‘वयम्’ चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची!

0
35
carasole

मिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी घेतली. मग ते पत्रकारितेकडे वळले. त्यांच्या मनामध्ये पत्रकारिता करत असताना (१९९६ ते ९९) समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ वेळोवेळी उफाळून येई. ते एका निवडणुकीसाठी झारखंड येथे गेले असताना ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी बिहार, छत्तीसगढ, झारखंड या  भागांतील आदिवासींचा अभ्यास केला. हाती पत्रकारितेचे शस्त्र होतेच. तेव्हाच्या पत्रकारितेचे स्वरूप अधिकतर राजकीय होते. तिचा ताळमेळ मिलिंद थत्ते यांच्या मनातील आणि नजरेसमोरील कामाशी न जुळल्यामुळे त्यांना त्यात समाधान मिळत नव्हते. त्यांची भूमिका फक्त साक्षीदाराची होती.

त्यांना त्याच ओघात प्रस्थापित तत्त्वज्ञानाच्या मर्यादा जाणवू लागल्या. दरम्यान ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेने महाराष्ट्रात काम सुरू केले. त्यामुळे मिलिंदना जव्हार तालुक्यात आदिवासींसाठी काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांची ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित दीपाली गोगटेशी ओळख झाली. ती भटक्या विमुक्त समाजातील डोंबारी मंडळींबरोबर काम करत असे. दीपाली आणि मिलिंद यांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले; अर्थात पुढील समाजकार्याची वाटचाल एकत्र करणे ओघाने आले.

वनवासी कल्याण आश्रमाच्याच कामाचा अनुभव घेतलेली मिलिंदची बहीण जान्हवी थत्ते, आता सेंद्रीय शेती करणारा नाशिकचा मित्र अमित टिल्लू हे त्यांच्या बरोबर होते. सर्वांना सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यायचे होते. मार्ग अनेक होते. एकशिक्षकी शाळेची संकल्पना राबवताना लक्षात येत गेले की केवळ शिक्षणाने भागणार नाही. जीवनशिक्षण आणि विकासकामे या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न केवळ शिक्षणाने सुटणार नाहीत. तेव्हा त्या चौघांनी स्वतःला कोणत्याही वैचारिक चौकटीत जखडून न घेता, एखाद्या विशिष्ट वैचारिक धारेत न गुरफटता नव्याने कामाला लागण्याचे ठरवले.

चौघांची मनोभूमिका मीपण मिटवून टाकणारे ‘आम्हीपण’ केंद्रस्थानी ठेवण्याची तयार झाली, मग स्वाभाविकपणे नजरेसमोर आले ‘वयम्’ हे नाव. ‘वयम्’ म्हणजे ‘आम्ही सर्व!’ ‘हम सब!’ ‘अपने विकास का अपना अभियान’ हे ‘वयम्’ चे सूत्र आहे. ‘वयम्’ चे काम आठ वर्षे चालू आहे व तिला चळवळीचे रूप आले आहे. त्यांचे मूलभूत ध्येय ‘स्थानिक पातळीवर नेतृत्व विकास’ हे आहे. लोकशाहीच्या मार्गाने कामे करता येतात, त्यांनी लोकांना रोजगारासारख्या समस्येवरही प्रभावी तोडगा काढता येतो हे प्रयत्नपूर्वक समजावले आहे. ‘वयम्’च्या कार्यकर्त्यांनी जनमानसात ‘कायदा समजून घेतला तर कामे अधिक वेगाने होऊ शकतात’ हेही रुजवले आहे.

‘वयम्’चे महत्त्वाचे काम गावागावांतील नेतृत्व हुडकून काढून ते विकसित करणे हे आहे. मूलभूत नेतृत्व, संघटना आणि वैयक्तिक पातळीवर लोकशाहीचा विचार या तीन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मिलिंद थत्ते यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या संस्थेचे नाव घेऊन शासकीय वर्तुळात स्वत:चे काम घेऊन जाणे वेगळे आणि लोकांनी कायद्याची माहिती करून घेऊन स्वतंत्रपणे स्वतःच्या हक्कांसाठी लढणे वेगळे. त्यासाठी ‘कायद्याच्या कक्षेत राहून काम करणे’ ही लोकांची मनोभूमिका तयार होणे महत्त्वाचे ठरते. येथे लोकशाही तत्त्वांचा कस लागतो.

