निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र हनुमान मंदिर आहे. मंदिरातील श्रीहनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गगनगिरी महाराजांच्या हस्ते १९८१ मध्ये करण्यात आली. मंदिराचा २००८ साली जीर्णोद्धार करून वास्तूची पुनर्बांधणी करण्यात आली.
मंदिराचा घुमट उंच व अष्टकोनी आहे. तो सुमारे वीस फूट उंच आहे. मारुतीची गदाधारी, पर्वत उचलून घेतलेली व गगनात झेपावणारी साडेतीन फूट उंचीची आकर्षक मूर्ती गाभाऱ्यात आहे. ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीसमोर गाभाऱ्याच्या बाहेर खांब असून त्यावर अष्टकोनी कळस आहे. मंदिरासमोर भव्य पटांगण आहे. सभोवती कठड्याचे बांधकाम केलेले आहे. मंदिरात आतपर्यंत सूर्यकिरण येत असल्याने सबंध मंदिर तेजोमय भासते. सागरतरंगांवर सूर्यकिरणात तळपणारे मंदिर त्याच्या सभोवतालच्या गर्द हिरव्या वनराईत विलोभनीय दिसते. देवगड व विजयदुर्ग यांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून दिसणारा वाडातर मंदिराचा परिसर तेथे येणाऱ्या पर्यटकांना मनमुराद आनंद देऊन जातो.
मंदिरात चैत्रपौर्णिमेपासून चार दिवस श्रीहनुमान जयंती उत्सव थाटात साजरा केला जातो. शिमगोत्सवानंतर मुंबईत परतलेले वाडा गावाचे चाकरमानी तितक्याच श्रद्धेने त्या सोहळ्यासाठी सहकुटुंब परत येतात. त्यावेळी किनारपट्टीलगत मंदिरपरिसरात कमानी उभारल्या जातात. विद्युत रोषणाई असते.
मंदिरात धार्मिक कार्यक्रम असतातच; पण कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात येते. धार्मिक उत्सवामध्ये श्रीजन्मोत्सव, होमहवन, लघुरुद्राभिषेक, ग्रंथवाचन, भजन-प्रवचन, महापूजा, आरती, भंडारा, पालखीची मिरवणूक, अवसर काढणे, नवस बोलणे व फेडणे अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. चार दिवस वातावरण आनंदी व भक्तीमय असते. त्यामध्ये श्रद्धा व संस्कृती यांच्या मिलाफाची अनुभूती येते.
मुंबईकर व ग्रामस्थ मंडळातर्फे काही शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्या दृष्टीने व्यवसाय मार्गदर्शन, मच्छिमारी प्रशिक्षण, मत्स्यशेती, वाचनालय, व्यायामशाळा, संगणककक्ष व रुग्णवाहिका यांची उपलब्धता करण्याचा मंडळाचा मानस आहे.
श्रीहनुमान शक्ती, भक्ती व त्याग यांचे प्रतीक मानला जातो.
पांडुरंग सुदाम बाभल यांचा जन्म 1959 सालचा. त्यांनी बी. ए.ची पदवी मिळवली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागात बत्तीस वर्षे नोकरी केल्यानंतर ते 2014 साली सहाय्यक शेड अधिक्षक पदावरून निवृत्त झाले. बाभल 1988 पासून वृत्तपत्रात लेखन करत आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. स्तंभलेखन करण्यासोबत त्यांनी बातमीदार आणि वृत्तसंकलक म्हणून काम केले. कोकणातील, विशेषतः देवगड तालुक्यातील व्यक्तीमत्त्वे, देवालये, कोकणातील संस्कृती आदी त्यांच्या लेखनाचे विषय असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9969022555, 022 25665066
खूप छान
खूप छान.
Comments are closed.