विजय आणि जयश्री मायदेव
विंग कमांडर विजय मायदेव यांची कारकीर्द वैमानिक म्हणून हवेत गेली – ते प्रथम भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून आणि नंतर एअर इंडियाचे विशेष मोहिमांवरील वैमानिक म्हणून. ते निवृत्तीनंतरचे जीवनदेखील प्रबळगडच्या पायथ्याजवळच्या डोंगरपठारावर, भूतलाच्या काकणभर उंचावरच आनंदाने व्यतीत करत आहेत. तेथून ते भुईवरील निसर्ग व मनुष्यजीवनाचे प्रश्न पाहत असतात; त्यावर मात करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी त्यांचा बंगला बांधला आहे तो डोंगरउताराचा फायदा घेऊन, तीन-चार मजली इमारतीचा भास करून देत. ते तेथील व्हरांड्यातून तळजमिनीवरील जलतरण तलाव जसा पाहतात, तशीच लांबवर पसरलेल्या काजू, मशरूम यांची लागवड आणि आंब्याची दोन-तीनशे झाडे यांवर नजर ठेवू शकतात. ते व त्यांच्या पत्नी जयश्री असे दोघेच तेथे राहतात. मुलगा रोहित, सून इरावती व नाती देविका आणि इशा या तेथे वीकेण्डला येतात, लागवड पाहतात, गड-डोंगरांत मौजमजा करतात. पत्नी जयश्री यांची साथ त्यांना असतेच; शिवाय त्या सभोवतालच्या ठाकर समाजातील उत्सुक मुलांना इंग्रजी शिकवतात. वायुदलातील नोकरीमुळे त्या दोघांना समाजापासून दूर राहण्याची सवय आहेच. मुलगाही वैमानिक आहे तर सून अभिनेत्री इरावती हर्षे-मायदेव आहे.
विंग कमांडर विजय मायदेव |
विजय यांची हवाई दलातील लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून कारकीर्द रोमहर्षक आहे. त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या 1965 व 1971 च्या, दोन्ही युद्धांत भाग घेतला आहे. पहिल्या पासष्टच्या युद्धात तर ते पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले होते व त्यांना युद्धकैदी म्हणून चार महिने बंदिवासात काढावे लागले होते. ते स्वत: नॅट विमान चालवत होते. ते भारतीय हवाई दलाकडे असलेले त्या वेळचे अत्याधुनिक, तंत्रसज्ज विमान. त्यांचे हवाई दलाचे नववे पथक. त्यांची चौघांची तुकडी पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करत निघाली. त्यांच्या तुकडीप्रमुखांचा अंदाज चुकला आणि मायदेव यांचे विमान पाडले गेले. ते हवाई छत्रीतून खाली उतरले ती हद्द पाकिस्तानची होती. सर्वत्र दलदल. त्यांना खेडुतांनी घेरले व मारझोड केली, त्यांचा तेथेच चेंदामेंदा व्हायचा, परंतु तेवढ्यात पाकिस्तानी सैनिक आले. त्यांनी विजय मायदेव यांचा ताबा घेतला व त्यांचा जीव बचावला. तो त्यांना त्यांचा पुनर्जन्म वाटतो – 19 सप्टेंबर 1965. त्यांना चार महिने पाकिस्तानी छावण्यांत व तुरुंगांत मुख्यत: विविध तऱ्हांच्या मानसिक त्रासांनी आणि अनेकविध प्रश्नोपप्रश्नांनी छळण्यात आले. त्या अनुभवाने त्यांना विचाराने प्रगल्भ व अधिक रफ आणि टफ बनवले असे ते म्हणतात. ‘स्प्लिट सेकंद’ या शीर्षकाने मायदेव यांनी विमान हल्ल्याचा तो प्रसंग लिहिला आहे. मायदेव यांनी त्या टिपणात तुकडीप्रमुखाचा चार विमाने विभाजित करण्याबाबतचा निर्णय मोक्याच्या क्षणी कसा चुकला व त्यामधून त्यांचे विमान कसे धोक्यात आले ते नेमक्या शब्दांत मांडले आहे.
