लुगडी

1
lugadi

सामान्यत:, स्त्रियांच्या नऊवारी वस्त्राला ‘लुगडे’ तर पाचवारीला ‘साडी’ म्हटले जाते. नऊवारीची मोहिनी मराठी मनावर एवढी आहे की लग्नसमारंभ अगर धार्मिक प्रसंगी पौढ स्त्रियाच नव्हे तर तरुणीही नऊवारीचा पेहेराव पसंत करतात.

राजा रविवर्मा  हा केरळमध्ये जन्मलेला चित्रकार. त्याने द्रौपदी, सरस्वती वगैरे पौराणिक काळातील स्त्रिया आपल्या कुंचल्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. त्या स्त्रियांचा पोशाख निवडण्यासाठी त्याने भारताचा दौरा केला आणि मराठमोळ्या नऊवारीची निवड केली!   आतापर्यंत नऊवारी म्हणजे स्त्रीसौंदर्य खुलवणारे लुगडे असा माझा समज. पण एकदा वाचनात आले की संत तुकारामां नी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘धुवीन मी संतांची लुगडी.’   त्यावरून कुतूहल जागृत झाल्यामुळे ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त दिलेला अर्थ पाहिला तो असा आहे: ‘साधारणपणे वस्त्र (पुरुषाचेसुद्धा); मानाचा पोशाख; कापड; देशमुख-पाटील ह्यांना पूर्वी वस्त्रे देत त्यांना ‘लुगडी’ अशी संज्ञा होती.’ लुगड्याचा वरील अर्थ संत तुकारामापूर्वीपासून चालत आलेला होता. उदाहरणार्थ:

  • वधुवरांचीय मीळणीं l वर्‍हाडीयांहि लुगडी लेणीं ll

(संदर्भ: ज्ञानेश्वरी ११.३)

  • गुजराती लुगडें l

( संदर्भ: ज्ञानदेवाचे अभंग, ३५)

  • आंगीची लुगडी काढा फेडा म्हणती l

(संदर्भ: तत्रैव, ४३)

  • वटेश्वर चांगा वहातो लुगडीं l

(संदर्भ: चांगदेवाचे अभंग,- ६)

  • पातळां लुगडे यांतुनि तैसे: आवएव दिसताति l

(संदर्भ: रुक्मिणीस्वयंवर, ३)

  • एरडवती लुगडां बाधौनि नावेक कांजीये आवषुति
  • ·(संदर्भ: पंडित विठ्ठल गलंड विरचित वैद्यवल्लभसंहिता, ३)
  • अंगीची लुग़डी काढूनिया घेती l तुज बांधोनिया नेती यमदूत ll

(संदर्भ: श्रीनामदेवगाथा, १७१)

  • गोसावीयांसि बरवीं लुगडीं ओळगविली l

(संदर्भ: लीळाचरित्र, पूर्वार्ध, ३१)

  • अर्ध लुगडीं गोसावीयांखालीं आंथुरली: अर्ध पांगुरविली ll

(संदर्भ: लीळाचरित्र, उत्तरार्ध ६५४)

  • दीप्तीचीं लुगडीं l दीपकलिके तूं वेढी ll

(संदर्भ: श्रीज्ञानदेव, अनुभवामृत, ७४५)

  • जेवि नाममात्र लुगडें l येर्‍हवि सूतचि उघडें ll

(संदर्भ: ज्ञानदेव, चांगदेव पासष्टी, )

  • ऐसे ठाकले मंडपातळी l महापंडित भगवीं लुग़डी

तो बलदेवास म्हणे वनमाळी l कीं हे पांडव वोळखे

(संदर्भ: कृष्णायाज्ञवल्कि, कथाकल्पतरू,५-१३-१३)

मराठी संतांच्या साहित्यात ‘लुगड्या’बद्दल असे अनेक उल्लेख आहेत. एवढेच काय, ते ताम्रपटातही आढळतात. उदाहरणार्थ, खातेगावच्या ताम्रपटातील उल्लेख पाहा:   ‘तुमासि आमिं थानेमाने लुगडिं विडा गंध आकेत दिधले’   स्वराज्यकाळी व पेशवाईतही ह्याच अर्थाने ‘लुगडे/डी’ शब्द वापलेला आढळतो. वानगीदाखल पाहा:

  • लुगडी दिली हेजीबाला l हेजीब बेगी रवाना झाला l

(संदर्भ: केळकर, य.न., ऐतिहासिक पोवाडे, १९२७ पृष्ठ १३)

(हेजीब: वकील, मध्यस्थ, बोलणी करणारा)

  • मालोबा गोसावी तुकोबा गोसावी याचे पुत्र वस्ती मौजे देहू यासी वर्षासनाची मोईन होन पातशाही लुगडियाबद्दल गला जोडी बारुले मापे वगैरे.
  • ·{मोईन: वर्षाची नेमणूक, पगार, तैनात; होन पातशाही: होनाचा एक प्रकार; बारुले: बारा पायंल्यांचा (मण, खंडी वगैरे) संदर्भ: पेशवे दप्तर, ३१ पृ. ३}
  • ·अशा प्रकारे पुरुषांचा मानाचा पोशाख़ असा लुगडे या शब्दाचा अर्थ पेशव्यांच्या काळापर्यंत प्रचलित होता. मग लुगडे म्हणजे ‘साधारणत: सोळा हात लांब व दोन हात रुंद काठपदर असलेले बायकांचे रंगीत वस्त्र’ (महाराष्ट्र शब्दकोश)असा अर्थ कधी प्रचलित झाला?

(एक हात=१इंच; सोळा हात=वार; दोन हात=१ वार)

 

संकलित अधिक माहिती :

कोटकामते  येथील भावई उत्‍सवात गावातील पाच मुलांना निवडून, त्‍यातल्‍या चार जणांना लुगडी नेसवून जोगिणी बनवले जाते. या प्रथेवर इतिहासअभ्यासक भालचंद अकोलेकर यांनी असे म्‍हटले आहे, की पूर्वीच्‍या काळी पौरोहित्‍याचा मान स्त्रियांकडे होता. कालांतराने हा मान पुरूषांनी हिसकावून स्‍वतःकडे घेतला असावा. मात्र देवाची पूजा करताना देवास फसवण्‍याच्‍या उद्देशाने पुरूषांकडून स्‍त्रीवेष धारण केला जाऊ लागला असावा.  

संदर्भग्रंथ

दाते, य.रा. व कर्वे, चिं.ग., महाराष्ट्र शब्दकोश, विभाग सहावा, १९८, पृ- २७०

Tulpule, S.G. and Feldhaus, Anne, A Dictionary of old Marathi, Popular Prakashan, Mumbai, 1999, p- 611

क़ेळकर, य.न., ऐतिहासिक शब्दकोश, दुसरी आवृत्ती, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, नोव्हेंबर २००६, पृ. ६९

– सुरेश वाघे, दूरध्‍वनी – 022-28752675

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version