वसंत नरहर फेणे यांचा कारवारी मातीचा वेध

0
75
_VasantNarharPhene_KarvariMatichaVedha_2.jpg

वसंत नरहर फेणे यांची नवी कादंबरी, ‘कारवारी माती’ ही साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा ऐवज आहे असे मत तिच्या प्रकाशन समारंभात प्र. ना. परांजपे, दिनकर गांगल आणि सुरेखा सबनिस या तिन्ही वक्त्यांनी व्यक्त केले. इंग्रजीची निवृत्त प्राध्यापक व मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे म्हणाले, की ‘या कादंबरीला एक असे मुख्य पात्र (Protagonist)  नाही. ती घटना-प्रसंगातून उलगडत जाते आणि स्वातंत्र्यपूर्व काळाचा एक मोठा पट उभा करते.’ मराठीच्या निवृत्त प्राध्यापक सुरेखा सबनीस यांनी सांगितले, की ‘कादंबरी शोकांतिकेच्या अत्युच्च पातळीवर जाते, पण ती कथा सर्वसामान्य माणसांची आहे. त्यामुळे ती लोभस, आपलीशी वाटते. मनाला भिडते. एक प्रकारे अंतर्दर्शन घडवते. कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार आणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, की ‘कादंबरीला स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामधून कादंबरीला दस्तावेजाचे स्वरूप प्राप्त होते. तिची तुलना फक्त तत्कालीन बंगाली, कन्नड व मल्याळम कादंबऱ्याशी होऊ शकते.’

‘कारवारी माती’ ही वसंत फेणे लिखित कादंबरी ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केली. तो समारंभ 2 डिसेंबर 2017 रोजी ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर’मध्ये पार पडला.

‘कारवारी माती’ ही कादंबरी सहाशे पानांची भलीप्रचंड आहे. वसंत फेणे यांनी ती 2007 साली लिहिण्यास सुरूवात केली. ती कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा फेणे यांचे वय एक्याण्णव वर्षांचे आहे. फेणे यांना कादंबरीच्या संस्करणात प्र. ना. परांजपे आणि चित्रकार-संपादक मनोज आचार्य यांची मदत झाली. ‘थिंक महाराष्ट्र’ने वसंत फेणे यांच्यासंदर्भात तयार केलेला दहा मिनिटांचा लघुपट प्रकाशन समारंभाच्या आरंभी दाखवण्यात आला. तो ‘थिंक महाराष्ट्र’च्या युट्यूबवरील चॅनेलवर पाहण्यास उपलब्ध आहे.

वसंत फेणे यांनी त्यांच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी लिहिण्यास सुरुवात केली. त्यांची वयाच्या नव्वदीपर्यंत तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा-कादंबरी यांचे प्रमाण जास्त आहे. एखादे नाटकसुद्धा आहे. त्यांना तरुणपणी कविता करण्याची ओढ होती. ते महाविद्यालयात असताना त्याची पहिली कविता ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाली, पण संपादकांनी नंतरच्या दोन कविता फेणे यांना साभार परत पाठवल्या. तेव्हा त्यांनी कविता लिहिणेच बंद केले! त्यांनीच तो किस्सा समारंभात कथन केला. त्यांच्या कथा तत्कालीन बऱ्याच लेखकांपेक्षा सकस आहेत, परंतु ते तुलनेने दुर्लक्ष झालेले लेखक आहेत अशीच भावना समारंभात सतत व्यक्त होत होती.

त्याची काव्यप्रतिभा कथाकादंबर्‍यांमध्ये सुकुमार शब्दशैलीने फुलून आली. तिन्ही वक्त्यांनी समारंभात फेणे यांच्या लेखनशैलीतील गोडव्याचा आवर्जून उल्लेख केला. तो गोडवा कारवारच्या निसर्गाकडून त्यांना लाभला, की जुन्या काळच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या वातावरणातून तो निर्माण झाला याबद्दल वक्त्यांचे प्रतिपादन वेगवेगळे होते.

_VasantNarharPhene_KarvariMatichaVedha_1_0.jpgपरांजपे यांनी कादंबरीला लाभलेली राजकीय घटनांची पार्श्वभूमी उलगडून सांगितली. ते म्हणाले, की ‘ही कादंबरी एका कुटुंबाची कथा आहे, पण तो काळ ब्रिटिश राजवटीचा आहे. त्या काळावर टिळक-गांधी-सावरकर अशी व्यक्तिमत्त्वांचे प्रभाव आहेत. भारतातील समाजवादी विचारांचा, कम्युनिझमच्या तत्वद्न्यानाचा उदय त्याच काळातला. ते सारे कादंबरीत कथानकाच्या ओघात आणि व्यक्तिचित्रविकासात स्वभाविकपणे येते आणि वाचक त्या साऱ्या सभोवतालात गुंगून जातो.

सुरेखा सबनीस यांनी कादंबरीचे कथानक स्पष्ट केले व त्यामधील गुंतागुंत अभ्यासाने व वेधक पद्धतीने मांडली. त्यांच्या मांडणीने श्रोत्यांमध्ये कादंबरीबद्दल ओढ निर्माण केली. ती कादंबरी सुरू होते 1901 सालात, व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूपासून आणि ती संपते 15 आॅगस्ट 1947ला, भारतास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा. कारवारच्या अंकोला तालुक्यातील होन्नेकरी या खेड्यामधील गणपतराव हिचकड यांच्या कुटुंबाची ती कहाणी आहे. त्यांचा मुलगा विद्याधर तत्कालीन आधुनिक विचारप्रवाहाना सामोरा जात अनेक हेलावेल घेतो आणि त्याच्यावर जीव लावून बसलेले नातेवाईक तसतसे हेलपाटत जातात. फेणे यांनी उपसंहारात म्हटले आहे, की काळाच्या एका लहान तुकड्यात कर्नाटकातील एका खेडेगावात घडलेली ती कहाणी आहे. परंतु कादंबरीच्या वाचनात जाणवते, की तिचा विस्तार साऱ्या जगाला व सर्व काळातील मानवी जीवनाला व्यापणारा आहे.

कार्यक्रमाच्या आरंभी ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे संपादक मनोज आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. अस्मिता पांडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. फेणे यांनी त्यांचे निवेदन वाचून दाखवले.

– टिम ‘थिंक महाराष्ट्र’

About Post Author