माझा एक मित्र मिलिटरीच्या सिलेक्शन बोर्डावर होता. तो मला म्हणाला, की ठाण्या-मुंबईतील फक्त अकरा टक्के जागा जेमतेम भरल्या जातात. त्याच्याकडे तेव्हा त्या इलाख्यातील जवळ जवळ एकशेबासष्ट व्हेकेन्सी होत्या. तो म्हणाला, “मी त्या दुसरीकडे पाठवून देणार आहे.” मी त्याला म्हटले, “आमच्याकडे इतकी मुले बेकार आहेत, की विचारता सोय नाही. त्यांना नोकऱ्या नाहीत आणि तू हे काय करत आहेस?” त्यावर तो म्हणाला, “येथील मुले सिलेक्शनलाच येत नाहीत, तर मी काय करू?” मी त्याला म्हणतो, “मी तुला मुले आणून दिली तर?” त्यावर तो म्हणाला, “त्यांची पात्रता असेल तर त्यांना नक्की भरती करू.” ते काम मी चॅलेंज म्हणून घेतले. ताबडतोब कामाला लागलो. वर्तमान पत्रात जाहिरात दिली – अशी अशी भरती होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता, शैक्षणिक क्षमता वगैरे वगैरे. त्या ठिकाणच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना सांगितले, की ‘ही बातमी तुम्ही तमच्या माहिती पत्रकातून द्या’. ठाणे शहरातील गावागावांत बॅनर्स, पोस्टर्स, पत्रके लावली. तेव्हा माझी धारणा अशी होती, की मुलांना या भरतीविषयी काही माहिती नसते, म्हणून ती येत नाहीत. मी त्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले.
भरतीचा दिवस उजाडला. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे जवळ जवळ दीड हजार मुले जमा झाली. माझा मित्र म्हणालेला, की भरतीसाठी कोणीच येत नाही. त्यामुळे तेवढी मुले पाहून मला आनंद झाला, की ‘चला एवढी मुले आली!’ त्यांची पहिली परीक्षा होती ती पाच मिनिटे चाळीस सेकंद एवढ्या वेळात एक मैल धावण्याची. मुले जशी धावू लागली तसा माझा उत्साह कमी होत गेला. कारण शंभर मुलांपैकी फक्त तीन किंवा चार मुले त्या परीक्षेत पास होत, बाकी सर्व मुले नापास! तो प्रकार पाहिल्यावर मला धक्काच बसला! ती मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम नव्हती! त्यामुळे मला असे वाटले, की मुलांना या सिलेक्शनविषयी नीट ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. जी थोडीफार मुले ‘फिजिकल टेस्ट’मध्ये निवडली गेली होती, त्यांतील काही मुले ‘मेडिकल टेस्ट’मध्ये बाद झाली. काहींचे दात किडले होते, काहींच्या कानात व्हॅक्स होते. हे काही मिलिटरीत चालत नाही. मुलांना त्याविषयी माहितीदेखील नव्हते. तेव्हा मी ठरवले, की आपण नुसता प्रोपागांडा करून चालणार नाही, तर त्या मुलांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
मग मी ती मोहीमच हाती घेतली. आम्ही शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन मुलांना माहिती देऊ लागलो. ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील उचाट या गावी कॅप्टन मोरे म्हणून आर्मीतील रिटायर्ड कॅप्टन राहतात. आम्ही त्यांच्याबरोबर तेथे मुलांसाठी सैनिकी प्रशिक्षण शिबिरे सुरू केली. त्यांच्या गावात ज्युनियर कॉलेज आहे. आम्ही तेथील हॉलमध्ये शिबिर घ्यायचो. आम्ही वाडा-मोखाडा-पालघर या भागातील आदिवासी मुले प्रशिक्षणासाठी घेत होतो. तेथे त्यांना धावणे, पुलअप्स करणे, लांब उडी मारणे अशा प्रकारचे शारीरिक प्रशिक्षण द्यायचो. आम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यास घेण्यासाठी तेथील कॉलेजमधील प्रोफेसर मदत करत.
