रेडिओ सिलोन ऐकतो कोण!
– कुमार नवाथे
रेडिओ सिलोन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. सिलोन रेडिओ केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण गेली दोन वर्षे बंद होते. केवळ सकाळी सात ते साडेआठ या वेळांत ‘पुराने फिल्मों के गीत’, ‘एक ही फिल्म के गीत’, कुणाच्या जयंती-पुण्यतिथी निमित्ताने एखाद्या गीतकार, संगीतकार वा गायक-गायिकेची जुनी गाणी एवढाच सिलसिला जारी होता. हे कार्यक्रम अतिशय तुटपुंजे असूनही भारताच्या अनेक भागांत आणि त्याहीपेक्षा लाहोर-कराची-सिंध-लोईरीला या पाकिस्तानातील शहरा-गावांतून तुफान लोकप्रिय होते. या काळात रेडिओ केंद्रावर श्रोत्यांच्या फोनचा व पत्रांचा भडिमार खूपच जास्त असे. नव्वद टक्क्यांहून जास्त जणांचा रोख गाण्यांच्या शिफारशीपेक्षा अपुरा वेळ व संध्याकाळच्या बंद प्रसारणाबद्दलच्या तीव्र नाराजीचा होता.
जेव्हा संध्याकाळचे प्रसारण बंद करण्याचे ठरत होते तेव्हा योगायोगाने (का दुर्दैवाने) मी व गीत-संगीतकार सुधीर मोघे कोलंबोमधील रेडिओ स्टेशनवरच चार दिवस जवळजवळ मुक्कामास होतो. आमच्या भेटीचा उद्देश रेडिओ केंद्राचा कानाकोपरा बघणे, सा-या ध्वनिमुद्रिकांचे संग्रहालय बघणे, प्रत्यक्ष प्रसारित होणारे कार्यक्रम बघणे, शक्य असल्यास त्यात सामील होणे एवढा मर्यादित होता, पण पहिल्या दिवसापासूनच आमचा जीव जो त्या वास्तूत अडकला त्यातून सुटका होणे कठीण झाले आणि तशातच, खुद्द चेअरमननी आम्हाला तीन वेळा अगत्याने बोलावून घेतले. पहिल्या भेटीत, त्यांनी आमच्या मुलाखती, आमच्या आवडीच्या गाण्यांचा कार्यक्रमांत समावेश, आम्हाला छायाचित्रणाकरता विशेष परवानगी या सा-यांचे आदेश योग्य व्यक्तींना दिले. नंतरच्या दोन्ही भेटींत, त्यांनी रेडिओ केंद्राची पैशावाचून होणारी हलाखीची परिस्थिती विशद केली. एकूण गप्पांच्यापैकी हा एक विषय एवढे समजून माझे श्रवण चालू होते. त्यामध्ये भारतातून वा कुठूनही कार्यक्रमाकरता कुणीही प्रायोजक पुढे येत नसल्याची खंत होती व त्याकरता कुणीतरी प्रयत्न करावा अशी त्यांची अपेक्षा होती.
हा कुणीतरी म्हणजे मी होतो, हे शेवटच्या दिवशीच्या भेटीत मला समजले! कारण त्यानंतर आर्थिक आणि व्यापार विभाग सांभाळणा-या दोघांची माझ्याबरोबर गाठ घालून देण्यात आली. त्यांनी सविस्तर कार्यक्रम व प्रायोजकत्वाचे दर असे पत्रकच माझ्या हातात दिले. ते सारं समजावून घेईपर्यंत चेअरमननी त्यांचा निर्णयच मला सांगितला.