मिलिंद थत्ते आणि त्यांची कार्यकर्ता टीम यांना विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात आरोग्य, शिक्षणाअगोदरही ‘रोजगार’ हा मुख्य प्रश्न असल्याचे जाणवले. तो विकासकामातील मोठा अडथळा होता. ‘वयम्’ ने स्थानिक तरुणांतील नेतृत्व हाताशी घेऊन तेथे कामांना सुरुवात केली. मुख्य प्रवाहापासून दूर असणारा तेथील रहिवासी – त्याला शिक्षण देऊन कायद्याची ओळख करून देणे फार कठीण होते. पण ते काम वाढत गेले, कायद्यांच्या अनेक छटा जनमानसात रुजवाव्या लागल्या. चळवळीतून जव्हार तालुक्यातील पंधरा तर विक्रमगड तालुक्यातील पाच गावांतील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

रोजगाराची समस्या समोर असल्यामुळे साहजिक रोजगार हमी कायद्याची माहिती आणि त्याची अंमलबजावणी या बाबी आल्या. रोखीचा व्यवहार नाही, उलट मजुरांच्या बँक खात्यात पैसे जाणार त्यामुळे प्रशासनाला शासकीय अधिकाऱ्यांना त्यात फार रस नव्हता, कारण त्यात त्यांचा फायदा नव्हता. त्यामुळे गावातील लोकांना रोजगार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ‘वयम्’चे कार्यकर्ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी असत. आंदोलनाचे नेतृत्व त्या त्या गावातील तरुणांनी केले.

रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हा गावातील तरुणांना बलसिद्ध करणारा हुकमी एक्काच आहे. काही गावांमध्ये गावप्रेरक म्हणून एकेका तरुणाला अल्प मानधन देऊन ‘रोजगार हमी योजना’ (रो.ह.यो.) चा प्रचार करण्यात आला. त्यातून झालेल्या कामांपैकी दोन उदाहरणे :

कुंडाचा पाडा ते किन्हवली रस्ता – दोनशेपंचवीस जणांना रोजगार, पन्नास नवीन मजूर नोंदणी, तीस जणांची नवीन बँक खाती (जेणेकरून मजुरी थेट बँक खात्यात जमा होईल, भ्रष्टाचाराला संधी नाही.), आयरे गावात शेतातील कामावर शंभर लोकांना काम, वीस नवीन बँक खाती…..

अशी कामे करत असताना संघटित होऊन लढा देण्यापेक्षा नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून घटनेने दिलेल्या हक्कांचा, अधिकारांचा सक्षमपणे वापर करण्यावर भर देण्यात आला. त्या पद्धतीने ‘रो.ह.यो.’ कायद्याची अंमलबजावणी पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात करण्यात येत आहे ‘वयम्’च्या या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील काही संस्थांनी, काही भागांत हे कायदेसूत्र अवलंबून धडाक्याने रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे.

शासनाने ‘वनहक्क मान्यता कायदा’ २००८ साली केला आणि त्यामुळे वनजमीन पूर्वापार कसणाऱ्या शेतकऱ्याला त्या जमिनीची मालकी मिळणे सोपे झाले. मात्र कायदा झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी होते असे नाही! त्यामुळे चळवळीने तेथील युवकवर्गाला त्या कायद्याच्या बाबींची माहिती देऊन ती शेतकरीवर्गापर्यंत नेण्याचे काम केले आणि गेल्या सहा पिढ्यांपासून असलेला त्यांचा जमीनमालकीचा प्रश्न कायद्याच्या योग्य वापरामुळे सुटला. शेतकऱ्यांना जमीन देण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु लोकांनी माहिती अधिकाराचा सत्याग्रह केला. परिसरातील बाधित एक हजार दोनशेबहात्तर शेतकऱ्यांनी माहितीचा अधिकार वापरला. राज्याच्या माहिती आयुक्तांनी त्या लोकांना माहिती देण्याचे आदेश दिले आणि यापुढे अशा वनहक्क वंचित शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची वेळ येऊ नये म्हणून वेबसाईटच्या माध्यमातून सर्व माहिती उपलब्ध करून दिली. तिचा फायदा राज्यातील लाखो वनहक्क संबंधित शेतकऱ्यांना झाला. हा संस्थेचा आणि शेतकऱ्यांचा विजय होता. विशेष म्हणजे त्यामागे कोणीही मोठा नेता नव्हता, लोक रस्त्यावर उतरले नाहीत. लोकांनी फक्त माहिती अधिकाराचा वापर केला!