1965 च्या भारत -पाकिस्तान युद्धातील वायुसेनेचे जवान |
त्यांच्या त्या खुलाशामुळे वायुदलातील त्यांची कारकीर्द निष्कलंक झाली. त्यामुळेच त्यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत 1971 च्या युद्धात ढाका विमानतळावर अनेक हवाई मोहिमा केल्या व तो तळ निकामी करून टाकला. मायदेव त्या युद्धाचा व त्यातील त्यांच्या सहभागाचा अभिमानाने उल्लेख करतात. ते म्हणतात, की 1965 च्या युद्धात भारतीय हवाई दल लढाईचा अनुभव प्रथमच घेत होते. दल त्यावेळी दृढ बनत होते. परंतु अवघ्या सहा वर्षांच्या अवधीत भारताने स्वत:च्या हवाई हद्दींवर पूर्ण ताबा प्रस्थापित केला आणि त्याचा प्रत्यय 1971 च्या युद्धात आला. नव्वद हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक त्यावेळी शरण आले, त्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या कामगिरीचा वाटा मोठा मानला जातो.
1965च्या युद्धानंतर फोटोत डावीकडून विजय मायदेव, लाल सदरंगानी, बी.एस. सिकंद, एअर चीफ मार्शल अर्जन सिंग, ओ.एन. कक्कड, एम.एम.लोब आणि नंदा करिअप्पा |
मायदेव मूळ नागपूरचे. त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून भारताच्या हवाईदलात प्रवेश मिळवला. त्यांनी त्यांच्या हवाई दलातील कारकिर्दीचा भाग म्हणून अनेक लष्करी व मुलकी वैमानिकांना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हवाई प्रशिक्षण दिलेले आहे. ते स्वत: तसे प्रशिक्षण अमेरिकी हवाई दलात घेऊन आलेले होते. त्यांनी वैमानिकांच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपददेखील भूषवले आहे. परंतु गेली वीस वर्षे ते त्यांच्या शेतीच्या प्रयोगांत अधिक रमले आहेत. त्यांनी व पत्नी जयश्री यांनी त्यासाठी शेतीचे व विशेषत: फळबाग लागवडीचे छोटे अभ्यासक्रम केले; विविध मार्गांनी ज्ञान संपादन केले. पनवेलजवळच्याडोंगरांत काजूची लागवड यशस्वी केल्यानंतर गेली काही वर्षे ते मशरूम या फॅशनेबल वनस्पतीची लागवड करत आहेत. तो वसा त्यांना स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना द्यायचा आहे. ते त्यांना मार्केटिंगचे तंत्रही सुचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सर्वांची भाजी एकत्र करून टेंपोने शहरभागात नेण्याचा प्रयोग कसा यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांचा प्रयत्न त्या स्थानिक जीवनाशी एकरूप होण्याचा असतो. त्याकरता त्यांनी तेथील जिल्हा परिषद शाळेची इमारत उभी करून दिली. मात्र तेथे आजुबाजूच्या वाड्यावस्त्यांतील व शाळांतील मुले येतील आणि आदिवासी पट्ट्यांतील एकूण शिक्षण समृद्ध होईल यासाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक प्रयत्नांना हवे तेवढे यश लाभले नाही याची खंत त्यांना आहे. त्यांचे निरीक्षण आहे, की निसर्गजीवनाचा भारतीय वारसा गेल्या शतकभरात भारताने गमावला आहे. ते उदाहरण सागाचे देतात. सागाची फांदी जरी कोठे पडली तरी महाराष्ट्राच्या भूमीत रुजते. ते झाड दहा-बारा वर्षांत मोठे सागवानी लाकडासाठी तयार होते. ती संपत्ती रानोमाळ, शहरखेड्यांत दुर्लक्षित राहते. ना स्थानिक पुढारी तिकडे लक्ष देत, ना ज्येष्ठ नागरिक.
