रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य

3
125

डॉक्‍टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्‍या भूमिका – त्‍या रंगवताना त्‍या भूमिकांमागचा त्‍यांचा सर्वांगीण विचार, त्‍यांचं ‘नाटक’ या माध्‍यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्‍यांनी पाहिलेला–घडवलेला मराठी रंगभूमीचा काळ…  अशा विविध विषयांना स्‍पर्शणा-या लेखनाचं संकलन म्‍हणजे ‘रूपवेध’ हे पुस्‍तक होय. या पुस्‍तकाचा विशेष असा, की यात डॉक्‍टर लागूंनी लिहिलेले काही लेख प्रथमच पुस्‍तकरुपात प्रकाशित होत आहेत. पुस्‍तकाच्‍या प्रस्‍तावनेत रामदास भटकळ लिहितात, की डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या रंगभूमीवरील  कामाचा ‘लमाण’ या पुस्‍तकातून आढावा घेतला. मात्र त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांचे चित्रपटसृष्‍टीतले अनुभव, त्‍यांचे सामाजिक आणि सांस्‍कृतिक विचार आणि त्यांची त्‍यांवरील वैयक्तिक निष्‍ठा यांविषयी लिहिणं आवश्‍यक होतं. त्‍यांना त्‍यांच्‍या वृत्‍ती आणि प्रकृती यांमुळे ते लेखन करणं शक्‍य नव्‍हतं. ती उणीव डॉक्‍टरांच्‍या मुलाखती आणि त्‍यांचे इतर लेख यांमधून दूर करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.’

पुस्‍तकात विविध लेखांचं संकलन आहे हे स्‍पष्‍ट झालं असलं तरी त्‍या लेखांना मांडणीच्‍या अंगानं प्रवाही गती मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न दिसतो. तो परिणामकारकही आहे. पुस्‍तकाची विभागणी पाच विभागांत केलेली आहे. मात्र लेख संकलित असल्‍याने त्‍यांमध्‍ये निश्चित असं समसूत्र शोधणं कठिण असावं. त्‍यामुळे विभागांची नावं (पहिला विभाग वगळता) थोडी ढोबळ भासतात. मात्र त्‍यास पर्याय नसावा!

पहिल्‍या विभागात डॉक्‍टर लागूंनी लिहिलेली ‘गणूचा सदरा’ ही मार्मिक एकांकिका आहे. या एकांकिकेत माणसानं सभोवतालच्‍या उद्वेगजनक आणि असह्य गोष्‍टींनी अस्‍वस्‍थ व्‍हावं, की तात्‍पुरते उपचार करून त्‍याच्‍या मनाला आतून लागणारी बोच बोथट करून टाकावी असा सवाल उपस्थित करण्‍यात आला आहे. या एकांकिकेतून डॉक्‍टर लागू यांची नाट्याची सूक्ष्‍म जाण ध्‍यानात येतेच, पण त्‍यांच्‍यातल्‍या कलावंताचं भोवतालच्‍या प्रश्‍नांनी अस्‍वस्‍थ होणंही जाणवतं. डॉक्टरांनी त्‍यानंतरच्‍या काळात सामाजिक प्रश्‍नांवर ज्‍या भूमिका घेतल्‍या त्‍या विचारप्रक्रियेची छटा या लेखनात दिसून येते. (अशा छटा पुस्‍तकातील इतर लेखांतही आढळतात.)

