रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!

0
17

रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!

राजेंद्र शिंदे

साक्षेपी संपादक व ‘मौज प्रकाशना’चे सर्वेसर्वा श्री.पु.भागवत यांचा २१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. तीन वर्षांपूर्वी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, २१ ऑगस्ट २००८ रोजी त्यांच्याच महाविद्यालयाने (रूईया कॉलेज – जेथे श्रीपुंनी विद्यार्थी म्हणून अध्ययन केले व प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांस अध्यापन केले) आपल्या ग्रंथालयात स्मृतिदालन निर्माण करून त्यांना यथोचित श्रध्दांजली अर्पण केली. याकामी याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि श्रीपुंच्या स्नेही ‘उद्योजक’ अचला जोशी व श्रीपुंचे चिरंजीव डॉ. अशोक भागवत यांनी पुढाकार घेतला. तसेच, त्यांना रूईयाच्या माजी मराठी विभागप्रमुख व श्रीपुंच्या एम्.ए.च्या विद्यार्थिनी डॉ.मीना गोखले आणि माजी विद्यार्थी असलेले तरुण प्राचार्य डॉ.सुहास पेडणेकर यांची ‘मोलाची साथ’ लाभली.

डावीकडून प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, मंगेश पाडगावकर, कवी शंकर वैद्य, रामदास भटकळ, डॉ. अशोक भागवतरूईया कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे वळल्यावर विद्यार्थ्यांनी खुल्या हवेत मनसोक्त वाचन, मनन, चिंतन करावे यासाठी लॉनवर आसनांची व्यवस्था केलेली आहे. तेथून थोडे पुढे गेल्यावर दुस-या एका छोट्या गेटमधून व नंतर पॅसेजमधून इमारतीत जाताना सुरूवातीलाच, डाव्या बाजूच्या भिंतीवर ‘श्रीपु स्मृतिदालनाकडे’ असे बाणाने निर्देशित केलेले शब्द लिहिलेले आढळतात. तसेच पुढे गेलो, की आपण स्मृतिदालनात पोचतो. स्मृतिदालन कॉलेजच्याच ग्रंथालयात उभारलेले आहे. कॉलेजच्या ग्रंथालयात प्रवेश करताच समोर ग्रंथालयातील स्टाफसाठी असणारे ऑफिस टेबल, खूर्च्या वगैरे असलेली रूम दृष्टीस पडते. रूममध्ये आत शिरताच उजवीकडे असलेल्या दरवाजातून उपग्रंथपाल यांची कॅबिन दिसते, तर डावीकडे असलेल्या दरवाजातून कॉलेजच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा कपाटातील संग्रह लक्ष वेधून घेतो या दरवाजाकडे जाताना डावीकडेच कोप-यात हे श्रीपुस्मृतिदालन उभारले आहे. ते एक मोठे लाकडी व दर्शनी काचेचे दरवाजे असलेले कपाट अशा स्वरूपाचे आहे. श्रीपुंना मिळालेली विविध सन्मानचिन्हे, मानपत्रे, पुरस्कार; तसेच, ‘मौज’ प्रकाशनगृहाची डावीकडून वसंत सरवटे,विजया राजाध्यक्ष, के. ज. पुरोहित पती-पत्नीप्रकाशित सव्वादोनशे पुस्तके ठेवण्यात आली आहेत. श्रीपुंचीच ही इच्छा होती, की त्यांची सन्मानचिन्हे, मानपत्रे व पुरस्कार रूईया महाविद्यालयात जतन व्हावी. त्या इच्छेचा त्यांचे पुत्र डॉ.अशोक भागवतांनी मान राखला. त्यांनी आभारप्रदर्शनाच्या भाषणात म्हटले होते, की माझे वडील नास्तिक होते. कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांचा पहिला स्मृतिदिन कुठल्या त-हेने पाळावा, या दुविधतेत मी पडलो होतो. रूईया महाविद्यालयाने हा हृद्य सोहळा आयोजित करून, स्मृतिदालन उभारून माझ्या वडिलांचे वर्षश्राद्ध फार कल्पकतेने साजरे केले याबद्दल मी महाविद्यालयाचा ऋणी आहे…

