लोणार सरोवर

1
50
_Lonar_Lake_1.jpg

लोणार हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य समजले जाते. ते नोटिफाईड नॅशनल जियो-हेरिटेज-मॉन्युमेंट आहे. उल्कापाताच्या आघातामुळे त्या सरोवराची निर्मिती झाली. सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास झाला आहे. पर्यटन करणाऱ्यांसाठी ते महत्त्वाचे आकर्षण समजले जाते. जगात उल्कापातामुळे निर्माण झालेली दोनच सरोवरे आहेत असे म्हणतात. त्यांपैकी दुसरे सोव्हिएत रशियात आहे.

लोणार सरोवराचा परीघ १.२ किलोमीटर आहे. तो जमिनीपासून एकशेसदतीस मीटर खोलपर्यंत आहे. जमिनीवरील परीघ मात्र १.८ किलोमीटरचा आहे. सरोवराचे वय बावन्न हजार वर्षें समजले जाते. नव्या अभ्यासात ते पाच लाख सत्तर हजार वर्षें असल्याचे म्हटले आहे. त्या सरोवराच्या निर्मितीत वीस लाख टनाचा उल्कापात होऊन मोठा खड्डा तयार झाला व त्यानंतर कैक सहस्रके रासायनिक प्रक्रिया होत राहिली. त्यातून वेगळाच खडक व माती तयार झाली. त्या खड्ड्यात अल्कलाईन पाण्याचे तळे विकसित झाले. हळदीचा त्या पाण्यात थेंब टाकला तरी त्याचा रंग लाल होतो. तळ्याचे पाणी जरी रासायनिक असले तरी त्याच्या दोन फूट बाजूला खड्डा खणल्यास गोडे पाणी लागते. त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञ तेथे येत असतात. उल्का आदळल्यामुळे आजूबाजूचा परिसर छोट्या टेकड्यांच्या स्वरूपात वर आलेला आहे. लोणार परिसराचे पाच विभाग होतात. पहिला म्हणजे उल्कापातामुळे झालेल्या विवराच्या बाहेरचा प्रदेश, दुसरा त्याचा उताराचा भाग, तिसरा तळाचा सपाट भाग, चौथा सरोवराच्या भोवतालचा दलदलीचा भाग आणि पाचवा व शेवटचा भाग म्हणजे सरोवर. सरोवराच्या पाण्यातील क्षाराचे प्रमाण अतिउच्च असून ते दहा ते साडेदहा पी.एच. एवढे आहे. त्यामुळे त्यात कोणताही जीव जगू शकत नाही.

सरोवराचा उल्लेख स्कंद पुराणात, पद्म पुराणात, मराठीतील लीळाचरित्रात; त्याचप्रमाणे, फार्सीतील ‘ऐने अकबरी’मध्ये आढळतो. जे. ई. अलेक्झांडर या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्या सरोवराची नोंद १८२३ मध्ये घेतलेली आहे. त्या उल्केचा छोटा तुकडा लोणार सरोवरापासून सातशे मीटरवर पडला आहे. तेथेही एक छोटे सरोवर तयार झाले आहे. त्या जवळ हनुमान मंदिर आहे. मंदिरातील हनुमानाची मूर्ती ज्या दगडाची बनली आहे, तिच्यात चुंबकत्व आहे. त्या सरोवराला छोटे लोणार या नावाने ओळखले जाते.

सरोवराच्या परिसरात घनदाट जंगल असून तेथे वनस्पतींच्या, पक्ष्यांच्या कित्येक दुर्मीळ प्रजाती पाहण्यास मिळतात. तेथे मोर, हरणे, रानडुक्कर, बिबट्या, रानमांजरी, सरडे, काळे करकोचे, लाल रंगाच्या टिटव्या, घुबड, खारी, सहस्रपाद कीटक, लंगूर माकडे इत्यादी प्राणी-पक्षी आढळून येतात. त्याच परिसरात संजीवनी वनस्पती असल्याचे पौराणिक उल्लेख आहेत. सीताफळ, बाभळी, कडुनिंब, निलगिरी, बांबू, ताग, रामफळ इत्यादी विविध जातींची झाडेदेखील तेथे आहेत.

