वसंत नरहर फेणे – सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ! (Vasant Narhar Fene – Celibration of his Life)

0
70
_Vasant_Narhar_Phene_1.jpg

वसंत नरहर फेणे यांचा मृत्यू 6 मार्च 2018 रोजी, एक दिवसाच्या आजाराने झाला. फेणे एक्याण्णव वर्षांचे होते. ते त्या दिवसभरात सतरा तास ‘आयसीयु’त जरी होते तरी त्यांनी खाल्ले-प्यायले-क्रिकेटची मॅच पाहिली, ते दुसऱ्या दिवशी सकाळी चहा प्यायले; आणि त्यानंतर त्यांचे हृदय अचानक थांबले! डॉक्टरांच्या टिमने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला, तथापी तो निष्फळ ठरला. त्यांच्या स्मरणार्थ, गुढी पाडव्याच्या दिवशी, 18 मार्चला छोटेखानी सभा झाली. सभा त्यांच्या कुटुंबीयांनी योजली होती. साठ-सत्तर लोक हजर असतील. सभेच्या आरंभीच, फेणे यांचा मुलगा श्रीहर्ष म्हणाला, “बाकी, बाबा कृतार्थ जीवन जगले, त्यांच्या मनाप्रमाणे जगले, शेवटच्या क्षणापर्यंत आनंदात होते. त्यांच्या मुला-नातवंडांचा परिवार मोठा आहे. ते सगळे एकमेकांना घट्ट बांधून आहेत. त्यामुळे बाबांच्या मृत्यूचा शोक करावा असे काही नाही. आपण ही सभा त्यांचा जीवनोत्सव (सेलिब्रेशन ऑफ हिज लाइफ!) अशा ढंगाने साजरी करूया. त्यांच्या छान छान आठवणी सांगुया.”

फेणे यांचे त्यांच्या वयाच्या एक्याण्णव्या वर्षीदेखील मृत्यूआधीचे तीन महिने धामधुमीचे होते. त्यांची ‘कारवारी माती’ ही पाचशे पानांची भलीमोठी कादंबरी डिसेंबरमध्ये प्रकाशित झाली. त्या समारंभात सुरेखा सबनीस, प्र.ना. परांजपे अशा जाणकार समीक्षक-प्राध्यापकांनी ‘ती कादंबरी म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळू शकेल असा ऐवज आहे’ असा निर्वाळा नि:संदिग्ध शब्दांत दिला. कादंबरी 1903 ते 1947 या काळात घडते. व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूची बातमी कारवारच्या एका खेड्यात पोचते. त्या खेड्यातील कुटुंबाची कहाणी कादंबरीत आहे. एकीकडे देशात घडणाऱ्या मोठमोठ्या घटना आणि दुसरीकडे, त्यानुसार हेलपाटणारी त्या कुटुंबातील माणसे… वास्तव, नाट्यपूर्ण आणि हृदयस्पर्शी असे सारे चित्रण आहे. काय योग पाहा!  फेणे यांची ‘कारवारी माती’ आणि त्या आधी सात-आठ महिने प्रसिद्ध झालेली प्रकाश लोथे यांची ‘धर्मधुरीण’ ही कादंबरी… या दोन्ही कृतींमधील घटना स्वातंत्र्यपूर्व साधारण एकाच काळात घडतात. फेणे यांची कादंबरी ‘कारवार ते मुंबई’ या टापूत प्रवास करते. त्यामुळे त्यातील मुख्य पात्रावर प्रभाव आहे तो समाजवादाचा, साम्यवादाचा, कामगार आंदोलनांचा. उलट, लोथे यांची कादंबरी विदर्भात घडते. त्या नायकाचा संबंध परिस्थितीवश पुण्याशी येतो. त्यामुळे लोथे यांचा नायक सामाजिक-सांस्कृतिक प्रवाहांमध्ये हेलकावे खातो आणि ख्रिश्चन धर्मांतर करावे या स्थितीपर्यंत पोचतो. दोन्ही कादंबऱ्यांतील समान धागे पकडून ‘मुंबई मराठी साहित्य संघा’त निवडक उपस्थितांच्या सभेत फेब्रुवारीच्या 27 तारखेला गोलमेज चर्चा करण्यात आली. अरुणा पेंडसे, मीना वैशंपायन, सुरेखा सबनीस, अवधूत परळकर, उषा तांबे, सुहासिनी कीर्तीकर, अनंत देशमुख, श्रीपाद हळबे अशी मातब्बर मंडळी तेथे उपस्थित होती. जवळ जवळ सर्वांनी नि:शंकपणे सांगितले, की फेणे यांची कादंबरी वाचून श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्यांची आठवण झाली. ती तितकी सघन आहे आणि मनुष्यजीवनाच्या गुंतागुंतीचा तसाच सखोल वेध घेते. फेणे तेथे चर्चा ऐकत दोन-अडीच तास निवांत बसले होते. नंतर ते मुलगा, श्रीहर्षला म्हणाले, ‘मलबार हिलवर हँगिंग गार्डनची पुनर्रचना केली आहे असे ऐकले, ती पाहू आणि मग घरी जाऊ.’ ते बागेत फिरलेदेखील. त्यानंतर, बरोबर सातव्या दिवशी ते ‘स्वर्ग’वासी झाले! ते मधील सहाही दिवस असेच कोठे ना कोठे गेल्याचे, त्यांनी ते दिवस आनंदाने मौज-मजेत काढल्याचे कुटुंबीय सांगतात. माणसाला आयुष्य असे शेवटपर्यंत ‘इव्हेंटफुल’ जगण्यास मिळणे हे दुर्मीळच!

