विद्यार्थ्याला प्रेमाचे शब्द लाभले, आणि….

_VidyarthyalaPremache_ShabdLabhale_1.jpg

शालेय शिक्षण ही जीवनाच्या सुंदर वास्तूची पहिली पायरी असते. ती विविध प्रकारच्या अनुभवांतून निर्माण होते. तिला भवितव्याच्या सुरेख कल्पनांचा रंग असतो. बालकांच्या सामाजिक, भौतिक व बौद्धिक विकासाची काळजी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गतिविधींच्या मार्फत घेतली जाते. परंतु भावनिक विकासाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही. त्याचा भावनिक कोशंट काय आहे त्याची दखल घेणे माहितीच्या अभावी शक्य होत नाही. बालक, तरुण आणि वयस्कसुद्धा यांच्यामध्ये अभिव्यक्त होण्याची कला नसेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकाकीपण, राग, द्वेष, क्रोध अथवा प्रसन्नता अशा भावभावना जाहीर करणे अवघड असते. वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी विविध कौटुंबिक पार्श्वभूमीचे असतात. त्यांना त-हेत-हेच्या समस्यांना तोंड रोजच्या रोज द्यावे लागत असते.

कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख येथे करते. एक विद्यार्थी वर्गामध्ये सतत खोड्या करत असे. त्याच्या खोड्या इतर विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनासुध्दा त्रासदायक झाल्या होत्या. त्याला कधी रागावून, कधी शिक्षा करून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला गेला. एके दिवशी त्याने हद्द पार केली! त्याने शिक्षकासमोर असलेला पोडियम जोरदार धक्का देऊन पाडला व तो त्याच्या डेस्कवरील पुस्तके फेकाफेक करू लागला. ती घटना त्या शिक्षकास अपमानकारक वाटली.

शिक्षकाने तो विद्यार्थी जर वर्गात असेल तर मी वर्गात जाणार नाही अशी घोषणा केली. मी महाविद्यालयाची प्राचार्य असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला माझ्या कक्षामध्ये बोलावून घेतले. विद्यार्थ्याच्या चेह-यावर त्याला प्राचार्यांकडून मोठी शिक्षा मिळणार याची भीती स्पष्ट दिसत होती. मी विद्यार्थ्याला बसण्यास सांगून त्याच्या पाठीवर हात ठेवून ‘तुला काय प्रॉब्लेम आहे? तू असा का वागलास?’ असे विचारले. तो विद्यार्थी ढसाढसा रडूच लागला! विद्यार्थ्याने माझ्या कक्षामध्ये येताना त्याच्या मनाशी स्वत:च तेथे काय घडू शकेल याचा अंदाज बांधला असावा, पण प्रत्यक्षात त्याच्या अपेक्षेच्या विरूद्ध असे काही चांगले घडले असावे. त्याचे अश्रुबांध त्याचा अपराध न विचारता त्याला माफी केली गेल्याच्या संमिश्र विचारांनी फुटले असावेत. मी त्या मुलास शांत करून, सर्व वृतांत पद्धतशीर मला सांगण्यास तयार केले. विद्यार्थ्याने सांगितलेल्या हकिकतीप्रमाणे त्याला आई नव्हती, वडील मदिराग्रस्त असून ते त्याच्याकडे व त्याच्या लहान भावाकडे लक्ष देण्याच्या स्थितीत नसतात. घरात घडलेल्या प्रत्येक नकारात्मक घटनेचा दोष वडील त्या विद्यार्थ्यावर थोपत असतात. त्याच्या पदरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत फक्त तिरस्कार पडत असे, त्याला कोठूनही प्रेमाचे किंवा कौतुकाचे दोन बोल कधी लाभले नाहीत. उद्धट बोलणे, वाईट मित्रांची संगत या गोष्टी होत्याच. मला त्याची कहाणी ऐकत असताना, एक अबोध निश्चल मन माझ्यासमोर उलगडत असल्याचे भासले. त्याला त्याच्या मनातील अनेक वर्षांचे साचून राहिलेले कटू अनुभव व्यक्त करण्याची संधी मिळाली होती.

मी माझ्या संरक्षणात त्या विद्यार्थ्याला त्याच दिवसापासून घेण्याचे ठरवले. मी त्या विद्यार्थ्याला ताकिद दिली, की त्याने त्याला आवडेल ते पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथसंग्रहालयात येऊन वाचावे व दिवसातून एकदा तरी एक तास फक्त माझ्यासोबत बोलावे. मी त्यास घरात वडिलांसोबत वाद न घालता त्या दहा दिवसांच्या काळात मित्रमंडळींस न भेटण्याचा सल्ला दिला. तो विद्यार्थी त्यानंतरच्या एका महिन्यात शांत व्यवहार करू लागला असे त्याच्या शिक्षकांकडून कळले. मलाही त्याच्याशी संवाद साधताना हे लक्षात आले, की वडिलांचे टोमणे जरी त्याच्यावर सतत चालू होते, तरी त्या मुलाने प्रतिकारात्मक विवाद करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. त्याला एक खात्री झाली होती, की त्याच्या पाठीवर हात ठेवणारा कोणी तरी त्याची कोठे तरी वाट बघत आहे!

विद्यार्थी अभ्यासात हुशार होताच, पण त्याच्या स्वत:च्या समस्या त्याचे कौशल्य प्रतिबाधित करत होत्या. तो पंच्याहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला व त्याच्या स्वप्नातील आवडते कॉलेज त्याला पुढे पदवी शिक्षणाला लाभले. तो सन्मार्गी लागला याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांशी भावनिक जवळीक करण्याची व त्यांना समजून घेण्याची गरज शिक्षणक्षेत्रात फार जाणवते. ‘थॉमस अल्वा एडिसन’सारख्या महान वैज्ञानिकाच्या आईला शाळेच्या शिक्षकाने ‘तुमचा मुलगा मूर्ख आहे’ असे लिहिले होते. आईने त्या पत्राकडे दुर्लक्ष करून एडिसनला अत्यंत आत्मविश्वासाने घरी शिक्षण दिले. एडिसनला त्याच्या आईने भावनिक बळ दिल्याने, त्याच्यामधून बुद्धिमान वैज्ञानिक घडवल्याने त्याने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. अभिव्यक्त होणे व अभिव्यक्त करवून घेणे हे कौशल्य शिक्षकामध्ये असायला हवे. शिक्षण हा व्यवसाय नव्हे किंवा फक्त एकामागे एक वर्ग चढून पुस्तकी ज्ञान मिळवणे नव्हे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाजूक भावनिक बंध खर्यास शिक्षणाचा सेतू निर्माण करू शकतात.

– सीमा अभय हर्डीकर

About Post Author