पालघर जिल्ह्यातील पहिले सामूहिक वनसंसाधन हक्क ‘वयम्’च्या गावांनी मिळवले. जव्हार तालुक्यातील कोकण पाडा (बावीस हेक्टर वनक्षेत्र) आकरे-आंब्याचा पाडा (साठ हेक्टर) ढाढरी (दोनशे चौऱ्यांशी हेक्टर) आणि विक्रमगड तालुक्यातील डोयाचा पाडा-कासपाडा (दिडशे हेक्टर) ही ती गावे. त्यांचे हक्क मिळवण्याचे प्रयत्न २०१२ पासून चालू होते.

‘वयम्’च्या मार्गदर्शनाने हाती घेण्यात आलेली इतर काही कामे :

पुण्याच्या ‘सायबेज आशा’ ट्रस्टने डोयाच्या पाड्याला जंगल संरक्षणासाठी दगडी बांध, गुरे प्रतिबंधक चर आणि पाऊसपाणी टाक्या इत्यादी कामांसाठी सहा लाख रुपये देऊ केले आहेत. गावातील सर्वांना ते माहीत आहे. हिशेब त्यांच्यासमोर केला जातो. गाव-समितीचे तरुण सदस्य ‘वयम्’च्या मदतीने केलेल्या कामाची मोजणी, नोंद आणि मजुरीचे गणित हे करतात. उपलब्ध पैशात लोकांनी त्यांच्या गावाचे त्यांच्या जंगलाचे काम पूर्ण झाले पाहिजे, यासाठी स्वतःच्या मिळकतीतील वाटा देण्याचे ठरवले. लोकांनी त्यांच्या कष्टाचे पैसे सोडल्याचे हे उदाहरण! कोकणपाड्यातील लोकांनी सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर जंगलाच्या एका भागात कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी केली होतीच; त्यावर श्रमदानही केले! ते पाहून संस्थेकडे आणखी एक प्रकल्प आपणाहून चालत आला. ‘महाराष्ट्र जनुक कोष’ या महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पातील ‘परिसर्ग संवर्धन प्रकल्प’ कोकण पाडा या गावात ‘वयम्’, बायफ- मित्र आणि कोकणपाडा ग्रामसभा असे तिघे मिळून चालवत आहेत. साडेपाच हेक्टर क्षेत्राला गुरे प्रतिबंधक कुंपण घालून  त्या क्षेत्रात बांबू आणि इतर काही वनस्पती यांची लागवड करण्यात आली आहे. त्याच गावाने जिल्ह्यातील पहिली ‘लोक जैवविविधता नोंदवही’ तयार केली होती. प्राध्यापक डी.के.कुलकर्णी यांच्या मदतीने तिचे पुनर्लेखन करण्यात आले. त्यात दोनशेपंचवीस जातींच्या वनस्पती नोंदवल्या गेल्या आहेत.

गावातील कृषी जैवविविधता वाढावी यासाठी चवळीच्या बावीस जाती आणि वालांचे सात प्रकारचे बियाणे लोकांना देण्यात आले. गावातील एका शेतात भाताच्या एकशेपंचवीस जातींच्या लागवड प्रात्यक्षिकासाठी करण्यात आली. त्यांपैकी स्थानिक शेतकऱ्यांना आवडलेल्या जाती आता तेथील शेतीच्या चक्रात कायमच्या समाविष्ट होतील. पाणी व माती अडवण्यासाठी डोंगर उतारावर करण्याच्या कामांचे तांत्रिक प्रशिक्षण कोकण पाड्यातील निवडक तरुण-तरुणींना दिले गेले आहे. त्यामुळे पाणलोट विकासाचा तांत्रिक आराखडा बनवणे व त्याचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे गावाला जमू शकेल. निरगुडीचे औषधी तेल तयार करण्याचे प्रशिक्षण महिला गटाला दिले गेले आहे.

‘वयम्’चे कार्यकर्ते प्रोत्साहन देणारे पोषक उपक्रम राबवत असतात. गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी पाककला स्पर्धे’ला भरभरून प्रतिसाद मिळाला. जव्हार-विक्रमगडमधील शंभर आदिवासी महिला त्यात सहभागी झाल्या. पहिल्या आलेल्या महिलेने तब्बल सव्वीस प्रकारच्या भाज्या करून दाखवल्या तर दुसरीने तेवीस प्रकारच्या भाज्या केल्या. रानभाज्यांच्या स्पर्धेत एकोणसत्तर प्रकारच्या ‘रेसिपीज’ मिळाल्या.