दुसरा विभाग हा मुख्‍यतः नाटकांविषयीचा आहे. त्‍यात डॉक्‍टरांच्‍या संस्‍मरणीय भूमिका, आणि त्‍यांच्‍या आयुष्‍यातील नाटककार, दिग्‍दर्शक, सहकलाकार यांच्‍याविषयीचे लेख या स्‍वरुपाच्‍या लेखनाचा आहे. त्या विभागात सर्वप्रथम ओळख होते ती डॉक्‍टरांच्‍या अभिनयानं गाजलेल्या ‘वेड्याचं घर उन्‍हात’ या नाटकामधील दादासाहेब ठाकूर यांची. वसंत कानेटकरांनी लिहिलेली ती भूमिका डॉक्‍टर लागू यांच्‍या सशक्‍त भूमिकांपैकी एक मानली जाते. डॉक्‍टर ‘माझ्या भूमिकेचे वैशिष्‍ट्य’ या लेखातून ‘दादासाहेब’ या पात्राचं विश्‍लेषण करू पाहतात. सामान्‍यतः पात्रांचा अवकाश समजून घेताना त्‍यांची व्यक्‍त-अव्‍यक्‍त अशी दोन मनं समजावून घेणं स्‍वाभाविक ठरतं. डॉक्‍टर इथं त्‍या पात्राचा तीन विविध प्रतलांवरील वावर स्‍पष्‍ट करत जातात. दादासाहेबांच्‍या व्‍यक्तिरेखेचा प्रवास, त्‍यांची मानसिक घुसमट – त्‍यांचं ढासळणं असं सारं काही समजावून सांगतात. त्‍या पात्राच्‍या वागण्‍यातला विरोधाभास – त्‍याची कारणं, त्‍याच्‍या इच्‍छा आणि गरजा यांचं नेमकं सूचनही करतात. हे सगळं एवढ्या नेमकेपणानं मांडलं आहे, की ‘वेड्याचं घर…’ हे नाटक न पाहिलेल्‍यांच्‍या मनातही लागूंच्‍या रूपातील दादासाहेब उभे राहावेत! ती भूमिका वाचताना डॉक्‍टर भूमिकेचा विचार किती वैविध्‍यानं करतात याची जाणिव होते. असाच अनुभव येतो तो ‘‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर’ लेख वाचताना. लागूंनी ‘नटसम्राटा’बद्दल लिहिताना नाटकातील संवादांचा मोठा आधार घेतला आहे. ते वाचत असताना, लागू स्‍वतःच्‍या शब्‍दांची जोड देत वाचकाला मधूनच हळूच बेलवलकरांच्‍या गाभ्‍यापर्यंत आणून सोडतात. त्यामुळे त्‍याआधी ‘नटसम्राट’ पाहिला-वाचला असला तरी तो लेख वाचताना गणपतराव बेलवलकर नव्‍यानं समजत जातात. ‘नटसम्राट’ ही एका नटाची शोकांतिका आहे का? डॉक्‍टर या प्रश्‍नाचं उत्‍तर ‘हो आणि नाही’ असं दोन्‍ही बाजूंनी देतात. त्‍यांनी त्‍याचं केलेलं विश्‍लेषण त्‍यांची भूमिकांबद्दलची समज स्‍पष्‍ट करतं.

लागू पुढे लिहितात, की ‘नटसम्राट’ या नाटकानं मला माझी जीवनाची जाण अधिक विस्‍तीर्ण करणारा सखोल संस्‍कार दिला. त्‍या नाटकातील भाषेचं सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्‍दाशब्‍दाला फुटणारे आशयाचे धुमारे ह्या सा-यांनी जीवनाला मिळणारा भरभक्‍कम आधार दिला. ‘नटसम्राट’ करण्‍याच्‍या आधी मी जो होतो त्‍यापेक्षा नंतरचा मी अधिक ‘बरा माणूस’ झालो. एका नाटकाने माणसाला यापेक्षा जास्‍त काय द्यावे?’’ एखाद्या गोष्‍टीशी तादात्‍म्‍य पावल्‍याखेरीज मनात असे विचार मनात उमटणं शक्‍य नाही. लेखाच्‍या अखेरपर्यंत वाचकाला ‘नटसम्राटा’तील बेलवलकरांची –  माणसाच्‍या भग्‍नतेची – जाणीव झालेली असते. अखेरीस लागू लिहितात, की ‘‘अप्‍पासाहेबांच्‍या तोंडी असलेल्‍या वाक्‍यांच्‍या अनेक अर्थच्‍छटांचा बारकाईने, कसून मागोवा घेण्‍यासारखा आहे आणि तसे करणे हे अतिशय आनंदाचे आहे – मन उध्‍वस्‍त करणारे आहे.’’ तो आनंद आणि मन उध्‍वस्‍त करण्‍याची भावना लेखणीतून उतरलेल्या पात्रांच्‍या अंतर्मनाचा ठाव घेतल्‍याशिवाय समजणं शक्‍य नाही.