डावीकडून पुरूषोत्तम बेर्डे, प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, लीना केदारेस्मृतिदालनाचे उद्घाटन मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी पाडगावकरांनी श्रीपुंच्या आठवणींना उजाळा दिला होता. ते म्हणाले, की मी गेली तीन वर्षे जवळपास रोज श्रीपुंकडे त्यांच्या शीवच्या ‘मातृस्मृती’मधील घरी जाऊन गप्पा मारत असे. एका आजारात श्रीपु विश्रांती घेत असताना; नवी सुचलेली कविता त्यांना वाचून दाखवायला घरी गेलो असताना, मी ‘उठू नको’ म्हणत असतानाही, ‘मग मी आजपर्यंत जगलो कशासाठी?’ असे विचारत श्रीपु आजार विसरून उत्साहाने उठून बसले व त्यांनी मला कविता वाचायला लावली. राज्यसरकारचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा प्रथम मला श्रीपुंचीच आठवण झाली. अलिकडे नवी कविता लिहिली, की तिचे कौतुक करायला श्रीपु आता या जगात नाहीत, या कटू जाणिवेने माझे डोळे भरून येतात.

‘मौज’ आपले अभावितपणे विद्यापीठ कसे बनले व गांधीजींकडे आपल्याला प्रथम आकर्षित श्रीपुंनी कसे केले आणि त्यामुळे गांधी-तत्त्वज्ञानावर आपण डॉक्टरेट मिळवली याची आठवण ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ यांनी सांगितली. त्यांनी श्रीपुंचा आपला ‘थोरला सोबती’ असा उल्लेख केला.

डॉ. अशोक भागवत, प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, मंगेश पाडगावकर, रामदास भटकळश्रीपुंचे साहित्यक्षेत्रातले योगदान नव्या पिढीला कळण्यासाठी हे दालन उभारल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी नमूद केले. रूईया महाविद्यालय व श्रीपुंचे नाते यावर रूईयाच्या माजी विभागप्रमुख व श्रीपुंच्या एम्.ए.च्या विद्यार्थिनी डॉ.मीना गोखले यांनी प्रकाश टाकला होता. अचला जोशी यांनी त्या प्रसंगासाठी ‘तलावातलं चांदणं’ हा दृकश्राव्य कार्यक्रम निर्माण केला होता. लीना केदारे व शिल्पा नेवे या मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले होते.

महाविद्यालयातील विद्यार्थी, श्रीपुंचे चाहते व साहित्यप्रेमी या दालनास केव्हाही भेट देऊ शकतात.

श्रीपुंच्या दुस-या स्मृतिदिनी पुरूषोत्तम बेर्डे यांचे व्याख्यान व दृकश्राव्य सादरीकरणाचा – ‘साहित्य आणि सिनेमा’ हा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी ‘भस्म’ व ‘निशाणी डावा अंगठा’ या सिनेमांच्या संदर्भात पुरूषोत्तम बेर्डे यांनी माहिती दिली.

यावर्षी, ७-८ ऑगस्ट २०१० ला अपर्णा पाडगांवकर यांच्या ‘सततच्या’ ‘चांगले, दर्जेदार लेखन करणारी ताज्या दमाची युवक मंडळी असतील तर कळव’ या सूचनेला अनुलक्षून ‘सर्जनशील लेखनाची कार्यशाळा’ घेण्याचे ठरवले. त्यासाठी अंजली कुलकर्णी व गणेश आचवल यांना निमंत्रित केले. अपर्णा पाडगांवकर मुद्दाम हजर राहिल्या होत्या. हा कार्यक्रम श्रीपु भागवतस्मृती अंतर्गत करण्याचे कारण म्हणजे श्रीपु व सर्जनशीलता यांचे असलेले नाते होय. कार्यशाळेत निवडक ऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता व त्यांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

