लेकास निरोप

0
37

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने….

शेक्सपीयरचा जन्मदिन २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका उता-याचा अनुवाद सादर केला आहे. तो आहे लेकास निरोप या स्वरुपाचा त्याचे महत्त्व आजच्या काळात प्रत्येक आईला व तिच्या लेकाला वा लेकांना स्वाभाविकपणेच कळून येईल..

लेकास निरोप

अरे, लिऍंटर्स, अजून इथेच तू?

आवर, आवर, प्रवासाची वेळ झालीय…

बोटीत बसायची वेळ झालीय…

बघ, तुझ्या बोटींच्या शिडांवर… वारं आरूढ झालंय…

तू निघालायस, …आशीर्वाद आहेतच माझे… पण थांब…

बाहेर देशी जातोयस… वागण्याच्या काही रीतीभाती

सांगतो तुला… स्मृतीमध्ये कोरून ठेव त्या तुझ्या…

ऐक…

तुझ्या विचारांना शब्दरूप देण्याच्या फंदात कधीसुध्दा पडू नकोस…

आणि अस्थिर, वेडयावाकडया विचारांना कृतीत कधीच आणू नकोस…

सगळयांशी समरसून वाग… पण वागताना, हीनतेकडे झुकू नकोस…

तुला नवनवे मित्र मिळतील…

त्यांची मैत्री पारखून घे…

अशा मित्रत्वाला बांधून ठेव पोलादी कणखर साखळी…

सारख्या भावबंधनानं…

आकर्षणांना भुलू नकोस…

अननुभवानं नाही त्या गर्तेत पडू नकोस…

क्षणकाल मोहात टाकणारे प्रसंग येणार नाहीत, असं नाही पण सावधानतेनं वाग…

संयमानं वाग…

भांडणांमध्ये उगाच व्यर्थ वेळ घालवू नकोस…

भांडणांना सामोरं जाण्यापूर्वी सावध राहा…

आणि जर का कधी केलंसंच धाडस, तर अशी जिरव त्या शत्रूची…

की पुढच्या वेळेस तोच सावध होईल… तुला सामोरी यायला…

आजुबाजूच्या सर्वांचाच कान देऊन ऐक…

मात्र तुझा आवाज फार थोडयांसाठी जपून ठेव…

भेटणाऱ्या प्रत्येकाचं मत विचारांत घे…

पण तुझा निर्णय हा तुझाच असायला हवा.

तुझ्या खिशातल्या पैशांना विचारून, तुझ्या छंद-सवयींचे तू लाड कर…

त्या छंदांनाही विविधता हवी, संपन्नता हवी मात्र भडकपणा नको…

चोखंदळ राहा, चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी…

कारण जिथे तू चाललायस, त्या देशातले, फ्रान्समधले खरे दर्जेदार लोक चांगल्या गोष्टींबद्दल फार चोखंदळ असतात, बरं…

अगदी तुम्ही घातलेल्या पोषाखापासून…

पैशांच्या बाबतीत…

मित्रांकडून पैसे कधी उसने घेऊ नकोस…

अथवा उसने देऊही नकोस…

अशाने गमावशील तू ते पैसे आणि तो मित्रही…

उसने घेण्याच्या सवयीने…

बेदरकार खर्च करायला लागशील दुसऱ्यांच्या पैशांवर…

आत्ताच तर शिकायचे आहे तुला…

आहे त्या पैशांत नीटनेटकेपणाने भागवण्याचे कसब…

हे तर लक्षात ठेवच, पण या सगळयापेक्षा महत्त्वाचे…

तू प्रामाणिक राहा, तुझ्या स्वत:शी… तुझ्या आत्म्याशी…

रात्रीनंतर दिवस; या सत्याइतकेच सत्य तू सतत ठेव तुझ्या आचरणात…

असे वागलास, तर कधीच धाडस होणार नाही अपयशाचे…

तुझ्या वाटेला येण्याचे…

अच्छा, तर मग…

चल निघ आता बाळा…

माझे खूप खूप आशीर्वाद…

आहेतच तुझ्याबरोबर…

– आई

 

About Post Author

Previous article‘स्नेहसेवा’
Next article‘रक्ताचं नातं’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.