त्या प्रशिक्षणासाठी भरपूर पैसे घेतले जातात, आम्ही मात्र ते प्रशिक्षण मोफत घेत असू. मी ‘रोटरी क्लब’चा सदस्य होतो. मी प्रशिक्षणाबाबतचा हा विचार तेथे मांडला. त्या सर्वांनी सहकार्य करण्याचे कबूल केले. त्यासाठी आम्ही दरवर्षी चाळीस-पन्नास हजार रुपये जमा करायचो. एका मुलाचा एक महिन्याचा खर्च 1888-89 साली एक हजार रुपयांत भागायचा. अशा प्रकारे, आम्ही चाळीस ते पन्नास मुलांना दरवर्षी प्रशिक्षण द्यायचो. कॅप्टन मोरे यांच्या पत्नी निष्ठेने सहकार्य करत. त्यांनी त्यांचा एक महिला ग्रूप तयार केला आणि मुलांना जेवण देण्याची जबाबदारी घेतली. आम्ही महिन्याभराच्या कॅम्पच्या शेवटी ग्रामीण आरोग्य केंद्रातून आरोग्यतज्ज्ञ बोलवायचो. ते सर्व मेडिकल चेकअप्स करायचे. पहिल्या बॅचमध्ये साठ मुले होती. त्यांपैकी चाळीस मुले सैन्यात सिलेक्ट झाली! त्यामुळे आमचा उत्साह वाढला. ‘रोटरी’मधून जी रक्कम मिळायची ती नंतर जशी हळुहळू महागाई वाढत गेली तशी कमी पडू लागली. मग मी व कॅप्टन मोरे एक छोटा टेम्पो घेऊन धान्याच्या व्यापाऱ्यांकडे जाऊन ‘भिक्षांदेही’ करायचो. आम्ही सांगायचो, की पैसे देऊ नका. तांदूळ द्या, तेलाचा डब्बा द्या आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे आम्ही असे अनेक कॅम्प घेतले.
त्या दरम्यान, एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे शहरातील मुले शक्यतो सैन्यात जाण्यास तयार होत नाहीत. कोणी तयार झाले तरी त्यांचा परफॉर्मन्स चांगला नसतो. शहरातील मुलांना इतर आकर्षणे खूप असतात. बारावी पास झाल्यावर कॉम्प्युटर येत असले, की मॉलमध्ये नोकरी मिळते. त्यांना कॉलसेंटर्ससुद्धा कामासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे शहरातील मुले लष्करात जाण्यास इच्छुक नसतात. तसेच, त्यांना सैन्याविषयी तितकी माहितीही नसते. मग मी शहरातील मुलांना ऑफिसर्स ट्रेनिंगसाठी तयार करण्यास लागलो. आम्ही शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन नववी/दहावी/अकरावी/बारावीच्या मुलांना त्याबद्दल लेक्चर्स द्यायचो. भारतात बहुतेकांच्या डोक्यात भिनलेले असते, की सैन्यात गेले, की माणूस मरतो. सुरुवातीला, मी पालकांच्या सभा घेऊन त्यांच्या डोक्यातील ती भीती काढायचो.
सैन्याविषयी बोलताना, त्यातील बेनिफिट्समध्ये अडथळ्यांची चर्चा जास्त होते असे मला वाटते. सैन्यात गेले म्हणजे बर्फात, लेह-लडाखसारख्या एक्स्ट्रा क्लायमेंटमध्ये कित्येकदा राहवे लागते. घरी जास्त जाता येत नाही. हा एक भाग आहे, पण त्या बरोबरीने अनेक चांगल्या गोष्टीही सैन्यात आहेत. त्या तरुणांना आधी सांगायला हव्यात. मी पालकांना आणि मुलांना सैन्यातील काही फॅसिलिटी अशा आहेत, की ज्या इतर करियरमध्ये नाहीत ते पटवून द्यायचो.
