Home संस्था लॉकडाऊन काळात चार लाखांची पुस्तकविक्री (More Marathi Books Sold in Lockdown Period)

लॉकडाऊन काळात चार लाखांची पुस्तकविक्री (More Marathi Books Sold in Lockdown Period)

 

भारतात लॉकडाऊन 24 मार्च 2020 रोजी सुरू झाला. लॉकडाऊनला 24 जुलैला चार महिने पूर्ण झाले. त्या चारपैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नियमांची फार कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते. किराणा, दूध आणि औषधे वगळून इतर दुकाने बंद होती. त्या बंद दुकानांमध्ये पुस्तकांच्या दुकानांनाही कुलूप लागलेले होते.
त्यातील चमत्कारिक भाग हा की नेमक्या लॉकडाऊन काळात देशातील जवळपास सर्व वाचक घरात होते आणि त्यांना वाचनासाठी भरपूर वेळही होता! स्वाभाविकच, त्यांना त्या काळात पुस्तके खरेदी करण्याची इच्छा होती आणि निकडही. पण त्यांना घराबाहेर पडता येत नव्हते. बाहेर पडावे तर पुस्तकांचे दुकान उघडे नव्हते. हातात मोबाईल होता, त्यावरून ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांवर ऑर्डर द्यावी तर त्यांच्या कुरियरवाल्यांनाही डिलिव्हरीची परवानगी नव्हती. एप्रिल आणि मे हे दोन महिने वाचकांनी तशा कुंद वातावरणात काढले. पाण्याची तहान जशी सरबत पिऊन भागत नाही, तशी जुन्या वाचकांना छापील पुस्तकाची तहान ते ईबुक म्हणून वाचून भागवता येत नाही. त्यामुळेच छापील पुस्तकांच्या बाजारपेठेत नेहमीच्या काळामध्ये जगभर अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असते.
मराठी पुस्तकांचे प्रकाशन आणि विक्री यांत पुणे हे सर्वांत आघाडीवर आहे. तेथील अप्पा बळवंत चौक म्हणजे मराठी पुस्तकांच्या बाजारपेठेची राजधानीच जणू! ती पुस्तकांची घाऊक बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील प्रकाशक व पुस्तक दुकानदार पुस्तके तेथे पुरवतात व खरेदीही करतात. शाळा-कॉलेजे-ग्रंथालये त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांच्या याद्या घेऊन तेथे येत असतात. पण तेथे एप्रिलमेपासून सारे सुनसान होते. मराठी पुस्तक वाचणाऱ्यांची उपासमार चालू होती. मीसंगणक प्रकाशनया ऑनलाईन पुस्तक वितरण संस्थेत व्यवस्थापन प्रमुख म्हणून काही वर्षें काम करत आहे. मराठी पुस्तकांचा वाचकग्राहक फक्त पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सीमित आहे असे कोणाला वाटेल, पण परिस्थिती तशी नाही. माझा अनुभव आहे, की नोकरीव्यवसाय किंवा बदल्या यामुळे जी लाखो मराठी कुटुंबे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य करून आहेत, त्यांना मराठी पुस्तकांची खरेदी करायची असते. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, तामिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांतून मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन ऑर्डर्स वर्षभर सतत येत असतात. महाराष्ट्राबाहेरील त्या वाचकग्राहकांसाठी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन पुस्तक बाजारपेठा म्हणजे वरदानच आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशव्यापी कडक लॉकडाऊनमुळे मराठी वाचकांची पुस्तकखरेदीची कुचंबणा महाराष्ट्रात तर झालीच, पण भारतभरही सर्वत्र झाली हे लक्षात घेतले पाहिजे.
