वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था

9
56
_VanyjivanSanrakshan_BahuuddeshiyaSanstha_4.jpg

‘वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था’ नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संशोधन-संरक्षण आणि संवर्धन ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे. संस्थेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याचा इरादा आहे.

संस्थेतर्फे 25-26 फेब्रुवारी 2017 ला पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन घेण्यात आले होते. त्यात तीस जिल्ह्यांतील साडेतीनशे सर्पमित्र उपस्थित होते. संस्थेतर्फे दुसरे उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन त्याच वर्षी धुळे जिल्ह्यात बारीपाडा येथे घेण्यात आले होते. संस्थेचे कार्य त्या आयोजनामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नगर या शहरांत वाढले.

सर्पमित्र, पक्षीमित्र, वनस्पती, सरीसृप, फुलपाखरू व कीटक यांचे अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, फोटोग्राफर व व्यावसायिक अशा दीडशे सभासदांचा संस्थेत सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रातून एक हजारापेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी वन्यजीव संस्थेशी जोडले गेले आहेत.

संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालय, शासकीय-निमशासकीय संस्था, औद्योगिक वसाहत आणि ग्रामीण भाग यांसारख्या ठिकाणी ‘सर्प, मानव व पर्यावरण’, ‘मानव वन्यजीव संवर्धन, ‘वृक्षतोड व कायदे कार्यशाळा’ असे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण, जागतिक व्याघ्र, सर्प, जैवविविधता, वन असे दिन पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी उत्साहाने साजरे केले जातात. विद्यार्थ्यांना जंगलात नेऊन तेथील जैवविविधतेचे निरीक्षण करण्यास सांगितले जाते. त्याबद्दल माहिती दिली जाते. चित्रकला स्पर्धा, वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

_VanyjivanSanrakshan_BahuuddeshiyaSanstha_2.jpgहोळी, गणेशोत्सव, नवरात्र हे सण साजरे करत असताना पर्यावरणाला हानी पोचणार नाही यासाठी समाजात विशेष काळजी घेतली जाईल यावर संस्थेचा कटाक्ष असतो. गणपती विसर्जनाच्यावेळी निर्माल्यसंकलन रथयात्रा काढून शहरातून निर्माल्य संकलन केले जाते; तसेच, मेहरुण तलाव, मण्यारखेडा तलाव, निमखेडी गिरणाकाठ या ठिकाणी निर्माल्य एकत्र करून त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते.

संस्थेच्या रेस्क्यू, रिसर्च, कॉन्झर्वेशन अशा समिती असून त्यात मुख्य तीन गट आहेत. ग्रीन सोल्जर गट, रेस्क्यू फोर्स गट, रिसर्च गट.

१. ग्रीन सोल्जर गट – ज्या भागात बेकायदेशीर वृक्षतोड होत असेल ती थांबवणे, ‘वृक्ष जगवा’ अभियानात वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन करणे, ट्रीगार्ड आणि रोपे यांचे मोफत वितरण करणे, रोपवाटिकेची निर्मिती करणे. हे ग्रीन सोल्जर गटाचे मुख्य कार्य. त्या उपक्रमांत नागरिक आणि विद्यार्थी यांचा सहभाग वाढावा म्हणून वृक्षदिंडी, मिरवणूक आणि चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते.

२. रेस्क्यू फोर्स गट म्हणजे बचाव गट – निसर्गातील सर्प, वन्यजीव, पक्षी, जखमी अवस्थेत सापडल्यास त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडणे. नागरी रहिवासातून मारले जाणारी सर्प, दुर्मीळ पक्षी, प्राणी यांना वाचवून जंगलात सोडणे; हिंस्त्र वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांसोबत संवाद साधून जनजागृती करणे; या कामांची जबाबदारी रेस्क्यू फोर्स गटावर असते. लांडोरखोरी वन उद्यान येथे वन्यजीवासाठी रेस्क्यू सेंटर उभारणी करावा असा ठराव संस्थेने केला असून तो वनविभागास देण्यात येणार आहे.