माझ्या त्या प्रयत्नांना यशही बऱ्यापैकी आले आहे. सुगंधा खांझोडे ही आमच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची विद्यार्थिनी आर्मीमध्ये मेजर होऊन रिटायर्ड झाली. अश्विनी कदम (उल्हासनगर), एअरफोर्समध्ये गेली. अक्षदा भोळे एअरफोर्समध्ये स्कॉड्रन लिडर आहे. भूपाली वडके ही एअरफोर्समध्ये पायलट आहे. त्या मुलींना आम्ही ट्रेनिंग देऊन सैन्यात पाठवले. मला असे वाटते, की तरुणांमध्ये अजूनही पाहिजे तितकी सैन्यात जाण्याची ओढ नाही, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे हल्लीच्या पिढीमधील मुली सैन्यात जाण्यासाठी उत्सुक असतात. हे चित्र मला आशादायी वाटते. माझ्याकडे मिलिटरी ट्रेनिंगविषयीच्या विचारणा येतात, त्यात साठ टक्के मुलींच्या असतात. ते ट्रेनिंग देताना माझ्या मनात आले, की आपण मुलांना लहानपणापासून लष्कराविषयी माहिती द्यायला हवी, तरच त्यांच्यात सैन्यात जाण्याचा भाव निर्माण होईल. त्यांना लष्कराचे महत्त्व कळेल. त्यासाठी आम्ही ‘संडे मिलिटरी स्कूल’ स्थापन केले. आम्ही शाळेतील मुलांना रविवारी सकाळी प्रशिक्षण द्यायचो. त्यांना पीटी, स्टॅमिना डेव्हलपमेंट, रायफल शूटिंग, मॅप रीडिंग, डिझॅस्टर मॅनेजमेंट या गोष्टी तेथे शिकवायचो. त्या त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडण्यासारख्या आहेत. तसेच, त्यांच्या मनात आर्मीविषयी कुतूहल जागृत होईल आणि त्यातून काही मुले आर्मीत जातील हाही हेतू होताच. त्या मुलांना आम्ही मिलिटरी कॅम्प दाखवण्यास न्यायचो. त्यापाठी उद्देश हा होता, की त्यांना लष्करी जीवन- ती माणसे जवळून बघण्यास मिळावीत. त्यांच्यामधील शिस्त, ते कसे बोलतात?- कसे चालतात?, त्यांचे ट्रेनिंग कशा प्रकारचे असते?, त्यांच्यावर काय प्रकारची जबाबदारी असते? हे सर्व विद्यार्थ्यांना दाखवणे मला आवश्यक वाटले. कारण सीइंग इज बिलिव्हिंग! मुलांनी स्वत:च्या डोळ्यांनी एकदा चांगली गोष्ट बघितली, की ती त्यांच्या हृदयात पक्की बसते. आमचे एक नातेवाईक एअरफोर्समध्ये होते. ते पुण्यामध्ये असताना, त्यांच्या परवानगीने, आम्ही आमची शंभर मुले तेथे घेऊन गेलो. तेथील एक ग्रूप कॅप्टन होते. ते म्हणाले, की एवढी मुले येत आहेत, तर आपण त्यांना एक छोटासा एअर डिस्प्ले दाखवू. मग त्यांनी मुलांना विमानांची प्रात्यक्षिके दाखवली. मुलांना ते बघून फार आनंद झाला. मुलांनी तेथील काही पायलट अधिकाऱ्यांशी गप्पाही मारल्या. तेथल्या तेथे, दोन तासांत ते पायलट्स अंदमान-निकोबार येथे जाऊन टेहळणी करूनसुद्धा आले होते, याचे मुलांना कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले. त्यांपैकी दोन लेडी पायलट होत्या. त्यांना पाहून सहभागी मुलींनासुद्धा वाटले, आपणही त्यांच्याप्रमाणे पायलट व्हायला हवे.
