विदूर महाजनच्या सतारीचे खेड्याखेड्यात झंकार!

8
25

विदूर महाजन हा मनस्वी कलावंत आहे. तो आठवीत असताना सतारीच्या प्रेमात पडला, त्याने नंतर तीस-पस्तीस वर्षे सतारीची साधना व आराधना केली, तो गेली काही वर्षे सतारीच्या मैफली करू लागला व विद्यार्थ्यांना शिकवू लागला आणि त्याने आता व्रत घेतले आहे ते सतार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचे.

गंमत अशी वाटते, की पुण्यात उच्चभ्रू वर्तुळात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची चर्चा चालू असताना विदूर एका उघड्या जीपमध्ये सतार, दोन साथीदार व अद्यावत ऑडिओ सिस्टिम घेऊन मावळ भागात फिरत होता आणि ग्रामस्थ, शाळेतील मुले यांच्यासमोर सतारीचे कार्यक्रम करत होता; सतारीच्या माध्यमातून आम लोकांना भारतीय रागसंगीताचा परिचय करून देत होता. (ते त्याचे व्रत चालूच आहे!) त्याने गेल्या काही महिन्यांतील प्रयत्नांमधून सातशे ग्रामस्थ व पंधराशे शालेय मुले यांच्यासमोर सतार सादर केली आहे.

विदूर महाजन आणि त्‍यांची मुलगी नेहा महाजन विद्यार्थ्‍यांसमोर सतार वाजवतानात्याची वर्तमानपत्रांत वा वाहिन्यांवर बातमीदेखील नाही, पण चांगल्या गोष्टींचा त्यांच्या स्वत:च्या गतीने प्रसार होत असतो, त्याप्रमाणे विदूरच्या उपक्रमाची हकिगत जळगावात जाऊन पोचली आणि तेथील ‘दीपस्तंभ’ संस्थेचे यजुर्वेंद्र महाजन यांनी विदूरचे कार्यक्रम जळगाव- धुळे जिल्ह्यांतील ग्रामीण भागात योजले. त्याला निमित्त झाल्या आश्लेषा महाजन. येथे एक मुद्दा नोंदण्यासारखा म्हणजे या तीन महाजनांचा खास पूर्व परिचय नव्हता. ते तिघे सत्कार्याच्या ओढीने एकत्र आले!

विदूरच्या उपक्रमाचा प्रचार व प्रसार म्हणजे ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’चाच उत्तम नमुना आहे! विदूर तळेगाव-दाभाडे येथे राहतो, तेथे गेली पंचवीस वर्षे संगीत संस्था चालवतो, त्याचे ‘मैत्रबन’ नावाचे संगीत शिक्षण वर्ग आहेत, तेथे गुरुकुल धर्तीचे शिक्षण देण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचे वर्ग पुण्यात औंधमध्येही आहेत. त्याने त्याचे स्वत:चे कार्यक्रम लोणावळ्याचे कैवल्यधाम ते युरोप-अमेरिकेतील अनेक स्थळे असे सादर केले आहेत. त्याला सतारीचे, संगीताचे शास्त्र कळते; त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो तत्त्वज्ञान विषय घेऊन एम. ए. झालेला असल्याने त्याला ते आधुनिक परिभाषेत सांगता येते. त्यामुळे संगीतातील निखळ कलात्मकता श्रोत्यांपर्यंत पोचते.

या उपक्रमातून विद्यार्थ्‍यांच्‍या मनात सतारीबद्दल कुतूहल निर्माण होताना दिसते.त्याचा सतार संगीताचा प्रवास मनोरमपणे चालू असताना त्याला भास्कर चंदावरकर यांचे एक वाक्य सतत त्रस्त करत असे. तो स्वत: सतार शिकत असताना चंदावरकर त्याच्याजवळ म्हणाले होते, की “मी, उस्मानखाँ असे सतारिये पुण्यात असूनदेखील महाराष्ट्रात सतार ही काय चीज आहे ते ठाऊक नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”  विदूरला तळेगावात त्याचा प्रत्यय वारंवार येई. त्याने त्याच्या घरी सतारीचा रियाझ केला तरी बाजूच्या शंभर यार्डांवर असलेल्या वस्तीत सतार नावाचे वाद्य माहीतदेखील नाही हे त्याला जाणवे. मग त्याने सतार तळेगाव परिसरातील मावळ तालुक्याच्या गावागावात नेऊन वाजवण्याचे ठरवले. त्याने आरंभी कीर्तनकार मंडळींचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. सुरुवातीला तळेगावच्या सुरेश साखवळकरांनी व बबनराव भसे सरांनी थोडीशी मदत केली. नंतर  ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी शाळेचे यशवंत लिमये व त्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक संघाचे व्यंकट भताने ही मंडळी जोडली गेली आणि विदूरच्या कार्यक्रमांची मालिका सुरू झाली. गावोगावचे ग्रामस्थ, मुले तल्लीनतेने सतार ऐकतात, त्याबाबत प्रश्न विचारतात तेव्हा विदूरला समाधान वाटते. त्याचा हा उपक्रम ‘मैत्रबन ट्रस्ट’तर्फे चालतो. त्यासाठी ट्रस्टींनी प्रत्येकी अकरा हजार रुपये ट्रस्टमध्ये जमा केले. उपक्रमात ‘ऑडिओ सिस्टिम’ हा खर्चिक प्रकार होता. परंतु विदूरच्या उपक्रमाची नुसती कल्पना सांगताच  टाटा कंपनीकडून व एका मित्राकडून असे पाच लाख रुपये जमा झाले व विदूरच्या उपक्रमास गती लाभली.