३. रिसर्च गट – जैवविविधतेतील पक्षी, सर्प, कीटक, वनस्पती, जलचर यांसारख्या निसर्गातील घटकांचे संशोधन करून त्यांच्या नोंदी संबंधित विभागास देणे, हे रिसर्च गटाचे काम.

जळगाव जिल्ह्यातील वनस्पती अभ्यासकांद्वारे पाचशेबावन्नपेक्षा जास्त वनस्पतींची नोंद, तीनशेवीसपेक्षा जास्त पक्षी, सापांच्या तीस प्रजाती, तीसापेक्षा जास्त सरीसृप, नव्वदापेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे, शंभरापेक्षा जास्त प्रजातींचे कीटक अशी नोंद झाली आहे. जैवविविधता अभ्यासकांद्वारे वीसापेक्षा जास्त स्पायडर, सात प्रजातींचे बेडूक, पस्तीसपेक्षा जास्त ड्रगनफ्लाय अशा नोंदींचे काम रिसर्च गटाकडे असते.

_VanyjivanSanrakshan_BahuuddeshiyaSanstha_3.jpgखानदेशात उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी पक्षीप्राण्यांचे फार हाल होतात. म्हणून वन्यजीव संस्थेने स्वखर्चाने पाणवठे बनवले आहेत. दर वर्षी नागरिकांना मोफत परळ (पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी लागणारे मातीचे भांडे) वाटप करण्यात येतात.

संस्थेद्वारा पाच हजार पेक्षा जास्त रोपे जगवली गेली आहेत तर एक हजारांपेक्षा जास्त वृक्षांची तोड थांबवली आहे; वनक्षेत्रातील जैवविविधततेस हानिकारक असलेली परदेशी तणे, दर्प तुळस आणि तरोटा या उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन केले जाते.

वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्थेस 2010 साली सृष्टी पुरस्कार मिळाला आहे; तर 2017 साली ‘किर्लोस्कर वसुंधरा- मित्र ‘, 2018 साली ‘बहिणाबाई’, ‘युवा प्रेरणा’ असे पुरस्कार मिळाले आहेत.

सातपुडा जंगलभागातील जैवविविधता वाचवण्यासाठी संस्थेतर्फे विविध पातळीवर कार्य केले जाते- जसे, वनविभागासोबत जखमी वन्यजीवांचे मॉनेटरिंग करणे, शिकाऱ्यांकडून वन्यजीवांची शिकार होऊ नये म्हणून जंगलाजवळील गावात जनसंपर्क वाढवणे…

डोलाराखेडा आणि चारठाण ‘अतिसंवेदनशील व्याघ्र संवर्धनक्षेत्र’ असे घोषित करावे यासाठी देखील संस्थेचे राज्य आणि केंद्रीय वन मंत्रालयापर्यंत प्रयत्न सुरू आहेत.

वन्यजीव बहुउद्देशीय संस्था, जळगाव
बाळकृष्ण देवरे – 9028308365
balkrishnadevre1979@gmail.com

– धनश्री बोरसे

About Post Author

9 COMMENTS

  1. Nice dear…keep it up…Its…
    Nice dear…keep it up…Its a great work…nice article… Best wishes to ur bright future…✌

  2. खूप छान धनश्री ,…
    खूप छान धनश्री ,

    सर्वांचे मनःपूर्वक आभार

  3. खुप छान काम आहे
    खुप छान काम आहे

  4. Nice initiative by Devre sir…
    Nice initiative by Devre sir and team best wishes for future work
    And nice article by Writer,,,,
    Keep it up

  5. आपले कार्य,उपक्रम अतिशय…
    आपले कार्य,उपक्रम अतिशय स्तुत्य, उत्कृष्ट व इतरांना प्रेरणादायी आहेत. जनमानसात आपली मूल्ये नक्कीच रुजतील.

Comments are closed.