संगणक प्रकाशनही संस्था, मराठीतील सर्व प्रकाशकांच्या पुस्तकांचे वितरण आणि विक्री ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन बाजारपेठेत करत असते. राजहंस, मौज, श्रीविद्या, रोहन, पद्मगंधा, ग्रंथाली, मनोविकास, शब्दालय, मनोरमा, समकालीन वगैरे ख्यातनाम प्रकाशनांबरोबर सुमारे शंभर लहानमोठ्या प्रकाशकांची हजारो पुस्तकांची देश पातळीवरील उलाढाल एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत एकदम शून्यावर आली. एकही पुस्तक सलग पासष्ट दिवसांत विकले गेले नव्हते. मे संपत आला तरी लॉकडाऊन उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती. सर्वत्र घबराट आणि गोंधळ यांचे वातावरण होते. मे अखेरपर्यंत तर बाहेर पडलेल्यांना नाक्यानाक्यावर अडवण्यात येत होते. फक्तरेड झोनजाऊन त्या जागीकंटेन्मेंट झोनआले होते. कोरोना साथीमुळे सर्वत्र पसरलेले मृत्यूचे सावट जुलै महिना संपून गेला तरी तसेच आहे. बहुसंख्य प्रकाशकांची कार्यालये उघडलेली नाहीत. कुरियर सेवा ऑगस्टचा मध्य आला तरी कोलमडलेली आहे.
तशा वातावरणात आम्ही एक प्रयोग केला. आम्हीपुनश्च हरिओमम्हणत १ जूनपासून सर्व मराठी प्रकाशकांची सर्व पुस्तके ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आमचे कार्यालय अंबरनाथ येथे औद्योगिक वसाहतीत म्हणजे रेल्वे स्टेशनपासून सुमारे सहासात किलोमीटरवर आहे. लोकल गाड्या बंद. रिक्षाही जवळजवळ बंद! काम करणारी माणसे कार्यालयात पोचणार ती चालत, सायकलवरून किंवा फार तर मोटरबाईकवरून. तो प्रयोग अवघड होता. मराठी पुस्तकांना ऑर्डर्स आणि मागणी किती येईल याचाही अंदाज आम्हाला येत नव्हता, पण तरीही आम्ही प्रयोग दामटण्याचे ठरवले. घरी बसलेल्यांना सायकल व मोटरबाईकवरून रोज कार्यालयात येण्याच्या सुचना दिल्या. दोनच माणसे आली. ॲमेझॉन व फ्लिपकार्टवरून ऑनलाईन ऑर्डर्स घेणे सुरू झाले. पहिल्याच दिवशी ऑर्डर्सचा पाऊस पडला. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून आलेल्या ऑर्डर्सची संख्या लक्षणीय होती. लक्षात आले, की मराठी वाचकाला पुस्तके वाचण्यास हवी आहेत. पुस्तकांची दुकाने बंद असल्याने, त्याला घरबसल्या फक्त ऑनलाईन ऑर्डर देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
