वावीकर, शिरधनकर यांची पुस्तकांची दुनिया (Books About Books By Wavikar and Shirdhankar)

0
100
मी वाचत सुटलो त्याची गोष्ट (लेखक – निरंजन घाटे) या नावाच्या पुस्तकाचा बोलबाला अलिकडे बराच चालू आहे. त्याच वेळेला, अलिकडे लोक वाचत नाहीत अशा मताचा प्रसार आवर्जून करणारी माणसेही ऐकण्यात येतात. अशा या वातावरणात वाचनावरील जुने पुस्तक हाती यावे हा सुखद योग म्हणावा. ते पुस्तक म्हणजे यादव शंकर वावीकर यांनी लिहिलेला शंभर पानी निबंध होय. तो प्रथम प्रकाशित 1900 साली झाला. त्याची दुसरी आवृत्ती 1907 मध्ये तर तिसरी आवृत्ती 1910 साली प्रकाशित झाली. त्या तिसऱ्या आवृत्तीची किंमत पाच आणे (एवढी) होती.

          तो निबंध दहा प्रकरणांत विभागला गेला आहे. त्यांची शीर्षके – ज्ञानाची महती, ज्ञानार्जनाची पाच साधने, ग्रंथ, वाचनाची अभिरूची, वाचावे कसे, प्रसिद्ध ग्रंथकार व त्यांचे वाचन, स्मरणशक्ती व ती कशी वाढवावी, वाङ्मय, मराठी पुस्तके व उपसंहार अशी आहेत. सर्व प्रकरणांत मोठ्या लेखकांची/विचारवंतांची वचने उद्धृत केली आहेत. पाच साधने सांगितली आहेत. ती अशी – अवलोकन, संवाद, वाचन, भाषण, मनन. अवलोकनाबाबत शेक्सपीयर याचे वचन – अवलोकनशक्ती ही एक दिव्य दृष्टी होय. ती ज्याला असेल त्याला दगडधोंड्यांत, झाडपाल्यात, प्रत्येक वस्तूमध्ये दुसऱ्याला दिसत नाही, ऐकू येत नाही किंवा समजत नाही असे दिसते.

          तत्कालीन सुशिक्षितांमध्ये, इंग्रजी शासन हे भारताचे सौभाग्य आहे ही भावना बरेचदा असे. त्या भावनेचा आविष्कार ग्रंथ या प्रकरणात त्या निबंधात स्पष्ट दिसतो – इंग्रज लोकांचा अंमल सुरू झाल्यापासून सर्वत्र शांतता झाली. ते स्वतः विद्याभिलाषी असल्याने; कर्नल टॉड, ग्रॅण्ट डफ, लॉर्ड एल्फिन्स्टन, सर जॉन माल्कम, मोनिअर विल्यम, प्रो मॅक्समुलर इत्यादी आंग्ल ग्रंथकारांनी इतिहास व धर्म यांविषयी अनेक ग्रंथ लिहून आम्हांस अत्यंत ऋणी करून ठेवले आहे.(मॅक्समुलर हे जर्मन होते.) ह्या विधानापूर्वी असे विधान येते, की मुसलमानांचा या देशात प्रवेश झाल्यापासून आम्ही दुर्दैवाच्या महान फेऱ्यात सापडलो. कलाकौशल्यांचा शोध करण्याचे टाकून देऊन, जो तो आपापल्या फिकिरीत चूर झाला.

          लेखनाच्या ओघात काही रंजक विधाने येतात – लोहाराचा हात, डाकवाल्याचा दम, कारकुनाची मांडी ही जशी सवयीच्या योगाने घट्ट होतात, तसेच बुद्धीचेही आहे. विचाराच्या योगाने ती बळकट होऊन तिला सोज्वलता प्राप्त होते.    

वाचते वेळी आपले मन क्षुब्ध किंवा क्रोधयुक्त नसावे. तसेच विवंचना, भीती इत्यादी कसल्याही विकारांनी मन दूषित नसता ते शांत असून त्यास श्रम करण्यास हुरूप असावा. ”(पृष्ठ 37)

          वाचताना पुस्तकावर खुणा कशा कराव्यात यासंबंधी सूचनाही आहेत – जेथे उत्तम विचार व आणखी विचार निघण्याचा संभव असेल तेथे : : अशी खूण करावी जेथे खोटी विधाने आढळून येत असतील तेथे ; अशी खूण करावी.

          वाङ्मयाचे मुख्य प्रकार कोणते हे सांगून निबंधकार म्हणतात – कादंबऱ्या म्हणजे दृष्टांतरूप कथा किंवा गोष्टी. दृष्टांतरूप कथांतून जसे शिकण्यासारखे खूप असते तसे कादंबऱ्यांतूनही असते. इतिहास हा प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून केलेला तत्वबोध होय असे एका प्रसिद्ध ग्रंथकाराने म्हटले आहे. ज्यांना प्रवास करण्याची ऐपत आहे त्यांनी अवश्य प्रवास करावा, परंतु ज्यांना तशी साधने नाहीत, त्यांनी प्रवास व स्थल वर्णनात्मक जे सर्वमान्य ग्रंथ आहेत ते जरूर वाचावेत. चरित्र ग्रंथाप्रमाणेच ते ग्रंथही सर्वाना वाचण्यास योग्य असे आहेत. पुस्तक gandhiheritageportal.org वर उपलब्ध आहे.

