रा. चि. ढेरे यांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात त्यांच्या भाषणात ‘वाळक्या काटक्या’चा उल्लेख केला, त्यांनी त्या त्यांच्या आजीला स्वयंपाकासाठी जळण म्हणून आणून दिल्या. तो टिपणाचा विषय म्हणून माझ्या समोर आला, तेव्हा खरेतर मी संभ्रमात पडले, की त्यावर काय लिहावे? मग विचार केला, जर चित्रकाराला वाळक्या काटक्यांत कलाकृती दिसू शकते, तर मला लेखन का सुचू शकणार नाही?
वाळक्या काटक्या म्हणजे झाडाच्या फांदीचा गळून पडलेला निर्जीव भाग. झाडाला जेथे नवी पालवी फुटते, त्या पालवीच्या पुढील फांदी अन्नरसाअभावी नैसर्गिकरीत्या वाळून जाते. झाडाच्या मुळांकडून मिळणारा अन्नरस नव्या पालवीला पुरवला जातो. त्यामुळे कालांतराने जुन्या फांद्या गळून पडतात. त्यांनाच वाळक्या काटक्या असे म्हणतात. कोकणात वाळक्या काटक्यांना बोलीभाषेत ‘कुरपुटे’देखील बोलतात. कोठल्याही झाडाखाली एक फेरफटका मारला तरी मोळीभर काटक्या सहज उपलब्ध होतात. त्याचे व्यावहारिक उपयोग अनेक आहेत. त्यांचा वापर ग्रामीण भागात चुलीच्या सरपणासाठी केला जातो. वाळक्या काटक्या इंधन म्हणून पूर्वीपासून वापरात आहेत. त्या पेट भुरूभुरू घेत असल्यामुळे लवकर जळून जातात. त्यामुळे बरीच उष्णता वाया जाते. विशेषत:, पाणी अंघोळीसाठी गरम करण्यास न्हाणीघरात वाळक्या काटक्यांचा उपयोग होतो. पालापाचोळा वाळक्या काटक्यांबरोबर पेटवून हिवाळ्याच्या दिवसांत थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची शेकोटी केली जाते. वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस अशा औषधी वनस्पतींच्या वाळक्या काटक्या अग्निहोत्रासाठी वापरून अग्नी प्रज्वलित करतात. औषधी वनस्पतींच्या तशा ज्वलनातून जी ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते असे म्हणतात. वाळक्या काटक्या पेटवून गरीब कुटुंबांमध्ये पूर्वी उजेडाची गरज भागवली जायची.
आदिवासी लोकांच्या जीवनात वाळक्या काटक्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते लोक जंगलातील कंदमुळे, फळे, रानभाज्या यांच्याबरोबर झाडांखालील वाळलेल्या काटक्या वेचून, त्याची मोळी विकून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या झोपडीवरील छतापासून ते तीन दगडांच्या चुलीवरील स्वयंपाकापर्यंत झाडांच्या, गवताच्या वाळक्या काटक्याच त्यांना उपकारक ठरतात.
– वृंदा राकेश परब