विदूर महाजन यांच्‍या उपक्रमावर माहितीपट चित्रित करण्‍यात येत आहे.त्यातील ‘डॉक्युमेंटेशन’चा योग जुळून आला ती हकिगतही मनोरंजक व प्रेरक आहे. विदूरची मुलगी नेहा स्वतंत्रपणे सतार वाजवते. ती त्यांच्याबरोबर या उपक्रमात होतीच. ती सिनेमातदेखील कामे करते. त्यामुळे दीपक थॉमस हा सिनेमा फोटोग्राफर तिच्या ओळखीचा. दीपकने तळेगावला जाण्यायेण्याच्या केवळ खर्चात ठिकठिकाणचे कार्यक्रम ‘शूट’ करून देण्याचे मान्य केले. परंतु त्याने दोन-तीन कार्यक्रमांचे स्वरूप व तेथील लोकांचा प्रतिसाद पाहिला मात्र, त्याने त्याच्या कंपनीमार्फत ‘टेकिंग रागसंगीत टू व्हिलेजेस’ या विषयावर ‘द व्हिलेज राग’ या नावाचा लघुपट बनवण्याचे ठरवले. आता, विदूरच्या प्रत्येक कार्यक्रमास दीपकची भली मोठी ‘टीम’ येत असते. त्याने नाना तऱ्हांनी विदूरचा उपक्रम चित्रपटबद्ध करून ठेवला आहे. त्यामधून लघुपटाच्या रूपाने कशी कलाकृती तयार होते ते २०१४ च्या अखेरीस ठरेल असे दीपक म्हणतो.

विदूर विलक्षण समाधानात आहे, की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासात नमूद नाही अशी घटना घडण्यास तो साधन ठरला आहे. तो स्वत: उस्मानखाँ, किशोरी अमोणकर अशा मातब्बरांकडे रागदारी संगीत शिकला आहे. मात्र तो शास्त्रीय संगीताभोवती असलेल्या गूढतेत अडकलेला नाही. शास्त्रीय संगीतकला सर्वसामान्य माणसांपर्यंत नेण्याचा विदूरचा उपक्रम अनुकरणीय आहे.

विदूरची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचे ‘शोधयात्रा’ हे ताजे पुस्तक त्याच्या लाचलुचपतीविरुद्धच्या लढ्याची कहाणी कथन करते. ती हकिगत वेगळीच आहे. कलेची आत्ममग्नता आणि कलेचे सामाजिक परिमाण जपणारा हा कलावंत मनस्वीपणे जीवनाची क्षेत्रे कलास्पर्शाने तरल, हळुवार करत असतो.

विदूर महाजन
९८२२५५९७७५
vidurmahajan@gmail.com

आशुतोष गोडबोले
thinkm2010@gmail.com

About Post Author

8 COMMENTS

  1. ‘द व्हिलेज राग’ hi sankalpana
    ‘द व्हिलेज राग’ hi sankalpana khoop aawadli… Cheers Vidur!

  2. Amazing nd very inspiring
    Amazing nd very inspiring work..keep doing the great wrk like this…proud of you..:)

  3. आगळा वेगळा उपक्रम , मनापासून
    आगळा वेगळा उपक्रम , मनापासून भावलेला …

  4. महाजन विदुर यांनी पहिलं
    महाजन विदुर यांचे सतार व सतारीचा उपयोग जनमानसासाठी करण्याचे उद्दीष्ट प्रेरणादायीच !

Comments are closed.