त्याच बेताला भानू शिरधनकर यांनी लिहिलेले पुस्तकांची दुनियाहे पुस्तक हाती आले तेव्हा नवल वाटले. भानू शिरधनकर हे नाव आम्ही शाळेत असताना शिकारकथा, सागरी साहसकथा वगैरे लिहिणारे म्हणून ऐकले होते. त्यांच्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळ्या विषयावरील पुस्तक म्हणून कुतूहल वाटले. त्याला प्रस्तावना शां. शं. रेगे या ख्यातनाम ग्रंथपालांची आहे.

          शिरधनकर यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1915 रोजी झाला. त्यांना बासष्ट वर्षांचे माफक आयुष्य लाभले. परंतु त्यात त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. उधानवारा, पाखरे भिरभिरती अंबरी, तराईच्या जंगलात, चित्रकण्ठ, चोरटं सोनं, इस्पितळाच्या खाटेवरून, कारवारचा काळुराम, धनु वाहे घुणघुणा ही त्यांची अन्य पुस्तके होत. त्यांनी ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम 1950 साली पुरा केला. त्यांचे ग्रंथालयीन व्यवहार आणि ग्रंथवाचन या विषयांवरील लेखांचे संकलन करून पुस्तकांची दुनियाहे पुस्तक तयार झाले. ते 1968 साली प्रकाशित झाले. (मंगेश नाबर यांच्या एका लेखामधून)       

पुस्तकांची दुनियाया पुस्तकाच्या पहिल्या भागात पुस्तकालयात पुस्तकांची व्यवस्था कशी असते, वर्गीकरण कसे केले जाते, पुस्तके कशी ठेवली जातात व ती कशी शोधता येतात याचे विवेचन केले आहे. ते कंटाळवाणे होणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्याचबरोबर, पुस्तके कशी हाताळावीत, वाचनालयात आणि इतर ठिकाणीही- अगदी ती कपाटातून कशी काढावीत व पाने काळजीपूर्वक कशी उलटावीत हे लिहिले आहे. पुस्तकावर काय माहिती असते – मुखपृष्ठ, आतीले पाने, प्रस्तावना, प्रकाशकाचे निवेदन वगैरे कसे असते इत्यादी माहिती दिली आहे. पुस्तके प्रथमच वाचू लागलेल्या मुलांना ती उपयोगी पडेल.

          त्यानंतर पुस्तके कधी वाचावीत, पाने कशी उलटावीत, खुणा कराव्या की करू नयेत, पुस्तके वाचण्याची पद्धत कोणती असावी, संदर्भ कसे मिळवावे, पुस्तकाचा खरा अभ्यास कसा करता येईल याचे विवेचन आहे. मोठ्या विद्वानांच्या वाचनाच्या पद्धती आणि त्यांनी पुस्तके केव्हा, कशी वाचली याची उदबोधक माहिती आहे. शेवटच्या प्रकरणात वि.भि.कोलते, श्री.म.माटे, के.ना.वाटवे, वि.द.घाटे, धर्मानंद कोसंबी, एल्फिन्स्टन, सयाजीराव गायकवाड, चर्चिल, गोळवलकर गुरुजी इत्यादींच्या वाचन- विषयक आठवणी आहेत.

          वि.द. घाटे हे अगाथा ख्रिस्ती हिच्या रहस्यकथा आवडीने वाचत असत, धर्मानंद कोसंबी यांनी लिहून ठेवले आहे, की पथ्यबोध या रामचंद्र पांडुरंग वैद्य यांच्या मासिकातील गुप्तरोग ही कविता माझ्या पथ्यावर पडली. कारण वाईट लोकांच्या संगतीने वाईट विचार माझ्या मनात त्या वेळी वावरत होते. श्रीपाद अमृत डांगे यांना आवडलेले पुस्तक म्हणजे ह.ना. आपटे यांची उषःकाल ही कादंबरी. ती विकत घेण्यासाठी त्यांनी दीड रुपये ही किंमत दुकानदाराला दिली तेव्हा ते दीड रुपये डांगे यांनी चोरून आणले असावेत अशी शंका दुकानदाराला आली होती.

          पुस्तकांसंबंधीचे पुस्तकांची दुनियाहे पुस्तक वाचकाला पुन्हा एकदा वाचन करण्यास उद्युक्त करेल असे आहे.

 रामचंद्र वझे 9820946547

vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी ‘बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. त्यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंसस्‍त्रीअनुष्‍टुभरुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍स‘ आणि ‘लोकसत्ता‘ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here