रेडिओ केंद्राचा हिंदी विभाग चालवण्याचे फक्त वीजवापराचे बिल महिना पाच लाख रुपये होते. बाकी सारे खर्च वेगळे. हा भार मी कोणा जाहिरातदारांकडून, प्रायोजकांकडून मिळवून द्यावा, म्हणजे कार्यक्रम चालू राहतील, पण ते न मिळाल्यास दोनच दिवसांनी म्हणजे 30 मार्च रोजी केंद्र नाईलाजाने संध्याकाळचे कार्यक्रम बंद करेल व सकाळच्या कार्यक्रमाची वेळ कमी करेल असे जणू निर्वाणीचे त्यांनी मला सांगून टाकले. हा माझा खाजगी मामला नसतानाही भारतात नेहमी हजारो कोटींच्या भाषेत बोलणा-यांकडून महिना पाच लाख मिळवणे काहीच अवघड नाही असे वाटून मी तिथे सारे कबूल केले. एवढीशी रक्कम एवढया लोकप्रिय रेडिओ केंद्राकरता मिळवणे हातचा मळ नसला तरी कठीण नाही या आशेने मी भारतात परतलो. मी मुंबईत पोचायच्या आधीच मला मेल आला होता. चेअरमनसाहेबांचा, माझे आभार मानणारा. पाच लाखांची कबुली दिल्याचा आणि स्टेशन बंद न करता चालू ठेवण्याच्या निर्णयाचा.
पुढचा सारा महिना सिलोनप्रेमींना फोनाफोनी करण्यात गेला. मी प्रत्येकाला-गुजरात-कर्नाटक-दिल्लीपासून दुबईपर्यंतच्या लोकांस- मदतीचे आवाहन करत होतो. प्रायोजकत्वासंबंधी विनंती करत होतो. असंख्य श्रोत्यांनी ही बातमी कळताच उलटे मला फोन केले व त्या सा-या प्रकाराने हसावे का रडावे हेच मला समजेनासे झाले. आपण सगळ्यांकडून वर्गणी गोळा करू, म्हणून प्रत्येकजण मला सांगत होता व त्याचे नेतृत्व, खजिनदारपद मी भूषवावे असा आग्रह होता. सत्यनारायणाच्या वर्गणी पातळीवर हे सारे आल्यावर मी तत्संबंधी फोन करणे आणि स्वीकारणे बंद केले.
दरम्यान, दहा दिवसांनी चेअरमन, रेडिओ सिलोन यांच्या कार्यालयाकडून चेक कधी पाठवता म्हणून फोन आला. पुढील पंधरा दिवसांत तो आणखी चार-पाच वेळा येऊन गेला.
मला प्रायोजक्त्वासाठी मिळणारा प्रतिसाद थंड होता. रेडिओ सिलोन अजून चालू आहे? म्हणून प्रश्न पहिला विचारला जायचा आणि आम्ही न चुकता ‘बिनाका गीतमाला’ कसे ऐकायचो त्या स्वप्नरंजनात जाऊन विषय भरकटला जायचा. जुनी गाणी, त्यांचे महत्त्व, तो अमूल्य ठेवा… माझी सारी बडबड फुकट जायची. आणि कुठून मी हे कबूल करून बसलो म्हणून मी स्वत:लाच दोष देत राहायचो.
26 मार्च 2008 रोजी श्रीलंकेहून फोन आला, तो त्यांच्या निर्णयाचा होता. उद्या रात्रीची सभा शेवटची. परवापासून सायं सभा आम्ही बंद करत आहोत!
आणि खरोखरच, 28ची संध्याकाळ निदान मला तरी घरातल्या कुठल्यातरी जवळच्याच्या निर्वाणाइतकी भयंकर शोकाकुल वाटली. एखाद्या व्यक्तीचे त्यावेळचे तिथे असणे आणि आता तिचे अस्तित्वही नसणे ही दरी मला भेसूर वाटू लागली.
त्यानंतर पुढील दोन वर्षें, आम्ही सारे अनोळखी सिलोन प्रेमी एकमेकांस प्रत्यक्ष न भेटता एका कामामुळे अखंड जोडले गेलो होतो. इंदूरचे कैलाश शुक्ला, दिल्लीचे चंदर नवानी आणि मुंबईहून मी श्रीलंकन हायकमिशन, भारतीय दूतावास, परदेश सचीव, स्थानिक मंत्री जे जे भेटतील त्यांना पत्रे पाठवत होतो. भेटीकरता वेळ मागत होतो. जुने दाखले देत होतो. भारतीय असूनही श्रीलंका या परदेशी रेडिओ केंद्राचे महत्त्व व वेगळेपण पटवून देत होतो.