सरोवराच्या आग्नेय पूर्व भागात जी मोकळी जागा आहे तेथे ज्वारी, मका, भेंडी, केळी, पपई यांसारखी पिके घेतली जातात. शेती कसण्यासाठी जी खते वापरली जातात त्यांचे अंश सरोवरात उतरत आहेत, त्यामुळे सरोवराच्या गुणवत्तेला बाधा पोचते. सरोवरात आजुबाजूचे सांडपाणीही सोडले जाते! सरोवरात काही धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी तेथे खाद्यपेयांची दुकाने लागतात. कपडे धुणे, आंघोळी करणे या विधींमुळे साबणातील रसायनेही पाणी प्रदूषित करत असते. सरोवराच्या पाण्याचे वैशिष्ट्य असे आहे, की ते एकाच वेळी सलाईन व अल्कलाईन आहे. पण बाहेरून येणाऱ्या पाण्यामुळे ते वैशिष्ट्य टिकून राहील का याबद्दल शंका वाटते.

सरोवराचे व्यवस्थापन व सौंदर्यीकरण यांवर कमी खर्च केला जातो. सरोवराला योग्य प्रसिद्धी न दिल्यामुळे जगातून भारतात येणारे प्रवासी त्या ठिकाणी जात नाहीत. ते जवळच असलेल्या अजिंठा-एलोरा लेणी पाहण्यासाठी येतात, पण त्यांना या सरोवराचे महत्त्व माहीत नसते.

सरोवराच्या सभोवती नवव्या शतकात बांधलेली हेमाडपंथी शैलीतील छोटीमोठी अशी सुमारे पंधरा मंदिरे आहेत. बहुतांश मंदिरे जीर्ण, तर मूर्ती अर्धभग्न अवस्थेत आहेत. रामगया मंदिर, विष्णू मंदिर, शंकर गणपती मंदिर, वाघ महादेव मंदिर, अंबरखाना मंदिर, मुंगळ्या मंदिर, देशमुख मंदिर (वायुतीर्थ), चोपडा मंदिर (सोमतीर्थ), वेदभाभा मंदिर (यज्ञवेश्वर मंदिर), कुमारेश्वर मंदिर, वारदेश्वर मंदिर, हाकेश्वर मंदिर अशा मंदिरांचा त्यात समावेश आहे. शहर परिसरात दैत्यसुदन मंदिर, ब्रम्हा विष्णू महेश मंदिर, लिंबी बारव मंदिर व अन्नछत्र मंदिर हा पौराणिक मौल्यवान ठेवा आहे. ती मंदिरे म्हणजे पौराणिक व मध्ययुगीन शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहेत. पैकी गोमुख मंदिरात – महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी नित्य येत असत. अहिल्याबाई होळकर यांनी गोमुख मंदिराचा जीर्णोद्धार केला. दैत्यसुदन मंदिर तर खजुराहोच्या तोडीचे शिल्पाकृती असणारे मंदिर आहे. गोमुख व दैत्यसुदन ही दोन्ही मंदिरे पुरातत्त्व खात्याने नीट जपली आहेत. तेथे धार्मिक लोकांचा राबता असतो. मोठा मारोती मंदिर कानेटकर कुटुंबीयांनी सांभाळले असून तेथे चुंबकीय दगडापासून बनलेली झोपलेल्या मारुतीची दहा फुटी मूर्ती आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे ती मूर्ती चुंबकीय तत्त्वावर असून तरंगती आहे. जमिनीला वा भिंतींना ती जोडलेली वा टेकलेली नाही. ते मंदिर मात्र लोकांना फारसे माहीत नाही.

मध्यंतरी पर्यावरण मंत्रालयाने एक मोठी घोडचूक केली. सरोवराच्या सभोवताली ‘एको सेन्सिटिव्ह झोन’ची मर्यादा पाचशे मीटरची होती; ती फक्त शंभर मीटरवर आणून ठेवली गेली आहे. त्यामुळे मानवी वस्ती पुढे सरकत चालली असून सरोवराच्या अस्तित्वालाच धोका पोचत आहे; सरोवर पुढील पन्नास वर्षें तरी तग धरेल का याबद्दल अभ्यासकांच्या मनात शंका आहे. सरोवराची जपणूक करण्यासाठी समिती २००२ साली स्थापन करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने त्या सरोवराच्या दहा किलोमीटर परिसरात कोणताही नागरी विकास होऊ नये असा आदेश दिला आहे, पण त्याची दखल घेतली जात नाही. सरोवरापासून दोन किलोमीटरवर राज्य सरकारने पाझर तलाव बांधला आहे. त्याची उंची लोणार सरोवरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यामधील पाणी पाझरून लोणार सरोवरात शिरते.

भूगर्भशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक; तसेच, पर्यटकांच्या दृष्टीने ते अप्रतिम ठिकाण आहे. जुलै ते जानेवारी, त्यातही प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर हे पर्यटक व अभ्यासक यांच्यासाठी सर्वाधिक सोयीचे महिने आहेत.

– (जलसंवाद, ऑगस्ट २०१७वरून उद्धत)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.