_HiKhaniMansachi_KarvariMatichi_1.jpgमाझा- त्यांचा संबंध ‘ग्रंथाली’ने त्यांची ‘सेंट्रल बस स्टेशन’ ही कादंबरी 1980 साली प्रसिद्ध केली, तेव्हा प्रथम आला. त्यावेळी जागतिक वाङ्मयात ‘एअरपोर्ट’ वगैरेसारख्या कादंबऱ्यांमधून ‘फॅक्शन’ नावाचा वाङ्मयप्रकार प्रचलित होत होता. फॅक्ट्सवर आधारित अशी फिक्शन! आमच्यापुढे फेणे यांची जी कादंबरी आली होती ती म्हणजे त्या प्रकारातील उत्तम कलाकृती! एसटीचा ड्रायव्हर हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावतो. गाडी थांबते. सर्व प्रवासी सुखरूप असतात. परंतु फेणे यांनी नाशिकला मुख्य सीबीएस स्टेशनच्या ठिकाणी त्यामुळे जे नाट्य घडते, त्याचे वास्तववादी व मनोवेधक चित्रण केले आहे. ती कादंबरी त्या काळात बऱ्यापैकी चर्चिली गेली. पण फेणे यांचा व आमचा संबंध खूप वाढला नाही. माणूस एककल्ली असा, पण सिगारेट तल्लीनतेने ओढे. ते लक्षात राहिले. फेणे यांची दोन पुस्तके – ‘पहिला अध्याय’ व ‘हे झाड जगावेगळे’ पुण्याच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केली होती. त्यांचे वितरण ‘ग्रंथाली’ने करावे अशी इच्छा प्रकाशकाने व्यक्त केली. व्यक्तिगत वाचकापर्यंत पोचण्याचा ‘ग्रंथाली’ हा हमखास मार्ग त्या काळी प्रकाशकांना वाटे. आम्ही त्या कादंबऱ्यांच्या प्रत्येकी तीनेकशे प्रती संच स्वरूपात विकल्या. त्या काळातसुद्धा फेणे यांच्याशी संपर्क येईल असे वाटत होते, परंतु तसे घडले नाही. फेणे मानीपणाने वागत आणि व्यवहारांपासून दूर राहत.