आम्ही सर्व ऑर्डर्स पॅकिंग होऊन तयार केल्या. प्रश्न होता तो कुरियर सेवेचा. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट. गाड्या सोडा, माणसेही कोठे दिसत नव्हती. कुरियरसाठी फोनवरून आमचा फॉलोअप सुरू झाला. फ्लिपकार्टने स्पष्ट शब्दांत असमर्थता व्यक्त केली. त्यांचा फार फार तर तीन ऑर्डर्स उचलू असा एसएमएस आला. ऑर्डर्सचा तर खच पडलेला. लोकांना वाचण्यास पुस्तके हवी होती. आगाऊ पैसे भरून ते ऑर्डर्स पाठवत होते. ॲमेझॉन व फ्लिपकार्ट त्यांना सरळ सरळ सांगत होते, की कोविद 19 मुळे डिलिव्हरीला पंधरा दिवससुद्धा लागू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरी बंद आहे. ॲडव्हान्स पेमेंट मस्ट आहे. तरीही लोक भरभरून ऑर्डर्स देत होते. कारण ते घरात होते, मोकळे होते, त्यांच्याकडे वेळच वेळ होता! ॲमेझॉनच्या लॉजिस्टिक विभागाने अंबरनाथवरून त्यांच्या ऑर्डर्स उचलण्यासाठी शिकस्त केली. ऑर्डर्स वाढत गेल्या, पण एक समस्या उभी राहिली. आमच्या गोडाऊनमधील माल संपत आला. काही पुस्तके शून्यावर आली. पुस्तकेच नाहीत, तर पुरवठा कसा करणार? प्रकाशकांकडून पुस्तकांचा नवा स्टॉक हवा होता, पण चौकशी केल्यावर कळले, की ग्रंथाली, मौज वगैरेंसारख्या मोठ्या प्रकाशकांची गेले अडीच महिने बंद असलेली कार्यालये उघडलेलीच नाहीत. आता, ती प्रकाशकांना साद घालण्याची वेळ होती. ते नाही म्हणालेतर आमचा प्रयोग ग्राहक-वाचकांची मागणी असूनही फसणार होता.
मंडळी, विश्वास ठेवा. कोरोनाची मृत्युछाया पसरलेली असताना, आम्ही धीर गोळा करून सुरू केलेला तो प्रयोग यशस्वी होणार की फसणार याचा निर्णय फक्त मराठी प्रकाशकांच्या हातात होता. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनचे अवधूत जोशी म्हणाले, मी सध्या फार थोडा वेळ ऑफिस उघडतो. पुण्याहून अंबरनाथला पुस्तके पाठवायची कशी हा प्रश्न आहे. वाहतूक बंद आहे. ईपासशिवाय गाड्या सोडत नाहीत. पण तरी प्रयत्न करतो.” ‘ग्रंथालीचे सुदेश हिगलासपूरकर म्हणाले, “मी बोरिवलीला घरात अडकलेलो आहे. ग्रंथाली ऑफिस माटुंग्याला आहे. गेली दोन महिने ते उघडलेले नाही. पुस्तके असतील, पण ती मोजण्यास-बांधण्यास माणसे नाहीत, अवघड आहे. पण प्रयत्न करतो.ग्रंथालीच्या धारपमॅडम म्हणाल्या, “पाहते जवळचे विश्वासाचे कोणी बाहेर पडून ऑफिस उघडण्यास तयार असेल तर चावी देईन. पण माटुंग्याहून अंबरनाथला पुस्तके कशी नेणार तुम्ही?
प्रकाशकांची इच्छाशक्ती मोठी होती. त्यांचा कोरोनाच्यासंकटावर मात करण्याचा मनोमन निर्धार होता. पुण्याच्या श्रीविद्या, पद्मगंधा, अनमोल, रोहन वगैरेंनी पुस्तकांची पार्सल्स बांधून ती व्हीआरएल कुरियरकडे पुण्यात दिली. ती व्हीआरएलच्या अंबरनाथ डेपोत चार दिवसांनी पोचली. पुण्याचा प्रश्न सुटला. मुंबईसाठी आम्हीच ईपासचा टेंपो घेऊन ग्रंथयात्रा काढली. मौजकडे विलेपार्ले, ‘ग्रंथालीमाटुंगा, राजा प्रकाशन, समकालीन प्रकाशन, मनोरमा प्रकाशन, अक्षर प्रकाशन हे दादर पूर्व-पश्चिमेला, भालानी प्रकाशन, परळ अशी आमची त्रिस्थळी यात्रा झाली. ती तारीख १ जुलै. पाऊस अधुनमधून हजेरी लावत होता. लॉकडाऊनमुळे जिकडे तिकडे बांबू लावून प्रतिबंधित क्षेत्रचे बॅनर दिसत होते. रस्ते बंद. टेंपो उलटासुलटा फिरवावा लागत होता. पण तसे करत करत सर्व पुस्तकांचे गठ्ठे गोळा केले. त्यात टेंपो आणि धीर फक्त आमचा होता. खरा मोलाचा