वर्षा परचुरे यांनी समाजसेवेचे औपचारिक शिक्षण घेतले आहे खरे, पण त्यांचा पिंडच वेगळ्या मुशीत घडला आहे. औपचारिक प्रशिक्षण व संस्कार यांचा सुरेख मेळ त्यांच्या जीवनात जाणवतो. वर्षा ‘राष्ट्रीय स्वराज्य संघा’च्या विचारसरणीच्या आहेत. त्या वडिलांच्या तालमीत घडल्या, वाढल्या. त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेत काही काळ काम केले. त्यांचे एम.एस.डब्ल्यू. आणि एम.बी.ए. या दोन्ही पदवी परीक्षांतील ‘रिसर्च पेपर’ उत्कृष्ट ठरले होते. त्या ‘ठाणा कॉलेज’, ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट’ आणि ‘कर्वे इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस’ ह्या तिन्ही कॉलेजमध्ये ‘बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड’च्या मानकरी ठरल्या होत्या. वर्षा परचुरे ‘महिला परिवर्तन संस्थे’त जुलै 2012 मध्ये काम करू लागल्या. तत्पूर्वी त्या ‘अपनालय’ या संस्थेत असिस्टंट डायरेक्टर ह्या पदावर काम करत होत्या. तेथे पोचण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास निराळा आहे.
परचुरे यांनी पुण्याच्या ‘वंचित विकास’ या संस्थेत प्रकल्प समन्वयक (प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर) म्हणूनही काम पाहिले आहे. तेथे त्यांनी झोपडवस्तीतील मुलांसाठी ‘अभिरुची वर्ग’ चालवले. त्यांनी शिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग व्हावा या विचारातून नवीन खेळ, नवीन अभ्यासक्रम तयार केले. तद्नंतर ‘जनसेवा प्रतिष्ठान’, (पुणे) येथे एक वर्ष काम केले. तेथे काम करत असताना, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात स्वसहायता गट (सेल्फ हेल्प ग्रूप) तयार केले. त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून, शेतक-यांना मार्गदर्शन केले; मुलांसाठी मनोरंजन वर्ग चालवले.
परचुरे यांनी स्वसहायता गटांसाठी पंधरा संचालक तयार करून, प्रशिक्षण प्रगत केले. त्यांनी त्या गटांचे बचतीचे रेकॉर्ड ठेवणे, गट बांधणे इत्यादी कामे केली. ‘टाटा पॉवर’च्या पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशी येथील कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण वर्ग भरवले, अंदाजपत्रके बनवली.
ते सर्व करत असतानाच, परचुरे यांनी अपनालय संस्था सोडून दुसरीकडे जाण्याचे ठरवले आणि त्या ‘महिला परिवर्तन संस्थे’सोबत काम (2012) करू लागल्या. त्यांनी स्वत:ला त्या कामात अक्षरश: झोकून दिले आहे. त्या तेथे संस्थेच्या तीन प्रमुख उपक्रमांची व्यवस्था पाहतात. त्यानुसार त्यांच्याकडे ‘मुक्ता बालिकाश्रम’, ‘दिलासा’ हे वृद्धांसाठीचे केंद्र आणि ‘मोखाडा प्रकल्प’ या उपक्रमांची जबाबदारी आहे. मोखाडा प्रकल्पात गावविकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. त्यात युवकांना कायद्याचे प्रशिक्षण देणे, शेतीविकास, युवक संघटन, महिला बचतगट यांसारख्या उपक्रमांचा सहभाग आहे.
तिन्ही ठिकाणच्या निरनिराळ्या कार्यक्रमांची आखणी करून, त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे हे त्यांचे काम. त्या संस्थेसाठी देणगीदार शोधणे, त्यांच्या संपर्कात राहणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, अहवाल बनवणे, केलेल्या कामांचा आढावा घेणे, पुढच्या उपक्रमांच्या योजना आखणे अशी सारी दैनंदिन, मासिक व वार्षिक कामे बघतात. त्यांच्या कामांची यादी मोठी आहे. मोखाडा भागात गावागावांतून बैठका घेणे, प्रशिक्षण शिबिरे योजणे, गावागावात जागरूकता व्हावी म्हणून गावकऱ्यांना प्रोत्साहन देणे – त्यांनी ग्रामविकासात सक्रिय व्हावे यासाठी सतत त्यांच्याशी संवाद साधत राहणे, ग्रामपंचायतीचे महत्त्व विशद करून, तिचा उपयोग करून घेणे, त्यातून स्वत: विकासाच्या वाटा कशा शोधाव्या ह्याचे मार्गदर्शन करणे, सरकारी योजना समजावून सांगणे, ग्रामपंचायतीच्या सभासदांचे प्रशिक्षण घेणे, स्त्रीसक्षमीकरणासाठी ‘अल्पबचत गट’ स्थापून त्या बचतगटांचे व्यवस्थापन करणे, स्त्रियांना शिकवणे…अशी ती यादी लांबतच जाते. परचुरे यांनी बचतगटाचे फॉरमॅट्स बनवले असून त्याकरता व्यवस्था निर्माण केली आहे.
