लॉकडाऊन काळातील आगळेवेगळे शिक्षण!

6
25
राज्यातील ग्रामीण भागांत शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे! कोरोनामुळे सर्वत्र शाळांना सुट्ट्या आहेत. परंतु दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचत आहे. दीक्षा अॅपमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे नऊ हजार सातशेहून अधिक व्हिडिओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत. त्या अॅपचा लाभ ग्रामीण भागातील दोन लाख मुले दररोज घेतात. पहिली ते दहावी या वर्गांच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासमाला 13 एप्रिल 2020 पासून सुरू झाली आहे. ती अॅपवरूनच प्रसारित होते. शिक्षण संचालक दिनकर पाटील पुढाकार घेऊन सोशल माध्यमांवर त्याची लिंक शेअर करतात. अभ्यासमालेत विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांवर आधारित मालिका आहेत. पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅपमध्ये मार्गदर्शनही उपलब्ध आहे. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील आवलगाव येथील शारदा ठेंगडे यांची प्रतिक्रिया  बोलकी आहे. त्या म्हणाल्या, ‘लॉकडाऊनमुळे गावातील शाळा बंद झाली. आमची मुले शिक्षणास दुरावतील अशी भीती तयार झाली. परंतु दीक्षा अॅपवर इयत्तानिहाय शिक्षणासाठी स्रोत उपलब्ध आहे हे ध्यानी आले आणि आम्हास दिलासा वाटला.’ त्या पुढे सांगतात, ‘आम्ही आमच्या घरी माझी मुलगी व शेजारी असणाऱ्या मुलामुलींना बोलावतो आणि वर्गनिहाय जो अभ्यासक्रम दिला जातो तो त्यांना दीक्षा अॅपवर दाखवतो. ती सर्व मुले आपापसांत चर्चा करुन छान पद्धतीने शिक्षण अनुभवत आहेत’. शारदा ठेंगडे यांना शाळेतील शिक्षक व अन्य अधिकारी यांचे सहाय्य लाभते.

         

गजानन जाधव

रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात सुगम, दुर्गम व अतिदुर्गम अशा तीन क्षेत्रांत शाळांची विभागणी केली गेली आहे. अतिदुर्गम क्षेत्रात चिंचवली गाव आहे. तेथील जिल्हा परिषद शाळेला चार वर्षांपासून इमारत नाही. शाळा आदिवासी वाडीतील समाजमंदिरात भरते. ना तेथे शौचालय आहे, ना किचन शेड, ना मुलांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था. तरीही तेथे गजानन जाधव नावाचे तरुण शिक्षक तीन-चार दिवसांनी जाऊन खुल्या हवेत शाळा भरवतात. शाळेतील पंच्याण्णव टक्के मुलांकडे व त्यांच्या पालकांकडे फोन नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही खूप दूरची गोष्ट होय. जाधवसर जंगलात गलोल घेऊन जाणे, गलोलच्या दगडीने आंबे पाडणे, किती दगडात किती आंबे पाडले याचे गणित करणे, करवंदे जमा करणे -ती मोजून -शंभर-शंभरचे गट तयार करणे, आंबे डझनांमध्ये विलग करणे -ते गावात विकणे – पैशांचा हिशेब ठेवणे, घरी आईवडिलांना कामात मदत करत मूल्यशिक्षण उपयोगात आणणे, बकरी/कोंबडी अशा पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, जंगलात गेल्यावर विविध प्राणी/पक्षी/वनस्पती यांची माहिती समजून घेणे अशा प्रकारे चार भिंतींबाहेरील आनंददायी शिक्षण मुले घेत आहेत.        