वन आणि जंगल संदर्भात काही प्रश्न सोडवणे अजून सुटायचे बाकी आहेत. डोयापाड्याच्या जंगलात मोहाची साडेचारशेहून अधिक झाडे आहेत. मोहाचे तेल काढण्यासाठी तेथे घाणा बसवण्याचा प्रस्ताव वनविभागाने आदिवासी विभागाला दिला होता. पण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. तीन वर्षे रखडलेला प्रस्ताव नवे उपवनसंरक्षक शिवबाला यांनी मार्गी लावला आणि गावाच्या समितीस साडेसात लाख रूपये वर्ग केले. ‘वयम्’चा त्या निधीतून फक्त घाणा नव्हे तर विविध वनौपज प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. लोक जागा देणार आहेत आणि श्रमदानासाठी तयार आहेत. माहितीचा अधिकार, रोजगार हमी कायदा, वनहक्क कायदा या नवीन कायद्यांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या बरोबरीने राहण्याचा अधिकार मिळाला आहे. ‘वयम्’चे तरुण कार्यकर्ते त्या बाबतीतील जनजागृती करत आहेत. ‘वयम्’ने ‘स्मार्ट लीडर’ कोर्स अठरा ते पंचवीस वयोगटाच्या तरुणांसाठी सुरू केला आहे. तो फक्त रविवारी असतो. सदतीस ग्रामीण तरुण-तरुणींनी त्यात प्रवेश घेतला. कोर्समध्ये  कायदेशिक्षणाबरोबर संवाद व संघटन कौशल्याचेही प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्याचबरोबर, कायद्याची सूत्रे वापरून पुणे, मुंबई शहरातील तरुणांनी शहरातील विविध प्रश्नांवर काम सुरू केले आहे. विविध कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआर योजनेतून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. तसेच पाण्याच्या समस्येवरदेखील काम चालू आहे. ‘वयम्’ने लोकविकासाची चळवळ कायद्याच्या चौकटीत राहून सुरू केली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी इतर सामाजिक संस्थांनीदेखील त्यात सहभागी व्हावे असे प्रयत्न ‘वयम्’चे सुरू आहेत.

शालेय शिक्षणाला व्यवहार शिक्षणाची जोड मिळावी यासाठी प्रायोगिक स्तरावर जीवनशिक्षण कार्यक्रम मेढापाटीलपाडा या दुर्गम गावातील छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. बँकेतून पैसे कसे काढावे, भरावे कसे, कर्ज कसे मिळते हे समजून घेण्यासाठी बँकेला भेट, ग्रामपंचायतीची जवळून ओळख होण्यासाठी ग्रामपंचायतदर्शन, बीज निवड व प्रक्रिया यांसारखी शेतीतंत्रे, स्थानिक बाजारपेठेची नव्याने ओळख असे उपक्रम घेण्यात आले आहेत. मेधा पाटकरांच्या नर्मदा खोऱ्यातील ‘जीवनशिक्षण शाळे’च्या संकल्पनेपेक्षा हा कार्यक्रम वेगळा आहे. दोन्ही ठिकाणी जीवनशिक्षण हे सूत्र समान असले तरी मेधा पाटकर यांनी जीवनशिक्षण शाळा सुरू केली आहे आणि मिलिंद थत्ते यांनी ‘वयम्’तर्फे शाळेत जीवनशिक्षण देणे सुरू केले आहे. मिलिंद थत्ते यांचा कल प्रस्थापित व्यवस्थेत मोडतोड न करता आवश्यक त्या सुधारणा करण्याकडे दिसतो. ते त्याला ‘संक्रांती म्हणजे सम्यक् क्रांती’ असे म्हणतात.

‘वयम्’ला ‘केशवसृष्टी’ या मुंबईच्या संस्थेने पुरस्कार देऊन गौरवले. चाळीस कार्यकर्त्यांनी मिळून तो पुरस्कार रंगशारदा नाट्यगृहात मुंबईकरांच्या भरगच्च प्रतिसादात स्वीकारला. ‘वयम्’ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ‘प्रेरणा’ पुरस्कारही मिळाला. तो स्वीकारताना थत्ते म्हणाले, की ‘नागरिक आणि सत्ता यांत समन्वय आणि समतोल असेल तरच लोकशाही सफल होते.’

मिलिंद थत्ते दाम्पत्याला ‘वयम्’कडून नाममात्र मानधन मिळते. पूर्वी मिलिंद थत्ते ‘कम्युनिकेशन कन्सल्टंट’ म्हणून काम करत असत. जोडीला पत्रकारिता आणि लेखन यांमधून उत्पन्न होतेच. पण थत्ते यांचा मुक अभिप्राय या बाबतीत अधिक बोलका आहे – ‘समाजकार्याला वाहून घेताना स्वतःच्या गरजा कमी ठेवण्याचे कौशल्य साधावे लागते!’

अलका आगरकर

About Post Author