त्यांचे लेखन नेटके होते. त्यातील कथनकौशल्य सुबकपणे व्यक्त झालेले जाणवे, पण आम्हाला त्या काळी अनघड साहित्याचा मोह जास्त वाटत होता. मात्र आता, सहा महिन्यांपूर्वी फेणे यांचे काही अनुभव, विचार ‘डॉक्युमेंट’ करावे म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी कॅमेरा घेऊन त्यांच्या खारच्या घरी गेलो. तेव्हा फेणे यांचे वय नव्वदी ओलांडून गेलेलेच होते. त्यांची आस्था कोकणी ढंगाची होती. त्यांचे अगत्य खूप जाणवले. त्यांनी गप्पा भरपूर मारल्या. त्यांना त्यांची मायभूमी कारवारची फार आठवण येई. ते वारंवार त्या गोष्टी बोलत. त्याच वेळी त्यांच्या बोलण्यात ते ‘कारवारी माती’ या नावाची कादंबरी गेली आठ-दहा वर्षें लिहीत आहेत असे आले. ‘डॉक्युमेंटेशन’साठी हवे तसे बोलणे त्यांच्याकडून मिळत नव्हते. परंतु ते घरंगळत घरंगळत असे बरेच काही बोलत होते. त्यामुळे आम्ही आपल्याला हवे ते साहित्य, त्यांच्या वारंवार भेटी घेऊन मिळवावे असा विचार करून, त्या दिवसापुरते थांबलो. पण दरम्यान, ‘ग्रंथाली’ने त्यांची ‘कारवारी माती’ प्रसिद्ध करण्यास घेतली. ती प्र.ना. परांजपे व मनोज आचार्य यांच्या सहकार्याने दोन महिन्यांत सिद्धदेखील केली आणि कादंबरीचा प्रकाशन समारंभ 2 डिसेंबर 2017 ला ठरला. आम्ही त्यांचे शूट केलेले काही चित्रण असल्यामुळे त्या समारंभात फेणे यांच्यावर आठ-दहा मिनिटांची फिल्म दाखवावी असा फंडा निघाला. मग त्यासाठी फेणे यांच्या मुलाकडूनच त्यांची जवळ जवळ तीस पुस्तके मिळवली, ती चाळली-वाचली आणि आठ मिनिटांचे निवेदन तयार केले. तेव्हा मात्र त्यांच्या वैविध्यपूर्ण व विविधगुणी लेखनाने स्तंभित होऊन गेलो. वाटले, एवढा मोठा सखोल, संवेदनाशील, बुद्धिप्रगल्भ आणि तरल लेखक दुर्लक्षित कसा झाला? मराठी साहित्यविश्वाने त्यांची उपेक्षा का केली?

मी ज्या फेणे यांना गेले सहा महिने पाहत होतो ते त्यांच्या स्वत:च्या जीवनात मस्त खूष होते. खारच्या घरात एकटे राहत होते. रोज जेवणाचा डबा ‘शिवाजी पार्क’च्या मुलाकडून येत होता. त्यांचा रोजचा वेळ कसा जात होता ते त्यांचे त्यांनाही सांगता येत नसे. पण भेटी, समारंभ मुख्यत: कौटुंबिक असत. त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षीं त्यांच्या निवडक कथांचा ‘ध्वजा’ नावाचा संग्रह समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आला. त्यांची मुले-नातवंडे पार अमेरिकेपासून आली. पुस्तकाला त्यांची ताकद प्रकट करणारा ‘लोकसत्ते’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांचा पुरस्कार लाभला. त्यांचे जुने स्नेही प्र.ना. परांजपे सोबत होते. त्यांनी त्यांना श्रेष्ठ वाटणाऱ्य़ा पुस्तकाच्या नावाच्याच ‘ध्वजा’ कथेचे आकलन मांडले व त्या निमित्ताने फेणे यांच्या एकूण कथा-साहित्याचा आढावा घेतला. परांजपे लिहितात – ‘फेणे यांच्या कथांतील वैविध्य इतर लेखकांच्यात क्वचित आढळते. फेणे यांच्या कथा वाचकांना अस्वस्थ करतात, विचारप्रवृत्त करतात व त्यामुळेच उत्कृष्टही वाटतात.’ तरी फेणे मराठी वाङ्मयात अग्रस्थानी आले नाही. त्यांची बोलवा झाली नाही.