इथं एक बाब मांडावीशी वाटते, ती अशी, की ‘दादासाहेब’ आणि ‘बेलवलकर’ या दोन भूमिकांत आणि त्‍यांच्‍या शेवटात एक साम्‍य आढळतं. दादासाहेब आणि बेलवलकर ही दोन्‍ही व्‍यक्तिमत्‍त्वं संस्‍कारी आणि संपन्‍न आहेत आणि दोन्‍ही नाटकांत त्‍या व्‍यक्‍तिमत्त्वांचा, त्‍यांच्‍या संवेदनशील मनांचा -हास झालेला दिसून येतो. त्‍या भूमिकांचा बाज, मांडणी, अभिनिवेश वेगवेगळे असले तरी हा समान धागा दिसतोच. ‘वेड्याचं घर…’ या नाटकातील दादासाहेब या भूमिकेच्‍या आत्‍म्‍याशी विशिष्‍ट प्रमाणात मेळ साधणारी ‘नटसम्राटा’ची भूमिका डॉक्‍टरांना भविष्‍यात मिळाली तेव्‍हा त्‍यांना त्‍यांनी दादासाहेबांची वठवलेली भूमिका फायदेशीर ठरली असावी असा अंदाज बांधता येतो.

प्रतिमा (1974) नाटकातील भूमिकेत डॉ. श्रीराम लागूडॉक्‍टरांना भूमिकांची जाण जेवढी गहिरी आहे तेवढीच नाटकांचीही आहे. ती जाण पुस्‍तकातील ‘गिधाडे’, ‘हिमालयाची सावली’ यांसारख्‍या अनेक लेखांमधून स्‍पष्‍ट होते. डॉक्‍टरांनी साकारलेल्या नाटकांतील पात्रं, त्‍यांची भाषा – वागण्‍याची लकब – त्‍यातून साधला जाणारा परिणाम – त्‍यासाठीची प्रकाशयोजना या विविध घटकांच्‍या सूक्ष्‍म विचारातून नाटक घडण्‍याचा प्रवास दिसतो. नाटकांचा हा विभाग नाटकं आणि त्यातील भूमिकांसोबत वसंत कानेटकर आणि तेंडुलकर अशा नाटककारांना किंवा विजया मेहता आणि सत्‍यदेव दुबे अशा नाट्दिग्‍दर्शकांना, भक्‍ती बर्वे यांच्यासारख्‍या डॉक्‍टरांच्‍या सहकलाकारांना वाचकांसमोर मांडत जातो. या सर्व गोष्‍टींचा समग्र आलेख एकट्या-दुकट्या लेखामध्‍ये सापडणं शक्‍य नाही. सा-या गोष्‍टी परस्‍परांत गुंतल्‍या गेल्या असल्‍यानं त्‍या पुस्‍तकात विविध लेखांत विखुरलेल्‍या अवस्‍थेत आढळतात. म्‍हणजे डॉक्टरांनी समजावून सांगितलेली दादासाहेबांची भूमिका वाचली – समजली, तरीही अखेरच्‍या भागात रामदास भटकळांनी घेतलेल्या मुलाखतीत दादासाहेब काही अंशी नव्‍यानं समजतात. पुस्‍तकात हे अनेक घटकांबद्दल अनुभवास येतं. त्‍यामुळे अनेक ठिकाणी घटनांची व क्‍वचित विचारांची पुनरावृत्‍तीही झालेली दिसते. ‘गिधाडे’ नाटकाच्‍या वेळी झालेला सेन्‍सॉरसोबतचा वाद किंवा काही नाटकं-भूमिकांबद्दलचा विचार अशा गोष्‍टी पुस्‍तकात पुन्‍हा पुन्‍हा वाचकांसमोर येतात. ती पुनरावृत्ती भासते.

