सुहास बहुळकर हे उत्तम व्यक्तिचित्रकार म्हणून विख्यात आहेत; तसेच संशोधक-लेखक म्हणूनही. त्यांचा हे करावे, की ते असा पेच गेली दोन-तीन दशके चालू होताच; तो कामाच्या दडपणाखाली आपोआप सुटला आणि ते संशोधन-लेखनाच्या नादी गेली काही वर्षे लागले ते लागलेच. आता ते व्यक्तिचित्राची नवी ‘ऑर्डर’ येईल तेव्हाच चित्रकलेकडे वळतील, पण ‘प्रदर्शन भरवले नाही म्हणून’ ही जी कलावंताची आतली गरज असते ती त्यांच्या बाबतीत मागे पडली आहे. ते लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या आदल्याच दिवशी एका मोठ्या कामातून मोकळे झाले होते. तो प्रकल्प इंग्रजी ग्रंथाचा आहे-‘एनसायक्लोपीडिया ऑफ आर्ट इन महाराष्ट्र’. ते आणि सहकारी संपादक दीपक घारे गेले नऊ महिने पंडोल आर्ट गॅलरीच्या फोर्टमधील कचेरीत ठाण मांडून बसलेले होते. त्यांनी मूळ मराठी ग्रंथाचे इंग्रजी टाईप करून घेऊन, त्यातील संदर्भ पुनःपुन्हा तपासून पाहून, आवश्यक तेथे मजकूराची भर घालून मुद्रणप्रत सिद्ध केली, चित्रांसह पंडोल यांच्या हाती मुद्रणासाठी दिली. प्रकाशनाची तारीख ठरली, 2 मे -महाराष्ट्र राज्य स्थापनेची साठ वर्षे! परंतु कोरोनाने घात केला आहे. वेळापत्रकाची शाश्वतीच उरलेली नाही.
[youtube=https://www.youtube.com/watch?v=eKTdoSlZL1A&w=320&h=266]
बहुळकर यांनी विवेक साप्ताहिकाच्या चरित्रकोशासाठी प्रथम हे काम मराठीत केले. ‘विवेक’ने वेगवेगळ्या क्षेत्रांतील मराठी कर्तबगारांची चरित्रे नोंदण्याचा हा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी हाती घेतला. साहित्य, चित्रपटनाट्य… असे खंड वेगवेगळ्या संपादकांच्या अखत्यारीत पुरे झाले. चित्रकला–शिल्पकला हे काम बहुळकर-घारे जोडीने हाती घेतले व तडीस नेले. त्यातून माहीत नसलेले अनेक चित्रकार लोकांसमोर आले, काहींची माहिती अधिक कळली. ते फार मोठे संशोधन कार्य घडून आले. मराठीत जुन्यात रमण्याचा दोष सतत नजरेत येतो, तसेच तेथे झाले. राजवाडे-केतकर यांच्यासारख्यांचे ‘गतशतकातील’ संशोधन कार्य सांगत राहायचे आणि समकालीन कार्याकडे दुर्लक्ष करायचे! बहुळकर-घारे यांनी दुर्लक्षित कलाक्षेत्र निवडून, अतोनात परिश्रम करून दुर्मीळ माहिती जमा केली आहे. बहुळकर-घारे यांचे मराठीतील काम पाहून पंडोल गॅलरीने ते काम इंग्रजीत करून देण्यास सुचवले.
बहुळकर यांनी ते काम बरेच विस्तारण्याचे आणि महाराष्ट्राचा चित्रकलाकोश म्हणूनच ते सादर करण्याचे ठरवले. त्यांची ती धावपळ गेली तीन-चार वर्षे चालू होती. इतिहासपूर्व काळापासून आधुनिक काळापर्यंत अशा नोंदी वाढल्या. त्यांचा हा प्रवास ढवळीकर-देगलूरकर-जामखेडकर यांच्यापुढे जाऊन आदिवासी, ग्रामीण ते अभिजन कला असा झाला आहे. त्यांनी त्यात कलासंस्थांच्या चरित्रांचा समावेशदेखील केला आहे. बहुळकर म्हणाले, की आमची प्रस्तावनाच अठ्याहत्तर पानांची झाली आहे. प्रस्तावनेतील प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्द लिहिताना दम निघाला, पुन्हा ते सारे काम इंग्रजीत! त्यांना ऐतिहासिक व पुरातत्त्वीय संदर्भ तपासण्यास पार्ल्याच्या साठे कॉलेजचे प्रा.सूरज पंडित यांची मदत झाली – ‘माझे सकाळचे अनेक तास त्या कॉलेजातच गेले आहेत’ असे बहुळकर म्हणाले. इंग्रजी तपासण्याचे काम करण्यात शांता गोखले यांची मदत झाली. चित्रकार सुधीर पटवर्धन व दिलीप रानडे यांचे एकूण सहकार्य होते.
बहुळकर चित्रकलेच्या क्षेत्रात संवेदनेने वावरतात. त्यामुळे त्यांना कलाइतिहासाचे विलक्षण भान आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडून गेल्या, त्यांची यथायोग्य नोंद नाही ही गोष्ट त्यांना खंतावते. पण ते फक्त उमाळा काढत बसत नाहीत. ते ती कामे करतात. त्यांनी मध्ये एशियाटिकसाठी ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’चा इतिहास लिहिला. त्यांच्या हाती आता दलालांची चित्रकला, कलेतील नग्नता अशी तीन-चार संशोधनपर कामे आहेत. त्यात तीन-चार वर्षे जातील. त्यामुळे स्टुडिओतील काम मागे पडते. ‘माझे प्रदर्शन 2015 साली पाच वर्षांपूर्वी भरले होते. त्यामुळे ब्रश कधी कधी खुणावतो, पण ब्रश की लेखणी यांत सध्या तरी लेखणीची ओढ जास्त वाटते, लेखनात रमतोय’ अशी बहुळकर यांनी टिप्पणी जोडली.
सुहास बहुळकर 9820942165 suhasbahulkar@gmail.com
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
—————————————————————————————————————-
‘एनसायक्लोपीडिया ऑफ आर्ट इन महाराष्ट्र’ ग्रंथाचे मुखपृष्ठ |
‘एनसायक्लोपीडिया ऑफ आर्ट इन महाराष्ट्र’ ग्रंथाचे मलपृष्ठ |
बहुळकर यांनी विवेक साप्ताहिकाच्या दृश्यकला ग्रंथाचे संपादन केले. |
Respected sir, plz continue both of this( Brush or pen ) cause of us , painting and brilliance .Thank u with warm regards
Artist/ DesignerVijay Waghare
Artist / DesignerVijay Waghare
श्री बहुळकर यांचे काम खूप मोठे आहे .लेखनाबरोबर त्यांनी चित्रकलेला पण प्राधान्य द्यावे. सौ,अंजली आपटे.
बहुलकर आणि घारे सरांची धावपळ आणि चिकाटीने काम करत राहण्याची ऊर्जा मी अनुभवली आहे.सा.विवेकच्या प्रभादेवी येथील कार्यालयात हे काम चालू होते.
बहुलकर, हे व्यंगचित्रकार सुद्धा आहेत हे माहिती नव्हते.प्रसिद्ध छत्रकार आहेत हे माहिती आहे. काम खूळ खूपच सुंदर आहे. या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली, त्या बद्दल धन्यवाद.