पाच राज्यांतील विधिमंडळ निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर झाले. मतदारांनी कौल अपेक्षेप्रमाणे वेगळ्या दिशेने दिला. ती मात्रा भाजपसाठी थोडी जादा कडक आहे, परंतु देशातील एकूण जनमानस मोदी-शहा जोडीला चांगला धडा मिळाला असे असावे. लोकांनी त्यांना त्यांच्या नव्या अजेंड्यावर विसंबून 2014 साली लोकसभेत बहुमताने निवडून दिले होते. त्याला साडेचार वर्षें झाली. सत्तेवरील एवढ्या अल्पकाळात चमत्कार घडेल अशी मतदारांची अपेक्षा नसावी. परंतु राज्यकर्त्यांची राष्ट्रविकासाची दिशा योग्य आहे आणि त्यांचा हेतू स्वच्छ आहे असा विश्वास राज्यकर्ते तेवढ्या काळात निर्माण करू शकलेले नाहीत.
नरेंद्र मोदी आश्वासने भरमसाठ देत राहिले आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचा आत्मविश्वास जरा जादाच वाटू लागला; इतका की ते मग्रूर आहेत ही प्रतिमा जनमानसात ठसली गेली. मोदी हवेत असावेत असेच भासायचे. त्यांचे दिवसभराचे भरपूर काम, अधिकाऱ्यांवरील वचक, साधी जीवनशैली या, सत्तेच्या आरंभीच्या काळातील साऱ्या गोष्टी त्यांच्या ‘प्रमोशन’चा भाग वाटू लागल्या. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्य खंबीरपणे चालवले, ही जी त्यांची प्रतिमा होती ती त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच विस्तारली. त्यांनी जगभर भारताबद्दल व त्यांच्याबद्दलही सद्भाव निर्माण केला. त्यांच्याकडून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नवे पैलू दिसतील असेही एका टप्प्यावर वाटू लागले. परंतु त्यांनी जनतेच्या मनात निर्माण झालेली ती भावना सार्थ ठरवली नाही. त्यांची अदानी-अंबानी यांच्याबरोबरची मैत्रीच खरी दिसू लागली. भाजपने काँग्रेसची राजकारण शैली उचलली, त्यांनी संघ परिवाराच्या सच्चेपणाचा एवढासा सुद्धा भास दर्शवला नाही. परिणामत: त्यांना पाच राज्यांत दणदणीत अपयश आले, मोठे झटके बसले.
भाजपची सत्ता गेली याबद्दल दु:ख वाटण्याचे कारण नाही. देशातील राजकारण सुधारू शकते हा विश्वास 2014 साली लोकमानसात निर्माण झाला होता, तो उध्वस्त झाला. या देशाचे राजकारण पूर्ण गर्तेत गेल्याशिवाय पुन्हा निकोप होणार नाही अशी उलटी खात्री तयार झाली. लोकशाहीवर भरवसा ठेवायचा की कोणा व्यक्तीच्या/गटाच्या हाती सत्ता देऊन मोकळे व्हायचे असा आशादायक जो पर्याय दिसू लागला होता, तो खोल बुडून गेला. सारे जग विविध तऱ्हांच्या अतिरेकांच्या सावटाखाली असताना भारतात मानवी जीवनात हितकर अशी जीवनशैली निर्माण होण्याची शक्यता जाणवू लागली होती, ती मालवून गेली. भाजप ही काँग्रेसची प्रतिकृती बनून गेली. लोकांना काँग्रेस संस्कृती नको होती. म्हणून त्यांनी काँग्रेसला झिडकारले. तसा भाजप लोकांना नको आहे हे त्यांनी त्या पक्षास दाखवून दिले.
तरीही 2019 च्या लोकसभा निवडणुकांबद्दल औत्सुक्य राहीलच; किंबहुना ते निर्माण केले जाईल. कारण निवडणुका हा भारतातील लोकशाहीचा एक चुरशीचा खेळ झाला आहे – क्रिकेट आणि फूटबॉलसारखा. त्यात राजकारणापेक्षा करमणूक जास्त असते. उमेदवार नाट्यदेखील तसेच निर्माण करतात.
पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होत होते, तेव्हा मी अहमदनगरमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती व संस्था यांची माहिती जाणून घेत होतो. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे 10 डिसेंबरला अहमदनगर महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. ती मतमोजणीदेखील त्याच दिवशी होत होती व निकाल जाहीर केले जात होते, त्यासंबंधी स्थानिक रेडिओवर चर्चा वगैरे सगळे उपचार रीतसर पार पडत होते. माझ्याबरोबरचे सर्व कार्यकर्ते एकीकडे त्यांच्या कामाची माहिती देत असताना त्यांचा एक कान गाडीतील रेडिओवरील स्थानिक व पाच राज्यांतील निकालांकडे आलटूनपालटून होता. मला ते क्रिकेट कॉमेंट्री ऐकत आहेत असेच वाटले.
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत नाट्य असतेच. उमेदवार प्रचार काळात धमाल करत असतात, आरोप-प्रत्यारोप चालतात, त्यावर टीव्हीच्या प्रत्येक चॅनेलवर खमंग चर्चा चालू असतात. एक्झिट पोलचे व निवडणुकांचे निकाल ही गंमत वेगळीच असते. निवृत्त ज्येष्ठ लोकांचा मोठा समुदाय देशात व गावोगावी आहे. त्यांना तर निवडणूक निकाल व चर्चा ही पर्वणीच वाटत असते. कारण त्यांना मोकळा वेळच वेळ असतो. तशी तर निवडणुकांची मौज अनेक पातळ्यांवर आणि तऱ्हतऱ्हांनी घडत असते. त्या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोठच्या ना कोठच्या सतत चालू असतात.
अहमदनगर महापालिकेतीलच उदाहरण बघा हं! तेथे शिवाजीराजांबद्दल अनुदार उद्गार काढले, म्हणून बराच काळ बदनाम झालेला व नंतर तडीपारही केला गेलेला उमेदवार निवडून आला! आणि त्याहून गंमत म्हणजे त्याच्या भावाने मतदान केंद्रात मतदान करण्यास गेला असता इव्हीएम मशीनची पूजा केली – त्यासाठी तो भटजीला बरोबर घेऊन गेला होता! केंद्राधिकाऱ्याने त्याला पूजा यथासांग करू दिली, पूजेस आक्षेप घेतला नाही. लोकांनी ते नाटक – त्यासंबंधीच्या बातम्या ‘एंजॉय’ केल्या. निवडणूक अशी असते. लोक त्या घटनेकडे असे पाहत असतात!
लोकशाही निवडणुका, त्यातून निवडून येणारे पक्ष – त्यांच्या युती व आघाड्या आणि त्यानंतर चालणारा देशभराचा कारभार… या साऱ्या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे ना?
– प्रतिनिधी
मतदान केंद्रांत, उमेदवाराने…
मतदान केंद्रांत, उमेदवाराने भेटीला बरोबर नेऊन पूजाअर्चा करणे, हे लोकशाही परंपरेची पायमल्ली करण्यासारखे आहे. आणि केंद्राधिकारी पूजा करू देतो हा मोठा विनोद म्हणावा लागेल.
Comments are closed.