पुस्‍तकातील तिसरा विभाग आहे वैचारिक लेखांचा. त्‍यात लागूंनी नाटक आणि इतर विषयांबद्दल लिहिलेल्‍या लेखांचा समावेश आहे. हा विभाग इतर विभागांपेक्षा थोडा वेगळा भासतो, तो यासाठी, की इथं लागूंचे केवळ नट म्‍हणून नव्‍हे, तर एक रसिक म्‍हणून, व्‍यक्‍ती म्‍हणून विचार जाणून घेता येतात. त्‍यांतील एका लेखातला डॉक्‍टरांचा विचार विशेषपणे नमूद करावासा वाटतो. लागू यांनी ८ एप्रिल १९९९ रोजी पंडित कुमार गंधर्वांच्‍या जयंतीनिमित्‍त भाषण केलं होतं. त्‍या वेळी डॉक्‍टरांनी ‘त्यांना संगीताबद्दल अजिबात ज्ञान नाही, मात्र प्रचंड गोडी आहे’ असं सांगताना संगीताची सांगड रंगभूमीवरच्‍या अभिनयाशी घातली आहे. कुमार गंधर्वांशी बोलताना डॉक्‍टर त्‍यांना म्‍हणाले, की ‘तुमच्‍या संगीतातलं जे तत्त्‍व, जी शिस्‍त, आणि जे नेमकेपण आहे ते मला गद्य भाषणामध्‍ये आणायचंय’. हा विचार एका व्‍यक्‍तीचं संस्‍कारी मन उन्‍नत होऊन सभोवतालच्‍या गोष्‍टींचा –  भोवतालच्‍या कलांचा किती विविध पातळ्यांवर विचार करत असेल याची साक्ष देणारा आहे. त्‍यांचा हा विचार त्‍यांच्‍यातील नट, त्‍यांच्‍या भूमिका, आणि एकूण रंगभूमी याबद्दलचा सखोल विचार सांगतोच; सोबत डॉक्‍टरांनी त्‍यांचा व्‍यासंग आणि त्‍याला दिलेली कार्यक्षेत्राची वैचारिक जोडही दिसून येते. ‘अभिरुची घडवणे गरजेचे’ हा लेख त्या मानानं थोडा आटोपल्‍यासारखा वाटतो. जे वाचक फक्‍त नाटकांबद्दलचं लेखन वाचण्‍याच्‍या दृष्‍टीनं पुस्‍तक हातात घेतील त्‍यांना ‘माझी गाफिल पिढी’ हा लेख काहीसा उपरा वाटण्‍याची शक्‍यता आहे. त्यात डॉक्‍टर नाटकांना वगळून भोवतालच्‍या परिस्थितीबद्दल लिहितात. डॉक्‍टर हे मान्‍य करतात, की ते समाजकारणाच्‍या आणि राजकारणाच्‍या दृष्‍टीनं गाफील राहिले. त्‍यास त्‍यांची नाटकं कारणीभूत होती. हा लेख सूचक वाटतो. स्‍वातंत्र्यानंतर प्रत्‍येकजण ‘आता सगळं सुरळीत होईल’ या कल्‍पनेत गाफील राहिला हे त्‍यातून जाणवतं. या लेखातले विचार नटातल्‍या माणसाचे आहेत. ते नटाला घडवत असतात. डॉक्‍टरांचा भविष्‍यात समाजाभिमुख कार्यांमध्‍ये सहभाग दिसून येतो. त्याबाबत त्‍यांच्‍या मनात रुजलेलं बीज या लेखनात शोधता येतं.