वसंत नरहर यांचा जन्म मुंबईत झाला तरी त्यांचे बालपण कारवारला गेले. त्यांची वाढ त्या काळातील सुशिक्षित कुटुंबातील मुलांची होई तशीच झालेली आहे. त्यांनी छोटे मूल म्हणून वर्षें-सहा महिने वडिलांबरोबर दिल्लीलादेखील घालवले. ते कारवारला ‘राष्ट्र सेवा दला’त गेले. त्यांचा एक भाऊ बेचाळीसच्या चळवळीत स्थानबद्ध होता. नंतर पुलंनी जोगेश्वरीच्या ज्या सरस्वती बागेचे वर्णन केले आहे तेथे फेणे यांच्यावर नाटक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम यांचे संस्कार झाले, त्यांचे एक काका तेथे क्रियाशील होते व पुलंच्या लेखात त्यांच्या कामाचा उल्लेख आहे. फेणे स्वत: मात्र समाजजीवनात खूप मिसळले नाहीत. ते नाशिकला एसटीत नोकरीला असताना त्यांचा व चंद्रकांत महामिने, मनोहर शहाणे, चंद्रकांत वर्तक असा गप्पांचा ग्रूप होता, तो घट्ट. त्यांचे मुंबईत मित्रवर्तुळ नव्हते, ना ते साहित्यिक वा प्रकाशन कार्यक्रमांत दिसत. त्यांचे लेखक जयवंत दळवी व संपादक उमाकांत ठोमरे यांच्याशी घनिष्ट संबंध होते. ते त्यातही लिहितात, “पण ते माझ्या बाजूने. त्यांच्याकडून ते किती जवळ-दूरचे होते हे त्यांना ठाऊक.” फेणे इतके सावध! प्र.ना. परांजपे म्हणाले, की फेणे लेखन उत्कटतेने व मन:पूर्वक करत, परंतु लेखन पूर्ण झाल्यावर ते पुढे प्रसिद्धीस देण्यासाठी फार चोखंदळ राहत नसत. ते लेखन जो प्रकाशक त्यांच्यासमोर येईल त्या प्रकाशकाच्या स्वाधीन करत. ते स्वत:ला किंवा लेखनाला प्रसिद्धी मिळावी म्हणून फार उत्सुक नसत. त्यांना लेखन करण्याची मात्र आवेगी ओढ होती. म्हणून त्यांनी वयाच्या बावन्नाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली व फक्त लेखनास वाहून घेतले. तसे लेखनव्रत घेतलेला लेखक मराठीत नाही. ते स्वत:लाच ‘मी लेखन का करतो?’ हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर देतात, ‘कारण मी लेखक आहे, म्हणून!’ इतकी त्यांची लेखननिष्ठा!    

फेणे यांनी मुख्यत: कथा-कादंबऱ्या लिहिल्या, गरजेप्रमाणे एकाददुसरे नाटकही लिहिले. त्यांनी स्वत:विषयी, स्वत:च्या जीवनाविषयी जवळ जवळ लिहिले नाही. त्यांच्या ‘शब्द अब्द’ या पुस्तकात आत्मपर लेखन येते, ते मुख्यत: त्यांना हार्ट अॅटॅक आला होता, त्यासंबंधी आणि त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी. ते वर्णन ‘ग्राफिक’ आहे. त्यांच्या पत्नीचा मृत्यू अकाली झाला. त्यांचे नाव मंगला. फेणे यांनी ‘मंगलाचरण’ असा एक वेगळाच ललित लेख त्या पुस्तकात शेवटी लिहिला आहे. त्या लेखातून त्यांची मनसंपन्नता आणि स्वप्नाळू वृत्ती, दोन्ही दिसून येते. त्यांनी त्या लेखात पत्नीच्या स्त्रीत्वाचा फार मोठा सन्मान केला आहे. त्यांच्या मनी पत्नी व एकूण स्त्रिया यांच्याबद्दल मानाचे व आदराचे स्थान आहे. ते सर्वत्र तितक्याच तीव्रतेने व्यक्त होते. त्यांनी जयवंत दळवी व उमाकांत ठोमरे या साहित्य़ जगतातील दोनच लेखकांबद्दल लिहिले आहे, ते त्या दोघांच्या मृत्यूनंतर. ते लेखन आत्मीयतेचे झाले आहे; दळवी यांच्यावरील लेख तर सुहृद भावाचा आहे. पण तेथेही ते स्वत्व सोडून देत नाहीत. त्यातील एक परिच्छेद पाहा, बरे. फेणे सत्त्वाचे किती पक्के होते ते त्यावरून कळते. “मला नावडणारा एकच प्रश्न त्याने (जयवंत दळवी यांनी) मला विचारला होता. माझ्या पत्नीच्या निधनानंतर तो प्रश्न अनेकांनी मला विचारला होता. तो प्रश्न म्हणजे ‘आता जेवणाची सोय काय केलीय?’ मी काय व्यवस्था केली आहे ते त्याला सांगितले आणि म्हटले, ‘अनेक जण हा प्रश्न करतात आणि ते मला बायकोविषयीच्या माझ्या भावनांचाच नव्हे तर बायकोचाही अधिक्षेप करतात असे मला वाटते!” काय मोठे मन होते त्या माणसाचे! ते ठायी ठायी तशाच विशालतेने प्रकट होते. किंबहुना त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या यांच्यासाठी त्यांनी ज्या कथावस्तू निवडल्या आणि त्यामधून जो आशय प्रसृत केला त्यामधूनदेखील लेखकाच्या असाधारण गुणवत्तेचे मनच जाणवून जाते. त्याचा प्रत्यय मी त्यांचे जे साहित्य वाचले त्यामधून आला होताच, पण त्याहून अधिक थेटपणे त्यांच्या मृत्यूनंतरच्या सभेत आला. त्यांचे साताठ नातेवाईक सभेत बोलले असतील. प्रत्येकाने ‘तो माणूस वेगळा होता – या भूतलावरील नसावा असा’ अशा प्रकारचे किस्से वा हकिगती सांगितल्या.

