शाळेत बोलावला जातो. मुलांनी कार्यानुभवाच्या तासाला तयार केलेल्या वस्तूंची विक्री दुकानजत्रेत केली जाते. मुले उद्योजकता विकास हा विषय प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव घेऊन शिकतात. सर्व मुले शाळेत मुक्कामी एक रात्र असतात. शाळेतील प्रत्येक मूल, अगदी दिव्यांग मूलही स्नेहसंमेलनात कोठल्या ना कोठल्या कार्यक्रमात स्टेजवर येईल असे कार्यक्रम योजले जातात.

विनोदिनी मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी याबाबतही दक्ष असतात. त्या शाळेच्या मुलांना ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या जीवनशाला बघण्यास नर्मदेच्या खोऱ्यात घेऊन गेल्या होत्या. मेधा पाटकरही शाळेला भेट देऊन गेल्या. काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अधिक कदमपासून मेळघाटात काम करणाऱ्या रवींद्र कोल्हे यांच्यापर्यंत सामाजिक क्षेत्रातील कोणीही नाशिकला आले, की त्यांना शाळेत बोलावले जाते. अभ्यासक्रमाबाहेरचे जग हा ‘आनंदनिकेतन’च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाच भाग असतो. शाळेला 2010 साली बारा वर्षें पूर्ण झाली. त्यावेळी ‘सहजशिक्षणाची प्रयोगशाळा’ या नावाने पुस्तक प्रसिद्ध केले गेले. त्या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील दूरवरच्या शिक्षकांना नवा मार्ग सापडला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत आनंद नाडकर्णी लिहितात- ‘सलगपणे वाचन करताना सर्व लेखन एकाच व्यक्तीने केले आहे असे वाटावे असा हा अक्षरशः चमत्कार आहे. तो विनोदिनी यांच्या नेतृत्वशैलीने घडवलेला चमत्कार म्हणावा लागेल.’

सर्वात कसोटीचा काळ 2005 मध्ये आला. त्यावर्षी ‘आनंदनिकेतन’चा आठवीचा वर्ग मान्यतेअभावी बंद करावा लागला. विनोदिनी यांचा धीर साधनसंपत्तीचा अभाव, सरकारी दडपण आणि पालकांमधील चलबिचल यांमुळे खचत चालला. त्यांना त्या प्रश्नावरून सरकारशी सरळ टक्कर घेणे भाग होते. विनोदिनी मुले, पालक व शिक्षक यांना बरोबर घेत 04 सप्टेंबर 2008 रोजी रस्त्यावर उतरल्या. ‘आनंद निकेतन’चे अरुण ठाकूर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे दीपक पवार, रमेश पानसे यांच्या नेतृत्वाखाली तशा शंभर शाळांचा लढा उभा राहिला आणि यशस्वीही झाला.

_Vinodini_Pitake_Kalagi_7.jpgआठवीचा वर्ग बंद करावा लागला होता, तरी शाळेने सातवीच्या पालकांना विश्वासात घेत 2008 पासून आठवी ते दहावीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. शाळेने पालकांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा पर्याय दिला व पालकांनीही तो आनंदाने स्वीकारला. म्हणजे सरकारी मान्यता नसली तरी शाळेने लोकमान्यता मिळवली होती!

‘आनंदनिकेतन’चे विद्यार्थी स्वतःच्या आवडीने निवडलेल्या अनेक क्षेत्रांत परदेशांतही शिक्षण घेत आहेत; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे आहे, की ते सर्व प्रश्नांचा विचार स्वतंत्रपणे करत असतात, झुंडीत सामील होण्यास नकार देतात, स्त्री-पुरुष समतेबाबत आग्रही असतात. त्यांना नवे प्रश्न पडतात व नवी उत्तरेही सुचतात. कोठल्याही अधिकारशाहीला आव्हान देण्याची हिंमत देते तेच खरे शिक्षण असते, ते पस्तीस शिक्षिकांच्या गटाने आपल्या वीस वर्षांच्या परिश्रमाने दाखवून दिले आहे.

– नीलिमा कुलकर्णी, neelimajapekulkarni@gmail.com

('महा अनुभव', सप्टेंबर 2018 वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)

About Post Author

2 COMMENTS

  1. This institute would not…
    This institute would not have come into existence without the efforts of late Arun Thakur. A salute to his Noble and golden hearted spirit. It saddens me to see his name in one corner and only at one place. But those who truly know Anand Niketan, know his contribution.

Comments are closed.