मायदेव यांचा रहिवास काही महिने मुंबईच्या अंधेरी- लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या जागेत असतो. तेथे जवळच्या सोसायटीत त्यांचा मुलगा, सून व नाती नित्य राहतात. विजय-जयश्री यांनी त्यांच्या प्रबळगडच्या पायथ्याशी असलेल्या बंगल्याचे नाव ‘विजयश्री’ ठेवले आहे. त्यांना या लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे त्यांचा मुलगा व दोन्ही नाती योगायोगाने त्यांच्या प्रबळगडच्या बंगल्यात अडकले. ते वीकेण्डला म्हणून तेथे आले होते आणि लॉकडाऊन जाहीर झाला. दोन महिने कोठेच हालचाल करणे शक्य नव्हते. स्वाभाविकच, मुलगा बंगल्याभोवतीच्या शेतीवाडीत, झाडांत रमला. त्यालाही ‘फार्मिंग’चे वेड लागले व तोही मशरूम पिकवू व विकू लागला आहे. त्याला गवसलेला हा ‘छंद’ त्याला आईवडिलांच्या वास्तूकडे खेचून आणत आहे ही गोष्ट त्या दोघांना आनंदाची वाटते.
जयश्री मूळ पुण्याच्या. त्यांची मुलगी सोनाली अमेरिकेत असते. ती शिकली आर्किटेक्चर, पण तिचे कार्यक्षेत्र वेगळे, इंग्रजी वाङ्मयाचे आहे. तिचा तिकडे मोठा लौकिक आहे. विजय-जयश्री यांची अमेरिकेत वारीही नित्य असते. जयश्री म्हणतात, की मी शिकागो वा मुंबई येथील जीवनाइतकीच प्रबळगडच्या जंगलजीवनातही रमून जाते. त्या पतीबरोबर सारे जग फिरल्या आहेत. पण 2020 साली आलेल्या ‘निसर्ग’ वादळाची आठवण त्यांना शहारून सोडते. त्या म्हणाल्या, की आमच्याकडे ‘निसर्ग’ वादळवारे प्रत्यक्ष बोचकारून गेले नाहीत. पण त्या वादळामुळे आमच्या जंगलभागात आठ दिवस वीज नव्हती, पिण्याचे पाणी नव्हते. सारे जीवन स्तब्ध, जगाशी संपर्क नाही, जगाची बातमी नाही!
विजय हवाई दलातून प्रतिनियुक्तीवर एअर इंडियात 1979 साली आले. तेथील त्यांची कारकीर्ददेखील रोमहर्षक ठरली. त्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या परदेश दौऱ्यांत विमान घेऊन जाण्याची जबाबदारी असे. तसेच, त्यांना खास मोहिमा असतील तरी ती कामगिरीही निभावावी लागे. तशात ते कुवेत-इराक युद्धात कुवेतमध्ये सत्तावीस दिवस अडकून पडले होते. त्यांना परतीचा प्रवास जॉर्डनमार्गे वाळवंटातून, कडकडीत अशा उन्हातून करावा लागला. मात्र ते सारे कडुगोड अनुभव आता त्यांना इतिहासाचा भाग वाटतात. ते एकूण इतिहासाकडेदेखील तटस्थ दृष्टीने पाहतात व आग्रहाने सांगतात, की शांतता ही सामर्थ्यातून, वर्चस्वातून प्रस्थापित होते व टिकते. नेभळटपणाची शांतता स्थायी असत नाही. सम्राट अशोकाला एवढ्या कलिंग विजयानंतर नैराश्य का आले हे त्यांना समजू शकत नाही. त्याने त्याच्या सामर्थ्यावर त्याच्या जगात शांतता तर निर्माण केलीच होती. त्यांचे ठाम मत भारताने शस्त्रसज्ज व लढाऊ पवित्र्यातच सतत असण्यास हवे असे आहे.
विजय मायदेव vmayadev@gmail.com
– दिनकर गांगल 9867118517
दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.‘ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग‘ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल हे ‘ग्रंथाली‘प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा‘चे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे.
———————————————————————————————-–
——————————————————————————————————————————–
BRAVO ZULU WINGCO,SALUTES TO YOU,HIM & MAYDEO FLIGHT OF FAMILY OVERLAND,ATB 100 GREEM
गांगल सरांनी साकारलेला हा लेख खुप महत्त्वाचा वाटला.वैमानिकाचे आयुष्य जगलेला माणूस शेतीत रमतो हे ही विशेष आहे.एखाद्याचे जीवन किती विविधांगी असते ते ही या लेखातून जाणवते.
अतुल्नीय्. विंग कॉ आणि मॅडम ना सलाम.
खुप छान लेख.गांगलसर लिहते राहो.अनेकांना आदर्श मिळत राहणार.