पैसा ही फक्त मुख्य मेख होती. मी ‘लोकसत्ते’च्या कुमार केतकरांना सारी
कथा-अथपासून इतिपर्यंत आणि मला एकूणच आलेल्या अपयशाबद्दल-कथन केली. केतकरांनी आश्चर्य दाखवून या सा-या चित्रपट उद्योगाबद्दल प्रचंड नाराजी नुसती व्यक्त केली नाही, तर ताबडतोब मला एक मोठा लेख लिहिण्यास सांगितले. जे मनात गेले काही महिने दडपून राहिले होते ते कागदावर येण्यास जराही वेळ लागला नाही. हा लेख नुसता न छापता, त्याच लेखाच्या वरच्या भागात एक अतिशय प्रभावी याच विषयाला धरून त्यांनी अग्रलेख लिहिला. दोन्ही लेखांवर चांगल्या पण (कोरड्या) प्रतिक्रिया भरपूर आल्या.
मला यातून बाहेर येण्याचा एक मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे जे कोणी मदत करू शकतील वा ज्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे व ज्यांच्याकडे जाहिरातीकरता निधी उपलब्ध आहे त्यांस भेटणे, सारे पटवून देणे आणि किमान लाख रुपयांची जाहिरात मिळवणे. याही ठिकाणी, कुमार केतकरांनी स्वत: पुढाकार घेऊन भेटीची वेळ व जागा निश्चित करून माझ्याबरोबर येण्याचे माझी-माझ्या कामाची ओळख करून देण्याचे कष्ट, त्यांच्या नेहमीच्या व्यस्त वेळांतही घेतले; पण कुमार केतकर आमच्याकडे आले होते या बातमीशिवाय गाडी पुढे सरकली नाही. दुर्दैव रेडिओ सिलोनच्या श्रोत्यांचे!
बारिकसारीक प्रयत्नांची जंत्री दिली तर छान पुस्तक होईल, एवढा मसाला दोन वर्षांत तयार झाला होता. पण तो न देता एवढेच सांगता येईल, की जो कोणी भेटेल त्याला या विषयाव्यतिरिक्त मी काहीच नवीन सांगत नव्हतो. पुढे काय झाले म्हणून एखाद्या सिलोनप्रेमी श्रोत्याचा फोन आला तर प्रथम त्याला त्याच्या नावे, मित्रांच्या नावे आठ-दहा-वीस पत्रे सिलोन-कोलंबोला पाठवायला सांगत होतो. संध्याकाळची सभा सुरू करा, सकाळची वेळ वाढवा असे आग्रहाने लिहायला सांगत होतो. चेअरमनच्या नावे फॅक्स करा म्हणून फॅक्स क्रमांक देत होतो. एवढे प्रेम असेल तर पत्रांसाठी वीस-बावीस रुपयांचा खर्च सोसा म्हणून आर्जवेही करत होतो.
कैलाश शुक्ला, चंदर नवानी व मी स्वत: जुलै 2010 मध्ये दिल्लीस जायचे नक्की केले. सुशीलकुमार शिंदे यांच्यामार्फत निरूपमा राव-फॉरीन सेक्रेटरी यांना भेटायचे; निश्चित आश्वासन मागायचे हेही ठरवले होते. भूतानमध्ये ‘सार्क’ परिषद झाली. त्यांना आम्ही पत्र पाठवले आणि भारत व श्रीलंका सरकारांनी ‘आमन की आशा’ या धर्तीवर हिंदी चित्रपट संगीत, जे रेडिओ सिलोनवरून प्रसारीत होते व भारत-पाकिस्तानला घट्ट बांधून ठेवते त्यास सढळ हातांनी मदत करावी म्हणून विनंती केली. हा विषय सार्क परिषदेत चर्चेला येणार नव्हता याची खात्री होती, पण आमचे पत्र, हा विषय दाखल करून घेतला गेला याचेही समाधान कमी नव्हते.
