लक्ष्मीपूजन (Laxmipoojan)

0
91

केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी ती आठ रूपे होत.

          लक्ष्मीपूजनात धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, चवळीच्या शेंगा वाहिल्या जातात. तसेच मसाला दूध आणि लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. मग पुढील मंत्राने तिची पूजा करतात

कमला चपलालक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया |
पद्मा पद्मालया सम्पदुच्चै: श्री: पद्मधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरे: प्रिया |
या गतिस्त्वत्पपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ||

          अर्थ – (हे लक्ष्मी,) तू सर्व देवांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणा-यांना जी गती प्राप्त होते, ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.

          लक्ष्‍मीपूजनाला लक्ष्मीसोबत कुबेराचीही पूजा केली जाते. कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किन्नरांचा अधिपती मानला जातो. कुबेराचा उल्लेख वैश्रवण असा केला जातो. बह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्य, त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असे सांगितले जाते. कुबेर हा संपत्तीचा रक्षण करणारा अशी श्रद्धा आहे. कुबेर हा शिवभक्त होता, म्हणून मंत्रपुष्पांजलीत त्याचा उल्लेख आढळतो. पूजमध्‍ये लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून पुढील मंत्राने त्याचेही ध्यान करतात

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च |
भवन्तु त्वत्पसादेन धनधान्यादिसम्पद: ||

          अर्थ निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेने (मला) धनधान्यादी संपत्ती प्राप्त होवो.

          त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे.

पुराणात असे सांगितले आहे, की आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व तिच्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तेथे ती आकर्षित होतेच; शिवाय, ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. लक्ष्मी व कुबेर यांची पुढील मंत्राने प्रार्थना करायची असते.

कमला चपलालक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया |
पद्मा पद्मालया सम्पदुच्चै: श्री: पद्मधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरे: प्रिया |
या गतिस्त्वत्पपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ||
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च |
भवन्तु त्वत्पसादेन धनधान्यादिसम्पद: ||

लक्ष्मीपूजन केल्याने पूजकाच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते आणि त्याला दु:ख-दारिद्रयाची बाधा कधीही होत नाही, असे त्याचे फल सांगितले आहे.

आंध्रप्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. त्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावल्या जातात. आश्विन अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.

आशुतोष गोडबोले

(आधार – भारतीय संस्कृतिकोश)

———————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here