‘सेन्‍सॉर’ या विषयाबद्दल  लागूंनी वेळोवेळी विचार मांडलेले आहेत. पुस्‍तकात ते अनेक लेखांत आढळतात. मात्र त्‍यांचा सेन्‍सॉरबद्दलचा (सेन्‍सॉर बोर्डाबद्दलचा नव्‍हे) नेमका विचार ‘आविष्‍कारस्‍वातंत्र्य आणि सेन्‍सॉरशिप’ या लेखातून स्‍पष्‍ट होतो. डॉक्‍टर तेथे योग्‍य पावित्रा घेतात. सेन्‍सॉर, मग ते कोणत्‍याही बाबतीतलं, कसं अनावश्‍यक आहे, हे सांगताना ते सेन्‍सॉरवर हल्‍ला चढवण्‍याऐवजी कोणत्‍याही कलाकृतीचा नेमका उद्देश आणि समाजाच्‍या त्‍याबद्दलच्‍या (खुळचट) कल्‍पना यांना हात घालतात. ते वाचकांना कलाकृतीच्‍या अस्तित्‍वाचा अर्थ आणि तिच्‍या कर्त्‍याच्‍या आविष्‍कारस्‍वातंत्र्याचं महत्‍त्व समजावण्‍याचा प्रयत्‍न करतात. वाचकांना ते समजल्‍यानं सेन्‍सॉरची गरज नसल्‍याची बाब आपसूक कळत जाते. मग सेन्‍सॉर बोर्डावर आघात करण्‍याची गरजच उरत नाही. त्‍यानंतर सेन्‍सॉरनं ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’ या नाटकांवरून निर्माण केलेले गदारोळ कथन केले जातात. ते सेन्‍सॉरच्‍या अनावश्‍यकतेवर अखेरचा शिक्‍का मारल्‍यासारखं असतं. त्या विभागात विशेष करून डॉक्‍टरांचं स्‍वतःच्‍या आयुष्‍याबद्दलचं (अर्थातच  नाटकांच्‍या पार्श्‍वभूमीवर) कथन आहे. यात ‘नाटकांची झिंग’, ‘डॉक्‍टरकी सोडण्‍याचा निर्णय’, ‘दीपा आणि मी’ असे लेख येतात. कुठल्‍याही विचारी व्‍यक्‍तीच्‍या आयुष्‍याला असलेलं पुस्‍तकांचं देणं श्रीराम लागूंनाही लाभलं. त्‍यावरील विवेचन ‘पुस्‍तकांनी आयुष्‍याला आकार दिला’ या लेखात येतं. पण एवढ्या मोठ्या आणि सघन प्रवासानंतरही या अभिनेत्‍याच्‍या मनात काही गोष्‍टी राहून गेल्‍या आहेत. मात्र ती खंत नाही, केवळ चुटपूट. ‘यशस्‍वी तरीही…’ मध्‍ये त्या बाबी जाणवतात.

पाचवा आणि अखेरचा विभाग श्रीराम लागू यांच्‍या विविध मुलाखतींचा संग्रह आहे. पुस्‍तकाच्‍या पहिल्‍या चार टप्‍प्‍यांत बरीच माहिती मिळाल्‍यामुळे या विभागात पुनरावृत्‍ती जाणवते. मात्र ती वाचनास फारसा अडथळा आणेल अशा स्‍वरूपाची नाही. कारण या मुलाखतींच्‍या स्‍वरूपात वैविध्‍य आहे. पहिल्‍याच, रामदास भटकळांनी घेतलेल्‍या मुलाखतीत डॉक्‍टर त्यांच्‍या उमेदीच्‍या काळाविषयी सांगतात. तेव्‍हा ते त्‍यांच्‍या चुकांकडे तटस्‍थपणे पाहताना दिसतात. त्‍यापुढील ‘मला नट असा हवा’ या मुलाखतीत लागूंचे नट आणि अभिनय याबद्दलचे विचार जाणून घेता येतात. याप्रकारे डॉ. नरेंद्र दाभोळकर, निखिल वागळे, वि.भा. देशपांडे, महेश एलकुंचवार, सुधीर गाडगीळ यांसारख्‍या प्रसिद्ध व्‍यक्‍तींनी विविधांगांनी घेतलेल्‍या मुलाखती वाचता येतात.