प्रतिसाद प्रकाशकांचा होता. मनोरमा प्रकाशन हे फडकेमॅडम आणि त्यांची कन्या या दोन धीराच्या महिला चालवतात. त्यांच्याकडे पुस्तके माळ्यावरून काढण्यास, गठ्ठे बांधण्यास माणसे नव्हती. कार्यालय कम गोदाम तीन महिने उघडलेले नव्हते. त्या राहत होत्या तेथून त्यांचे कार्यालय वाहनाने वीस मिनिटे लागावी एवढे लांब होते, पण त्यांनी कसलीही सबब न सांगता बांधलेले गठ्ठे आमच्याकडे दिले. समकालीन प्रकाशन दादरला कबूतरखान्याजवळ आहे. तेथे समोर टेंपो उभा केला, तर पोलिस दटावण्यास आले, येथे टेंपो उभा करायचा नाही, साहेब येणार आहेतअसे सांगू लागले. त्यामुळे टेंपो लांब उभा केला. पाऊस रिमझिमत होता. समकालीनच्या ऑफिसमधून त्यांचे धीरज साळवी पुस्तकांचा गठ्ठा घेऊन पावसातून धावत लांबवरच्या टेंपोपाशी आले. अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत म्हणाले, मीच गठ्ठा घेऊन चालत नाक्यावर येतो. आजूबाजूला सगळीकडे नो एण्ट्री आहे.राजा प्रकाशनचे ज्ञानेश्वर मुळे आणि प्रसाद विचारे प्रतिबंधित क्षेत्राच्या शेजारून आम्ही टेंपो कोठून वळवावा त्याचे मार्गदर्शन करत पुस्तकांचे गठ्ठे घेऊन आमची वाट पाहत होते.
मराठी पुस्तकांचा एकूण प्रवास तसा खडतरच म्हणायचा, पण प्रकाशकांच्या इच्छाशक्तीमुळे तो प्रवास आणि आमचा प्रयोग दोन्ही यशस्वी झाले. जून आणि जुलै या लॉकडाऊनग्रस्त महिन्यांत संगणक प्रकाशन संस्थेने सुमारे चार लाख रुपयांची मराठी पुस्तके ॲमेझॉन व फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन विकली. वाचकांना पुस्तके हवी होती ती मिळाली. प्रकाशकांच्या पुस्तकांना दोन महिन्यानंतर विक्रीचा योग आला. त्या निमित्ताने किती तरी माणसांचे हात या प्रयोगाला लागले. श्रावण महिना सुरू झाला आहे. कहाणीतसाठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्णअसे म्हणतात. त्याच धर्तीवर आमचा लॉकडाऊनमधील प्रयोग कोरोनाला हरवून हा असा सुफळ संपूर्ण झाला!

विश्वनाथ खांदारे 9987642793

vkhandare@gmail.com

विश्वनाथ खांदारे हे वेब डिझायनर आहेत. ते ‘पूजासॉफ्ट टेक्नोलॉजी’स या माहिती तंत्रज्ञानविषयक संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. ते ‘संगणक प्रकाशन’ या कंपनीसाठी ईबुक कवर आणि लेबल डिझायनिंगचे काम करतात. त्यांनी विश्वकोश मंडळाच्या जीवसृष्टी व पर्यावरण या दोन खंडांचे लेआउट व डिझायनिंग केले आहे. त्यांनी केतकर ज्ञानकोश, राम गणेश गडकरी, धर्मानंद कोसंबी, केशवसुत, यशवंतराव चव्हाण आणि अशा चाळीस वेबसाईटसची निर्मिती केली आहे. ते विविध वृत्तपत्रांत लेखन करतात. त्यांच्या पंढरपूर इन्फो या ब्लॉगला स्टारमाझाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, ‘राज्य मराठी विकास परिषदे’तर्फे त्यांना सतत तीन वर्षे उत्कृष्ट संकेतस्थळ बनवल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे.

——————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version