वटपौर्णिमा (Vatpaurnima)

0
81
सुवासिनी भारतीय परंपरेनुसारसौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले. तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले. ज्या वृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आले तो वृक्ष वड होता, तर दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता, अशी भाविक महिलांची श्रद्धा आहे. म्हणून त्या दिवशी महिला वडाची पूजा करतात. भारतीय संस्कृतीत पातिव्रत्य, पतिनिष्ठा हे मूल्य मोठे म्हणून सांगितले गेले आहे. आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात ते निराधार ठरले आहे. तथापी, भारतीय लोकांना संसारसुखासठी ते महत्त्वाचे वाटते. त्यामुळे तेथे वाङ्मयात, संस्कृतीतपतिव्रतांना मानाचे स्थान आहे. त्यातीलच एक सावित्री, जी आदर्श मानली जाते. एखाद्या सुवासिनीने एखाद्यास वाकून नमस्कार केला असता, तिलाजन्मसावित्री होअसा आशीर्वाद देण्याचा प्रघात पूर्वी होता. एकूणच, सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. 
          वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत असे त्रिरात्रव्रत असते. उपवास तीन दिवस करायचा असतो पण, उपवास तीन दिवस करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेला उपवास करतात. वडाला पाणी घालतात. त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. नंतर वडाची पूजा करून स्त्रिया स्वत:च्या सौभाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्या दिवशी सवाष्णीची गहू व आंबा यांनी ओटी भरतात.
          नवविवाहितेचे वटपौर्णिमेचे वाण असते. त्याला वडवतेअसेही म्हणतात. ही वाणे पाच किंवा अकरा असतात. छोट्या सुपलीत हळकुंड, सुपारी, बांगड्या, गळेसर, करंडा, फणी, यथाशक्ती दक्षिणा, तांदूळ, खण-नारळ आणि घरी केलेली उंबरे (ही उंबरे – उंबराच्या झाडाची नाही तर फणसाचा रस, गूळ, तांदुळाचा रवा यांपासून केली जातात) असे घालून पाच किंवा अकरा वाणे तयार करतात. एक वाण सासरी, एक माहेरी व एक वडाच्या झाडापाशी ठेवून पूजा झाल्यावर उरलेली वाणे इतर सुवासिनींना देतात. ती पूजा पर्यावरणपूरक अशी आहे.
          वस्तुत: प्राणवायूचे प्रचंड भांडार असलेल्या वडाच्या झाडाचे सान्निध्य सदासर्वकाळ लोकांना लाभावे व आरोग्यप्राप्त व्हावी अशी दूरदृष्टी त्या मागे असावी. वडाची प्रत्येक पारंबी जमिनीपर्यंत जाऊन मूळ वृक्षाला आधार देते. त्यामुळे वृक्षविस्तार मोठा होतो. वड कोणत्याही बाह्य परिस्थितीत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवतो. दीर्घायुष्याचे प्रतीक असलेला तो वृक्ष औषधीसुद्धा आहे. त्याच्या पानांपासून पत्रावळीद्रोण करतात. पारंब्यांपासून दोर, केसांसाठी औषध बनवतात. त्या महावृक्षाची सावली घनदाट असते. त्यामुळेच त्या झाडाची पूजा केली जात असावी आणि पुढे, महाभारताच्या वनपर्वात सावित्रीया उपआख्यानाची त्याला जोड दिली गेली असावी.
          सध्या मात्र ज्या झाडाखाली सत्यवानाला अमरत्व मिळाले त्या झाडालाच घरघर लागल्याचे दिसून येते. वडाची झाडे हद्दपार होऊ लागली आहेत. वटपौर्णिमेच्या सुमारास तर उरल्या-सुरल्या झाडांची पूजेला फांद्या हव्या म्हणून अक्षरश: कत्तल होते. दुसऱ्या दिवशी कचऱ्यात पडलेल्या वडाच्या फांद्या आणि उघडीबोडकी झालेली आसपासची वडाची झाडे पाहून मन विषण्ण होते. पूजा फांदीची अपेक्षित नसून पूजा झाडाची अपेक्षित आहे. स्त्रीने पूजेच्या निमित्ताने का होईना चार घटका निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन, शांत मनाने, प्रसन्न चित्ताने जास्तीत जास्त ऊर्जा मिळवून ताजेतवाने होणे याला महत्त्व आहे. तिच्या घराच्या जवळपास वडाचे झाड नसेल तर ती वृक्षारोपण करूनही वटपौर्णिमेचा दिवस/सण साजरा करू शकते. आपण निसर्गाचे रक्षक व्हायला हवे, भक्षक नव्हे.
स्मिता भागवत smitabhagwat@me.com

——————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here