लागूंच्‍या प्रस्‍तुत लेखनातून आणि मुलाखतींतून मराठी रंगभूमीचा मोठा कालखंड उलगडत जातो. तो उलगडताना डॉक्‍टरांचा हेतू केवळ गतकाळच्‍या सुरस कहाण्‍या सांगून त्‍यात रमण्‍याचा नाही. त्‍यांना त्‍या घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर स्‍वतःचा विचार मांडायचा आहे. असा विचार जो भूतकाळातील विविध प्रसंगांतून, त्‍यांनी साकारलेल्या भूमिकांमधून घडत गेला आहे. डॉक्‍टरांचे त्‍यांची नाटकं, त्‍यांतील भूमिका, त्‍याचं लेखन-सादरीकरण, अभिनय अशा विविध गोष्‍टींबद्दलचे विचार प्रगट होत जातात. तोच ‘रूपवेध’ पुस्‍तकाचा सर्वात मोठा विशेष ठरतो. पुस्‍तकातील डॉक्‍टरांच्‍या कथनामागे रंगभूमी आणि नाटक या दोहोंबद्दलचा जेवढा आपलेपणा आहे तेवढाच तटस्‍थ विचारदेखील आहे. त्‍यामुळे त्‍यात अनावश्‍यक अशी भावुकता नाही आणि असलीच तर ती निर्लेप आहे. डॉक्‍टरांची अभिनयाची विविध तंत्रं, वाचासामर्थ्‍य, भूमिकांचा-नाटकांचा सारासार विचार हे सारं संचित त्‍यांच्‍या ‘ट्रायल अॅण्‍ड एरर’ अशा धडपडीतून जमा झालेलं आहे. त्‍यामुळे त्‍याला तपश्‍चर्येचा गंध आहे. ते ज्ञान आज विविध संस्‍थांमधून शिकवलं जातं. त्‍याची जाणीव असल्‍यामुळे डॉक्‍टर ते ज्ञान वाटण्‍याचा प्रयत्‍न करत नाहीत. मात्र ते मिळवतानाच्‍या धडपडीतून मनात उमटलेले विचार, त्‍यांच्‍या अवलंबत्‍वातून मिळालेला अनुभव ते सांगू पाहतात. तो अनुभव फार मोलाचा आहे. अभिनेते, लेखक, दिग्‍दर्शक अशा सर्व त-हेच्‍या कलावंतांसाठी हे संचित मार्गदर्शक तत्‍त्‍वांसारखं आहे.

डॉक्‍टर श्रीराम लागू यांच्यासारख्‍या प्रतिभावंत आणि कलेशी इमान राखणा-या अभिनेत्‍याचा हा मानसिक-वैचारिक प्रवास आहे. तो शब्‍दांत पकडण्‍याचा प्रयत्‍न ‘रूपवेध’ पुस्‍तकात करण्‍यात आला आहे. ‘लमाण’नंतर ‘रूपवेध’च्‍या रूपानं डॉक्‍टर लागू यांच्‍या नाट्यविषयक लिखाणाला मोठी जोड मिळाली आहे. पुस्तकात एके ठिकाणी डॉक्‍टर दादासाहेबांची भूमिका स्‍पष्‍ट करताना लिहितात, की ‘दादा’ ही भूमिका रंगभूमीवर साकार करताना जी व्‍यथा मी साकारण्‍याचा प्रयत्‍न केला, ती शब्‍दांत पकडण्‍याचा हा प्रयत्‍न आहे. रंगभूमीवरच्‍या माझ्या प्रयत्‍नांपेक्षाही हा प्रयत्‍न अधिक तोकडा पडला असेल याची जाणीव मला आहे. या दोन्‍ही प्रयत्‍नांच्‍या पलीकडे असे पुष्‍कळच या भूमिकेत आहे असा माझा विश्‍वास आहे. कुणा थोर नटाला ते सापडो एवढीच माझी इच्‍छा आहे.’

हीच गोष्‍ट डॉक्‍टरांच्‍याही बाबतीत लागू पडते. या साहित्‍यकृतीतून डॉक्‍टरांचा नाट्यविषयक विचार सविस्‍तर मांडण्‍यात आला असला तरी तो संपूर्ण आहे असं म्‍हणता येणार नाही. या लेखनाच्‍याही पलीकडे डॉक्‍टर आणि त्‍यांचं चिंतन कुठेतरी उरलं असावं असं वाटत राहतं. आपल्‍याला हिमनगाचं केवळ पाण्‍यावर असलेलं टोक दिसतंय. त्‍या खाली खूप काही दडलेलं असेल. कुणा जाणकाराला ते सापडो!

(पूर्वप्रसिद्धी साप्‍ताहिक विवेक जुलै २०१३)

पुस्तकाचे नाव : रूपवेध
लेखक : डॉ. श्रीराम लागू
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि. ३०१, महालक्ष्मी चेंबर्स,
२२, भुलाभाई देसाई रोड, मुंबई – २६.
मूल्य : ६७५/- रु.  l  पृष्ठ : ४९३

किरण क्षीरसागर

About Post Author

Previous articleशम्स जालनवी – कलंदर कवी
Next article‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ – बाळ कुडतरकर
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

3 COMMENTS

Comments are closed.