सरकारच्या ‘मनरेगा’सारख्या विशिष्ट योजनांबद्दल जनजागृती करून, त्यांचे लाभ कसे मिळवावे ते सांगून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे- रोजगार उपलब्ध करून घेणे याबाबत प्रशिक्षण हा वर्षा परचुरे यांच्या कामाचा भाग आहे. त्यांना रोजगारीचा ताळेबंद ठेवणे, तो तपासून घेणे अशी अनेक कामे तेथील लोकांना शिकवावी लागतात.
त्या सर्वांसाठी वेळोवेळी बैठका घेणे, त्या लोकांना नवीन काम देणे. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणे अशी त्यांची कामे सातत्याने चालत असतात. त्या नव्या-जुन्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यास नवयुवकांना प्रवृत्त करत असतात. वर्षा परचुरे त्या मुलांपैकी एक होऊन काम पार पाडतात. त्या त्यांच्या जीवनाशी आणि भावनांशी एकरूप होऊन, कामाचे डोंगर उपसत असतात. वर्षा परचुरे त्या धडपडीतून यशाचे डोंगर उभे करत आहेत.
वर्षा परचुरे कामाच्या एवढ्या पसाऱ्यातून वेळ काढून, समाजसेवा प्रशिक्षण कॉलेजमध्ये शिकवण्यास जातात. त्यांना वेळेचे व्यवस्थापन उत्तम जमते. वर्षा परचुरे म्हणतात, “माझी तेरा-चौदा वर्षांची विकसित होत गेलेली वाटचाल माझ्या मनाच्या कक्षा रुंदावत गेली आहे. मला सर्व प्रकारच्या संस्थांचा आधार घेत काम करता आले. त्यामुळे माझे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे आणि होत राहील. त्यातून माझा काम करण्याचा उत्साहही वाढत राहील. माझे ज्ञान व अनुभव जेथे उपयोगी पडतील तेथे मला काम करत राहण्यास आवडेल.”
वर्षा परचुरे यांच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ-वहिनी आणि छोटी शुभ्रा आहे. त्यांच्या आधाराने परचुरे समाजसेवेचे काम करत असतात. आई गृहिणी आहे. बाबा ‘ठाणे जनता सहकारी बँके’तून निवृत्त झाले आहेत. ते सध्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे काम करतात. कुटुंबाबरोबरीनेच स्निग्धा सबनीस, सचिन आणि जयश्री सराफ, विनय आणि शुभा ओजाळे हे कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांना कामात मदत करत असतात. नरेश जेना आणि शुभांगी जेना हे परचुरे यांचे ऊर्जास्रोत आहेत. जेना काका-काकू परचुरे यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. उदय सबनीस, विजू माने, रवी करमरकर, विवेक लागू यांच्यासारख्या कलावंत लोकांचाही वर्षा परचुरे यांच्या कार्याला सतत पाठिंबा असतो.
परचुरे यांना नृत्य व नाटक या गोष्टींची आवड आहे. त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकणे आवडते. त्या गुजराती, तमिळ आणि जर्मन या भाषा शिकल्या आहेत. परचुरे यांनी महाविद्यालयीन जीवनात नाटकात काम केले आहे. वर्षा परचुरे यांना एकपात्री अभिनयात विद्यापीठ स्तरावर बक्षिसे मिळाली आहेत. त्याचा फायदा त्यांना सामाजिक काम करताना होतो. परचुरे यांना सामाजिक विषयाची नाटके बसवणे, लोकांना विषय पटवून देणे, सामाजिक गाणी म्हणणे हे जमते. त्यामुळे त्यांना काम करताना आत्मविश्वास जाणवतो. ‘रोटरी क्लब’ने परचुरे यांना ‘रोटरी वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ 2015-16 साली दिला. त्यांना ‘विदुलता पुरस्कार’ 2016 मध्ये मिळाला आहे. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव अनेक संस्थांनी केला आहे. वर्षा परचुरे सध्या ‘महिला परिवर्तन संस्थे’चे काम करत आहेत. वर्षा परचुरे यांचे लक्षणीय कार्य आणि त्याला संस्थेच्या अध्यक्ष ज्योती पाटकर यांची लाभलेली साथ यामुळे संस्थेच्या कामाला गती लाभून नवी उभारी मिळाली आहे.
वर्षा परचुरे – 9969475359
– ज्योती शेट्ये