मानवी मन व मानवी संबंध यांचा वेध प्रत्येक लेखक घेत असतो. फेणे यांनी तो फार सखोलतेने घेतला – पाणबुड्याने सागरात खोलवर जाऊन तेथील सृष्टी व्यापकतेने व सूक्ष्मतेनेही पाहवी, तशा प्रकारे. त्यांच्या कथांचा व कादंबऱ्यांचा आवाका, त्यांचे प्रकटीकरण आणि कथा-कादंबऱ्यांची पार्श्वभूमी हे सारे वेगवेगळे आहे; पण त्यामध्ये अंत:सूत्र आहे ते मानवी जीवनाची व नातेसंबंधांची गुंतागुंत जाणून घेण्याचे. काही नाती जन्माने तयार होतात, काही नाती माणूस जीवनप्रवाहात जोडतो. त्यामधून प्रेमभावनेचे व नीतिमूल्यांचे विचार प्रकट होत जातात आणि जीवनदर्शन घडते. फेणे यांनी त्यांच्या अनेक पुस्तकांतून असा जो पसारा मांडला आहे त्याचे सार त्यांच्या अखेरच्या ‘कारवारी माती’ या कादंबरीत येते. त्यामुळे फेणे तेथे सर्वसामर्थ्यानिशी प्रकटलेले जाणवतात. संपादक उमाकांत ठोमरे यांनी फेणे यांच्या पात्राच्या तोंडचे एक वाक्य एका ठिकाणी उद्धृत केले आहे – माणसाबद्दल ठामपणे एकच सांगता येते, की माणसाबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही!

