लोकवाद्य – संबळ (Sambal Folk Art Instrument)

5
169
संबळहे डमरूचे प्रगत रूप होय. शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी ते वाद्यनिर्माण केले अशी समजूत आहे (कालिकापुराणात). संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून संबळ वापरतात. गोंधळहा लोकगीताचाप्रकार संबळेच्या तालावर आकार घेतो. अंगात तेलकट झबले, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत दारात येणारी व्यक्ती म्हणजे गोंधळी. गोंधळी लोक गोंधळाच्यावेळी याचा उपयोग करतात. अंबामातेचा जयजयकार करत ती व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने देवींची विविध गाणी सादर करते, ती कलाकार व्यक्ती संबळेच्या तालावर नृत्यहीकरते. त्याला संबळ गोंधळम्हणतात.  
            संबळ हे वाद्य गोलाकार असते. त्याला सुपारी घाटअसे म्हणतात. ते तबल्याप्रमाणे दोन वाद्यांची जोडी असलेले चर्मवाद्य आहे. त्या वाद्याचा एक भाग लहान व एक भाग मोठा असतो. त्यांतील एकाला नरसंबळ आणि दुस-याला मादीसंबळ असे म्हणतात. झाडाचे खोड आरपार कोरून पोकळ केलेले लाकूड संबळतयार करण्यासाठी वापरले जाते. ते वाद्यपितळ किंवा तांबे या धातूस आवश्यक तो आकार देऊनदेखील तयार केले जाते. त्या वाद्यावर चामड्याचे आवरण लावलेले असते. नरसंबळ डग्ग्याचे बोल पुरवते. त्‍यावर डग्ग्यासारखी शाई असते, तर मादीसंबळ तबल्याचे बोल पुरवते. लहान वाद्याच्या(मादी वाद्य) तोंडाचा घेर मोठ्या वाद्याच्या घेरापेक्षा निम्मा असतो. त्यांची तोंडे कातड्याने मढवून सुताच्या दोरीने आवळलेली असतात. वाद्याच्‍या तोंडावरील कातड्यास ताण देण्‍याकरता संबळेच्‍याभोवती तबल्‍याप्रमाणे चामड्याची किंवा दोरीची वादी असते. इतर वाद्ये ही साथीची वाद्ये असतात. मात्र संबळ साथीसाठी खूप कमी वेळा वापरली जाते. संबळ वाजवणाऱ्याला गाता आले पाहिजे. संबळ वाद्य स्वत: गात गतीत वाजवावे लागते. ते संथ वाजवून चालत नाही.

         

संबळावर वाजवण्यासाठी आराटी या झाडाच्या मुळीचा खास आकडा तयार केला जातो. संबळ तखडाच्या किंवा वेताच्या बारीक छडीनेदेखील वाजवतात. आकड्याच्या टोकाला इंग्रजी अक्षर ‘S’ यासारखा आकार दिलेला असतो. आकड्याची लांबी एक ते सव्वा फूट असते. तो हातातून निसटू नये, यासाठी त्याच्या हातात धरण्याच्या टोकाला कापड गुंडाळलेले असते. वाद्य व काड्या दोन्ही आपापसांत जोडलेले असतात. वादक संबळवाद्य कंबरेस दोरी वा शेला यांच्या सहाय्याने बांधतो व वाद्य वाजवतो. आकड्याच्या सहाय्याने संबळ वाजवताना त्या वाद्याचा आवाज घुमतो. तो ऐकणाऱ्यांना शरीर कंप पावत असल्याचा अनुभव येतो. त्‍या वाद्यातील खर्ज स्वर निघणा-या भागाला बंब किंवा धम असे म्हणतात, तर दुस-याला झील असे नाव आहे. संबळ दोरी अथवा शेला यांनी कमरेस बांधले जाते. गोंधळी उभे राहूनच संबळ वाजवतात. संबळचे वजन सुमारे साडेदहा किलो असते. संबळ वाद्य सनईवादनाच्या वेळी मात्र साथीला असते. ते वाद्य बासरीच्या वेळी साथ करताना हाताने वाजवतात. 
           

संबळ वाद्य एकाच वेळी शांत व उग्र आहे. ते कोमल आहे आणि तीव्रदेखील! तसेच; ते ऐक्य व विग्रह करणारे आहे, असेही समजतात. वेदांमध्‍ये उल्‍लेखलेले स्तंबर किंवा सांबल वाद्य म्‍हणजे संबळ असावे असा अंदाज मांडला जातो. पूर्वीच्या काळी लग्नकार्यात मांडवापासून ते सत्यनारायण विधीपर्यंत पारंपरिक संबळवादन होत असे. संबळेबरोबर पिपाणी व भोंगा यांवर विविध गाणी, वाद्ये लय, ठेका व स्वर यांचा एकत्रित मिलाप करून वाजवली जात. सुलभा सावंत या महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय गोंधळीण आहेत.

            पारंपरिक संबळ वाद्य पाहणे दुर्मीळ झाले आहे. मात्र सध्याच्या मराठी सिनेगीतांमध्ये संबळेचा उपयोग केला जातो. संगीतकार अजय-अतुल यांनीजोगवाया सिनेमामध्ये लल्लाटी भंडारऽऽऽया गीतामध्ये संबळ वापरली आहे.
सुरेश वाघे

——————————————————————————————————————————————-

About Post Author

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here