पैगंबर तांबोळी
          सोलापूर जिल्ह्याच्या शेजबाभूळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पैगंबर तांबोळी हे शिक्षक जून 2018 मध्ये रुजू झाले. त्यांनी शाळेपासून जवळ असणाऱ्या ‘विज्ञानग्राम’ या संशोधन संस्थेच्या सहाय्याने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजत आहे. पैगंबर तांबोळी यांचे वडील मनुलाल तांबोळी त्याच शाळेत होते. मुख्याध्यापकपदावरून ते सेवानिवृत्त 2002 मध्ये झाले. त्यांनीही त्या शाळेत महत्त्वपूर्ण कार्य केले.
          पैगंबर तांबोळी यांनी लॉकडाऊनच्या काळात एकशेपस्तीस मुलांना व त्यांच्या पालकांना दररोज आकाश निरीक्षणाचे वेड लावले आहे. तांबोळीसर पालकांना सोशल माध्यमांवर माहिती देतात. लॉकडाऊनच्या काळात घरी असलेले पालक रात्री दहा वाजेपर्यंत व पहाटे पाच वाजल्यापासून पाल्यांसमवेत अवकाश-निरीक्षणकरतात. गावातील मुलांना चंद्राच्या विविध कला, सुपरमून व त्यामुळे पृथ्वीवर होणारे परिणाम -ढग येणे, वादळे निर्माण होणे वगैरे- यांचा निरीक्षणातून अनुभव मिळतो. सद्यस्थितीत आकाश अधिकच निरभ्र असल्यामुळे शुक्र, गुरु, मंगळ, शनी, बुध हे ग्रह, ध्रुवतारा, मृग, पुनर्वसु व रोहिणी ही नक्षत्रे मुले आता सहज ओळखू लागली आहेत. सोबतच, विविध खगोलीय घडामोडी, घटनांची माहिती मुले मिळवत आहेत. तांबोळी सरांना वैज्ञानिक अरुण देशपांडे व खगोलप्रेमी शिक्षक शावरसिद्ध पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. सरांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ, पंढरपूर, माळशिरस व सोलापूर तालुक्यातील अनेक शिक्षक त्याचा फायदा घेत आहेत.

       

विनीत पद्मावर

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामधील उपक्रमशील शिक्षक विनीत पद्मावार यांची कोयनागुडा ही शाळा. त्या आदिवासी गावात कोठल्याही फोनला रेंज नसते. विनीत यांनी लॉकडाऊन काळात मुले शिक्षणापासून दुरावू नयेत यासाठी देवराई आर्ट व्हिलेज व जिल्हा परिषद शाळा (कोयनागुडा) यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्राम ग्रंथालय सुरु केले आहे. त्या वाचनालयात आठशे पुस्तके आहेत. ते वाचनालय दररोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत सुरु राहते. शशी मडावी ही तरुणी वाचनालयाच्या व्यवस्थेचे काम पाहते. मुले दररोज वाचनालयात जाऊन पुस्तके वाचतात व वाचलेल्या पुस्तकांची माहिती कागदांवर लिहून सरांना पाठवतात. त्यामुळे मुलांचे शिक्षणही चालू आहे. गावातील नागरिकदेखील लॉकडाऊनच्या काळात वाचनाचा आनंद घेत आहेत. ही तीन नमुना उदाहरणे आहेत. राज्यात असे प्रयत्न  गावोगावी होत असतील व गावोगावची मुले शिकत असतील. त्याबाबतचे तपशील शिक्षकांनी वा नागरिकांनी जरूर पाठवावेत. पत्ता –info@thinkmaharashtra.com

गजानन जाधव  99233 13777
पैगंबर तांबोळी   95189 88221, 99213 80871
विनीत पद्मावार  94202 81982
संतोष मुसळे 9763521094 santoshmusle1983@gmail.com
संतोष मधुकरराव मुसळे जालना येथे राहतात. त्यांनी एमए,बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आवलगाव (जालना) येथे तेरा वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेले लेखन विविध दैनिकांत आणि साप्ताहिकांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकहा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
——————————————————————————————————–
अवकाश निरीक्षणाचे धडे देताना तांबोळीसर
शारदा ठेंगडे आवलगाव येथील विद्यार्थ्यांसोबत

 

काही मजेशीर फोटो

—————————————————————————————————————————————————————–

About Post Author

6 COMMENTS

  1. खरोखरच धन्य आहे या.लोकांची !प्रसिद्धी पासून दूर राहून किती मोठं काम करतात ही थोर.लोकं !सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.

  2. ही छान माहिती कोणत्याही चॅनलवर नाही दाखवत .कदाचित पेपरमध्ये असेल. think maharashtra मुळे कळली . धन्यवाद.

  3. अशी उदाहरणे पाहून / वाचून छान प्रेरणा मिळते ना ? आपण पण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे ही भावना येते ना ? आपण कशी सुरुवात करू शकतो ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here