दळवी-तेंडुलकर-खानोलकर हे फेणे यांचे समकालीन. त्यांच्यापैकी दळवी जगन्मित्र व लोकप्रिय साहित्यिक, तेंडुलकर यांचा वेगळा साहित्यप्रवाह होता. त्यांनी आधुनिक जाणिवा व्यक्त केल्या. ते नाटक-सिनेमांच्या अंगाने अधिक प्रसिद्ध होते. खानोलकर यांची प्रतिभावान कवी-लेखक अशी एवढी मोठी ख्याती होती, की त्यांचे स्वत:चे स्वतंत्र व स्वायत्त विश्व भासे. मी त्या तिघांच्या पंक्तीत फेणे यांचे नाव घेत आहे, कारण त्यांचे लेखनसामर्थ्य त्या तोडीचे होते. पण त्यांच्या पंक्तीत फेणे यांचे नाव घेतले मात्र जात नाही. किंबहुना, फेणे विषयांची निवड व त्याची मांडणी या बाबतीत त्या तिघांइतकेच श्रेष्ठ वाटतात. सुबोध जावडेकर यांनी फेणे यांच्या मृत्यूनंतरच्या सभेत त्यांच्या साहित्याचे तीन गुण सांगितले – १. भविष्यसूचक लेखन, २. ‘बोल्ड’ मांडणी, ३. परकाया प्रवेश. त्यांच्या त्या गुणांची अनेक उदाहरणे त्यांच्या साहित्यात सापडतात. फेणे यांनी ‘सखाराम बाइंडर’शी नाते सांगता येईल असे नाटक तेंडुलकरांच्या नाटकाआधी लिहिल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या ‘शतकांतिका’मध्ये ज्या पाच स्त्रियांच्या कथा आहेत त्याही गेल्या शतकातील स्थित्यंतराचा आढावा घेता घेता भविष्याचे सूचन करतात. फेणे हा लेखक त्यांच्या बऱ्याचशा लेखनातून त्यांच्या सभोवतालच्या ‘टिपिकल’ मध्यमवर्गीय लेखकांपेक्षा कितीतरी वेगळा वाटतो! सामाजिक जाणिवेच्या बाबतीत तर त्यांची बुद्धी खरोखरीच वैश्विक पातळीवर चालते. महाराष्ट्रातील कथानकात ते दलित-सवर्ण संघर्ष कादंबरीतून मांडतात तर ते काही कथांमध्ये दक्षिण आफ्रिका, अमेरिका येथील व्यक्तिरेखांपर्यंत पोचतात आणि तेथील सामाजिक विद्वेष वेधक व भेदक रीत्या वर्णन करून सांगतात. ‘ध्वजा’ नावाच्या त्यांच्या निवडक कथांच्या संग्रहात त्या पुस्तकाच्याच नावाची कथा ‘कम्युन’मधील जिण्यातील पेच वर्णन करते. फेणे यांच्या विचारात, कथनात अशी सतत प्रगती व आधुनिकता व्यक्त होत राहिली आहे. त्यांचा त्यांच्या लेखनातून सतत विकास होत गेलेला जाणवतो – आणि अखेरीस ‘कारवारी माती’त ते पुन्हा ‘रूट्स’कडे वळलेले दिसतात. माणसाची ती ओढच विलक्षण आहे. किंबहुना, कोकणी माणसाचा चिवटपणा आणि जीवनाकडे त्रयस्थपणे पाहण्याची वृत्ती फेणे यांच्या रंध्रारंध्रात मुरलेली जाणवते. त्यांची पुतणी रंजना हिने त्यांची जीवनवृत्ती कमलपत्राप्रमाणे होती असे केले. ते जीवनात राहिले, त्यांनी जीवनरस शोषला, परंतु ‘जीवन’ अंगाला मात्र लागू दिले नाही.

त्यांच्या आगेमागे जगलेले श्री.दा. पानवलकर, दि. बा. मोकाशी असे कसदार लेखकही मराठी साहित्यात दुर्लक्षित झाले, पण त्यांपैकी पानवलकर अल्पप्रसवी लेखक होते. उलट, दि.बा. मोकाशी यांनी बरेच लिहिले, विविध लिहिले, त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली, पण त्यांना मराठी साहित्यात योग्य स्थान मिळाले नाही. फेणे यांची जातकुळी ती म्हणता येईल – कदाचित त्याहून अधिक सघन व सखोलही. मोकाशी यांनी माजगावकर-तेंडुलकर हा आस तरी पकडून ठेवला होता. फेणे अशा सर्व सर्व साहित्यदुव्यांपासून दूर राहिलेले जाणवतात.

वसंत नरहर फेणे प्रदीर्घ जगले, सर्व काळ मानाने जगले, एकलेपणाने जगले, सत्त्वाने जगले, त्यामुळे त्यांच्या जगण्याचा महोत्सव करणे हे उचितच होय. त्यांनी त्यांच्या जगण्यातून आणि त्यांच्या साहित्यातून जी मूल्ये मांडली ती सध्याच्या अस्वस्थ काळात कशी जपली जातात व टिकतात हे पाहणे अधिक औचित्याचे होईल.

(पूर्वप्रसिद्धी – ‘शब्द रूची’ मासिक, मार्च 2018)

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleफालतू
Next articleसर जमशेटजी टाटा (Sir Jamshedji Tata)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here