भूपाली वडके ही माझी विद्यार्थिनी पायलट आहे. मी तिला एकदा ती सुट्टीवर आली असताना विचारले होते, की “आकाशात उडताना तुला कसे वाटते?” ती चायना बॉर्डरची रसद पोचवण्याचे काम करत असे. ती मला म्हणाली, की “कौन बनेगा करोडपती’मध्ये कोणाला एक करोड रुपये मिळाले, की लोकांना त्याचे प्रचंड कौतुक वाटते, पण माझ्या विमानाची किंमत चारशे पन्नास कोटी रुपये आहे आणि मी एकटीने ते विमान चालवत असते. त्या विमानात बसल्यावर माझ्या मनाला काय आनंद होतो ते मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही!” मला आपल्याकडील जास्तीत जास्त मुलींनी सैन्यात जावे असे वाटते. मी त्यांना त्याकरता नेहमी प्रोत्साहन देत असतो.
जवळ जवळ सर्व मुलांना ड्रायव्हिंगची व गाड्यांची फार आवड असते. मी त्यांना सांगतो, की अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या गाड्यांची किंमत जास्तीत जास्त किती असेल? सहा-सात कोटी. तुम्ही जर सैन्यात गेलात तर मी तुम्हाला कोट्याधीश बनवेन. आमचा जो आर्मीचा टँक असतो त्याची किंमत एकशेवीस कोटी रुपये आहे आणि ती गाडी तुम्ही चालवता. त्याचा मेंटेनन्स, फ्युएल सर्व सरकार बघते आणि तो टँक एकदा चालवला की त्या अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या गाड्या तुम्हाला खटारा वाटतील. सांगण्याचा मुद्दा असा, की संरक्षण दलातील जीवनात तरुणाच्या मनात निराळा आत्मविश्वास निर्माण होतो. साऱ्या भौतिक गोष्टींची किंमत वाटेनाशी होते.
आम्ही मुलांना अहमदनगरला ‘आर्म्ड कॉर्प्स’चे जे ट्रेनिंग सेंटर आहे तेथे नेऊन रणगाड्यात बसवून आणतो. तेथील अधिकारी मुलांना रणगाड्याची माहिती देतात. लढाईत रणगाडे वापरले कसे जातात, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. ‘एनडीए’ची पासिंग आऊट परेड दाखवतो, ‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी’ हे सर्व दाखवतो. सध्या आमचे काम ‘प्रभाव मिलिटरी अॅकॅडमी’ या नावाने चालते. त्यांचे कमांडर संदीप शिरगावकर आहेत.
आम्ही शाळांमध्ये जे मिलिटरी ट्रेनिंग घेतो त्यात फिजिकल ट्रेनिंग तर असतेच, पण त्याचबरोबर मानसिक प्रशिक्षणाचापण भाग असतो. मी मुलांना नेहमी सांगतो, की तुम्ही चालता कसे? वागता कसे? विचार करता कसा? हे अभ्यासाच्या बरोबरीने बघणे आवश्यक आहे. मुलांच्या मनावर साध्या साध्या गोष्टीतून शिस्त बिंबवता येते आणि मुले ती चट्कन आत्मसातही करतात. आपल्या देशाच्या प्रत्येक मुलामध्ये देशाभिमान हा असायलाच हवा.
Breaths there the man whose soul so dead who never to himself has said this my country, this is my motherland.
ज्या माणसाच्या मनात कधी आले नाही, की हा देश माझा आहे, या देशासाठी मी काहीही करण्यास सदैव तयार आहे; तो माणूस जिवंत असला तरी मेल्याप्रमाणेच आहे. मुलांमध्ये देशाभिमान बिंबवणे ही पालक व शिक्षक यांची जबाबदारी आहे आणि तो बिंबवलाच गेला पाहिजे असे माझे मत आहे.
– मेजर गावंड
Salutes to you and your work…
Salutes to you and your work,but that’s not enough.I have been reading about you for years,but it’s for the first time communication CH kept open,
Pl. mail me your address by mail,so I could get back to you with more details from my end.Regards.
Comments are closed.