वाईचा ढोल्या गणपती

-vai-dholya-ganpati

वाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. ते पेशव्यांचे सरदार भिकाजी रास्ते यांनी बांधले. त्यामुळे तो गणपती घाट म्हणून ओळखला जाऊ लागला. गणपतीची मूर्ती एकसंध, काळ्या दगडात केलेली असून, तिचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे त्याला ‘ढोल्या गणपती’ असे म्हणू लागले असावेत. तो दगड कर्नाटकातून आणला गेला. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला गेला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा, दोन्ही मांड्या पसरून बसला असून मूर्तीला जानव्यासह काही मोजके अलंकार घातलेले आहेत. त्यातही हार, बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागे अर्धचंद्राकृती प्रभावळ आहे. गणपतीच्या हातात मोदक, परशू, पळी व दात आहेत. मंदिर कृष्णा नदीच्या पात्रात बांधले गेले आहे. मंदिराचे संरक्षण वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मध्यभागी त्रिकोणी आकार देऊन एखाद्या नावेच्या टोकासारखी केली आहे. तशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पुराचे पाणी दुभंगले जाऊन त्याचा दाब कमी होतो आणि मंदिराचे नुकसान टळते. त्या मंदिराचे बांधकाम 1762 मध्ये झाले. गणपतीचा प्रतिष्ठापना दिन म्हणून वैशाख शुद्ध त्रयोदशी हा दिवस वाईमध्ये उत्साहात साजरा करतात. त्याप्रमाणेच संकष्ट चतुर्थी, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीपासून सात दिवस आणि माघी गणेश जयंती उत्सवप्रसंगी श्रीगणपतीची अलंकारयुक्त विशेष पूजा करतात. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची उंची पायथ्यापासून कळसापर्यंतची चोवीस मीटर आहे. 

-dholya-ganpatiवाई हे गाव पूर्वी ‘विराटनगरी’ किंवा ‘दक्षिणेची काशी’ अशा नावांनीही ओळखले जाई. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे गाव जसे घाट आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच, चित्रपटांसाठी उत्तम लोकेशन म्हणूनही नावारूपास आले आहे. विश्वकोशाची निर्मिती करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ते गाव आहे. त्या छोट्याशा गावात सात घाट आहेत आणि त्या घाटांवर अनेक मंदिरे आहेत. वाईतील सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी आहे. गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे तेथे आहेत. महाबळेश्व र, पाचगणी येथे पर्यटनाला आलेले हजारो पर्यटक वाईत येउन न चुकता गणेशाचे दर्शन घेतात. त्यामुळे तेथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते.
(‘आदिमाता’, फेब्रुवारी 2016 वरून उद्धृत)

About Post Author