साहित्यक्षेत्रातील श्रीपुंचे योगदान नव्या पिढीला कळावे हे श्रीपुंच्या स्मृतिदालनाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी ठरवलेले उद्दिष्ट ‘अगदीच योग्य प्रकारे सफल झाल्याचे विद्यार्थ्यांच्या त्या दालनाला भेटी देऊन तेथील पुस्तकांचा उपयोग केला जातो यावरून दृष्टीस येते’ असे अचला जोशी म्हणाल्या. मराठी विभागास माझी काही मदत हवी असल्यास मी त्यांच्या संपर्कात जरूर असते असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक वर्षीच्या स्मृतिदिनानिमित्त रूईयाच्या मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी, साहित्य, कला, शास्त्र या विषयांतील अभिजात गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्यात येईल. त्यायोगे विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत व ज्ञानात भर पडेल असे लीना केदारे यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांस उदंड प्रतिसाद लाभतो असे मराठी विभागातर्फे सांगण्यात आले. अशा प्रकारे रूईया महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थी-अध्यापकाचा वसा विद्यार्थ्यांच्या पुढील पिढ्यांना देण्यासाठी स्मृतिदालनाचा एक स्तुत्य असा पायंडा पाडला आहे असेच म्हणावयास हवे.

ही माहिती जमवण्याच्या निमित्ताने मी रूईया कॉलेजमध्ये व स्मृतिदालनात दोन-तीन वेळा गेलो. मुख्यत: शिल्पा नेवे मॅडम व तेथील अन्य मंडळींना भेटलो. या प्रत्येक वेळी, स्मृतिदालनात विद्यार्थ्यांचा वा अन्य पाहुण्यांचा फार वावर असावा असे मला जाणवले नाही. श्री.पु.भागवतांच्या स्मृत्यर्थ एक वार्षिक कार्यक्रम (यंदा तर तो सात-आठ ऑगस्टलाच होऊन गेला!) असे कर्मकांडी स्वरूप श्रीपुंबद्दलच्या स्मृतिभावनेला पहिल्या तीन वर्षांतच येऊन गेले आहे. खरे तर, श्रीपुंची स्मृती अजून उच्च अभिजन वर्गात जागती आहे, मात्र तिचे प्रतिबिंब या स्मृतिदालनात उमटत नाही. पु.ल. हे महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व तर श्री.पु.हे माननीय व्यक्तिमत्त्व. पु.ल. हयात असताना पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात ‘पु.ल. गौरव दर्शन’ असे कायमस्वरूपी प्रदर्शन तेथे लावण्यात आले. संघाने आरंभी प्रदर्शन दालनात दरवान ठेवून ते सतत उघडे राहील अशी व्यवस्था केली होती. तथापि, प्रदर्शनाकडे फार कोणी फिरकत नाही असे ध्यानी आल्यावर संघाने त्या दालनास कुलूप ठोकले. कोणी उत्सुक व्यक्ती विचारणा करू लागली तर तिला कामाच्या वेळात कुलूप उघडून प्रदर्शन दाखवले जाते. अचंबा असा वाटतो, की महाराष्ट्रातले लोक इंग्लंडला गेले, की शेक्सपीयरच्या जन्मगावी, स्ट्रॅटफर्डला जाऊन येतात. वर्डस्वर्थचा लेकवॉटर डिस्ट्रिक्ट पाहून येतात, वेगवेगळ्या साहित्यिक-कलावंतांची नीटपणे जपलेली स्मृती पाहून, आपल्याकडे असे नाही म्हणून हळहळ व्यक्त करतात. परंतु महाराष्ट्रातून मुंबईत येणारे किती लोक (किंवा खुद्द मुंबईचे देखील) आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचे हे दर्शन करण्याबाबत जागरूक असतात? तीच गोष्ट मराठी भाषा-संस्कृतीवर प्रेम करणा-या उच्चशिक्षितांची. त्यांनी श्रीपुंच्या या स्मृतिदालनास आवर्जून भेट द्यायला नको का? डॉ. अचला जोशी-प्राचार्य सुहास पेडणेकर- प्रा.लीना केदारे-प्रा.शिल्पा नेवे यांच्या प्रयत्नांना तरच बळ मिळेल.

राजेंद्र शिंदे

भ्रमणध्वनी : 9324635303

thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleदेशवंदना
Next article‘मान्सून’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.