3 जून 2010 रोजी सकाळच्या कार्यक्रमात उद्धोषिका ज्योतीने अब सुनिये एक खुशखबरी म्हणून, उद्यापासून रात्रीची सभा चालू होत आहे म्हणून सांगितले आणि अक्षरश: कित्येक फोन, एसएमएस तिच्यापर्यंत जाऊन पोचले. (कदाचित माझा एसएमएस पहिला असावा, कारण बातमी ऐकता ऐकताच तो टाईप करून बातमी संपायच्या आत पाठवलाही होता.) ज्योतीचा पुढचा बराच वेळ गाणी ऐकवण्याऐवजी या आनंदात सहभागी झालेल्यांचे आभार मानण्यात गेला. मी त्याचवेळी पन्नास-साठ जणांना ही बातमी एसएमएस केली आणि लगोलग पुण्याचे ‘लोकसत्ता’चे सुनील देशपांडे यांचा अभिनंदनाचा फोन आला. ते स्वत: आमच्यासारखेच वेडे आहेत त्यांनी लोकसत्तेत ही बातमी सविस्तर दिली.
सकाळच्या बातमी-प्रसारणाचा आणि वर्तमानपत्रातील विशेषउल्लेखाचा अपेक्षित परिणाम पहिल्या दिवसापासूनच जाणवू लागला. लोईराला पाकिस्तानमध्ये गावक-यांनी रात्री नऊच्या आधी एकत्र जमून, ढोल बडवून, नाच-गाणी म्हणून व मिठाई वाटून कार्यक्रमाचे स्वागत करायचे ठरवले. सारे रेडिओसमोर बसून नऊ वाजता कार्यक्रम ऐकणार होते. बोरिवली, मुंबईच्या पारेख कुटुंबाने ‘संध्या. प्रसारणा’च्या आगमनानिमित्त नऊ वाजता मोठ्या मेजवानीचे आयोजन केले. पुण्यात उषा सप्रे व अनंत सप्रे या रसिक दांपत्याने रेडिओ सिलोनची उदघोषिका पदमिनी परेरास या आनंदाप्रीत्यर्थ खास आमंत्रित करून पन्नास-साठ लोकांच्या उपस्थितीत एका सुरेल मैफलीचे आयोजन केले. जुन्या अवीट गोडीच्या तेहत्तीस गीतांचा श्रवणसोहळा पदमिनीच्या खास ‘सिलोन स्टाईल’ निवेदनाने, प्रासंगिक शायरीने सिलोनच्या संध्याकाळच्या सभेची आठवण पुलकित करून गेला. तरुण बाळासाहेब सप्रे फक्त त्र्याहत्तर वर्षांचे! तर त्यांच्या सुविद्य पत्नी उषा फक्त पासष्टीच्या, सा-या रसिकांना एवढाच आनंद देऊन थांबले नाहीत तर चविष्ट अन्नाच्या आग्रहाने अजूनही तृप्त करून गेले. नंदू नाटेकर, सुधीर मोघे हेही या आनंदात सामील होते. मुंबईत खास प्रेक्षागृहात अजित प्रधान या अशाच सिलोनवेड्याने पदमिनीला आमंत्रित करून एक संध्याकाळ जुन्या गाण्यांच्या ध्वनिफिती साठवून साजरी केली. अजूनही कुठे-कुठे या अडगळीत पडलेल्या रेडियोकरता, त्याच्या पुनरागमनाकरता सोहळे होत आहेत.
हे सारे धडपडणे कशासाठी, हल्ली रेडिओ कोण ऐकतो, देशातच एवढी मुबलक रेडिओ केंद्रे असताना बाबा आदमच्या जमान्यात जायची जरूरी काय, काय एवढे सोने लागलेय त्या रेडिओ सिलोनला? माझ्याकडेही याचे उत्तर नाही.
– कुमार नवाथे
फोन : (022) 26118309
भ्रमणध्वनी : 9869014486
ई-मेल : kumar.nawathe@hotmail.com